अखेर दहा दिवसाच्या अवधीत छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात ‘सुखरूप’ आणले गेले आहे. हे काम कधी होईल किंवा नाही याचीच चर्चा जास्त झाली. पण ज्यांना त्यातले काहीच कळत नाही, त्यांच्याकडून यापेक्षा अधिक अपेक्षाही करता येणार नाही. छोटा राजन याची एक फ़रारी गुन्हेगार अशीच ओळख माध्यमातल्या बहुतेक शहाण्यांना आहे. पण दुसरीकडे अशा गुन्हेगारांनाच विविध देशातील गुप्तचर संघटना आपापले हेतू साध्य करण्यासाठी मोठ्या खुबीने वापरत असतात, याचे भान फ़ार थोड्या जाणकारांना असते. ते असेल तर छोटा राजन कागदोपत्री गुन्हेगार असला, तरी भारतासह अनेक देशांना उपयुक्त असाही व्यक्ती होता, हे लक्षात येऊ शकते. भारताला तर दाऊद वा तत्सम शत्रूंच्या कारवाईला शह देण्यासाठी असेच छोटे ‘मोठे’ उपयोगाचे असतात. पण भारताखेरीज श्रीलंका वा इंडोनेशिया अशा देशांनाही दाऊदसारख्यांचा त्रास होत असेल, तर छोटा राजनसारखी मंडळी मदतीला घ्यावी लागतात. म्हणूनच इथे जे काही गुन्हे राजन विरोधात दाखल असतील, त्यात त्याला शिक्षा करण्यापेक्षा, त्याचा अन्य कारस्थानी कामात वापर करून घेतला जात असतो. त्याचा तपशील कधी बाहेर येत नाही. असा आपला ‘खास माणुस’ संकटात असेल तर त्याची मदतही त्या गुप्तचर संघटना करीत असतात. तसे नसते तर इतक्या दिर्घकाळ राजन ऑस्ट्रेलियात वास्तव्य करू शकला नसता आणि इतक्या सहजासहजी इंडोनेशियातही येऊ शकला नसता. त्याला परदेशी राहुन खोटा पासपोर्ट मिळू शकला नसता. हे लक्षात घेतले, तरच सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदलेले असताना राजनला इथे मुंबईत आणायचे कशाला टाळले गेले, त्याचा अंदाज येऊ शकतो. अर्थात त्यानेच मुंबईचे अनेक पोलिस अधिकारी दाउदचे निष्ठावान असल्याचे आधीच सांगितलेले आहे. त्यामुळेच त्याला दिल्लीतच ‘सुरक्षित’ जागी ठेवले गेले आहे.
योगायोग असा, की छोटा राजनला भारतात आणणार व इंडोनेशियात पकडला म्हटल्यावर तिकडे दाऊदची पाकिस्तानच्या ‘सुरक्षित’ घरातही गाळण कशाला उडाली असेल? विनाविलंब दाऊदचे वास्तव्य असलेल्या घराबाहेर थेट मिलीटरी कमांडो तैनात करण्यात आले. याचा अर्थ असा, की राजन सुरक्षित झाल्यावर दाऊदचा काटा काढला जाण्याच्या भयाने पाकिस्तानला पछाडले आहे. दाऊद-राजन ही व्यक्तीगत दुष्मनी असण्यापेक्षा ती भारत व पाकिस्तान यांच्या गुप्तचर खात्यांत चाललेली सावल्यांची लढाई आहे. त्यात मुंबई पोलिसांवर राजनने संशय कशाला व्यक्त केला? त्याची अनेक कारणे आहेत आणि उदाहरणेही आहेत. २००० सालात बॅन्कॉक येथे दाऊदच्या हस्तकांनी राजनवर हल्ला केल्यावर मुंबई पोलिस तिथे रुग्णालयात पडलेल्या राजनला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले होते. इतकी घाई मुंबई पोलिसांना कशाला झालेली होती? असे कधी दाऊदच्या बाबतीत झाल्याचे ऐकीवात नाही. अर्थात तो प्रयत्न फ़सला. कारण त्याला कायदेशीर बाजू नव्हती. दुसर्या देशातील गुन्हेगाराला आणायला परराष्ट्र खात्यामार्फ़त प्रयत्न करावे लागतात. इथे त्याला टांग मारून मुंबई पोलिस पथक थायलंडला पोहोचले होते. तशीच आणखी अनेक प्रकरणे सांगता येतील. मुंबई पोलिस दाऊदसाठी पक्षपात करीत असल्याचा निष्कर्ष त्यातून निघू शकतो. दाऊदला पाकिस्तानात जाऊन मारण्याचे भारताने प्रयत्न आजवर अनेकदा केलेले आहेत. त्यापैकी एकदा छोटा राजनच्या दोन हस्तकांना खास प्रशिक्षण देण्यात आलेले होते. त्यासाठी त्यांना दिल्लीत गुपचुप आणलेले होते. ते प्रशिक्षण देऊन कामगिरीवर धाडले जाणार होते, अशावेळी अकस्मात त्यांनाच मुंबई पोलिसांच्या पथकाने दिल्लीत धाड घालून पकडले होते. मुद्दा इतकाच, की त्यांना फ़रारी गुन्हेगार पकडायचे होते, की दाऊदचे मारेकरी रोखायचे होते?
