Sunday, November 15, 2015

पॅरीस, मुंबई आणि बेडकांची वस्ती



एक शास्त्रीय प्रयोग आहे. बेडकाला पाण्यात डुंबायला खुप आवडते. म्हणूनच तो सहसा पाण्यातून बाहेर पडायला राजी नसतो. एका प्रयोगात बेडकाला पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवले गेले आणि तेच पातेले मग चुलीवर ठेवून मंद विस्तवाने पाणी तापवले जाऊ लागले. त्या पाण्याचे तापमान वाढत चालले, तसतसा बेडूक आपल्या शरीराला उष्णतेशी जुळवून घेत गेला. आधी किंचित कोमट वा उष्ण वाटणार्‍या पाण्यातून उडी मारून बाहेर पडायची इच्छा काही त्याला झाली नाही. मग पुढे पुढे उष्णता वाढत चालली होती आणि तितकी उष्णता आपल्या शरीराला पेलवणार नाही, याची जाणिवही बेडकाला होईना. तो तापणारे पाणी सहन करीत तसाच पाण्यात डुंबत राहिला. अखेर पाणी उकळू लागले आणि बेडकाच्या जीवाची घालमेल सुरू झाली, तरी त्याला बाहेर उडी मारण्याची इच्छाच उरली नव्हती. उकळत्या पाण्यात तो बेडूक भाजून मरण पावला. हा प्रयोग शास्त्रीय आहे आणि ती भाकडकथा नव्हे. त्यातून एक गोष्ट सिद्ध होते, की सहनशीलत्ता वा संयम कुठल्याही सजीवाच्या उपजत प्रतिकाराच्या जाणिवा बोथट व निकामी करतो. त्याचा तो पुरावा आहे. एका बेडकावर असा प्रयोग करण्यात आला किंवा असे प्रयोग नेहमी अन्य प्राण्यांवर केलेले असतात. त्यातून मानवी जीवनाला भेडसावणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधली जात असतात. अर्थात बेडकापेक्षा माणसाची बुद्धी अधिक तीक्ष्ण व तल्लख असते. म्हणूनच माणसाच्या जाणिवा अधिक तीव्र व तत्पर असतात. माणूस त्या बेडकाच्या जागी असता तर उष्णता असह्य होऊ लागल्यावर तापणार्‍या पाण्यातून बाहेर पडला असता असेच आपल्याला वाटेल. म्हणून ते खरे आहे काय? बेडूक वा माणूस यांच्या बुद्धीत कितीही फ़रक असला, तरी विषय बुद्धीचा नसून सजीव प्राणीमात्राच्या उपजत जाणिवा जागृत असण्याचा आहे. आधूनिक माणसाच्या जाणिवा तितक्या जाग्या राहिल्या आहेत काय? असत्या तर पॅरीसचे हत्याकांड घडले असते काय?

कुठल्याही सजीवाला आपल्या अस्तित्वाला धोका असेल तर त्याचा प्रतिकार करण्याची जाण उपजतच मिळालेली असते. तो बेडूक असो वा माणुस असो. आपल्या शरीराला इजा होत असेल, तर त्यापासून आपला बचाव करण्याची क्रिया क्षणाचाही विचार न करता आपोआप सुरू होत असते. पण ह्या उपजत जाणिवा प्रशिक्षणाने वा सरावाने बोथट केल्या जाऊ शकतात. कोणी माणूस उंचावरून खाली बघायला घाबरत असेल तर सवयीने ती भिती दूर करू शकतो. कोणी पाण्यात उतरायला घाबरत असेल तर पोहण्याच्या सरावाने ती भितीही दूर होते. पण अशीही माणसे पुरात उडी घेत नाहीत वा उंचावरून खाली उडी घेण्याचा धोका पत्करणार नाहीत. कारण तिथे बुद्धी त्यांना सावध करीत असते. अशा माणसांची बुद्धीच जर विचार करण्याचे सोडून देईल, तर मग ही माणसे कुठलाही धोका पत्करून आत्महत्या करीत असतात. मरणाला माणूस घाबरतो आणि आपला बचाव करायला धडपडतो, ही त्याची जगण्याची उपजत प्रेरणा असते. एकदा त्या मरणाचीच भिती संपली, मग त्याला बचावाचे भान उरत नाही की मरण्याची चिंता उरत नाही. असे दोन्ही टोकाचे लोक सामान्य नसतात. त्यातला कोणी घातपाती आत्मघातकी होऊ शकतो. किंबहूना आपण काही पवित्र कार्य करीत असल्याची त्याची समजूत करून दिली, तर माणूस आत्मघाताला स्वेच्छेने तयार होतो. ही एक बाजू आहे. तर दुसरी बाजू अशी, की पवित्र कार्यासाठी मरायची तयारी नसलेले, पण स्वत:चा बचाव करण्याची इच्छाही गमावून बसलेले लोक तितकेच संवेदनाहीन असतात. येऊ घातलेल्या संकट वा मृत्यूशी दोन हात करायचा विचारही त्यांना शक्य नसतो. आज जगभरच्या लोकसंख्येची अशा दोन भागात विभागणी झाली आहे. एका बाजूला घातपाती मारेकरी आहेत आणि दुसर्‍या बाजूला जीव वाचवण्याची इच्छाशक्ती गमावलेले कोट्यवधी लोक आहेत.

