Sunday, July 28, 2019

पवारच भाजपात चाललेत?

sharad pawar, devendra fadnavis, ncp, farming, bt technology, farmer loan waivers, farmer loans, maharashtra news

सचिन अहीर किंवा अन्य काही राष्ट्रवादीचे नेते आमदार भाजपा किंवा शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या मागला आठवडाभर चालू आहेत. काहीजण राष्ट्रवादीतून बाहेर पडलेतच. पण छगन भुजबळ यांच्यासारख्या काहीजणांनी साफ़ इन्कार केलेला आहे. पण यात एका नावाचा समावेश मात्र झालेला नाही, ते खुद्द पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे. अर्थात पवार आपला पक्ष गुंडाळून पुन्हा कॉग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा अफ़वा मध्यंतरी उठल्या होत्या. तेव्हा त्यांनी लोकसभा मतदानानंतर राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि राहुलनी पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिलेला होता. सहाजिकच त्यानंतर जुन्या विभक्त झालेल्या कॉग्रेसजनांना पुन्हा पक्षात आणायच्या काही हालचाली सुरू झाल्या असाव्यात, अशी अटकळ अनेकांनी बांधली. त्यातूनच पवारांच्या कॉग्रेस प्रवेशाच्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या. त्यात ज्येष्ठ व अनुभवी म्हणून मग त्यांनाच कॉग्रेसचे अध्यक्षपद दिले जाईल, अशाही गोष्टी सुरू झाल्या. पण लौकरच साहेबांनी त्याचा साफ़ इन्कार केला आणि राहुलची समजून काढायला भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिलेले होते. त्यामुळे त्या बातमीवर नंतर पडदा पडला. मग साहेब कामाला लागले आणि आपल्या दुसर्‍या नातवाला त्यांनी भाकरी कशी थापावी किंवा भाजावी; त्याचे धडे देण्याचे काम हाती घेतले. लोकसभा निवडणूकीपुर्वी त्यांनी पार्थ पवार या नातवाला नात्यागोत्यात कर्ज कसे द्यावे, त्याचे खास धडे दिलेले होते. आता विधानसभेपुर्वी त्यांनी रोहित पवा्रांना भाकर्‍या भाजण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतलेला दिसतो. अन्यथा त्याने पक्ष सोडून जाणारे भाकरीच्या पीठातले भरड असल्याचा शोध कशाला लावला असता? असो, पण या नव्या पलायनांच्या निमीत्ताने पवारांनी केलेले विधान अतिशय सुचक आहे आणि तेच स्वत: विधानसभेनंतर भाजपात जातील किंवा काय; अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे.

पवारांना स्मरत असेल, तर आज त्यांनी पक्षातले आमदार भाजपा वा शिवसेनेत जाण्याची केलेली मिमांसा, अजिबात नवी नाही. त्यांच्यापुर्वी त्यांच्याच राजकीय वंशातील वा जमातीच्या एका अन्य नेत्यांने तशीच काहीशी मिमांसा केलेली होती. लोकसभा निवडणूकीला काही महिने शिल्लक असताना, म्हणजे २०१९ च्या आरंभी अकस्मात भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर गेलेले होते. तिथून मग ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत वरळीला पोहोचले आणि दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी लौकरच होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युतीची घोषणाही केलेली होती. जागावाटप वा अन्य कुठल्याही वादात दोघे पडले नाहीत आणि त्यांनी युतीची घोषणा केली होती. तेव्हा विधानसभेतील कॉग्रेसचे गटानेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटिल यांनी युती होण्याविषयी कुठली प्रतिक्रीया दिलेली होती? शरद पवारांना ती प्रतिक्रीया आठवते काय? उद्धव ठाकरे भाजपवर तेव्हा कितीही टिका करीत असले, तरी त्यांचा शिवसेना हा पक्ष सरकारात सहभागी होता आणि तांत्रिकदृष्ट्या तरी एनडीएमध्येच होता. पण सेना भाजपा यांच्यात कायम भांडणे चाललेली होती. एकमेकांवर कुरघोड्या करणारी वक्तव्येही चालली होती. तरीही त्यांनी निवडणूकपुर्व युती केल्यावर राधाकृष्ण विखे म्हणाले होते, की ही सर्व ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयाची कृपा आहे. म्हणजेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला त्या ईडीच्या धाडी वा कारवाईचा धाक घालून युतीला शरण जाण्याची सक्ती झाली आहे. खरेच तसे होते काय? की राधाकृष्ण टाईमपास करीत होते? आज शरद पवारही मनातले बोलत आहेत, की निव्वळ टाईमपास करीत आहेत? कारण दोघांच्या भिन्नकालीन प्रतिक्रीया समान आहेत. फ़रक इतकाच आहे, की विखे ते विधान विसरून आज भाजपाचे मंत्री म्हणून सहभागी झालेले आहेत. पवार साहेबांचा काय मनसुबा आहे?

