Wednesday, July 3, 2019

अजुनी रुसूनी आहे

१२ कोटी मतदारांचे काय?

No photo description available.

राहुल गांधी यांनी कॉग्रेसच्या दारूण पराभवानंतर आपल्या पदाचा राजिनामा दिला आणि कॉग्रेस पक्षात भलताच पेचप्रसंग उभा राहिला आहे. त्या पक्षाला विचारधारा वगैरे काही नसल्याचा तो परिणाम आहे. कारण कॉग्रेस म्हणजे लालू, मुलायम किंवा राष्ट्रीय लोकदल असा कौटुंबिक पक्ष म्हणून स्थापन झालेली राजकीय संघटना नाही. सव्वाशे वर्षापुर्वी ब्रिटीश साम्राज्याच्या जुलमी सत्तेला आव्हान देण्यासाठी काही महापुरूषांनी जी संघटना स्थापन केली, तिला अजूनही कॉग्रेस म्हणून ओळखले जाते आणि आजही बहुतांश कॉग्रेसवाले तोच वारसा आपल्याकडे असल्याचे अगत्याने सांगत असतात. मग त्या पक्षाची स्थापना करताना कोणीही नेहरू त्यात सहभागी नसेल वा नंतरही दोनतीन दशके त्यात नेहरू खानदानाचा कोणी नसला; तर आज त्या कुटुंबाच्या वारसाशिवाय तो पक्ष कशाला चालत नाही? विचारधारेशी संबंध असेल, तर मार्क्सवादी किंवा भाजपाही तसे पक्ष आहेत आणि त्यापैकी कुठल्या संघटनेला एका घराण्याच्या वारसासाठी अडून बसावे लागलेले नाही. पण राजद, समाजवादी किंवा लोकदल अशा कौटुंबिक पक्षांना मात्र घराण्याशी निष्ठा असलेला नेता किंवा वारस प्रमुखपदी असावा लागतो. त्याचा सामान्य जनता वा मतदाराच्या भावनांशी संबंध येत नाही. कॉग्रेसची अवस्था नेमकी तशीच झालेली नाही काय? त्या घराण्याचा वारस आपल्याला अध्यक्षपद वा म्होरकेपण नको म्हणून हट्ट धरून बसला आहे आणि त्याच्या जागी कॉग्रेस पक्ष कोणी चालवायचा, असा पेच पक्षात निर्माण झाला आहे. पण कोणालाही कॉग्रेसची काही विचारधारा आहे आणि तीच पुढे घेऊन जावी, याचे साधे स्मरणही होताना दिसत नाही. मग त्या विचारधारेला म्हणून ज्या १२ कोटी मतदारांनी दोन महिन्यापुर्वी मतदान केले; त्यांच्या भावनांचे काय? त्यांच्या वैचारिक निष्ठांचे काय? राहुल गांधी आपल्याच अनुयायी लाळघोट्या नेत्यांना लाथाडत आहेत, की त्या १२ कोटी मतदारांना?

मुद्दा त्या १२ कोटी मतदारांचा आहे. कारण त्यांनी एका पक्षाला किंवा तो पक्ष जी विचारधारा सांगत असतो, त्यासाठी मते दिलेली आहेत. पराभूत होतानाही कॉग्रेसला मिळालेली मते कुठल्याही इतर पक्षापेक्षा प्रचंड आहेत आणि त्यांना आपल्या विचारधारेचे काय होते आहे, ते जाणून घेण्याचा हक्कही नाही काय? १९८४ सालात भाजपा अवघ्या दोन खासदारांचा पक्ष म्हणून उरला होता, अशी आठवण कॉग्रेसवाले अगत्याने सांगत असतात. तेव्हाही भाजपला इतकी प्रचंड मते मिळालेली नव्हती. पुढे १९९६ सालात भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून विजयी घोडदौड करू लागला, तेव्हाही भाजपाला १५ टक्के मतांची मजल मारता आलेली नव्हती. त्यापेक्षा कॉग्रेसची आज मिळालेली मते अधिक आहेत. लोकशाहीत जागांना महत्व नसते किंवा संख्येलाही महत्व नाही. त्यामागे जो मतदार उभा राहिलेला आहे, त्याचा सन्मान राखणे हे पक्षाचे व नेत्याचे कर्तव्य असते. आपल्या पराभव किंवा सत्ता गमावण्यामुळे नेत्याने पक्षासह विचारधारेच्या राजकारणाकडे पाठ् फ़िरवणे; हा त्याच मतदाराचा घोर अपमान असतो. निर्णय त्याने आधी घ्यायचा असतो. निवडणूकीत उतरताना त्याने मतदार आपल्याला कशाला मत देणार, त्याचे भान ठेवूनच यायचे असते. आता सत्ता मिळाली नाही म्हणून सगळ्या जबाबदारीकडे पाठ फ़िरवणे; म्हणजे प्रत्यक्षात त्या १२ कोटी मतदाराच्या इच्छा अपेक्षांना लाथाडणे आहे. ज्यांनी त्या निवडणूकीत पदरमोड करून वा कुठल्याही अपेक्षेशिवाय काम केले, त्यांचे काय? फ़क्त राहुलना सत्ता मिळणे इतकीच त्या मतदाराची इच्छा नव्हती. भाजपा विरोधात किंवा कॉग्रेसची भूमिका आहे, ती ठामपणे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर मांडली जावी; म्हणून त्या कार्यकर्त्याने व मतदाराने काही केलेले आहे. त्याचेही भान ज्या माणसाला असू शकत नाही, तो नुसता पक्षाध्यक्ष व्हायलाच नालायक नसुन अन्य कुठलीही सार्वजनिक जबाबदारी घ्यायलाही निकामी माणूस आहे.

