Thursday, June 25, 2015

२५ जुन १९७५



२५ जुन १९७५
त्या दिवशी दै. ‘मराठा’त मी रात्रपाळीला होतो. माझ्या सोबत प्रदीप वर्मा (पुढे तो लोकप्रभाचा संपादक झाला) होता. रात्री साधारण एक वाजता आमचे काम संपले आणि पाने छपाईला पाठवून आमच्या गप्पा चालू झाल्या. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींची निवड रद्द केली होती आणि त्यामुळे तेव्हाचे राजकारण गढूळ झालेले होते. सहाजिकच इंदिराजी काय पावले उचलतील, हाच विषय गप्पात होता. पावणे दोनच्या सुमारास छपाई सुरू झाली आणि तिथेच पेपरची फ़ाईल उशाला घेऊन आम्ही दोघे निद्रादेवीला शरण गेलो. सवयीनुसार प्रदीप सकाळी साडेसहाला उठून निघायचा. तर मी नऊ वाजेपर्यंत लोळत पडलेला असायचो. ‘सांज मराठा’चा संपादक येऊन टेबल मोकळे करायसाठी माझी झोपमोड करायचा प्रघात होता.

२६ जुन १९७५
त्या दिवशी सकाळी प्रदीपनेच माझी झोपमोड केली. मी चिडतो, शिव्या घालतो हे ठाऊक असूनही त्याने मला उठवण्याचा उद्योग केला. सवयीप्रमाणे तो उठला आणि घरी निघण्य़ापुर्वी त्याने पीटीआयच्या टेलिप्रिंटरवर नजर टाकली. त्यामुळे उत्तेजित होऊन त्याने मला हाक मारली होती. ‘भाऊ उठ, राडा झालाय. इंदिरेने आणिनाणी लावलीय. दिल्लीत मोठी धरपकड झालीय. जयप्रकाश, वाजपेयी अनेक संपादकांना गजाआड टाकलेय बाईने.’ मी तसाच डोळे चोळत उठलो आणि माझ्या हाती टेलिप्रिंटरचे भेंडोळे सोपवून प्रदीप सटकला. मी डोळे किलकिले करून त्यातल्या बातम्या बघू लागलो. खरेच एकामागून एक ब्रेकिंग न्युज होत्या. तेव्हा त्याला स्नॅप किंवा फ़्लॅश असे शिर्षक असायचे. त्यानंतर तपशील म्हणून लीडच्या बातम्या येत. त्यावरून नजर फ़िरवली आणि माझी उरलीसुरली झोप उडाली. तसाच तडक कॅन्टीनमध्ये जाऊन दोन चहा फ़र्मावले आणि येऊन चुळा भरल्या. अजून कंपोज खात्यात रेंगाळलेल्या चार कामगारांना गांभिर्य समजावले आणि कामाला जुंपले. उद्या पेपर निघेल किंवा नाही याची खात्री नव्हती. कारण दिल्लीत मोठ्या दोन वर्तमानपत्राच्या संपादकांनाही अटक आणि छापखाने सील केल्याचा उल्लेख त्यात होता. लुंगी गुंडाळलेल्या तशाच अवस्थेत कामाला बसलो. घाईघाईने जमेल तशा बातम्या खरडू लागलो. आठ वाजण्याच्या सुमारास एक एक कागद घेऊन कंपोज करणार्‍या त्या चौघांनी चार पाने पुर्ण करत आणली होती. मध्यंतरी नुसता दोन कप चहा ढोसून मी बातम्या उपसल्या होत्या. त्यातली शेवटची बातमी होती मोहन धारियांची

पंडित नेहरूंनी लावलेला लोकशाहीचा वृक्ष त्यांच्याच कन्येने उखडून टाकला, अशी काहीशी ती प्रतिक्रीया होती. शेवटचे ते लिहून मी पाने भरायला कंपोजमध्ये गेलो. पण आमचे कामगार किती हुशार? त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून छपाई खात्यातल्यांना तसेच रोखून धरलेले होते. ‘सांज’ लौकर छापायचाय हे मला सांगायला जावेच लागले नाही. इतके झाल्यावर डोक्यात आले छापून काय उपयोग? वाटणार कोण आणि विकणार कोण? वाक्कर व आंबेरकर असे दोघे वितरण-जाहिरात खात्याचे लोक ‘मराठा’तच मुक्कामाला असायचे. पुन्हा चहाची ऑर्डर देऊन त्यांच्याकडे धावलो. तेव्हा दादर स्थानकाच्या बाहेर पश्चिमेला तावडे नावाचा मोठा एजंट होता. तोच सांजचे वितरण करायचा. त्याला तात्काळ बोलावून घ्यायचे वाक्कर यांना सुचवून जागेवर आलो. साडेआठला ‘सांज मराठा’चा उपसंपादक प्रभाकर राणे नेहमीचे हास्य चेहर्‍यावर पांघरून हजर झाला. मिश्किलपणे मला म्हणाला, आज लौकर उठलास? चल जागा खाली कर. मी त्याला म्हटले, कंपोजमध्ये जाऊन मजकूर किती हवा ते तर बघून ये. तिथे कामगार त्याच्या प्रश्नावर हसू लागले आणि सांजची पाने छापायला गेली ऐकून तो चकीत झाला. मग मला येऊन विचारतो, झाले तरी काय? तेव्हा त्याला जगात काय चालले आहे, त्याची कल्पना दिली. तोवर पीटीआयचा टेलिप्रिंटर रेंगाळू लागला होता. बातम्यांचा ओघ कमी झालेला होता. तासाभराने तावडे शिवशक्तीत हजर झाला आणि त्याला परिस्थितीची कल्पना दिली. पोलिस कुठल्याही क्षणी येऊन प्रेस बंद करतील, तेव्हा होतील तितक्या प्रती उचलून बाजारात घेऊन जा. त्यानेही पळापळ केली. पहिल्या आठ हजार कॉपी त्याने नेल्या आणि पुढल्या होतील तशा प्रति मिळेल त्या टॅक्सीने दादरला पाठवण्याचे काम वाक्कर पार पाडत होते.