तेव्हा उद्धब ईडीच्या भितीने युतीत सहभागी व्हायला राजी झालेले होते, हा दावा खरा असेल; तर लौकरच विखेंचा सुपुत्र सुजय विखे भाजपात कशाला गेला होता? तेव्हा त्याच्याही विरोधात ईडीने कुठली धाड घातली होती, की कारवाई सुरू केली होती? लौकरच त्याला भाजपाची उमेदवारी मिळाली आणि पित्यानेही कॉग्रेस पक्षात राहूनच आपल्या पुत्रासाठी भाजपाचा प्रचारही केला होता. पण इतके होऊन गेल्यावरही कॉग्रेसने राधाकृष्ण विखे पाटिल यांच्यावर कुठली शिस्तभंगाची कारवाई केलेली नव्हती आणि कंटाळून त्यांनाच राजिनामा द्यावा लागला होता. त्यांनीच भाजपात प्रवेश केला आणि लौकरच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागलेली होती. पवारांची भाषा नेमकी तशीच असेल, तर पवारांचा इरादा तरी वेगळा कशावरून असू शकेल? ईडीच्या धाडी व कारवाईचा धाक दाखवून किंवा सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षामधले आमदार नेते स्वक्षात आणणे ही भाजपाची निती असेल, तर आधी तशा तक्रारी कशाला केल्या जातात? उलट असे दिसते, की आधी नेमके असे आरोप प्रछन्नपणे करणारेच आपला इतरत्रचा गाशा गुंडाळून भाजपा किंवा शिवसेनेत दाखल होत असतात, होत आहेत. ताजा प्रसंग सांगायचा, तर सचिन अहीर यांचे विधान तपासायला हरकत नसावी. ते शिवसेनेत दाखल झाल्यावर म्हणाले, शरद पवार हृदयात आहेत, मनात मात्र शिवसेना किंवा उद्धव आहेत. हे त्यांचे शब्द आहेत, की शरद पवारांच्या मनातले शब्द हृदयात घेऊन अहीर सेनेत दाखल झाले आहेत? खुद्द पवारांनाच आपल्या भवितव्याची चिंता इतकी सतावते आहे, की आपल्यावरही ईडीने धाडी वगैरे घालाव्यात आणि आपल्याला भाजपात सक्तीने उचलून न्यावे; अशी अपेक्षा आहे? कारण त्यांची विधाने व वक्तव्ये नेमकी राधाकृष्ण विखे पाटलाचे अनुकरण करणारी आहेत. साहेबांच्या मनात काय चाललेले असते, ते नेमके त्यांनाही आधी ठाऊक नसते. मनातले करून टाकल्यावर साहेब त्याचे स्पष्टीकरणे देत असतात.

