Friday, November 20, 2015

सौदी सिंहासन डळमळू लागलेय



फ़्रान्सच्या मोठ्या घातपाती हल्ल्यानंतर युरोपभर धमाल उडालेली असताना सर्वांचे लक्ष इसिस व सिरीया-इराकने वेधून घेतले आहे. म्हणूनच मग अन्य तितक्याच महत्वाच्या घडामोडी दुर्लक्षित होऊन जातात. किंबहूना पॅरीसच्या घातपाताशी संबंधित असूनही अशा घटनांकडे दुर्लक्ष होते. अशी एक घटना आहे येमेनचा परागंदा राष्ट्राध्यक्ष मायदेशी परतला आहे. अब्द रब्बु हादी हे येमेनचे राष्ट्राध्यक्ष मागले कित्येक महिने आपल्या देशातून परागंदा होऊन सौदी अरेबियात वस्तीला गेले होते. अज्ञातवासातून त्यांनी देशाचा कारभार चालविला होता. कारण इराण समर्थित हौथी नावाच्या जिहादी अतिरेक्यांनी येमेनमध्ये अराजक माजवले होते. तिथे फ़सलेल्या कित्येक हजार भारतीय व अन्य देशाच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची यशस्वी कारवाई भारतीय सेनेने पार पाडल्याचे आपल्या स्मरणात असेल. इतके अराजक होते, कारण हौथींनी तिथे उच्छाद मांडला होता. एकामागून एक मोठी शहरे वस्त्या त्यांच्या ताब्यात गेल्यावर हादी यांनी सौदीकडे पळ काढला होता. मित्र देश म्हणून त्यांना सौदी राजांनी आश्रय दिला व त्यांच्या वतीने यादवीत हस्तक्षेप करून आखाती अरबी देशांची आघाडी बनवली होती. त्यामार्फ़त येमेनमध्ये सौदीने सैन्य पाठवले व हवाई हल्ले चढवले होते. मात्र ते युद्ध सौदीला सोपे गेले नव्हते. इतके जवळ असूनही इसिसने त्यात नाक खुपसले नाही. कारण हौथी हे इराण समर्थक असून शियापंथीय जिहादी बंडखोर आहेत. किंबहूना इसिसच्या मागची खरी शक्ती सौदी घराणे आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही. म्हणून तर इसिसला संपवताना तशी वेळ आली तर सौदीवर हल्ले करण्याची धमकी पुतीन यांनी दिलेली होती. पण तशी वेळ अजून आलेली नाही. कारण इसिसने मोठी चुक करून फ़्रान्समध्ये घातपात केला किंवा त्याची जबाबदारी घेतली. सहाजिकच सौदीचा मित्र असलेल्या फ़्रान्सने पवित्रा बदलला आहे.

आजपर्यंत इसिसपेक्षा असदला व त्याच्या सेनेला संपवणारे हल्ले अमेरिका व नाटो देश करीत होते. पण शुक्रवारच्या हल्ल्यानंतर फ़्रान्सने थेट इसिसच्या अड्ड्यावर आणि बालेकिल्ल्यावर हल्ले सुरू केले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन पुतीन यांच्याशी जुळवून घेत संयुक्त हल्ले करण्याची योजना आखलेली आहे. त्यामुळे सौदी राजे मोठ्या अडचणीत आले आहेत. कालपर्यंत इराण, इराकच्या सत्ताधीशांना हैराण करणारे इसिसचे लढवय्ये आता घाबरले असून, आपला बचाव करण्यासाठी त्यांनी सौदी राजांना साकडे घातल्यास नवल नाही. पण तसे सौदी घराणे उघडपणे करू शकणार नाही. म्हणजेच इसिसला वाचवणे सौदीला शक्य नाही. अशा वेळी येमेनच्या अध्यक्ष हादी यांचे लोढणे सौदीला गळ्यात नको होते. म्हणूनच त्याला विनाविलंब माघारी धाडलेले आहे. म्हणजे़च आता येमेनच्या युद्धातून सौदी माघार घेत असल्याचा संदेश दिला गेला आहे. सौदी त्यात माघार घेत आहे, कारण आता त्या राजेशाहीला त्यांनीच उभा केलेला भस्मासूर भेडसावतो आहे. कालपर्यंत सिरीयाच्या असदला अडचण करण्याच्या बोलीवर इसिसला सौदीने मदत केलेली आहे. त्यासाठीच इसिसला रोखण्याचे नाटक रंगवून अमेरिकेनेही असदलाच निकामी करणारे हल्ले केले होते. परंतु त्यात पुतीन यांनी उडी घेऊन सगळाच खेळ विस्कटून टाकला आहे. पुतीन यांनी थेट व नेमके इसिसवर हल्ले चढवून असदची शक्ती वाढवली आहे. त्यात अमेरिका व नाटो देश असद विरोधात पुढे आले नाही, तर इसिसची ससेहोलपट होणार आहे. त्यांना पळायला जागा उरणार नाही. अशावेळी त्यांनी नजिकचे प्रदेश म्हणून सौदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना रोखणे सौदी सेनेला व लष्कराला अशक्य होऊन जाऊ शकते. शिवाय इसिसचे लढवय्ये सूडबुद्धीने अतिशय क्रुर वागतात. म्हणूनच सौदीला त्यांचा धाक असल्यास नवल नाही. त्याला सामोरे जाण्याची सौदी राजे तयारी करीत असल्याची ही खुण आहे.

