Tuesday, July 11, 2017

मागील पानावरून पुढे ‘लालू’

lalu cartoon के लिए चित्र परिणाम

कुठल्याही बाबतीत अतिरेक हा घातक असतो. पण याचे भान अनेक लोकांना रहात नाही. बिहारचे लालूप्रसाद यादव त्यापैकीच एक आहेत. म्हणूनच ते पुन्हा गोत्यात आलेले आहेत. पंधरा वर्षापुर्वी भाजपा-नितीश यांच्या एकजुटीने लालूंच्या साम्राज्याला पहिला धक्का दिलेला होता. तोपर्यंत लालू बिहारमध्ये अजिंक्य मानले जात होते. पण राजकारणाने असे वळण घेतले, की पडझडीतून सावरण्याची आणखी एक संधी लालूंना मिळाली आणि भाजपा-नितीश आघाडी मोडीत निघाली. २००५ सालात प्रथम लोकांनी लालूंना नाकारले, तेव्हा भाजपा-नितीश आघाडीला कसेबसे काठावरचे बहूमत मिळालेले होते. पण पुढल्या पाच वर्षात या दोघंनी इतका चांगला कारभार करून दाखवला, की २०१० सालात लोकांनी लालूंना जवळपास नेस्तनाबूत करून टाकले. लालूंची विधानसभेतली शक्ती इतकी क्षीण झाली, की लालू संपले असेच मानले जात होते. पण मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आणि नितीश यांना अवदसा आठवली. त्यांचा मोदी विरोध इतक्या टोकाला गेला, की सावरलेला बिहार नितीशनी जणू पुन्हा लालूंच्या घशात घातला. लोकसभेत नितीशसह लालूंचा फ़ज्जा उडालेला होता. त्यानंतर आपला मोदी विरोध आवरून नितीश सावरले असते, तर त्यांच्यावर आजसारखी केविलवाणी परिस्थिती आली नसती. त्यांना आजच्या इतक्या कसरती कराव्या लागल्या नसत्या. पण एकदा दुर्बुद्धी झाली, मग त्यातून बाहेर पडायला वेळ लागत असतो. नितीशनाही तसा वेळ लागला आहे. कारण त्यांनी लालू नावाचा धोंडा आपल्याच पायावर मारून घेतला होता. अर्थात लालूंनाही अनुभवातून काही शिकता आले नाही. म्हणूनच आता लालूही गोत्यात सापडले आहेत. त्यांच्यावर खटले चालले आणि त्यांना निवडणूकीतून बाद करण्यात आलेले होतेच. आता त्यांच्या संपुर्ण कुटुंबावरच खटल्याचे गडद सावट पसरले आहे आणि नितीशना गळ्यातून हे लोढणे काढण्याची गरज भासू लागली आहे.

चारा घोटाळ्यात फ़सल्याने लालूंची निवड रद्द झाली आणि त्यांना निवडणूक लढवण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना नितीशशी मोदीविरोधात युती करून त्यांनी आपला पक्ष पुन्हा सावरला. तर आपल्याच दोन्ही मुलांना मंत्रीमंडळात बसवण्याची घाई करायला नको होती. तर नितीशना वेसण घालण्याच्या हव्यासातून बहुधा लालूंनी आपल्या धाकट्या पुत्राला उपमुख्यमंत्रीपदी बसवले आणि मुलीला राज्यसभेत पाठवण्याची घाई केली. जेव्हा या प्रत्येकाच्या पापाचे घडे उलटे होऊ लागले, तेव्हा नितीशसाठी हे गळ्यातले लोढणे झालेले आहे. त्यापैकी लालूंची कन्या मिसा भारती व तिचा पती यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांचा इन्कार करण्यात धन्यता मानली गेली. पण आता चौकशीला टांग मारण्याचा प्रयत्न फ़सला असून सक्तवसुली संचालनालयाच्या तावडीत ही कन्या व जावई फ़सले आहेत. तेवढेच थोडे नाही म्हणून की काय, उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या तेजस्वी या पुत्राच्याही भानगडी चव्हाट्यावर आलेल्या आहेत आणि त्याच्याही राजिनाम्याची मागणी जोरात पुढे आली आहे. अशावेळी नितीशनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मोदींच्या उमेदवाराला पाठींबा देऊन लालूंचा रोष जाणिवपुर्वक ओढवून घेतला. जेणेकरून लालूंनी आगपाखड करावी, हीच नितीशची अपेक्षा होती आणि झालेही तसेच. आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अडचणीत लालू फ़सलेले आहेत. नितीशशी फ़ाटले तर भाजपाने सरकार टिकवण्यासाठी जदयुला पाठींबा देण्याचे आधीच जाहिर केले आहे. म्हणजेच लालूंवर नितीशना विसंबून रहाण्याची गरज उरलेली नाही. पण दुसरीकडे लालूंना मात्र सत्ता हवी असेल, तर नितीशशी जुळवून घेण्याखेरीज पर्याय शिल्लक उरलेला नाही. म्हणजेच लालूंना नितीशला दुखावता येत नाही आणि पलिकडे आपल्या मोदी विरोधी राजकारणाचा म्होरक्या होण्याच्या हट्टालाही सोडता येत नाही, अशी कसरत झाली आहे.