मुंबई असो किंवा पॅरीस, तिथल्या हल्ल्यातील साम्य-साधर्म्य शोधायचा प्रयत्न सध्या चालू आहे. पण त्या दोन घटनांमधले साम्य जगातल्या प्रत्येक जिहादी हिंसेतले साधर्म्य असल्याचे आढळून येईल. एकीकडे धर्मकार्य म्हणून निरपराधांना निर्ममपणे ठार मारणारे जिहादी आहेत. त्यांना आपण पकडले वा मारले जाण्याची अजिबात भिती नाही. तर दुसरीकडे तुम्ही आम्ही आहोत. ज्यांना अशा संकटापासून मुक्ती मिळवण्याची इच्छाच उरलेली नाही. कारण असे मरणाचे संकट हानिकारक नाही, अशी आपली पक्की समजूत करून देण्यात आली आहे आणि आपण त्या समजूतीत मशगुल रहाण्यात धन्यता मानू लागलो आहोत. मग ती माणसे मुंबईकर असोत किंवा पॅरीसकर असोत. कसाबची टोळी मुंबईत येऊन किडामुंगी सारखी माणसे मारत सुटली, म्हणून त्या प्रवृत्ती विरोधात आपली काही तक्रार आहे काय? मेलेले आपल्या कर्माने गेल्याची स्वत:ची समजूत करून घेत आपण निश्चींत मनाने दिवस काढतो आहोत की नाही? पॅरीसचे नागरिक कुठे तसूभर वेगळे आहेत? अवघे दहा महिने आधी तिथल्या शार्ली हेब्दो या मासिकावर असाच हल्ला झाला होता. त्यात संपादक व चित्रकार पत्रकारांची निर्मम हत्या करण्यात आली. ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत ते हत्याकांड झाले. म्हणून तशाच घोषणा देणार्‍या इराक-सिरीयाच्या निर्वासितांना आपल्या देशात प्रवेश द्यायला कुणा फ़्रेन्चाने विरोध केल्याचे आपल्या ऐकीवात आहे काय? हे असे निर्वासितच आजवरच्या फ़्रान्समधील घातपाती हिंसेचे म्होरके व कर्ते राहिले आहेत. पण कुणा नागरिकाने त्याबद्दल तक्रारीचा सूर लावला आहे काय? धोका दिसतो आहे आणि त्यामागची प्रेरणा उमजते आहे. तापणार्‍या पाण्याचे चटके बसत आहेत. पण बेडूक त्यातून बाहेर पडायला राजी आहे काय? आपण जिहादचे चटके सोसतोय, पण त्याबद्दल बोलायची तरी हिंमत आहे आपल्यात?

जगात कुठल्याही देशात जा, तिथे आज भेडसावणार्‍या घातपात हिंसाचाराची घोषणा ‘अल्ला हो अकबर’ अशीच असते. पण त्याकडे निर्देश करून सवाल विचारण्याची इच्छा वा हिंमत कुणात राहिलेली आहे काय? असती तर युरोपवर चाल करून आलेल्या चाळीस लाख मुस्लिम-अरब निर्वासितांच्या गर्दीतून आलेले जिहादी आमच्याच जीवावर उठतील, असे तिथले नागरिक बोलले असते. कारण त्या गर्दीतून आपण प्रशिक्षित जिहादी युरोपात पाठवल्याचा इशारा इसिस संघटनेने दिला होता, पण बेडूक झालेल्या युरोपियन जाणिवा ते ऐकायला कुठे तयार होत्या? कोणी तुम्हाला हातपाय बांधून मृत्यूच्या जबड्यात ढकललेले नाही. त्यापासून सुटका करून घ्यायला तुम्ही मोकळे आहात, त्या बेडका इतकेच! तापणार्‍या पाण्यातून उडी घेणे तुमच्या हाती आहे. सवाल इच्छेचा आहे. आजही जगातल्या कुठल्याही देशात जिहादींनी नागरिकांचे हातपाय बांधलेले नाहीत, की निरपराधांना कुठल्या कोंडवाड्यात टाकलेले नाही. आपल्या नागरिकांना कोंडवाड्यात टाकले आहे, त्या त्या देशाच्या जाचक कायद्यांनी व त्यांचा अंमल करणार्‍या सत्ताधीशांनी! हे जाचक कायदे मोडून सुरक्षेची हमी देणारे व मारेकरी वृत्तीच्या मुसक्या बांधणारे कायदे आपापल्या देशात जारी करणार्‍यांना सत्ता देण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे ना? असला प्रकार निर्दयपणे मोडून काढणार्‍या अरबी देशात कुठला जिहाद होत नाही. मात्र मानवाधिकाराचे थोतांड माजलेल्या देशातच माणुस किडामुंगीसारखा मारला जातो आहे. आणि आपण त्या बेडकासारखे सुस्त मस्त आहोत, आपापल्या मरणाची प्रतिक्षा करीत! उदारमतवाद, पुरोगामीत्व, मानवता अशा गोष्टींनी आपल्या उपजत सुरक्षेच्या जाणिवाच बोथट केल्यात. त्याचा लाभ जिहादी घेत असतील. पण खरे गुन्हेगार ते मारेकरी नाहीत. मानवाधिकारवादी त्यांचे पोषिंदे म्हणून पहिले आरोपी आणि त्यांच्या कारवायांनी निष्क्रीय झालेले आपण दुसरे आरोपी आहोत.