मागले चारपाच आठवडे हा तमाशा रंगलेला आहे आणि वृत्तपत्रांसह विविध वाहिन्याही त्या़चे नाटक रंगवुन पेश करीत आहेत. त्यापैकी कुठल्याही वाहिनी वा संपादकाने कॉग्रेसच्या प्रवक्ते वा नेत्यांना एक प्रश्न अजिबात विचारलेला नाही. राहुल अध्यक्ष नव्हते तेव्हा कॉग्रेस कोण चालवित होता? सोनियाही नव्हत्या तेव्हा कॉग्रेसचे कोणते नुकसान झालेले होते? राजीव गांधी यांच्या निधनानंतर काही अशाच लाळघोट्यांनी सोनियांच्या दारात उपोषण करून त्यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्विकारावे म्हणून आग्रह धरला होता. पण आपली मुले एकटी पडली असून, त्यांच्या पालनपोषणासाठी आपण सर्व वेळ देऊ इच्छितो, म्हणत सोनियांनी अध्यक्षपद नाकारण्याचा ‘त्याग’ केलेला होता. त्यातून त्यांनी एक गोष्ट साफ़ केली होती. अगदी गांधी खानदानाशिवाय कॉग्रेस चालणार नसली, तरी गांधी खानदान मात्र कॉग्रेसशिवाय चालू शकते, जगूही शकते. त्यांच्या जगण्यात कुठलाही अडथळा किंवा व्यत्यय कॉगेसमुळे येणार असेल, तर त्यांच्यासाठी पहिला प्राधान्याचा विषय कुटुंब इतकाच आहे. त्यासाठी वेळ देताना कॉग्रेस वार्‍यावर सोडायलाही गांधी खानदान कमी करीत नाही. इतकाच सोनियांच्या तात्कालीन वागण्याचा अर्थ होता. म्हणून १९९१ पासून १९९८ अशा सात वर्षात त्यांनी कॉग्रेसची आबाळ होऊ दिली आणि मुले मोठी शहाणीसुरती झाल्यावर कॉग्रेसची बुडती नाव वाचवायला सोनिया अध्यक्षपदी येऊन बसल्या. तर तेव्हाच राहुलना अध्यक्षपदी बसवायला काय हरकत होती? आज राहुलच अपरिहार्य आहेत, तर १९९८ सालात राहुलशिवाय किंवा सोनिया कॉग्रेस कशाला वाचवू शकत होत्या? आजही राहुल नसतील तर सोनिया हयात आहेत आणि त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नाहीच तर प्रियंकाही त्याच खानदानाच्या वारस आहेत. त्याही नकोत तर प्रियंकाचा पुत्र रिहानही वयात आलेला तरूण आहे.

राहुल एका बाजूला राजिनामा देतात आणि आपण माघार घेणार नाही म्हणतात. पण कोणाचे नाव सुचवित नाहीत, की कामही थांबवित नाहीत. कालपरवा अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना भेटून गयावया करत होते. पण राहुलनी त्यांनाही नकार दिलेला आहे. मुद्दा इतकाच, की खरेच राहुलना अध्यक्षपद नको असेल, तर त्यांनी कार्यालयात किंवा घरातही त्या संदर्भाने भेटायला येणार्‍यांना थेट हाकलून लावावे आणि विषय संपवून टाकावा. पण त्यापैकी काहीही होताना दिसलेले नाही. सोनियांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतली आणि लोकसभेतील पक्षनेता म्हणून अधीररंजन चौधरी यांची नियुक्ती केली. राहुलनीही अनेक राज्यातल्या समित्या बरखास्त केल्या, किंवा इतरही काही नेमणूका केलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ होऊन बसला आहे. पण देशाचा ५५ वर्षे कारभार चालविलेल्या पक्षातील एकाहून एक अनुभवी नेतेही त्या बालीशपणला लगाम लावण्याला धजावलेले नाहीत. हा घरातल्या घरात रुसण्याचा नसून जगासमोरच चाललेला हास्यास्पद तमाशा आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील दुसर्‍या क्रमांकाचा लोकप्रिय पक्ष म्हणून जगाचेही कॉग्रेसमधील पोरखेळाकडे बारीक लक्ष आहे. हा पक्ष वा त्यांचा नेता भारताचा पंतप्रधान व्हायला किंवा देशाची सत्ता संभाळायला कसा नालायक आहे्, त्याचीच अशा तमाशातून ग्वाही दिली जात असते. इतकेही मनमोहन वा चिदंबरम, अन्थोनी यांना कळत नसेल का? पण बोलायची कोणाची बिशाद नाही. वयाने वाढलेल्या थोराड कारट्याचे नसते लाड व् चोचले चालू आहेत आणि त्यासाठी ज्या १२ कोटी मतदारांना लाथाडले जात आहे, तोच मतदार पुढल्या प्रत्येक निवडणुकीत कोणाला लाथाडेल, याचा तरी विचार कोणाला कसा सुचत नाही? निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात राहुल म्हणायचे जनता मायबाप है. मग त्याच मायवापाने टाकलेली जबाबदारी पार पाडायची सोडून, हे कसले तमाशे चालू आहेत?

