Thursday, July 27, 2017

खर्‍या गद्दारांचे काय?

leaders at hurriyat doors के लिए चित्र परिणाम

कुठल्याही देशाची सेना किती सुसज्ज आहे किंवा किती मोठी आहे, त्यामुळे त्या देशाला युद्ध जिंकता येत नसते. त्यापेक्षाही त्या देशात किती गद्दार सोकावलेले आहेत, त्यावरच त्या देशाचा विजय पराजय अवलंबून असतो. भारतावर अनेक आक्रमणे झाली आणि प्रत्येक वेळी कोणा परकीय आक्रमकाला यश मिळालेले असेल, तर त्याचे श्रेय त्याच्या लढवय्या असण्याला वा शौर्याला कमीच द्यावे लागेल. त्यापेक्षाही भारताला पराभूत करण्याचे श्रेय इथल्या गद्दारांना अधिक द्यावे लागेल. कारण प्रत्येक आक्रमकाने भारतीयातील घरभेदी जमातीला हाताशी धरून भारताचा पराभव केलेला आहे. मोगल असोत की ब्रिटीश असोत, त्यांचे यश भारतीय गद्दारीवर अवलंबून होते. त्यांच्यासाठी हिरीरीने लढणारे भारतीयच दिसतील. आजही आपण फ़ारसे बदललो आहोत, असे कोणी म्हणू शकत नाही. कायदे वा सहिष्णू मानसिकता हा भारतीय समाजाचा सर्वात मोठा दुबळेपणा राहिला आहे. तसे नसते तर भारतात राहून व भारताचेच अन्न खाऊन, हुर्रीयतचे फ़ुटीरवादी नेते इतके शिरजोर होऊ शकले नसते. जयचंद राजाने आपल्याच आप्तस्वकीयाच्या विरोधात घोरीशी हातमिळवणी केली आणि पृथ्वीराज चौहानाचा पराभव घडवून आणला होता. आज भारतीय जवान सैनिकांची हत्याकांडे घडवून आणणार्‍या काश्मिरातील जिहादींच्या हिंसेला पाठीशी घालणारे व युक्तीवाद करीत पाठीशी घालणारे दिल्लीत उजळमाथ्याने वावरणारे लोकच आहेत ना? हुर्रीयतच्या नेत्यांनी घरात घेतले नाही तरी त्यांचे पाय चाटायला गेलेले अनेक संसद सदस्य वा हुर्रीयतच्या नेत्यांकडे भारतीय सेनादलाची निंदा ऐकायला जाणारे मणिशंकर अय्यर वेगळे असतात काय? भारत पाक संबंध सुधारण्यासाठी मोदींना पराभूत करायला मुशर्रफ़ यांना हातमिळवणीचे आवाहन करणारे अय्यर जयचंदापेक्षा नेमके कसे वेगळे असतात?

