Monday, June 8, 2015

सोमनाथ दर्शन, अडाणीपणाचे प्रदर्शन



गुजरात राज्यातील सोमनाथचे मंदिर ही ऐतिहासिक वास्तू आहे. तसे बघितले तर ह्या वास्तुला ऐतिहासिक संबोधणे गैर ठरावे. कारण भा्रतावर जी शेकडो आक्रमणे झाली, त्यात सोरटी सोमनाथला महत्व अधिक आहे. वारंवार या श्रीमंत अशा धर्मस्थळावर हल्ले करून तिथली संपत्ती लुटण्यात आली. सततच्या हल्ल्यात तिथली सोमनाथाची मुर्ती फ़ोडली गेली त्याची धार्मिक आक्रमणाची छटा महत्वाची आहे. किंबहूना त्यातूनच या खंडप्राय देशात धार्मिक तेढ निर्माण झाली. तात्कालीन मुस्लिम आक्रमकांनी नुसती देशाची व प्रदेशाची लुट केली नव्हती. तर हिंदूस्तानातील धर्मश्रद्धांवर हल्ले चढवले होते. आज जो अयोध्येचा वाद चालू आहे, तितकेच सोरटी सोमनाथ हे ऐतिहासिक स्थान आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर तात्कालीन उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन त्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. नव्याने त्यांनी त्याची सन्मानपुर्वक विधीवत पुनर्बांधणी केली. अशा मंदिराचे विश्वस्त कायम राजकीय वा सत्ताधारी नेतेच राहिले आहेत. आज तिथे भाजपाचे नेते विराजमान झालेले दिसतील. पण भाजपाचे राजकीय प्राबल्य निर्माण होण्यापुर्वी कॉग्रेसचेच नेते सोमनाथचे विश्वस्त राहिलेले आहेत. पटेलांनी त्या आघातग्रस्त मंदिराची पुनर्बांधणी केल्याने कोणी त्यांच्यावर जातीयवादी वा धर्मांधतेचा आरोप केला नव्हता. असा सोमनाथच्या मंदिराचा अलिकडला इतिहास आहे. त्याच्या नव्या उभारणीचा संदर्भ देऊन अयोध्येचा विषय भाजपाने गाजवला. तेव्हा पटेल भाजपाचे नव्हते आणि त्यांनीच संघावर बंदी घातल्याचे हवाले दिले जातात. पण त्यांनीच सोमनाथचा जोर्णोद्धार केला तेही विसरून चालणार नाही. तेव्हाच्या कॉग्रेसला हिंदूंच्या धर्मभावना किंवा श्रद्धांना लाथाडून धर्मनिरपेक्षतेचे प्रदर्शन मांडण्याची गरज भासत नव्हती. म्हणूनच सरदार पटेल सोमनाथ उभारू शकले. आज तेही शक्य झाले नसते.