17 comments:

  1. जळजळीत अंजन घातलं भाऊ डोळ्यात.

    ReplyDelete
  2. नम्र आवाहन
    माझे फ़ेसबुकवर तीन अकाऊंट होते आणि त्यातले दोन बंद पाडण्यात आले आहेत. अंदाज करायचा तर ही माझ्या पुरोगामी मित्रांची कृपा आहे. जेणेकरून त्यांना बोचणार्‍या व उघडे पाडणार्‍या मा्झ्या ब्लॉगचे लोकांपर्यंत पोहोचणे थांबावे किंवा किमान कमी व्हावे हा हेतू! तो अर्थात गेल्या महिन्याभरात यशस्वी झालेला नाही. मुख्यप्रवाहातून मी बहिष्कृत केलेला पत्रकार असूनही सोशल मीडियातून माझी भूमिका अधिक लोकप्रिय झाल्याने पुरोगामी मित्र व पत्रकार विचलीत झाल्यास नवल नाही. विचार स्वातंत्र्याचे आग्रही नेहमीच अधिकार मिळाल्यावर विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करतात. हा जागतिक इतिहास आहे. म्हणूनच हे नाटक पुरोगामी मित्रांचेच असण्याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मात्र पुन्हा पुन्हा नवे फ़ेसबुक अकाऊंट सुरू करा किंवा बंद पाडलेले सुरू करून घेण्यात वाया घालवायला माझ्यापाशी सवड नाही. त्यापेक्षा अधिकाधिक वेळ लिहीणे व वाचन-चिंतन यासाठी खर्ची घालणे मला पसंत आहे. मात्र याकामी मला अन्य खर्‍या वाचक मित्रांची मदत हवी आहे. माझ्या ब्लॉगवर लेख टाकला, की त्याचा सारांश व लिन्क अशा मित्रांनी आपापल्या भिंतीवर टाकून मला सहाय्य केल्यास या फ़ुसक्या पुरोगाम्यांशी लढण्यात माझा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे लेख वा विषय अधिक लोकांपर्यंत जायला हातभार लागू शकेल. काम सोपे आहे. जे अशी मदत करू इच्छितात त्यांना मी इमेलने ‘कटपेस्ट’ करण्यायोग्य माझ्या ब्लॉगची पोस्ट पाठवत जाईन आणि त्यांनी नित्यनेमाने ती पोस्ट आपल्या भिंतीवर टाकावी. ज्यांना ही मदत देणे इष्ट वाटते, त्यांनी आपापले इमेल मला इथे किंवा मेसेज बॉक्समध्ये पाठवावेत. म्हणजे आपला हेतू साध्य होईल आणि मला फ़ेसबुकमधून बाद केल्याचा आनंद पुरोगामी मित्रांनाही मिळवता येईल.
    भाऊ तोरसेकर

    Great idea torsekaesaheb. I am very much glad to post your article. my mail is nyn333@gmail.com

    ReplyDelete
  3. माझा ईमेल पत्ता sprasadco@mail.com

    ReplyDelete
  4. भाऊसाहेब...किती तळमळीने अभ्यासपूर्ण विष्लेशण करता हो.....आशा आहे जागृती येईल..!!

    ReplyDelete
  5. आशा आहे आपल्या लिखाणामुळे जागृती येईल....फारच छान !!

    ReplyDelete