गेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या आधीपासून नरेंद्र मोदी यांच्यावर मार्केटींगचा आरोप होत राहिला. गुजरातमध्ये आपण खुप विकास वा प्रगती केली, असे दावे मोदींनी तेव्हाही केले नव्हते. फ़क्त अन्य पुरोगामी राज्ये आणि गुजरात यांची तुलना मोदी करीत राहिले. तेव्हा त्यांच्या मूळ दाव्यांना खोडण्यापर्यंत पुरोगाम्यांची मजल गेली होती. पण उलट गुजरात दंगलीचे जे बारा वर्ष मार्केटींग चालले, ते मात्र प्रत्येक दिवसागणिक कोर्टातही खोटे पडत चालले होते. त्याबद्दल माध्यमे वा पुरोगाम्यांनी चकार शब्द कधी बोलला नाही. एकूणच सामान्य माणसाला ही मार्केटींग काय भानगड आहे, त्याचा फ़ारसा गंध नसतो. म्हणूनच असे अनेक शब्द सरसकट माध्यमातून वा बोलण्यातून लोकांच्या माथी मारले जात असतात. त्यातून काही प्रतिमा व कल्पना लोकांच्या डोक्यात भरवल्या जातात. त्या खर्या नसल्या तरी सतत माथी मारून खर्या वाटाव्यात, अशी स्थिती निर्माण केली जाते. गुजरात दंगल असो किंवा फ़ेअर एन्ड लव्हली सारखी क्रीम असोत. त्याच्या मार्केटींगची एक ठराविक रणनिती असते. त्यातला पहिला भाग असा आसतो की तुमच्यात न्युनगंड निर्माण करणे आणि मग त्यावर आपले मार्केटींग माथी मारणे. त्वचेचा काळेपणा किंवा निमगोरेपणा ही त्रुटी असल्याचे एकदा तुमच्या डोक्यात बसले, मग तुम्हाला गोरे होण्याची अनिवार इच्छा होते. त्यातून मग चारपाच दिवसात गोरेपण देणार्या क्रीमचा धंदा सुरू होतो. त्यामुळे तुम्हाला गोरेपण मिळत नाही. पण गोरे होत नसलो तरी आपण अमूक एक क्रीम वापरतो, म्हणून गोरे अशा भ्रमात तुम्ही न्युनगंडाला दाबू शकता. स्पष्टपणे ही चाललेली दिशाभूल असते. त्याला जितका मार्केटींगचा मारा कारणीभूत असतो, तितकाच तुमच्यातला न्युनगंडही जबाबदार असतो. तुम्ही आपल्याच त्वचेच्या रंगाने लाजत असता, हे अशा मार्केटींगचे खरे भांडवल असते.
गुजरात दंगलीत मुस्लिम वा हिंदू आपापल्या लोकसंख्या प्रमाणातच मारले गेले आणि दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापल्या प्राबल्याच्या भागात तितकीच हिंसा केली. पण त्यात मुस्लिम मारले गेल्याचा प्रचंड गवगवा करण्यात आला आणि हिंदूंच्या हत्या झाल्याचा तपशील सातत्याने झाकला गेला. सहाजिकच गुजरात बाहेरच्या हिंदूंच्या मनात त्यातून अपराधगंड निर्माण करण्याचा सपाटा माध्यमातून व विविध व्यासपीठावरून लावला गेला. त्याचा परिणाम असा झाला, की भाजपाचेही अनेक कार्यकर्ते व नेते मोदींच्या बचावाला पुढे येऊ शकले नाहीत. पण जेव्हा गुजरात दंगलीचा बाजार उठू लागला आणि मोदींनी सत्ताकाळात केलेल्या विकास व प्रगतीच्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या; तेव्हा पुरोगामी मार्केटींगची तारांबळ उडाली. म्हणून मग मोदी खोटे बोलतात व प्रगतीचे खोटे आकडे सांगतात, असा भडीमार सुरू झाला. त्यात कुठल्याही सत्यापेक्षा आकड्यांचा मारा जास्त होऊ लागला. मार्क ट्वेन म्हणतो, एक साधे खोटे असते आणि दुसरे धडधडीत खोटे असते. पण त्याच्याहीपेक्षा भयंकर धोकादायक खोटे म्हणजे आकडेवारी! त्याच तंत्राचा वापर मग मोदी विरोधात सुरू झाला. पण बारा वर्षाच्या सातत्याने बोलल्या गेलेल्या खोटारडेपणाने कंटाळलेल्या लोकांनी कुठलीच आकडेवारी मान्य केली नाही आणि मोदींनी लोकसभा जिंकली. तेव्हा दिर्घकाळ राजकीय मार्केटींग करणारेच मोदींचा विजय मार्केटींगचा विजय असल्याचे ओरडू लागले. ते नाकारण्यात अर्थ नाही. पण तेच सत्य असेल, तर आजवरचा देशातील पुरोगाम्यांचा वरचष्माही मार्केटींगच असणार ना? नव्हे आहेच व होताच. कारण नेहरू वा त्यांचे वारस यांचा बाजार मांडण्यापलिकडे पुरोगामी म्हणून काय होऊ शकले होते? नातूही पंतप्रधान होऊन गेल्यावर रोजगार हमी म्हणून खड्डे पाडायची वा खड्डे भरण्याची कामे काढावी लागणे, हा विकासाचा निकष होता की पुरावा होता?
