He who fears being conquered is sure of defeat. -Napoleon Bonaparte
कुठल्याही लढाई वा संघर्षात मन खंबीर ठेवून सामारे जाणे आवश्यक असते. आपल्यासमोरचे आव्हान किती लहान वा मोठे आहे, त्याला महत्व नसते; इतके आव्हान समजून घेण्याला प्राधान्य असते. मगच आपली शक्ती कुठे व कशी लावायची, त्याची रणनिती तयार होत असते. आपोआप मोजक्या व नेमक्या जागी शक्ती पणाला लावून विजय संपादन करता येतो. नुसती मोठी फ़ौज वा शस्त्रास्त्रांची सज्जता कामाची नसते. बिहारच्या विधानसभा निवडणूकीची मिमांसा करताना त्याचेच कुणाला भान राहिलेले नाही. मग गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोपी उत्तरे शोधली जातात. नाहीतर उसनी उत्तरे सादर केली जातात. भाजपाचे नेते वा विरोधकांची निकालांनंतर समोर आलेली निमांसा तशीच आहे. गेल्या दोनतीन महिन्यापासून मोदी सरकारच्या विरोधात जे काहुर माजवण्यात आलेले आहे, त्यात त्याच जुन्या आरोपांची आतषबाजी झालेली आहे. सहाजिकच विरोधकांनी त्याच कारणास्तव भाजपाच बिहारमध्ये दारूण पराभव झाल्याचा निष्कर्ष काढल्यास नवल नाही. कारण त्यांना आपल्या निरर्थक आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध करण्याची उत्तम संधी या निमीत्ताने मिळालेली आहे. म्हणून भाजपाने व त्याच्या नेत्यांनी तितक्याच सहजपणे ही मिमांसा स्विकारावी काय? कधीतरी आत्मपरिक्षण करणार की नाही? थोडक्यात आपल्या पराभवाचे शत्रूने कारण सांगावे आणि आपण ते स्विकारावे, ही पराभूत मानसिकता असते. कारण शत्रूला फ़क्त तुमचा पराभव करायचा वा विजय संपादन करायचा नसतो, तर तुमच्यातली लढाईची खुमखुमी संपवण्यात शत्रूचा खरा स्वार्थ असतो. सहाजिकच बिहारचे जे विश्लेषण सध्या चालू आहे, त्याचा वास्तवाशी काडीमात्र संबंध नाही. तसेच भाजपाकडून दिले जाणारे खुलासेही तितकेच तकलादू आहेत. कारण हा पराभव बेफ़िकीरी व गाफ़ीलपणाने ओढवून आणलेला आहे.
लोकसभा निवडणूकीत भाजपाने याच बिहारमध्ये मोठा विजय संपादन केला होता. म्हणूनच मग इतक्याच आरामात विधानसभाही जिंकू शकतो, ही बेफ़िकीरी आजच्या पराभवाचे खरे कारण आहे. तेव्हाच्या विजयाची मिमांसा केली तर तो विजय परिस्थितीने भाजपाला दिलेला असल्याचे सहज लक्षात येईल. त्यापेक्षा परिस्थिती बदलली असेल, तर तसाच व तितकाच सहजगत्या विजय अशक्य असल्याचेही तेव्हाच लक्षात येऊ शकले असते. म्हणजे असे, की तेव्हा सेक्युलर म्हणतात अशा गट-पक्षातली मते मोठ्या प्रमाणावर विभागली गेली होती आणि त्यांच्या तुलनेत अधिक मते मिळवणारे उमेदवार म्हणून भाजपाचे व एनडीएचे उमेदवार जिंकून आले होते, शिवाय नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली होती. अधिक संघाच्या स्वयंसेवकांची फ़ौज मतदानाची टक्केवारी वाढवायला अहोरात्र झटलेली होती. त्याचा एकत्रित परिणाम निकालावर झालेला होता. देशभर आठनऊ टक्के मतदानात वाढ झाली, ही वाढ भाजपाच्या प्रयत्नांनी घडली होती. जेव्हा तुम्ही अधिक मतदार घराबाहेर काढता, तेव्हा त्यातले बहुतांश तुमच्याच पारड्यात मते टाकतात. त्यामुळे लोकसभेत चौदा कोटी मतदान वाढले आणि त्यातली साडेनऊ कोटी मते भाजपाला वाढीव मिळालेली होती. त्याचा अर्थ असा, की २००९ सालात १७ टक्के असलेल्यात आणखी चौदा टक्क्यांची भर पडून भाजपाची टक्केवारी ३१ टक्के झाली. कॉग्रेसची २००९ इतकीच मते राहिली, तरी टक्केवारीत घट होऊन अनेकजागी उमेदवार स्पर्धेत मागे पडले आणि पराभूत झाले. म्हणजेच लोकसभेत भाजपाचे यश मतदानाची टक्केवारी वाढवून मिळवलेले होते. बिहारमध्ये आणखी एक जमेची बाजू होती, ती विभागालेल्या विरोधी मतांची! त्याची प्रचिती अवघ्या तीन महिन्यात आलेली होती. किंबहूना भाजपाला तोच इशारा होता. पण त्याकडे बघायचेही नाकारले गेले.