अकरा वाजेपर्यंत ३५ हजारहून अधिक सांज मराठा बाजारात गेला होता. त्यानंतर मात्र छापलेल्या पाच हजार कॉपी जाऊ शकल्या नाहीत. कारण एव्हाना पोलिस आपला ताफ़ा घेऊन हजर झाले होते आणि त्यांनी छपाई थांबवली. असलेल्या कॉपी रोखल्या. पोलिस आणि वाक्कर यांच्यात जुंपली होती. पण वरळी ठाण्याचेच अधिकारी होते आणि ते रुबाब दाखवण्य़ापेक्षा समजूत घालत होते. पुढे काय होईल आणि आताही काय चालू आहे ठाऊक नाही. कृपया आगावूपणा करू नका. अखेर पोलिसांपुढे काय चालणार होते? छपाई थांबली. सव्वा अकराच्या सुमारास टेलिप्रिंटरची घंटी वाजली आणि तो बंद पडला. उठून तिकडे धावलो. तर शेवटचा संदेश होता. टेलिप्रिंटर कोमात. सरकारने सेन्सॉर लागू केला आहे आणि पुढले आदेश येईपर्यंत कुठलीच बातमी देता येणार नाही. एव्हाना रेडीओ आणि दुरदर्शनवर इंदिराजी झळकल्या होत्या आणि एक एक करून आमचे ज्येष्ठ सहकारी शिवशक्तीमध्ये दाखल होऊ लागले होते. दुपारी बारा वाजता ऑफ़िस सोडून मी घरी गेलो. भरभर अंघोळ जेवण उरकून पुन्हा मराठात आलो. सगळे सुतकी चेहर्‍याने बसलेले होते. उद्याचा पेपर निघणार किंवा नाही याची काहीच खात्री नव्हती. पुढले आदेश व नियम जाहिर होईपर्यंत काहीही छापायला सरकारने बंदी जारी केली होती. येताना बघत बघत आलो त्यामुळे कळले, की ‘सांज मराठा’ सोडला तर मुंबईत कुठलाच संध्याकाळचा पेपर बाजारात येऊ शकला नव्हता. दुपारी निघणारे इंग्रजी दोन पेपर छपाईला जाण्यापुर्वीच पोलिस तिथे थडकले असल्याने निघू शकले नव्हते. एकूण सांज मराठा सोडला तर आणिबाणी लागू झाल्याचे वृत्त सेन्सॉर लागण्यापुर्वी कुठल्याच वृत्तपत्राला देता आलेले नव्हते. प्रदीपने झोपमोड केली आणि छपाई व कंपोजच्या कामगारांनी प्रसंगावधान राखले म्हणून तो आणिबाणीतही सेन्सॉरशिवायचा पेपर निघू शकला होता.

दुपारभर आणि संध्याकाळ झाली तरी काहीही करणे शक्य नव्हते. सगळे सुतकी चेहरे होते आणि भविष्यावर भलेथोरले प्रश्नचिन्ह लागलेले होते. सेन्सॉर म्हणजे काय आणि ते कोण करणार? प्रत्येक पेपर व बातम्या सेन्सॉर कशा होऊ शकतील? असले विषय चघळले जात होते. दैनिकाचे काम दिवसभर चालायचे. आजच्यासारखे तेव्हा संगणक नव्हते. मग इतकी पाने कंपोज व्हायची कधी? काहीही सुचत नव्हते आणि कुणालाच सुचत नव्हते. अखेर सूर्य पश्चिमेला झुकला आणि काळोख पडायची चिन्हे दिसू लागली. सव्वा सातच्या सुमारास पुन्हा मरगळल्या किंवा कोमात गेलेल्या टेलिप्रिंटरला जाग आली. त्याची घंटी वाजली आणि खडखड सुरू झाली. जवळच असल्याने आधी मी तिकडे धावलो. बाकीचेही धावले. सेन्सॉर व वृत्तपत्रांसाठी आचारसंहिता त्यावर येत होती. ती समजून घेऊन कामाला लागायचे तर रात्री नऊ वाजेपर्यत कामाला आरंभच होऊ शकणार नव्हता.

२६ जुन १९७५ चा सूर्य असा उजाडला आणि असा मावळला.

1 comment:

  1. "आणीबाणीला विरोध, लोकशाहीचे पुनरुज्जीवन, लोकशाही श्रेष्ठ" ह्या सर्व श्रेष्ठ गोष्टी आहेत. पण आता दोन्हीही कडचे लोक म्हणजे त्यावेळचे आणीबाणीचे समर्थक आणि आणीबाणीचे विरोधक या गोष्टी म्हणतात.

    तेंव्हा एवढेच म्हणावेसे वाटतेय "सैतानाच्या तोंडी बायबल आहे" किंवा "सैतानाचे वंशज आता बायबल म्हणू लागले आहेत".

    ReplyDelete