Thursday, November 26, 2015

‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता



उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट बसला, असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आधीच उंटावर नको तितके ओझे लादलेले असते आणि तेच उचलण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. म्हणूनच एका काडीचे वजन जास्त झाल्याने उंट बसलेला नसतो. तर त्याच्या कुवतीपेक्षा त्याच्यावर बोजा लादण्याचा अतिरेक झालेला असतो. म्हणून मग एक काडीही उंटाला जड होत असते. कुठलाही अतिरेक असेच परिणाम देत असतो. मग चर्चा काडीची करायची नसते, तर अतिरेकाची करायला हवी. आताही तेच झाले आहे. असंहिष्णूतेचे नाटक छान रंगले होते. पण त्याचाही अतिरेक होऊ लागला होता आणि लोकांना त्याचा कंटाळा नव्हेतर संताप येऊ लागला होता. नाटक आणि वास्तव याचे भान नाटककार व नाटकातल्या कलावंतांनीही ठेवायला हवे. अन्यथा त्यांची वेशभूषा व रंगभूशा सामान्य माणासाला खरडून काढायची वेळ येते. एकूणच संहिष्णूतेच्या नाटकाचा तोच अतिरेक होत गेला होता. मुख्यप्रवाहातील माध्यमांपासून राजकीय, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात त्याचा नको इतका अतिरेक झाल्यावर लोक कंटाळले होते आणि हळुहळू लोकांना संताप येऊ लागला होता. अशावेळी त्यात आमिरखानने उडी घेतली आणि तीच मग उंटाच्या पाठीवरची काडी झाली. त्याचा पहिला फ़टका आमिर खानला नव्हेतर त्याला आपल्या जाहिरातीचा ब्रॅड लिडर बनवणार्‍या कंपनीला बसला आहे. स्नॅपडील नावाची इंटरनेट व्यापार कंपनी आहे. आमिर तिच्या जाहिराती करतो. आमिरच्या ताज्या वक्तव्यांनी माध्यमातले पुरोगामी सुखावले असले, तरी त्याचा गाजावाजा करताना पुरोगामी पत्रकार व कलावंत यांनी आपल्याच पायावर आता धोंडा पाडून घेतला आहे. त्याचा पहिला फ़टका स्नॅपडील कंपनीला बसला आहे. आमिरच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीशी काडीमोड घेतला आहे. एका माहितीनुसार दोन दिवसात कंपनीने ३८ कोटीचा धंदा गमावला आहे.

अविष्कार स्वातंत्र्य, संहिष्णूता ही दिवसेदिवस देशात पाखंड व थोतांड बनत चालली आहेत. मग त्यात काळापैसा ओतून लोकांच्या माथी खोट्या गोष्टी व भ्रामक वार्ता मारण्याचा उद्योग चालू राहिला. त्याचा दुष्परिणाम मागल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आला असतानाही, एक वर्षात पुन्हा त्याच नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. आमिरने त्यातच उडी घेतली आणि त्याच्याच पोटावर आता पाय आला आहे. कारण जाहिरपणे काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीच्या मोबाईल खरेदीसुविधेचे साधन आपल्या फ़ोनवरून हटवले आहे. आमिर जाहिरातीत असल्याच्या निषेधार्थ आपण स्नॅपडीलला रामराम ठोकत असल्याच्या हजारो प्रतिक्रिया लोकांनी सोशल माध्यमातून दिल्याच. पण ज्यांनी शांतपणे रामराम ठोकला त्याचे आकडे कंपनीला कळू शकतात. हे आकडे सहा लाखाहून अधिक असल्याने ही कंपनी हादरून गेली आहे. आमिर खानला जाहिरातीतून बाजूला करण्यापर्यंत आपण या कंपनीशी व्यवहार करणार नाही, असा इशाराही काही लोकांनी सोशल माध्यमातून कंपनीला दिला आहे. त्याची सहसा कधी दाद घेतली जात नाही. असे काही माथेफ़िरू असतात. पण जेव्हा आपल्या ऑनलाईन ग्राहकांच्या नोंदबुकातली संख्या झपाट्याने घसरू लागली, तेव्हा कंपनीला खडबडून जाग आली आहे. अर्थात ही सुरूवात आहे. कारण आता माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे प्रभावी झाली असून, व्यापारावरही त्यांची हुकूमत चालते याचा साक्षात्कार यातून घडणार आहे. खरेच स्नॅपडील कंपनीला याचा आर्थिक फ़टका बसला, तर त्यांना आमिरला हटवावे लागेल. किंवा मग अशाच पैशावर नावारुपास आलेल्या आमिरला तरी आपले शब्द मागे घेऊन विरोधाला शरण जाणे भाग पडेल. आणि हे नवे अजिबात नाही, अविष्कार स्वातंत्र्य असो किंवा संहिष्णूतेचे नाटक असो, पैशासमोर सगळे पाखंडी शरण जातात हा जगाचा इतिहास आहे.