असो, तर असे राजकीय वा बाजारू उत्पादनाचे मार्केटींग होत असते. ग्राहक वा सामान्य माणसाच्या मनात अपराधगंड वा न्युनगंड उत्पन्न करून, त्याच्या गळी आपला माल वा आपली भूमिका मारण्याला मार्केटींग म्हणतात. त्यातून तुमची नसलेली गरज निर्माण केली जाते आणि त्यासाठी तुमच्या माथी तयार माल मारला जातो. आजकाल अशीच एक जाहिरात प्रत्येक वाहिनीवर धुमाकुळ घालते आहे. एक गृहस्थ नवा टिव्ही खरेदी करून आणतो आणि शेजारीपाजारी बघायला जमा होतात. टिव्ही लावताच, तो एचडी या तंत्राचा नाही हे लक्षात येते आणि एक शेजारी म्हणतो, ‘इसमे तो एचडी नही है. तो ये टिव्ही नही डब्बा है’. झाले, तिथली एक मुलगी गृहस्थाच्या भोवती गिरकी घालून म्हणते, डब्बा है रे डब्बा, अंकलका टिव्ही डब्बा! मग तीच ओळ गुणगुणत कॉलनीतली मुले फ़ेर धरून नाचतात. तो गृहस्थ आपल्याच नव्या टिव्हीसमोर हिरमुसलेला दिसतो. जाहिरात संपली! गेले काही दिवस अखंड झळकणार्या या जाहिरातीतून कोणता संदेश बघणार्याच्या मनात ठसवला जात असतो? त्याने आणलेला टिव्ही एचडी तंत्रज्ञानाचा नसल्याने डब्बा आहे. निरूपयोगी आहे. एक नवी जादा सुविधा नसल्याने टिव्ही डब्बा म्हणजे निरूपयोगी होतो काय? नसेल तर यातून ती जाहिरात काय करते? ग्राहकाच्या वा ज्यांच्या घरात तसा नव्या तंत्राचा टिव्ही नाही, त्यांच्यात न्युनगंड निर्माण करते. अशा जाहिरातीत मुद्दाम शाळकरी वयातली मुले हेतूपुर्वक वापरली जातात जेणेकरून ती मुले आपल्या आईबापांवर नवा टिव्ही घेण्य़ासाठी दबाव आणू लागतील. त्या वयातल्या मुलांनाच आईबापाच्या विरुद्ध कंपनीचे सेल्समन म्हणून अशा मार्केटींगमधून उभे केले जाते. मुलेच आपल्या पालकांच्या मनात मग न्युनगंड ठसवण्याचे काम करू लागतात, याला मार्जेटींग म्हणतात. नसलेली चुक वा त्रुटी तुमच्या माथी मारून तुम्हाला पापी ठरवायचे आणि ‘पापमुक्त’ व्हायला उद्युक्त करायचे.
सध्या देशात असंहिष्णूतेचे मार्केटींग भयंकर जोरात सुरू आहे. सामान्य माणसाला जे अनुभवता येत नाही वा दिसत जाणवत नाही, अशी असंहिष्णूता दिडदोन महिने आपल्या माथी मारली जाते आहे, त्याचे रहस्य अशा मार्केटींगमध्ये शोधावे लागेल. एका बाजूला ‘लोकमत’च्या जळगाव येथील कार्यालयावर हिंसक हल्ला मुस्लिम जमाव करतो आणि त्याचा निषेधही कोणी करीत नाही. उलट संपादकच माफ़ी मागतात. दुसरीकडे राजरोस हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा सपाटा चालू आहे. त्याचा विरोधही होत नाही. तरी हिंदू बहुसंख्यांकच असंहिष्णू असल्याचा ओरडा मात्र जोरात चालू आहे. हिंदू त्यातल्या खोटारडेपणाचा निषेधही करायला बिचकत आहेत. अगदी अनेक पत्रकार व माध्यमकर्मी खाजगीत बोलताना त्याची कबुली देतात. पण उघड बोलायला घाबरतात. कारण स्पष्ट आहे. प्रत्येकाला आपली ‘बुद्धी डब्बा’ अशी टवाळी होण्याच्या भयगंडाने पछाडले आहे. ज्यांनी या असंहिष्णूतेचा पहिला गजर करून साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करायची मोहिम सुरू केली, त्यालाच आता आपल्या कर्माची फ़ळे भोगायची पाळी आलेली आहे. कवि उदय प्रकाश यांनी या मोहिमेचा मुहूर्त केला होता. कालपरवा त्यांनी कुठल्याशा मोदींच्या भाषणाचे कौतुक करताच, उदय प्रकाश प्रतिगामी असल्याचे आरोप सुरू झाले. रातोरात उदय प्रकाशची ‘बुद्धी डब्बा’ झाली. याला मार्केटींग म्हणतात. जिथे तुम्हाला आपली विवेकबुद्धी वापरून काही बोलायला, मतप्रदर्शन करायला स्वातंत्र्य नसते, त्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात. ठराविक एक भूमिका एकदा पुरोगामी म्हणून फ़तवा निघाला, मग प्रत्येकाने त्याचे पालन करायचे असते आणि त्याच मर्यादेत राहून एकसूरात टाळ्या पिटत म्हणायचे असते, ‘डब्बा है रे डब्बा, अंकलका टिव्ही डब्बा’! मग झालात पुरोगामी. मग झालात बुद्धीमंत! मग झालात हायडेफ़ीनेशन सेक्युलर!