पहिली गोष्ट अशी, की कुठल्याही बाहेरील राज्यातील वा आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील गुन्हेगारांना पकडताना स्थानिक पोलिसांची परवानगी व सहकार्य घेणे अपरिहार्य असते. पण दिल्लीत छोटा राजनच्या साथीदारांना पकडायला गेलेल्या पोलिस पथकाने परस्पर एक गाडी भर रस्त्यात रोखली आणि त्यातल्या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच गाडीत गुप्तचर विभागाचे माजी संचालकही होते. त्यांनी आक्षेप घेतला आणि मुंबईच्या अधिकार्यांनी हट्टच केला, तेव्हा दिल्ली पोलिसांना बोलवायला भाग पाडले. मगच दोन्ही गुन्हेगारांचा ताबा मुंबई पोलिसांना दिलेला होता. इथे मुद्दा असा येतो, की दिल्ली पोलिसांना अंधारात ठेवून मुंबई पोलिस पथक दिल्लीत परस्पर कारवाई कशाला करत होते? राजनच्या या दोन्ही साथीदारांना परस्पर उचलून कसलीही कागदोपत्री नोंद राहू नये, असा प्रयत्न त्यात होता काय? त्यांना परस्पर चकमकीत मारले जाण्याशी शक्यता नव्हती काय? आणखी एक मुद्दा असा, की दाऊदच्या हत्येसाठी प्रशिक्षण दिल्या जाणार्याच फ़रारी गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिस इतके उतावळे कशाला झाले होते? त्यांना राजनचे हे साथीदार कुठे आहेत, ही नेमकी माहिती कोणी पुरवली होती? जे गुन्हेगार माजी गुप्तचर अधिकार्याच्या सोबत व संरक्षणात असतात, त्यांची माहिती शत्रू गुप्तचर संस्थाच उघड करू शकते ना? इथे मग मुंबई पोलिसांच्या कृती संशयास्पद होऊन जातात. छोटा राजनने मुंबई पोलिसांविषयी शंका वा संशय कशाला व्यक्त करावा, त्याचे उत्तर अशा घटनांमध्ये शोधता येते. कारण दाऊदच्या टोळीबाबत जितकी तत्प्ररता मुंबईच्या पोलिसांकडून दिसत नाही, तितकी त्याच्या शत्रू टोळ्यांच्या बाबतीत अनेकदा दिसली आहे. हे आपण बाहेरून बघू शकत असू, तर त्यात गुंतलेला राजन अधिक नेमकेपणाने माहिती देऊ शकतो. त्याचा संशय बिनबुडाचा मानता येत नाही.
अर्थात छोटा राजन हा भारतीय गुप्तचर संस्थांना मदत करीत होता वा तेही त्याची मदत घेत होते; हे आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच त्याला अटक झालेली दिसत असली तरी प्रत्यक्षात हा सौदाही असू शकतो. जसा दाऊदला हाताशी धरून पाक हेरसंस्था अनेक पापकर्मे उरकून घेत असते, तसेच काम भारतीय गुप्तचरांनाही करावे लागत असते. यातून कुठल्याच देशाची सुटका नसते. कारण गुन्हेगारांना कायद्याचे कधीच भय नसते. उलट प्रत्येक कायदा प्रशासन चालवणार्यांच्या पायातच बेड्या ठोकत असतो. मग कायद्याला बगल देऊन प्रशासनाला अनेक गरजा पुर्ण कराव्या लागत असतात. ते काम कुठलाही सरकारी सेवेतला अधिकारी कर्मचारी करू शकत नाही. ते काम अशा गुन्हेगारांकडून करून घ्यावे लागत असते. मग जेव्हा असे आपले हस्तक संकटात असतात, तेव्हा त्यांना संरक्षण द्यावे लागते. पण त्याची उघड वाच्यता करता येत नाही. म्हणूनच राजनला देशाबाहेर धोका असेल तर भारतातच आणुन सुरक्षित करणे, ही ज्यांची जबाबदारी आहे त्यांना ती पार पाडावी लागते. त्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारी कृतीही करावी लागते. देशप्रेमी असे बिरूद लावून त्याला मायदेशी परत आणणे शक्यच नसेल, तर गुन्हेगार म्हणून आणल्याने कुणालाच काही फ़रक पडत नाही. थोडक्यात राजनचे अटकनाट्य हे लिहीलेल्या पटकथेनुसार पार पडले आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत मुंबई वा महाराष्ट्रात आणले जाणे शक्य नव्हते. किंबहूना तशी शक्यता असती, तरी राजनने अटकनाट्यात सहभाग घेतला नसता. राजनच्या माफ़ियागिरीच्या कहाण्या आपण माध्यमातून खुप वाचलेल्या असतील. पण जशा दाऊदच्या घातपाती कहाण्या आपल्यापर्यंत येतात, तसे काही राजनबद्दल वाचायला मिळत नाही. ज्यांना त्याविषयी उत्सुकता असेल, त्यांना पाक माध्यमात त्या बातम्या शोधायला लागतात. कारण राजन पुराण बातम्यातून येते त्यापेक्षा खुप मोठे व गुंतागुंतीचे आहे.
आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे राजनचे एकाच वाक्य आता पर्यंत आईकाण्यास मिळाले ते म्हणजे "मुंबई पोलिसांमध्ये दावूद्चे हस्तक आहेत" बाकी तो काय बोलला हे फार काही आइकले नाही.
ReplyDelete