आपल्याच पायाशी आग जळू लागली म्हटल्यावर सौदी राजांनी येमेनच्या अध्यक्षाला पिटाळून लावले, असे म्हणायला हरकत नाही. मागल्या काही वर्षात जगभर जिहादी व वहाबी हिंसा व धार्मिक आक्रमतेची आग पेटवण्यात सौदीच्या राजघराण्याने सतत पुढाकार घेतला होता. कधी ओसामा वा इसिसचा बगदादी किंवा पाकिस्तान यांना पुढे करून सौदी राजे सतत नामानिराळे राहिलेले आहेत. पण मुशर्रफ़ म्हणतात तसा सौदीचा भस्मासूर आता त्यांच्यावरच उलटण्याचे भय सतावते आहे. ओसामा वा जिहादी आम्हीच तयार केले, पण आता ते आमच्यावर उलटले आहेत, असे मध्यंतरी मुशर्रफ़ म्हणाले होते. सौदीची कहाणी भिन्न नाही. पेट्रोलच्या पैशाने जगभरात मुस्लिम तरूणांना जिहादमध्ये ओढण्याचे कारस्थान मूळात सौदीचे आहे. मागे राहुन त्यांनी ते पाप बगदादी, ओसामा इत्यादि हस्तकांकडून करून घेतले. वेळ आल्यावर ओसामाला देशातून हाकलण्यापर्यंत मजल मारली. पण बगदादी ओसामासारखा नाही. तो अतिशय क्रुरकर्मा व सुडबुद्धीने पेटलेला जिहादी आहे. म्हणूनच आपल्याला सौदी राजांनी वापरून फ़ेकल्याची धारणा झाल्यास तो सौदीलाही गवसणी घालण्याचा धोका आहे. किंबहूना त्याने स्वत:ला खलिफ़ा म्हणूनच घोषित केले आहे. धार्मिक निकषावर मग त्याला सौदीत धुसणेही भाग आहेच. कारण खलिफ़ा हा इस्लामी सत्ता व जनतेचा सार्वभौम सुलतान असतो आणि मक्का मदिना अशा धर्मस्थळांवर त्याची सत्ता चालावी, असाही संकेत आहे. म्हणजेच उद्या बगदादीने सौदीत घुसून मक्का मदिनेवर अधिकार सांगितला, तर सौदी घराण्याची सत्ता डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही. कारण वहाबी पंथाचेच अधिक सौदी लढवय्ये बगदादीला सामील आहेत आणि एकूणच सौदी राजापेक्षा तिथली लोकसंख्या वहाबी पंथाशी निष्ठावान आहे. ह्या भयाने सौदी घराण्याची सध्या तारेवरची कसरत सुरू झाली आहे.

कालपर्यंत शियांच्या विरोधात सुन्नी अशी लढाई लढवून पश्चिम आशियात आपले वहाबी वर्चस्व निर्माण करण्याचे साळसुद डावपेच सौदी घराण्याने यशस्वीरित्या खेळले. पण आता सर्वच डाव उलटू लागले आहेत. आधी रशियाने हल्ले करून इसिसचा कणा मोडला आणि आता त्याच्या मदतीला फ़्रान्स गेल्यास अमेरिकेला त्यात कुणाची बाजू घ्यावी, असा पेच पडणार आहे. इसिसच्या विरोधात अमेरिका हल्ला करायला पुढे झाली नाही आणि निष्क्रीय राहिली, तरी पुतीन यांचा डाव यशस्वी होऊ शकतो. कारण पुतीन यांना पश्चिम आशियात इराण-असद यांना शिरजोर करायचे आहे. पर्यायाने सौदीला खच्ची करायचे असून, तसे झाल्यास अमेरिकेचे त्या भागात असलेले वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. फ़्रान्समध्ये घातपात करून इसिसने सौदीच्या गोटातील फ़्रान्सला पुतीन-असद यांच्या गोटात जायला भाग पाडले आहे. त्यामुळे सौदी घराण्याला नाटो व अमेरिका यांचे असलेले सुरक्षा कवच विस्कटले आहे. परिणाम सरळ आहे. सौदीला आता पश्चिम आशियात स्वत: उडी घ्यावी लागेल, अथवा त्या एकूण राजकारणातून माघार घ्यावी लागेल. त्याच कारणास्तव मग येमेनमधून सौदीने एकप्रकारे माघार घेतली आहे. तिथल्या अध्यक्ष हादी यांना मायदेशी पाठवून त्याचा आरंभ झालेला दिसतो. पॅरीसमधील घातपाती हल्ला अनेक राजकीय डावपेच व राजकीय समिकरणांना कलाटणी देणारा ठरू लागला आहे. एकूणच जगभरात जे जिहादचे हिंसक तांडव चालू आहे, त्यामागे सुन्नी मुस्लिमांची शक्ती आहे. तीच खच्ची झाली तर पर्यायाने सौदी व आखाती देशांचे मनोधैर्य खचणार असून इराणला आपला व शिया पंथाचा वरचष्मा निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. हीच स्थिती आल्यास मग सौदी घराण्याचे सिंहासन डळमळीत होऊ शकते. किंबहूना म्हणूऩच कुठलाही गाजावाजा न करता सौदीने येमेनच्या अध्यक्षाला मागे पिटाळले आहे.

No comments:

Post a Comment