इथे वा एकूण माध्यमात जी मते व्यक्त होतात, त्याकडे पहाता विचार करणारी माणसे किती गोंधळलेली आहेत, त्याचा अंदाज येतो. मग असे लोक मोदीभक्त वा भाजपाचे समर्थक असोत किंवा त्यांचे पुरोगामी विरोधक असोत. मोदी यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली व भाजपाला बहुमत मिळवून दिले. म्हणजेच मतदाराने त्यांच्या विकास विषयक भूमिकेला प्रतिसाद दिला, असे अगदी पुरोगाम्यांचे मत आज झालेले आहे. पण जेव्हा लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी उडालेली होती, तेव्हा याच पुरोगाम्यांना मतदार प्रतिगामी जातियवादी व हिंदुत्ववादी मोदींना प्रतिसाद देणारच नाहीत, याची पक्की खात्री होती. तोच त्यांचा विचार असेल, तर मग निदान आपण तेव्हा चुकीचा विचार केल्याचे त्यापैकी कोणी कबुल करणार नाही. कारण निकाल बघून ६९ टक्के लोकांनी मोदींना नाकारल्याचा युक्तीवाद तेव्हा केला गेला होता. आता मात्र वर्ष उलटून गेल्यावर मतदार मोदींच्या विकासाच्या भाषेला फ़सला, अशी कसरत चालू आहे. म्हणजेच लोकसभा मतदानात मोदींना जनतेने सकारात्म प्रतिसाद दिला, अशी कबुली पुरोगामीही आडवाटेने देत आहेत. दुसरीकडे मोदीसमर्थक वा भाजपावाल्यांना आपल्यासाठी लोकांनी दिर्घकालीन सनद लिहून दिली, अशीच धारणा दिसून येते. लोकांनी मोदींना व भाजपाला मते दिली म्हणजे पुरोगामी वा विरोधातला विचार पुर्णपणे फ़ेटाळून लावला, असा या दुसर्या बाजूचा समज आहे. मग तेव्हा त्यांना ३१ टक्के विरोधात ६९ टक्के मते असला किंवा एनडीएला मिळालेली ४२ टक्के विरोधातली ५८ टक्के मते, यातला असमतोल विचारातही घ्यावासा वाटत नाही. म्हणून मग कसलेही युक्तीवाद चालू असतात. त्यामागचा एक गैरसमज कोणाला उलगडून तपासावा असेही वाटत नाही. खरेच लोकांनी मोदींना कौल दिला, की इतरांना नकार दिला? दिड वर्षापुर्वी झालेल्या मतदानाचा नेमका अर्थ कसा लावायचा?
मोदींना मिळालेले यश आणि मागल्या सहा सात दशकात कॉग्रेसला मिळत राहिलेले यश, यात तसूभर फ़रक नाही. तेव्हा मतदार पुरोगामी नव्हता आणि आज त्याला हिंदूत्वाची वा विकासाची भुरळ अजिबात पडलेली नाही. मतदार तसाच आहे आणि तो उपलब्ध धोक्यापैकी किमान धोक्याची निवड करत असतो. लोकशाही राजकारण देशात सुरू होऊन सात दशके होत आली, तरी सामान्य नागरिकाला उत्तम व नालायक अशा पर्यायातून निवड करण्याची संधीच कोणी दिलेली नाही. चर्चगेट ते विरार वा शिवाजी टर्मिनस ते कल्याण कसारा-कर्जत असा लोकल प्रवास करणार्याने कुठले उपनगर निवडले, याला त्याची आवडनिवड म्हणता येत नाही. त्यात त्याने अधिक सुसह्य नावड निवडलेली असते. शक्य तितके त्याला मुंबईतच वास्तव्य करायचे असते. पण ते अजिबात शक्य नसल्याने दूरची, पण सुसह्य ठरू शकेल अशी जागा त्याने निवडलेली असते. आजवरच्या निवडणूकीत लोकांनी तशाच प्रकारचे मतदान अगत्याने केलेले आहे. कारण त्यांच्यासमोर कुठलाही उत्तम पर्याय ठेवलाच गेलेला नाही. सहाजिकच कमी त्रासदायक होईल असा पर्याय त्यांनी निवडला आहे. कॉग्रेस सतत दिर्घकाळ यशस्वी झाली, त्याचे श्रेय तिच्या पुरोगामीत्वाला नव्हते की नेहरू घराण्यालाही नव्हते. सलग पाच वर्षे कोण सत्ता राबवू शकेल, या निकषावर कॉग्रेस निवडणूका जिंकत राहिली. म्हणून तर आणिबाणीचे चटके सोसून केलेला बदल जास्त धोकादायक जाणवला; तेव्हा मतदाराने अडीच वर्षात पुन्हा इंदिराजींना प्रचंड बहूमत दिले. ते आणिबाणीवर शिक्कामोर्तब नव्हते. तर त्याहीपेक्षा धोकादायक अशा जनतापक्षीय पुरोगामी अराजकाच्या विरोधातली नावड निवड होती. आज आपण देशात मोदींचे भाजपा सरकार बघतो, त्याचीही निवड तशीच नावडीत कमाल सुसह्य अशी आहे. इ्तर पर्यायांपेक्षा सुसह्य इतकेच तिचे महत्व आहे.