लोकसभेनंतर अवघ्या तीन महिन्यत बिहारमध्ये पोटनिवडणूका झालेल्या होत्या. भाजपाचे जे आमदार लोकसभेत निवडून गेले, त्यांच्या जागेसाठी हे मतदान झाले. तेव्हा लोकसभा पराभवाने शहाणे झालेले लालू व नितीश एकत्र आले. त्यांनी भाजपासमोर संयुक्त उमेदवार टाकले आणि भाजपाच्या दोन जागा बळकावल्या. याचा अर्थ असा, की विरोधी लालू-नितीशच्या मतांची बेरीज झाल्यास ते भाजपावर मात करू शकत होते. तसेच लोकसभेत लढले असते, तर भाजपाला तिथे तेवढे यश मिळवता आले नसते. लोकसभेत लालू-नितीश परस्पर विरोधात उभे ठाकले. त्याचा लाभ भाजपाच्या सहज विजयाला हातभार लावणारा ठरला होता. पंधरा महिन्यांपुर्वी मिळालेला पोटनिवडणूक निकालाचा हा इशारा भाजपाने मनावर घेतला असता, तर कालपरवा झालेल्या मतदानाची योग्य रणनिती तयार करता आली असती. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. उलट मोदींना पुढे करून आपण कुणालाही निवडून आणु शकतो, अशा भ्रमात भाजपाचे नेतृत्व वागत गेले. कमी पडण्याची शक्यता आहे तिथे बाहेरच्या पक्षातून बलदंड उमेदवार आयात करून बाजी मारता येते, अशीही समजूत त्यामागे होती. त्याला रणनिती नव्हेतर गाफ़ीलपणा म्हणतात. जसजसे निवडणूकीचे दिवस निकट येत गेले, तसतसे लालू व नितीश यांनी अधिक एकजुटीने मोहिमा उघडल्या. कारण आपल्या बेरजेने भाजपापेक्षा अधिक मते मिळवण्याचे समिकरण त्या दोघांनी मांडले होते. त्यात त्रुटी असेल, ती भरून काढण्यासाठी त्यांनी दुबळ्या कॉग्रेसला सोबत घेऊन आणखी डागडूजी केली होती. या बेरजेवर भाजपा कसा मात करू शकेल, याचा विचारही रणनितीमध्ये झाला नाही. त्यापेक्षा आपल्यावर होणारे आरोप नाकारण्यात भाजपा नेते धन्यता मानत राहिले. आरक्षणाचा मुद्दा वा साक्षी महाराजांची वक्तव्ये, गोमांस वा गोहत्या, यामुळे मते जातील, असा अपप्रचाराला भाजपाने नेतृत्व बळी पडले.