आठ वर्षापुर्वी अमेरिकेतली एक घटना त्याचा दाखला आहे. डोनाल्ड आयमस नावाचा अत्यंत लोकप्रिय रेडीओ कलाकार अशाच चक्रव्युहात सापडला होता. अमेरिकाभर त्याच्या रसभरीत खोचक भाषेतील शेरेबाजीसाठी तो प्रसिद्ध होता. शेकडो रेडिओ स्टेशनवरून त्याचा कार्यक्रम प्रसारीत केला जात होता. विविध नेटवर्क तो प्रसारीत करीत होती. रग्गर नामक विद्यापिठाच्या महिला बास्केटबॉल संघाने २००७ साली राष्ट्रीय अजिंक्यपद संपादन केले आणि त्याही अंतिम सामन्यावर आयमसने शेरेबाजी केली होती. त्या संघात बहुतांश कृष्णवर्णिय मुली होत्या आणि त्यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीने वादळ निर्माण झाले. त्याची शेरेबाजी वर्णद्वेषी असल्याचा गदारोळ उठला आणि अनेक संघटनांनी त्याच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अभिजन वर्ग, प्रतिष्ठीत मान्यवर (म्हणजे आपल्याकडे जसे असंहिष्णूतेचे नाटक करणारे आहेत तसे) लोक आयमसच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि बहुतेक नेटवर्क कंपन्यांनी आयमसला हाकलण्यास नकार दिला. ते अविष्कार स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर बंदीची मागणी म्हणजे मुस्कटदाबी व असंहिष्णुता असल्याचा तमाशा चालू झाला. दोन दिवस हा तमाशा जोरात चालला आणि अखेरीस रग्गरचा तो महिला संघ पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आला. त्यांनी एकच भूमिका जाहिर केली. ‘आयमसचा कार्यक्रम प्रसारीत करणार्‍या रेडीओ स्टेशन, नेटवर्क यांच्यावर जाहिरात करणार्‍या कुठल्याही कंपन्या वा जाहिरातदाराला आमचा संघ प्रायोजक म्हणून घेणार नाही’. ही घोषणा झाली आणि एका तासात पाच मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी आयमसचे प्रसारण करणार्‍या नेटवर्कच्या आपण जाहिराती थांबवत असल्याचा इशारा दिला. पुढल्या दोन तासात त्या नेटवर्कने आयमसचे पुढील सर्व कार्यक्रम रद्दबातल केल्याची घोषणा केली होती. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते.