मागल्या काही महिन्यात व वर्षात मोदी सरकारने कसोशीने प्रयत्न करून हुर्रीयत व काशिरातील हिंसाचाराचे धागेदोरे शोधून काढले आहेत. कोर्टात सिद्ध होऊ शकतॊल असे पुरावे संपादन केलेले आहेत. पण मध्यंतरीच्या काळात काश्मिरात ज्यांचे मुडदे पाडले गेले, त्यांची भरपाई कोण करणार आहे? तीनचार वर्षात सैनिक वा नागरिक यांचे बळी घेण्याच्या कारवाया पाकिस्तानी पैशाने व हुर्रीयतच्या आश्रयाने चाललेल्या होत्या. हे आता छुप्या चित्रणातून समोर आले आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे समोर आले आहेत. मग अशा पापकृत्यांचे दर्शन समोर घडत असतानाही हुर्रीयतला पाठीशी घालणारे दोषी नाहीत काय? कारण अशाच पाठीराख्यांनी हुर्रीयतला भारतात आणि अगदी संसदेत अभय बहाल केलेले होते. एका सेनाधिकार्‍याने दगडफ़ेक्याला जीपवर बांधून सुरक्षित काम केले, तर त्याच्यासह संपुर्ण सेनेला अतिरेकी वा युद्धखोर ठरवण्यापर्यंत कॉग्रेस नेता संदीप दिक्षीतची मजल गेली. त्याला कॉग्रेस गप्प करीत नाही, तेव्हा कॉग्रेसही हुर्रीयतचा पाठीराखा होत असते. हुर्रीयत ही काश्मिरातील बाब आहे. दिल्लीतल्या नेहरू विद्यापीठात संसदेवर घातपाती हल्ला करणार्‍या अफ़जल गुरूची पुण्यतिथी अगत्याने साजरी केली जाते. तिथे भारताचे तुकडे होतील अशा घोषणा दिल्या जातात. त्याचा रागही ज्यांना येत नाही, ते कोण आहेत? त्या घोषणा दिल्याचा आरोप करणार्‍यांना अटक झाली, तर त्याच्या बचावाला कोर्टात जाऊन उभे रहाणारे प्रसिद्ध वकील कोण आहेत? तिथे जाऊन कन्हैया वा तत्सम देशद्रोह्यांची पाठराखण करणारे राहुल गांधी कोण आहेत? अशा लोकांनी पुचाट पाक जिहादींना शूरवीर व पराक्रमी करून ठेवलेले आहे. असे मुठभर लोक लक्षावधी भारतीय सैनिकांना आपल्या भूमीवरच पराभूत करायला समर्थ असतात. पाक वा चिनी सेनेने आक्रमण करण्याची गरज नसते. अय्यर व त्यांची कॉग्रेस त्यासाठी पुरेशी असते.

मागल्या दहा वर्षात देशात पाकिस्तानी हेरखाते राज्य करीत होते, की भारताची धोरणे निश्चीत करत होते? अशी शंका येण्यासारखे गौप्यस्फ़ोट सध्या होत आहेत. हिंदू दहशतवाद नावाचे पाखंड उभे करण्यासाठी जिहादी घातपाताचे पुरावे नष्ट करून विविध मार्गाने हिंदू दहशतीचे खोटे पुरावे तयार करण्यात आले. इशरत जहान हिला वाचवण्यासाठी पोलिसांना तुरूंगात टाकण्यापर्यंत कारवाया झाल्या आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यालाही आरोपी बनवण्यापर्यंत घातपात सरकारच करीत होते. आता त्याची कागदपत्रे व पुरावे समोर येत आहेत. पाकिस्तानी वा जिहादींना सोडून त्यांची पापे व गुन्हे निरपराध हिंदू संघटनांच्या माथी मारण्याचा उद्योग खुद्द युपीए सरकारच करीत होते. पण हे सर्व कोर्टात सिद्ध करणे मोठ्या जिकीरीचे काम असते. गुजरात दंगलीचे शेकड्यांनी आरोप नरेंद्र मोदींवर करण्यात आले आणि त्यासाठी न्यायालयापासून तपास यंत्रणांपर्यंत सर्वांना ओव्हरटाईम कामाला जुंपण्यात आले होते. पण कोर्टात सिद्ध होऊ शकेल असा एकही पुरावा समोर येऊ शकला नाही. कारण पुरावाच नव्हता. सगळेच कुभांड होते. पण त्यासाठी न्यायालये व तपास यंत्रंणांसह माध्यमेही कामाला जुंपलेली होती. कसल्याही सज्जड पुराव्याशिवाय मोदींना गुन्हेगार ठरवून माध्यमातून अखंड बारा वर्षे राळ उडवली गेली. त्यापैकी एकही आरोप सिद्ध झाला नाही. मात्र तेच आरोप करणारे आज आपल्याच पापाचे पुरावे मागत आहेत आणि आरोप सिद्ध करण्याची मागणी करीत आहेत. साध्वी प्रज्ञासिंग वा कर्नल पुररोहित विरोधात कुठला पुरावा अजून कोर्टात सिद्ध होऊ शकला आहे? नऊ वर्षानंतरही काही समोर येऊ शकलेले नाही. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. सर्व काही खोट्या पुराव्यावर रचलेले कुभांड होते. किंबहूना जिहादी, हुर्रीयत व पाकीस्तानची पापे लपवण्यासाठी युपीए सरकार व कॉग्रेसने उभी केलेली ही कुभांडे होती.