राहुल यांच्यासाठी कॉग्रेस ही घरगुती मालमत्ता असेल. पण हजारो दुय्यम कनिष्ठ नेते व लाखो कार्यकर्त्यांसाठी कॉग्रेस हा एक राजकीय पक्ष आहे. त्यांच्या आकांक्षांचे प्रतिक आहे. त्यांचा नेता व त्याच्या भोवतालचे अन्य नेते असे खुळचट वागू लागतात, तेव्हा त्या कॉग्रेस अनुयायांचा पुरता भ्रमनिरास होत असतो. त्या बारा कोटी मतदारापैकी मुठभर तरी त्याच्यापासून दुर जाण्याचा विचार करू लागतात. नेत्यांनी राहुलचे पाय धरावेत्. कदाचित तीच अपेक्षा आहे. आपल्या राजिनाम्यावर राहुलही हट्ट धरून बसलेत, तेव्हा त्यांना कार्यकारिणी व श्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍या नाकर्त्या नेत्यांचेही राजिनामे हवे आहेत. पण त्यापैकी कोणी राहुलसोबत सती जायला राजी नाही, म्हणून हे नाटक रंगलेले आहे. प्रदेशाध्यक्ष वा अन्य पदाधिकार्‍यांच्या राजिनाम्याशी राहुलना कर्तव्य नाही. त्यांना कार्यकारिणी व मुख्यमंत्र्यांनी राजिनामे घेऊन पुढे यावे अशी अपेक्षा आहे. पण त्यापैकी कोणी तितका त्याग करायला राजी नाही, तिथेच घोडे अडलेले आहे. कारण राहुलचा राजिनामा खोटा आहे याची सर्व ज्येष्ठ नेत्यांना पक्की खात्री आहे. पण त्याच्या नादी लागून आपण राजिनामे दिले, तर ते मात्र स्विकारले जाण्याचा धोका प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणूनच त्यापैकी कोणी तसे करायला राजी नाही आणि राहुलचा तिथेच मुखभंग झालेला आहे. पण याहीवेळी त्यांना मते देणारा १२ कोटी मतदार ते बारकाईने बघतो आहे आणि त्याची किंमत तोच अपमानित मतदार पुढल्या प्रत्येक निवडणुकीतून वसुल केल्याशिवाय रहाणार नाही. कारण जो काही तमाशा चालू आहे, त्यातून त्याच निष्ठावान कॉग्रेस मतदार जनतेची अवहेलना चालू आहे. तिने पाठ फ़िरवली तर विधानसभा व लोकसभा सोडा; महापालिका जिल्हा परिषदा जिंकणेही अशक्यप्राय होऊन जाईल. म्हणून तर जिल्हा तालुका पातळीवरच्या नेत्यांनी कॉग्रेस सोडायचा सपाटा लावला आहे आणि श्रेष्ठींचे शेफ़ारलेले पोर ‘अजूनी रुसूनी आहे’ असा सुर आळवत बसलेले आहे.

7 comments:

  1. एका शतायुषी व राष्ट्रीय पातळीच्या पक्षाकडून ही अपेक्षा नाही. बहुतेक २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष शिल्लक रहाणार नाही, असे वाटते.

    ReplyDelete
  2. भाऊ तुमचं म्हणणं पटतंय , पण राहुलना कार्यकारिणी चे राजीनामे कशाला हवेत ते त्यांना काढून पण टाकू शकतात. नंतर नवीन कार्यकारिणी नेमू शकतात.

    ReplyDelete
  3. अत्यंत सूक्ष्म विश्लेषण

    ReplyDelete
  4. श्री भाऊ कशाला आपली लेखणी फुकट घालवता, चार आठ दिवस नाटक चालेल मग ये रे माझ्या मागल्या

    ReplyDelete
  5. सुंदर विश्लेषन!

    ReplyDelete
  6. अप्रतिम विश्लेषण.
    आपण एखादा असाच अभ्यासपूर्ण लेख 'देशातील आजची शिक्षणव्यवस्था आणि राजकारण' ह्या विषयावरही लिहावा अशी विनंती

    ReplyDelete
  7. त्याहून कहर म्हणजे पक्ष अध्यक्ष म्हणून मोतीलाल वोरा,सुशीलकुमार शिंदे,मॉलिकार्जुन खर्गे या जेष्ठांची नावे पुढे आली जात आहेत.

    ReplyDelete