दोनतीन दिवस अविष्कार स्वातंत्र्याचा तमाशा चालला. पण उत्पादक व जाहिरातदार कंपन्यांनी आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखून आयमसला वार्‍यावर सोडून देण्याचा दिलेला इशारा जादूची मात्रा ठरली. तमाम माध्यमे शेपूट घालून शिस्तीत वागू लागली. स्नॅपडील कंपनीवर सोशल माध्यमातून आमिर विरोधात सुरू झालेला बहिष्कार हे अतिरेकी अविष्कार स्वातंत्र्याचे फ़लित आहे. ही नुसती सुरूवात आहे. असा इशारा गोदरेज कंपनीला दिल्यावर त्यांनी आमिर आपला मॉडेल नसल्याचा खुलासा केला आहे आणि स्नॅपडील समोर दुसरा पर्याय नाही. पण आज हे चक्र सुरू झाले आहे, ते कुठवर जाऊ शकते? जे कोणी अशाप्रकारे संहिष्णूतेचे नाटक करत आहेत आणि अतिरेक करीत आहेत, त्यांची मदार जाहिराती व उत्पादक कंपन्यांच्या पैशावर आहे. उद्या आपल्याला नावडत्या भूमिका प्रेक्षक वाचकाच्या गळी मारण्याचा उद्योग असाच चालू राहिला, तर हेच प्रक्षुब्ध सामान्य लोक त्या माध्यमाला जाहिरात देणार्‍या कंपन्या वा तिच्या उत्पादनावर बहिष्कार घालू लागतील, तेव्हा संपादक पत्रकार काय करणार आहेत? उदाहरणार्थ राजदीप वा बरखा दत्त यांच्या खोटारडेपणाला सामान्य माणुस रोखू शकणार नाही. पण त्यांच्या कार्यक्रमाला प्रायोजक असेल त्या कंपनीच्या उत्पादनावर असा सार्वत्रिक बहिष्कार सुरू झाला मग? म्हणजे टाटा चाय प्रायोजक जाहिरातदार असेल आणि अशा बहिष्काराची घोषणा झाली, त्यातून मुंबई वा दिल्लीसारख्या शहरात साप्ताहिक चहाच्या खपात टाटा चहाची विक्री घटली तर काय होईल? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक राजा झाला आहे आणि तोच सुत्रधारही होऊ लागला, तर माध्यमांचे अविष्कार स्वातंत्र्याचे काय होईल? कुठलाही अतिरेक विनाशाला आमंत्रण देत असतो. मग तो मोदीभक्तांचा असो किंवा पुरोगामी विचारवंतांचा असो! संहिष्णूतेचा गळा घोटणारी संहिष्णुता लोकांना आता असह्य झालीय, इतकाच त्याचा अरर्थ आहे.

11 comments:

  1. व्वा. अप्रतीम.

    ReplyDelete
  2. हि खर्या लोकशाही ची सुरूवात म्हणता येईल.

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर भाऊ! या असहिष्णू शब्दाचा आता अतिरेक झाला आहे, आणि भारतात ती वाढली आहे असे म्हणणाऱ्या लोकांचाही!

    ReplyDelete
  4. As usual very nice article Bhau. I see this all Aamir khan fuss with a little different angle.Few days ago Rahul Gandhi was in trouble due to his disputed british citizenship issue. Suddenly Aamir Khan comes for his rescue. Makes comment tending to indicate intolerance in India. And Rahul gandhi must be relieved as no one is any more questioning for his clarification on British citizenship issue. Please let us know your views.

    ReplyDelete
  5. साक्षात दंडवत भाऊ

    ReplyDelete
  6. पुर्ण पने सम्मत!

    ReplyDelete
  7. एकदम बरोबर भाउ . अगदी उबग आला होता राव. पोपट पंचि करणारे पुरोगामी वठणीवर आणावे लागतील

    ReplyDelete
  8. Bhakt going to suicide now.
    http://scroll.in/article/772281/appwapsi-backfires-as-increased-publicity-spurs-snapdeals-app-rankings-to-rise