आता त्या मंदिरात केवळ हिंदूंना प्रवेश देण्याच्या विषयाने वाद उदभवला आहे. हल्ली तिथल्या व्यवस्थापकांनी तशी घोषणा केल्याने त्याला धार्मिक भेदभाव ठरवले जात आहे. ह्यातला विरोधाभास बघायला हवा. सोमनाथ हे मंदिर असेल, तर तिथे भाविक हिंदूंनीच जायला हवे आणि ज्यांची त्यावर श्रद्धाच नसेल, त्यांनी तिथे कशाला फ़िरकावे? मग पर्यटन म्हणून जायची मुभा मागितली जाते. अशी अनेक स्थळे व वास्तु देशात आहेत, जिथे पुरातन वा ऐतिहासिक म्हणून पर्यटन मूल्य लक्षात घ्यावे लागेल. ज्या धर्माच्या चालिरीती असतात, त्याची जपणूक करणार्‍यालाच तिथे प्रवेश असायला हवा. ज्याला तिथल्या श्रद्धा वा भावनांशी कर्तव्य नसेल, त्याने तिकडे फ़िरकण्याची गरज काय? सौदी अरेबियात मक्का शहरात काबा हे मुस्लिमांचे अत्यंत पवित्र स्थळ आहे. त्या मक्का शहरात बिगर मुस्लिमांना फ़िरकताही येत नाही. काबा सोडाच, पण मक्का मदिना या ऐतिहासिक शहरात बिगर मुस्लिमांना स्थान नाही. मग हिंदूंच्या मदिराला तितके पावित्र्य नाकारण्यात काय अर्थ आहे? त्या श्रद्धेचे पालन व जतन करणार्‍यांच्या मर्जीवरच तिथे प्रवेश असू शकतो. ज्याला त्या श्रद्धेचा वा धर्मभावनेचा पाठपुरावा करायचा आहे, त्याला प्रतिबंध होत असल्यास गोष्ट वेगळी. पण त्या ठराविक धर्मश्रद्धेलाच ज्याचा विरोध आहे, त्यालाही तिथे जाण्याची मोकळीक मागणी एकप्रकारे त्या श्रद्धेची पायमल्ली नाही काय? पर्यायाने त्या धर्माशी केलेला तो राजकीय वा सरकारी भेदभाव नाही काय? जे सरकार वा कायदा अन्य कुणाच्या धर्मश्रद्धेमध्ये हस्तक्षेप करीत नाही, त्याला हिंदूंच्या धर्मश्रद्धेत ढवळाढवळ करायचा अधिकार कुठली घटना वा कायदा देतो? सहाजिकच सोमनाथच्या विश्वस्तांनी बिगर हिंदूंना त्या मंदिरात प्रवेश नाकारला असेल, तर त्यात बेकायदा वा गैरलागू असे काहीच नाही. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याचाही सन्मान व्हायलाच हवा.

पण त्या बाबतीत नुसती घोषणा झाली आणि विनाविलंब काहूर माजवायला तमाम सेक्युलर बोलघेवडे सज्ज झाले. लगेच हिंदूत्ववाद्यांना धर्मांध ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली. आपल्या बौद्धिक, तार्किक व अभ्यासू अडाणीपणाचे प्रदर्शन मांडणे, हे अलिकडे आपल्याकडल्या सेक्युलर जाणतेपणाचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. म्हणूनच सोमनाथ मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश नाकारण्याचे सेक्युलर भांडवल करण्याचा तमाशा सुरू झाला. ज्यांना तिथे बिगर हिंदूंना प्रवेश असायला हवा असे वाटते, त्यांना हिंदूश्रद्धा ही मुर्तीपूजा असल्याचे ठाऊक असायला हवे. सोमनाथ हे प्रतिकाचे पूजन करणारी श्रद्धा आहे. सहाजिकच तिथे मुस्लिम वा एकेश्वरवादी भाविकांना जाताच येत नाही. कारण त्यांच्या श्रद्धेला तिथे धक्का बसत असतो. तिथे गेल्यास मुर्तीला वा प्रतिकाला भजायला हवे. माथा टेकायला हवा. आणि तसे करणे एकेश्वरवादाला मंजूर नाही. तशी किंचितही शक्यता असू नये, म्हणून मुस्लिम देशात मुर्तीला प्रतिबंध असतो. इसिसने जुन्या प्राचीन मुर्तीही तोडून फ़ोडून टाकल्या. अशा इस्लामचे आचरण करणार्‍यांनी मंदिरात जाणे म्हणजे घोर पाप असते. तीच कथा ख्रिश्चन आचरण करणार्‍यांची आहे. मग त्यांनी तिथे जाऊन माथा टेकण्याची एकप्रकारे सक्तीच होते. अनवधानाने त्यांना हिंदू चालिरीतीचे पालन करायला लावणे, म्हणजे त्यांच्या धर्मश्रद्धांची पायमल्ली नाही काय? एकप्रकारे ती छुपी ‘घरवापसी’ नाही काय? मग एकीकडे हेच सेक्युलर घरवापसीच्या विरोधात बोंबा ठोकणार. म्हणजे ज्यांना समजावून वा त्यांचे मतपरिवर्तन घडवून त्यांना हिंदू धर्मात आणण्यावर काहूर माजवले जाणार आणि दुसरीकडे नकळत त्याच विगर हिंदुंना धार्मिक हिंदूश्रद्धांचे पालन करायला भाग पाडण्याचाही आग्रह धरणार. हा निव्वळ विरोधाभास नाही काय? इतका मुर्खपणा चालू आहे. कारण अशा विषयात अकारण नाक खुपसणार्‍या सेक्युलर अर्धवटांना धड कुठल्याही धर्मश्रद्धांची माहिती वा अभ्यास नाही, की त्याच्याशी कर्तव्यही नाही. जे काही हिंदू संस्था वा संघटना करतील, त्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले मग आपण सेक्युलर झालो, अशा समजूतीतून त्यांची वाटचाल सुरू असते.