राष्ट्रपती निवडणूक असो किंवा २०१९ ची लोकसभा निवडणूक असो, मोदी विरोधातील आघाडी आपणच उभी करणार; असा चंग लालूंनी बांधला आहे. पण त्यासाठी त्यांना नितीशशी संघर्ष करून भागणार नाही. तसे झाल्यास बिहारमध्ये जी सत्ता हाती आहे, त्यालाही मुकावे लागण्याचा धोका आहे. शिवाय तसे झाल्यास देशव्यापी राजकारणात लालूंना काहीही स्थान रहाणार नाही. बिहारचे महागठबंधन हा २०१९ साठी उत्तम मार्ग असल्याचा दावा टिकवायचा असेल तर ती आघाडी टिकवली पाहिजे. आणि ती टिकवायची तर नितीशना आपल्या सरकारमध्ये भ्रष्ट लालू कुटुंबाला राखावे लागेल, त्याला आता नितीश कितपत तयार असतील याची शंका आहे. म्हणूनच हे वितुष्ट आता विकोपास जाण्याची चिन्हे आहेत. भाजपाने लालूपुत्राला हाकलण्याची मागणी जोरात चालवली आहे आणि त्यासाठी नितीश सरकारलाही लक्ष्य केलेले आहे. त्यातून पुत्रालाची हाकालपट्टीही संभवते. तसे केल्यास नितीश सरकारमधून लालू बाहेर पडतील काय? लालूंनी त्यासाठी आपल्या आमदारांची वेगळी बैठक घेतली आहे. दुसरीकडे नितीशनेही आपल्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी बैठक योजल्याचे सूतोवाच केलेले आहे. परिणामी बिहारच्या आदर्श महागठबंधनाला तडे जाऊ लागले आहेत. तसे तडे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीपुर्वीच गेले, तर भविष्यातील राष्ट्रव्यापी गठबंधनाचे काय? लालूंनी अलिकडेच बिहार धर्तीवर उत्तरप्रदेशात अखिलेश मायावती यांना एकत्र आणायची घोषणा केलेली होती. पण ती बाजूला पडलेली असून, बिहारमध्येच गठबंधन ढासळू लागल्याची चिन्हे आहेत. त्याची काही गरज नव्हती लालूंनी आपल्या पक्षाला संधी मिळाली म्हणून अवघ्या कुटुंबाला सत्तापदे वाटण्याचा अट्टाहास केला नसता, तर आज अशी वेळच आली नसती. पण १९९० च्या दशकात आपले मुख्यमंत्रीपद सोडताना तिथे पत्नीला बसवून केलेली चुक त्यांनी पुत्राच्या बाबतीत पुन्हा केलेली आहे.

खटले आरोप व भ्रष्टाचार याचे लालूंना कधीच वावडे नव्हते. त्यामुळे आयकर वा सीबीआयने कुटुंबाच्या विरोधात कितीही चौकशा केल्या, म्हणून लालू विचलीत होण्याची बिलकुल शक्यता नाही. अशा आरोपांची राळ उडत असतानाही त्यांनी पत्नीला सत्तेवर बसवले होते आणि आपणही केंद्रात मंत्रीपद उपभोगलेले होते. आरोपांचे खुलासे देण्यापेक्षा प्रतिपक्षावर उलटे आरोप करण्यात लालू पटाईत आहेत आणि त्यांच्या सहकार्‍यांनाही बदनामीचे वावडे नाही. पण आज त्यांच्या सोबत नितीश आहेत आणि त्यांना आपली प्रतिमा मलीन होऊन चालत नाही. मागल्या दोन दशकात नितीशनी राजकारणात पाय रोवले, तेच मुळात भ्रष्टाचार व गैरकारभार निपटून काढणारा नेता म्हणून! अशा मुख्यमंत्र्याच्या सरकारमध्ये विविध आरोप व खटले असलेल्या लालू कुटुंबाचा वावर नितीशना परवडणारा नाही. म्हणूनच आपली उजळ प्रतिमा टिकवायची, तर नितीशना लालूपुत्राला डच्चू द्यावा लागेल. तो अमान्य असेल, तर लालूंचीही साथ सोडावी लागेल. अशा स्थितीत नितीशना सत्ता गमावण्याचा धोका आज राहिलेला नाही. कारण कमी पडणारे आमदारांचे पाठबळ त्यांच्यामागे भाजपा उभे करू शकतो. म्हणजेच महागठबंधन तुटायला नको असेल तर लालूंनी चिंता करायला हवी आणि सत्तेत असलेला सहभाग टिकवायचा तर पुत्रशोक पत्करून तेजस्वीला बाजूला करावे लागेल. थोडक्यात राष्ट्रव्यापी महागठबंधन उभे करायला निघालेल्या लालूंना बिहारमधले गठबंधन टिकवण्याची कसरत करण्याची अगतिकता आलेली आहे. त्यांनी पुत्राला व कुटुंबाला सत्तापदावर बसवण्याचा हव्यास केला नसता व सत्तेवर आपला अपरोक्ष कब्जा ठेवला असता, तर आज ही नामुष्की लालूंच्या वाट्याला आली नसती. पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, त्यातलीच लालूंची कथा आहे. बिहारी राजकारणात टिकून रहाण्याची आणखी एक संधी त्यांनी मातीमोल करून टाकली आहे.

1 comment:

  1. I partially agree on these views. I do not see anything wrong done by Lalu by making his wife as CM and later his kids in the assembly. When he want the Satta by hook and crook, he can go to any extent and he will not think of long term...

    Lalu's behavior is correct.

    ReplyDelete