    ReplyDelete
  9. असहिष्णुता म्हणजे काय ? असा प्रश्न हल्ली सर्वांना पडला आहे, एक उदाहरण, अगदी साध्या भाषेत..
    एक मुलगा धावत धावत पोलीस स्टेशनात पोचतो.
    धापा टाकत तिथल्या इन्स्पेक्टरला म्हणतो : साहेब, चला लवकर , आमच्या गल्लीत असहिष्णुता फार वाढलीय.
    इन्स्पेक्टर : म्हणजे ? नक्की काय झालेय ?
    मुलगा : अहो, गेला अर्धा तास माझे बाबा आणि दुसरा एक माणूस यांची मारामारी चाललीय.
    इन्स्पेक्टर : आणि तू आत्ता येतोस सांगायला ? आधी का नाही आलास ?
    मुलगा : कारण पहिली पंचवीस मिनटे माझे बाबा त्या माणसाला चांगला झोडपत होते. आता तो उलटलाय, माझ्या बाबांना मारतोय.
    याला म्हणतात " असहिष्णुता ".

    ReplyDelete
  10. असहिष्णूता :~

    कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तिला त्याच्या स्व-कर्तुत्वामुळे ठराविक काळानंतर पाच-पन्नास लोक ओळखू लागतात. कालांतराने त्याचे चाहते वाढू लागतात. सरतेशेवटी ती व्यक्ति इतकी प्रसिद्धी पावते की त्याचे चाहते अंधानुकरण करू लागतात, म्हणजेच अंधभक्त तयार होऊ लागतात. तर अंधभक्ती इतक्या पराकोटीला जातो की सदसद्विवेकबुद्धीला न स्मरता, सारासार विचार न करता ती व्यक्ति म्हणेल ती पूर्व दिशा मानू लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी जबाबदारीने भानावर राहून बोलले पाहिजे. अशा अंधभक्तांमुळे ती व्यक्ति अगदी राजरोसपणे आपल्याच देशाचा अपमान करण्यासही धजत नाही.

    अलीकडेच दोन मूर्खांनी आपल्याच देशाचा अपमान केला. आणि पाठोपाठ त्याचे अंधभक्त व काही अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेले स्वयंघोषीत (अल्प)बुद्धीजीवी साहित्यिक देश सोडून जाण्या इतक असहिष्णूता वाढला म्हणून गरळ ओकत सुटलेत. त्या मूर्खांकडे अमाप पैसा असल्यमुळे उरलेलं आयुष्य परदेशी घालवू शकतात पण मग गरीब, मध्यम वर्गीय अंधभक्तांनी कुठे जायचे ? का या मूर्खांनी घातलेल्या भीतीच्या वातावरणा मध्येच उरलेलं आयुष्य घाबरत घाबरत यांचेच सिनेमे बघत कंठायचे ???

    मलाही यांचा अभिनय अतीशय आवडतो, पण याचा अर्थ असा नाही की हे जे काही आपल्या देशाबद्दल बरळतील ते मला मान्य आहे.

    यांचे सिनेमे, व्यवसायावर लोकांनी बंदी घातल्यास, जाहिरातीतून हाकलल्यासच यांचा माज उतरेल. आणि यामुळे जर उद्योग धंद्यात नुकसान होत असेल तर संबंधित उद्योजकानी योग्य पर्यायी उपाय योजना कराव्यात जे अत्यंत सहजशक्य आहे. नाक दाबल्यावरच तोंड उघडतं. ज्या लोकानी या मूर्खांना एवढे डोक्यावर घेतले तेच लोक त्यांना त्यांची जागा दाखवू शकतात. आणि जर का कुणाला वाटत असेल की त्यांच्या धर्मामुळे विरोध होतोय तर तो कधीच (अगदी दिलीपकुमारच्या काळातच) झाला असता आणि मग हे लोक एवढे मोठे झालेही नसते आणि एवढा माजही केला नसता. हिंदुस्थान मुळातच सहिष्णू आहे म्हणून तर हे लोक आज स्टार सेलेब्रिटी झालेत हे विसरता कामा नये.

    Once we start compromising with our self respect, there is no end to it. Do not tread upon our faith & our dignity.

    ReplyDelete