विरोधी पक्षाची देशभरातली दुर्दशा आणि महाराष्ट्रात जुनेजाणते व निष्ठावान सहकारी एकामागून एक पक्षाची कास सोडून जाऊ लागल्याने साहेबांचा धीर खचला आहे काय? कारण सत्तेपासून दिर्घकाळ वंचित रहाणे त्यांच्या स्वभावात नाही. १९७८ च्या बंडानंतर दोन निवडणुकात मार खाल्यावर त्याना अकस्मात राजीव गांधींचे हात बळकट करण्याची उपरती झालेली होती आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी १९८६ च्या अखेरीस पुन्हा कॉग्रेसमध्ये आपले कार्य विलीन करून टाकले होते. त्यामुळे राजीव गांधींच् हात किती बळकट झाले, ते साहेबांनाच ठाऊक. पण नंतरच्या आठदहा वर्षात महाराष्ट्रात तरी शरद पवारांचे हात भरपूर बळकट झालेले होते. त्यांच्यासमोर विलासराव, सुशीलकुमार अशा मुळच्या निष्ठावंतांचे हातही लुळेपांगळे होऊन गेलेले होते. १९९९ नंतर राष्ट्रवादी अशी वेगळी चुल मांडून सोनियांचे परकीय हात रोखण्याचा प्रयास फ़सल्यावर अवघ्या पाच वर्षात साहेबांनी सोनियाच पंतप्रधान व्हाव्यात म्हणून कुठल्याही कसरतपटूला लाजवणार्‍या कोलांट्या उड्यांचा पराक्रम केलेला होता. हा सगळ इतिहास तपासला तर आता त्यांनी वापरलेली इडीच्या धाडीची कथा ‘राधाकृष्णा’च्या लिलांची आठवण करून देणारी आहे. मुलांना किंवा नातवांना राजकारणात हवी असलेली खेळणी आणून देण्याची कुवत राहिलेली नसल्याने साहेबांना भाजपात जाण्याचे तर वेध लागलेले नाहीत? लोकसभेपुर्वी विखेपुत्राचा हट्ट पुर्ण करता येत नसल्याने, आपल्या पोरांना सोडून दुसर्‍यांच्या पोरांचे लाड किती करायचे? ही भाषा साहेबांचीच् होती ना? आता आपल्याच मुलानातवंडांच्या अपेक्षांची पुर्ती करण्यातल्या अपुरेपणाने साहेब शरणागत झाल्यासारखे बोलत आहेत का? नुसत्या ईडी वा आयकराच्या धाडीतून कोणी पक्षांतर करायला शरण जात नाही, हे समजत नसण्याइतके शरद पवार दुधखुळे नक्कीच नाहीत. अन्यथा विखेंच्या विधानाचे अनुकरण करून त्यांनी वेगळा संकेत कशाला दिला असता? साहेबच भाजपात येण्यासाठी सज्ज होत असतील का?

22 comments:

  1. देव करो आणि तसं न होवो अन्यथा भाजपला घेऊन शरदराव बुडतील.... अर्थात भाजपचं शीर्ष नेतृत्व इतकं दुधखुळं असणार नाही..

    ReplyDelete
  2. तसं झालंच तर माझ्यासारख्या लाखो मतदारांची मते भाजप पासुन दुरवतील हे निश्चित.

    ReplyDelete
  3. राष्ट्रवादी कांग्रेस ही यापुर्वीच बिनाशर्त पाठिंबा बीजेपीला द्यायला तयार होती जे पुर्वी होणार होत ते आत्ता होताने दिसत आहे अस ही असु शकत जर सेने मुख्यमंत्री पदाचा अट्टहास धरलाच तर गनिमी कावा होवु शकतो

    ReplyDelete
  4. साहेबांची खुप इच्छा असेल हो...
    भाजप ला पटलं पाहिजे ना...

    ReplyDelete
  5. शरद पवार भाजपच कशाला बसप, रिपब्लिकन पार्टी किंवा मनसे यापैकी कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार करू शकतात. मवा वाटत नाही की पक्ष विलीन करतील. मला वाटते की पक्ष वाऱ्यावर सोडून एकटेच पक्षबदल करतील.

    ReplyDelete
  6. नको हो भाऊसाहेब. असली अभद्र भविष्यवाणी करू नका. तुमचे अंदाज बहुतेक वेळा योग्य ठरतात. ही घाण भाजपाला सोसणार नाही.कमळ चिखलात उगवते पण ते साखरकारखान्यांच्या घाण वासाच्या मळीत कसे टिकणार?

    ReplyDelete
  7. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच निवडणूक आयोगाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे की आपली राष्ट्रीय मान्यता का काढून घेवू नये.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या पक्षाचा राष्ट्रीय प्रभाव संपला आहे व आता येणार्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशिक प्रभाव संपणार असे वाटते आहे.