अशा स्थितीत देशात अघोषित आणिबाणी आलीय वा सहिष्णूता संपत चाललीय, यावरून गदारोळ माजवून कुठलाही फ़रक पडणार नाही. अगदी उद्या जरी लोकसभेसाठी मतदान घेतले, तरी लोक इतकाच नव्हेतर थोडा जास्त कौल मोदींना देतील. कारण आपण सरकार चालवू शकतो, याची ग्वाही मोदींनी या दिड वर्षात दिलेली आहे. मात्र ते सरकार नालायक आहे किंवा उत्तम आहे, यावर मतदान होणार नाही. मोदींना हटवायचे, तर सरकार चालवू शकेल, असा दुसरा पर्याय लोकांपुढे नाही. म्हणून पुन्हा मोदींना कौल मिळेल. त्याला भाजपाकडे झुकलेले मत असे मानणे मुर्खपणाचे ठरेल. समजा तसे झाले, तर साहित्यिकांच्या चिंतेचा जनमतावर परिणाम झाला नाही वा असहिष्णूताच लोकांना हवी आहे, असाही त्याचा अर्थ घेणे चुकीचे असेल. लोकांना उत्तम पर्याय हवा असतो. कल्याणकारी गुणग्राहक सत्ता लोकांनाही हवी असते. पण तशी सत्ता चालवणारा कोणी राज्यकर्ता उपलब्ध नसेल, तर सत्तेशिवाय देश व समाज चालू शकत नाही, हे बुद्धीमंतांना उमजत नाही. पण सामान्य जनतेला ते नेमके कळते. म्हणून लोक उपलब्ध असलेल्या पर्यायतला सुसह्य पर्याय निवडतात. त्याला नावड-निवड असे म्हणता येईल. देशात अत्यंत उत्तम सरकार व राजकीय पक्ष असावे, अशी प्रवचने लोकांनी सतत ऐकली व वाचली आहेत. पण तशी कुठली पक्ष संघटना वा नेता लोकांच्या निदर्शनास आलेला नाही. जो आशा निर्माण करू शकला, त्याला लोकांनी प्रत्येकवेळी संधी दिली आणि त्याने अपेक्षाभंग केल्यावर त्याला तितक्याच निर्दयपणे बाजूला सारून जनतेने त्यापेक्षा नालायक वाटणार्याला पुन्हा सत्ता दिलेली आहे. त्यामागची जनभावना समजून घेतली, तर राजकीय परिवर्तन घडवता येऊ शकेल. जे त्याविषयी अखंड पोपटपंची करीत असतात, त्यांना आजवर असा काही पर्याय समोर आणता आला नाही, हेही सामान्य माणूस जाणुन आहे. म्हणून तो जाणत्यांकडे जाणूनबुजून काणाडोळा करीत असतो.
त्सुनामीत फ़सलेल्यांना जीव वाचवणारा हवा असतो. तिथून प्राण बचावले मग लगेच पंचतारांकित व्यवस्था नसल्याची तक्रार करणार्या बुद्धीमंता इतकी सामान्य जनता व्यवहारशून्य नसते. तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला गढूळ वा अशुद्ध पाणी दाखवून थांबवता येत नाही. त्याला समोरचे पहिले पाणी गंगेपेक्षा पवित्र वाटत असते. ती अगतिकता असली तरी वास्तविकता असते. ‘पाव मिळत नाही तर केक खा’, हा बुद्धीवाद सामान्य जनतेला पचणार नसतो, तर अधिक प्रक्षुब्ध करीत असतो. आजच्या भारतीय मतदार व सामान्य जनतेची मानसिकता तशी आहे. कुठलेही सरकार वा राजकीय पक्ष परिपुर्ण नाहीत वा कुणी तितका चांगला कारभार करून दाखवलेला नाही. म्हणूनच मग मुदतभर सरकार चालविल आणि सुसह्य कारभार करील, या किमान अपेक्षेने लोक सत्ता निवडत असतात. जिंकणार्याला तो आपला मोठा विजय वाटतो. त्यात अर्थ नाही, तितकाच पर्याय उभा न करणार्यांच्या टिकेत जनतेला अर्थ वाटत नसतो. लोकांच्या घरातल्या नळाला वेळच्या वेळी पुरेसे पाणी यावे म्हणून संघर्ष करणार्या मृणालताईंना डोक्यावर घेणार्या मुंबईने, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवत भरकटल्यावर त्याच मृणालताईंचे डिपॉझीट जप्त केले होते. त्याचा अर्थ पुरोगामीत्वाचा पराभव झाला नाही, तर वास्तविकतेचे भान सोडून केलेल्या कल्पनाविलासाला लोकांनी झिडकारले होते. मृणालताई पर्याय झाल्या तेव्हा लोकांनी स्विकारले. त्यापेक्षा उपयुक्त पर्याय आल्यावर फ़ेटाळले. राजकीय पक्ष वा संघटना प्रतिगामी पुरोगामी असतात. मतदार व्यवहारी असतो. त्या़चे भान राखून चालतात, त्यांनाच लोकशाहीत सत्ता संपादन करता येते. आजचे पुरोगामी पाव नासका आहे म्हणून केकच्या गप्पा मारतात, तो लोकांना साध्या डोळ्यांनी दिसतही नसेल, तर लोक मोदींना उचलून फ़ेकणार कशाला? हातातला पाव नासका असेल, तर निदान ताजा पाव तरी जनतेला दिसू देत ना?
आशा निर्माण होईल असा एकही नेता जनतेला दिसत नव्हता. त्यात मोदींची स्वच्छ प्रतिमा त्यांच्या बाबत आशा निर्माण करण्यास पूरक ठरली कारण त्यांना भ्रष्टाचार व घोटाळ्याचा कोणताही इतिहास नाही.
ReplyDelete