निवडणूकीपुर्वीच नव्हे, तर आता निकाल लागल्यावरही अनेक भाजपा नेते अशा अपप्रचाराला मान डोलवून दाखवतात, तेव्हा नवल वाटते. यापैकी कितीजणांना मतदान, त्यातली गुंतगुंत व समिकरणे कळतात, याचीच शंका येते. लोकसभेपेक्षा यावेळी भाजपाच्या मतांची टक्केवारी घटली नसेल, तर कुठली वक्तव्ये किंवा आरक्षणामुळे पराभव होण्याचा विषयच कुठे येतो? आज पराभव झालेला दिसतो, ती जागांमधली घट आहे आणि मतदानातील टक्केवारीचा आपला हिस्सा वाढवूनच त्यावर मात करणे शक्य होते. आजकाल मतदानकेंद्रानुसार मतमोजणी उपलब्ध होते. शिवाय विधानसभावार मोजणी होत असल्याने बिहारच्या कुठल्या मतदारसंघात लालू नितीशच्या एकत्र येण्याने आपले लोकसभेतील मताधिक्य तोकडे पडू शकते, त्याची आकडेवारी मे २०१४पासून भाजपाला उपलब्ध होती. त्यातून आपण कुठल्या जागी किती दुबळे आहोत, त्याचे वर्गिकरण करणे सहजशक्य होते. सहा महिन्यापुर्वीच लालू-नितीश व कॉग्रेसने हातमिळवणी केली, तर त्यामुळे आपले मताधिक्य कुठे धोक्यात आहे, ते ओळखून तिथे मतदान वाढवून त्यांना मागे टाकण्याची रणनिती आखायला हवी होती. तर ही वेळ नक्कीच आली नसती. कारण मतदान शेवटी साठ टक्केपेक्षा कमी झाले. ते प्रयत्नपुर्वक ७५-८० टक्केपर्यंत वाढवणे भाजपाच्या कार्यकर्ता फ़ौजेला अशक्य नव्हते. त्यातून मग विरोधकांच्या बेरजेवर मात करता आली असती. पण त्याचे भान कुठेच दिसले नाही, जे लोकसभेत चौदा कोटी मतदान वाढवताना होते. थोडक्यात पराभव तिथेच झाला होता. तो रणनितीचा पराभव आधीच झाला होता. फ़क्त प्रत्यक्ष मतदानातून त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे तेवढे बाकी होते. ते काम आक्टोबर नोव्हेंबरच्या मतदानातून झाले. मतमोजणीने ते जगासमोर आणले. पण हा पराभव कुणाचे वक्तव्य वा धोरणांचा नाही वा नव्हता. तो गाफ़ील रणनितीने ओढवून आणलेला पराभव आहे.
देशाची सत्ता मिळाली व मोदींच्या नुसत्या भाषणानेच आपण जिंकू शकतो, अशी एक गैरसमजूत त्याला कारणीभूत आहे. त्याच्याखेरीज जिथे आपली बाजू लंगडी-दुबळी आहे, तिथे अन्य पक्षातला बलदंड उमेदवार आणुन उभा करण्याची पळवाटही त्याचे एक प्रमुख कारण आहे. भाजपाचे नेते एक गोष्ट विसरून गेले, की लोकसभा लढताना त्यांना अन्य पक्षातून फ़ारसे उमेदवार आयात करावे लागले नव्हते. काही किरकोळ तडजोडी कराव्या लागल्य होत्या, त्या क्षम्य असतात. पण त्याला रणनिती समजणे घातक होते. तोच प्रयोग दिल्लीत करून दणदणित अपयश पदरी आलेले होते. त्यापासूनही धडा घेतला गेला नाही. किंबहूना आपण लोकसभेत इतके दैदिप्यमान यश कशामुळे मिळवले, त्याचाही भाजपाला पुर्णपणे विसर पडला. त्या निकालाच्या दुसर्या दिवशी दिल्लीत पोहोचलेले नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयात महत्वपुर्ण भाषण केले, त्याचाही पक्ष नेतृत्वाला विसर पडला. मोदी म्हणाले होते, ‘हा विजय माझा नाही. जे जिंकून आलेत, त्या उमेदवारांचा नाही आणि ज्यांनी निवडणूकीत अपार मेहनत घेतली, त्यांच्यापुरतेच या विजयाचे श्रेय नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून ज्यांनी पक्षासाठी अथक कष्ट उपसले, त्या चार पिढ्यांतील कार्यकर्त्यांचा हा विजय आहे’. यातली चमत्कार घडवणारी खरी शक्ती कुठली होती, प्रेरणा कोणती होती, याचे इतक्या मोठ्या विजयानंतर मोदींनी दाखवलेले भान पक्षाला नंतरच्या काळात राहिले नाही. याची साक्ष दिल्लीच्या दारूण पराभवाने दिलेली होती. तरीही झोपेतून उठायचेच नसेल, तर बिहारचा पराभव अपरिहार्यच होता. मग त्यासाठी अन्य कुणाची विधाने वा आपल्या धोरणात्मक निर्णयात दोष शोधणे, हा शुद्ध पळपुटेपणा आहे. त्यात काडीमात्र तथ्य नाही. आपल्या विचार, शक्ती व संघटनेवरचा विश्वास गमावल्याचा तो परिणाम आहे. प्रतिस्पर्ध्याची मिमांसा स्विकारणे हाच पराभव असतो.