आज बोफ़ोर्स असो वा युपीएच्या काळातील विविध भ्रष्टाचार असोत, त्यांची चौकशी सुरू झाली; मग त्यात आपण साफ़ असल्याचा कुठलाही पुरावा कॉग्रेस देऊ शकत नाही. उलट राजकीय सूडबुद्धीचा आरोप हे उत्तर झाले आहे. शब्बीर शहा वा हुर्रीयतच्या नेत्यांचेही तेच उत्तर झाले आहे. कॉग्रेस आणि पुरोगामी पक्ष आता क्रमाक्रमाने पाकिस्तानचे आश्रयदाते बनत चालले आहेत. मोदी विरोध इतका टोकाला गेलेला आहे, की हुर्रीयतचे समर्थन, देशद्रोहाचे समर्थन करण्यापर्यंत घसरगुंडी झाली आहे. पण हे लोक एक गोष्ट विसरून गेले आहेत, की देश टिकला तर तुमची राजकीय सत्तेची लालसा पुर्ण होऊ शकणार आहे. पृथ्वीराजाला संपवल्यानंतर घोरीने जयचदाचा काटा काढला होता. सूडाच्या आहारी जाऊन शत्रूशी हातमिळवणी केली, मग यापेक्षा वेगळे काही होत नसते. म्हणूनच आज हुर्रीयत वा त्यांच्या आडोशाने पाकिस्तानशी ज्यांनी हातमिळवणी केलेली आहे, त्यांचेही भविष्य जयचंदापेक्षा वेगळे नसेल. कारण पाकिस्तान त्यांची भारताच्या अंतर्गत असलेली राजकीय लढाई लढण्याच्या कारवाया करीत नसून, भारतालाच खतम करण्याचे डाव खेळत आहे. त्यात पाकिस्तान चीन यशस्वी झाले, तर भारत नावाचा देश शिल्लक रहाणार नाही आणि तिथली सत्ता मिळण्याचे स्वप्नही धुळीस मिळालेले असेल. मोदी वा भाजपा हा हंगामी सत्ताधारी असतात. आज ते सत्तेत असतील आणि उद्या नसतील. भारत कायम राहिला तरच उद्या पुरोगामी पक्षांनाही सत्ता मिळवता येऊ शकेल. पण सूडाच्या आहारी गेलेल्यांना असले शहाणपण शिकवता येत नाही. म्हणूनच सवाल असा आहे, की आज हुर्रीयतवर उचललेला बडगा सरकार त्यांच्या पाठीराख्यांवर कधी उगारणार आहे? कारण हुर्रीयत हा देखावा आहे. खरे गद्दार आजही दिल्लीत व देशात उजळमाथ्याने वावरत आहेत. त्यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय देश सुरक्षित होऊ शकत नाही.

3 comments:

  1. निधर्मीकता आणि शेती हे दोन विषय भारतीय राजकारणात पुरोगाम्यांनी सत्तासोपं चढण्यासाठी वापरलेले विषय आहेत.काँग्रेस सत्तेवर असताना यात किती यश मिळाले होते? उलट हे विषय अधिक संपृक्तपणे जटील करण्यात ते तरबेज होते.
    आज विरोधात बसल्यावर उत्तर शोधण्याची निकड केवळ "पाक्षिक " व्यवसाय होतोय. न की त्यात अनुस्यूत असणारी आत्मीयता!!

    ReplyDelete
  2. भाऊ अन्याय सहन करणारे तितकेच दोषी आहेत आता सरकार त्या फूरोगामीनचं नाही सरळ देशद्रोहा अंतर्गत आत टाका किंवा गोळया घाला

    ReplyDelete
  3. या साठीच भारतीय जनतेने म्हणजेच आपण मोदींना अजून ५ वर्षांसाठी राज्यसभा आणि लोकसभेत बिनविरोध निवडून द्यावा लागेल. सो अश्या तथाकथित पुरोगाम्याची त्यांच्या मागे कटकट राहणार नाही. आणि एक हाती निर्णय घेवून भारताला खऱ्या अर्थाने चांगले दिवस परत आणता येतील.

    ReplyDelete