मशिदीत जाणार्‍याला बोडक्या डोक्याने तिथे जाता येत नाही. अमृतसर वा अन्य कुठल्या गुरूद्वारात जाणार्‍यांना आपले मस्तक मोकळे ठेवून प्रवेश नाही. तिथे गेल्यावर ग्रंथसाहेब वा पवित्र स्थानी माथा टेकवावाच लागतो. उलट मशिदीत माथा टेकण्याची मोकळीक नाही. तर मक्केच्या दिशेने नतमस्तक व्हाय़चे असते व दुवा मागायचा असतो. ही बाब इतकी काटेकोर आहे, की भारतीय उपखंडात दिसणारे नावाजलेले दर्गेपीरही इस्लामची विटंबनाच आहे. म्हणून तर काश्मिरातील चरारे शरीफ़ व हजरतबाल दर्गा जिहादींनीच बॉम्ब लावून उध्वस्त केले. अयोध्येविषयी गळा काढणार्‍यांनी कधी त्या दोन काश्मिरी मशिदी दर्ग्याच्या मोडतोडीबद्दल दोन अश्रू ढाळले आहेत काय? नसतील तर बाबरीसाठी मातम करण्याची गरज काय? त्यापैकी कोणालाही बाबरीचे कौतुक नाही. वेदना बाबरीच्या उध्वस्तीकरणाची नाहीच. तर पाडणारे कोण त्याची यातना अधिक आहे. असो, मुद्दा धर्मस्थानाचा आहे आणि तिथे कोणी जायचे त्याची तिथे श्रद्धा असायला हवी. कारण ते श्रद्धास्थान आहे आणि ज्यांची श्रद्धा असते त्याच्यासाठीच त्याची उभारणी केलेली असते. त्यात अश्रद्ध लोकांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. खरे तर हा दोन्ही बाजुंनी अन्याय असतो. एकीकडे ज्यांचे श्रद्धास्थान आहे त्यांना अवमानित केले जाते आणि ज्यांची तिथे श्रद्धाच नाही, त्यांना तिथे पाठवून त्यांच्या भिन्न श्रद्धांची विटंबना अनवधानाने व्हावी, असा खेळ केला जात असतो. एकप्रकारे सोमनाथच्या या प्रतिबंधाने बिगर हिंदूंना त्यांच्या धर्मश्रद्धा काटेकोरपणे पाळण्यासच मदत होते. प्रामुख्याने मुस्लिमांना त्यांच्या धर्मश्रद्धा जपायला असा प्रतिबंध हातभार लावत असेल, तर मुस्लिम धार्जिण्या सेक्युलरांनी त्या बंदीचे स्वागत करायला हवे. पण यापैकी कशाचाही गंध त्यांना नसल्याने सवयीनुसार हिंदूनी निर्णय घेतला, मग कोल्हेकुई विनाविलंब सुरू झाली. अडाणीपणाचे प्रदर्शन सुरू झाले.

No comments:

Post a Comment