नेपोलियन या जगप्रसिद्ध सेनापतीचे विधान वर दिलेले आहे, त्याचा अर्थ इथे समजून घ्यावा लागेल. आपल्या मनातली पराभवाची भिती पराभवाला आमंत्रण देत असते. त्याची लक्षणे आत्मविश्वास सोडूनच्या पळापळीतून दिसत असतात. अन्य पक्षातले लोक उमेदवारीसाठी आणायचे, किंवा लालू-नितीश यांनी फ़ेकुन दिलेल्या कोणा नेत्याला सहकार्याला सन्मानाने भाजपात आणून त्याच्या मदतीची अपेक्षा बाळगणे; हे दिल्ली बिहारच्या चुकीच्या रणनितीतले दोष होते. त्याच्या परिणामी पराभवाची परिस्थिती आली. मोदींनी कुणा मौलवीने दिलेली टोपी नाकारली, त्यांना पंतप्रधान होण्याइतकी मते दिलीच जाणार नाहीत, अशी इथले विश्लेशक अभ्यासक छातीठोक ग्वाही देत होते. तरीही भाजपाना ऐतिहासिक बहुमत मिळाले होते. ते आत्मविश्वासाचे यश होते आणि आपल्या धोरण निर्णयासह कार्यकर्त्याच्या लढवय्या वृत्तीवरच्या विश्वासाचे द्योतक होते. म्हणून जगाला लोकसभेत चमत्कार दिसला. मात्र नंतरच्या काळात भाजपाने त्याकडेच पाठ फ़िरवून विचार-भूमिकांसह उमेदवारांचीही आयात सुरू केली, ते आत्मविश्वास हरवल्याचे लक्षण होते. म्हणूनच हा भाजपाच्या धोरणांचा किंवा मोदींच्या लोकप्रियतेचा पराभव नाही, तर रणनितीचा पराभव आहे. जेव्हा समिकरणे बदलतात आणि परिस्थिती बदलते, तेव्हा रणनितीही बदलावी लागत असते. आपल्या शक्ती व बलस्थानांचा योग्य वापर हे युद्ध जिंकण्याचे कारण असते. आपणच आपल्या बलस्थानावरचा विश्वास गमावणार असू, तर बाहेरची कुठलीही मदत आपल्याला वाचवू शकत नाही. हिंदूत्व किंवा भाजपाचे धोरण त्याच्या लोकप्रियतेचे कारण आहे. जे लोकसभा विजयात प्रतिबिंबीत झाले. त्याची व्यापकता म्हणजे मतदानातील टक्केवारीत वाढ व्हायला काही काळ अजून लागणार आहे. त्यात उसनवारी हा जवळचा मार्ग आत्मघातकी ठरू शकतो, इतकाच या निकालांचा अर्थ आहे. तो पक्ष वा धोरणांचा पराभव नसून, ते गाफ़ील रणनितीचे अपयश आहे.
पूर्वप्रसिद्धी `तरूण भारत' नागपूर
रविवार १५/११/२०१५
No comments:
Post a Comment