    ReplyDelete
  8. Bhai Namaskar, Your analysis on change of party is possible of Sharad Pawar from NCP to BJP Up to extent the possibility cant be ruled out but Sharad Pawar is such a untrustworthy leader to whom BJP recognizes him well and they shall allow his entry in the party on the contrary they may finished him from political career Now the situation has come to an end both the Congress and NCP for that I m eagerly waiting for it since this fellow has never put his efforts in the interest of nation and his selfishness in other words nature has decided to teach him a lesson (they shall not allow)

    ReplyDelete
  9. पवार साहेब आहेत तिथे ठिक आहेत नाहीतर भाजपाला पण उतरती कळा आणून सोडल्या शिवाय राहणार नाहीत एवढे नक्की आहे.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. भाऊ मला वाटत नाही ...शरद पवार भा ज प मध्ये येतील ..कारण शरद पवार पल्याड आसल्यानेच आल्याड च्या भा ज पा ला ...तोफ गोळे फेकता येत आहेत ...जसा सिनेमा काल्पनिक असला तरि त्यात व्हिलन लागतोच त्या शिवाय हिरो हा हिरो ठरणार नाही ...पण व्हिलनच जर हिरो ला येऊन मिळला तर थेटर बाहेर पडणारे प्रेक्षक ...शिव्या देतच बाहेर पडतील ...शरद पवार हे बी जे पी साठी मोठे टार्गेट आहे ...त्या मुळं बी जे पी ला पण त्यांना पक्षात घेणे ...जागा देणे(सोय लावणे ) ...आणी सांभाळणे अवघड आहे ...आणी लोकांना पण पचनी पडणे त्या हून अवघड ...त्या पेक्षा ते आहेत तिथेच त्यांना बांधून ठेऊन ..कमकुवत करणे जास्त प्रेक्टिकल असेल ...कारण आजगर पण काही प्राणी गिळले तरि पचवू शकत नाही ..एक तर बाहेर फेकतो किंवा मरतो ..असा अजगर होणे बी जे पी पसंत करणार नाही 😀 😀

    ReplyDelete
  12. ही निवडणुकी नंतर सेनेला कात्रज घाट दाखवण्याची तयारी आहे


    ReplyDelete
  13. अशोक बनकरJuly 29, 2019 at 9:14 AM

    जर असे घडले,तर unknown लिहितात तसेच होईल.

    ReplyDelete
  14. शरद पवार , भाजप मध्ये आले तरी त्यांचा चिखलच होणार आणि नाही आले तरी होणारच होणार ! त्यांच्या चिखलातच कमळ फुलणार ! चिखलाचे कमळ होत नाही !

    ReplyDelete
  15. शरद पवार , भाजप मध्ये आले तरी त्यांचा चिखलच होणार आणि नाही आले तरी होणारच होणार ! त्यांच्या चिखलातच कमळ फुलणार ! चिखलाचे कमळ होत नाही !

    ReplyDelete
    Replies
    1. प्रत्येकाचे मरण वेगळे असते,
      तुझाच आहे शेवट वेडया माझ्या पायाशी.

      Delete
  16. NCP चा प्रयत्न ह्या म्हणीनुसार आहे, "If u can't fight them, join them"

    ReplyDelete
  17. काकांना वाचवा.

    ReplyDelete
  18. पण प्रश्न हा पण उरतो की जे bjp चे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत ते डावलले जातात .
    आणि काँग्रेस चे भ्रष्ट नेते भ्रष्टचार लपवण्यासाठी bjp जॉईन करतात आणि एकदा का bjp जॉइन झाले कीं byforce त्यांचे भ्रष्टाचार पाठीशी घालावें लागतात .आणी मग कालांतराने bjp आणी काँगेस मध्ये कांही फरक राहिला नही असें लोकांनी म्हंटले तर ते चूक ठरणार नाही.
    आणि संख्या बळ साठी जर घेतात तर तत्व मागे रहतात आणि सत्ता हातून गेलीं नाही पाहिजे याला प्रायोरिटी येते .

    ReplyDelete