Tuesday, July 23, 2019

कॉग्रेसचे नवे ‘अध्यक्ष’

Image result for trump

कॉग्रेस पक्षाची बुद्धी आजकाल इतकी भ्रष्ट झाली आहे, की त्यांना कुठलाही विषय समजून घेणेही अशक्य होऊन गेले आहे. म्हणूनच त्यांना लोकसभेतील आपल्या दारूण पराभवातून कुठलाही धडा शिकता आलेला नाही. तो धडा राफ़ायलच्या कागदी विमानात बसून उडाल्याने झालेला कपाळमोक्ष इतकाच आहे. कोणी फ़्रान्सचा माजी म्हणाला, मोदींनी राफ़ायलच्या करारात अनील अंबानीला सहभागी करू घ्या आणि आपण तसे केले. राहुलशी तो कोणी अध्यक्ष तसे बोलला किंवा नाही, याचा कुठलाही पुरावा नाही. पण तरीही राहुलनी त्यावर विश्वास ठेवला आणि आपोआप संपुर्ण कॉग्रेस पक्षाने मग राफ़ायल विमानाचा करारच बोफ़ोर्सची तोफ़ समजून तोफ़गोळे डागायचे काम हाती घेतले. पण त्यात तथ्य नव्हते आणि व्हायचे तेच अखेरीस झाले. राफ़ायलवरून मोदींची कोंडी करण्यात अवघी लोकसभा निवडणुक बारगळली आणि पराभवाची नामुष्की पदरी आली. पण कॉग्रेस वा राहुलनी असे कशाला करावे? तर मोदींच्या विरोधात कोणीही काहीही बरळावे, कॉग्रेस व अन्य विरोधी पक्षनेते त्यालाच ब्रह्मवाक्य ठरवून आपली सगळी शक्ती त्यासाठी पणाला लावतात आणि दिवाळखोर होऊन जातात. तेव्हाही राफ़ायल विषयात संरक्षणमंत्री, फ़्रान्सचे विद्यमान अध्यक्ष, विमानाचे उत्पादन करणारी कंपनी अशा प्रत्येकाने त्या अंबानी आरोपाचा साफ़ इन्कार केलेला होता. सुप्रिम कोर्टाने त्यावरील याचिकेला फ़ेटाळून लावत करार नियमात बसणारा असल्याचा निर्वाळा दिलेला होता. पण सत्य स्विकारायची हिंमत लागते आणि आपला अध्यक्ष मुर्ख असल्याचे सत्य कॉग्रेसला अजूनही स्विकारता आलेले नाही. त्याची भयंकर किंमत मोजायला लागलेली असताना आता कॉग्रेसने आपले ‘ट्रंप’कार्ड बाहेर काढलेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप हे राहुल इतकेच बेछूट बेताल बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आता कॉग्रेसने त्यांचा शब्द ब्रह्मवाक्य मानून आत्महत्येसाठी झेप घेतलेली आहे.

नाहीतरी कॉग्रेस पक्ष सध्या अध्यक्षाविना चालतो आहे आणि देशातील तमाम पुरोगामी अभ्यासक, विचारवंत व संपादकांना नवा अध्यक्ष शोधण्याच्या प्रश्नाने चिंताक्रांत केलेले आहे. गेल्या दोन महिन्यापासून कॉग्रेस पक्षाच्या बाहेर पक्षाध्यक्ष शोधण्याची मोहिम देशभर व माध्यमातून राबवली जात आहे. कारण राहुलनी अध्यक्षपद सोडले आहे आणि पक्षातला अन्य कोणी नेता अध्यक्ष व्हायला राजी नाही. मग अध्यक्षाशिवाय कॉग्रेस कशी चालणार? ही देशासमोरची सर्वात मोठी समस्या उभी राहिली आहे. तिचे समाधान शोधण्यात सगळे पुरोगामी मेंदू व्यग्र असताना अकस्मात कॉग्रेसला नवा अध्यक्ष सापडल्याची ब्रेकिंग् न्युज अमेरिकेतून आलेली आहे. आजकालच्या कॉग्रेस पक्षाला मेंदू नसलेला आणि बेताल बडबडू शकणारा अध्यक्ष लागत असतो आणि कॉग्रेसमध्ये राहूल सोडून तसा अन्य कोणीही नेता नसल्याने हॊ समस्या उभी राहिलेली होती. त्याचे उत्तर आता कॉग्रेसला अमेरिकेत सापडलेले आहे. योगायोगाने ती व्यक्ती आधीच अध्यक्ष आहे. पण ती कुठल्या पक्षाची अध्यक्ष नसून अमेरिका नावाच्या एका खंडप्राय देशाची अध्यक्ष आहे. पण त्याच्यापाशी राहुल गांधींमधले महत्वाचे दुर्गुण ठासून भरलेले आहेत. सहाजिकच कॉग्रेस पक्षाला त्याच्यामध्ये आपला तारणहार दिसला, तर नवल नाही. त्याला पाकिस्तानचा पंतप्रधान भेटायला आला असताना त्या अध्यक्ष म्हणजे ट्रंप यांनी एक बेछूट विधान जाहिरपणे केले आणि त्याचे खंडन त्यांच्याच देशाला करावे लागलेले आहे. पण असाच बेताल बोलणारा अध्यक्ष भरतातल्या कॉग्रेस पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो ना? तात्काळ इथल्या कॉग्रेस नेते व पुरोगामी पक्षांनी ट्रंप यांचे शब्द शिरसावंद्य मानून मोदींना लक्ष्य करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे, ट्रंपच्या या मुर्खपणाने कॉग्रेस पक्षात आलेली जान बघता, या शतायुषी पक्षाला नवा अध्यक्ष मिळाल्याचे मान्य करण्याला पर्यायच नाही ना?

अर्थात ही आजची गोष्ट नाही. कॉग्रेसचा हा मोदीद्वेषच् त्या पक्षाला रसातळाला घेऊन गेलेला आहे आणि त्याची सुरूवात आज नव्हेतर अठरा वर्षापुर्वी झाली होती. तेव्हा गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याची घटना घडली आणि नवख्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना परिस्थिती चांगली हाताळता आली नाही. तर त्याचे राजकीय भांडवल करून केंद्रातील भाजपा सरकारची कोंडी करायचा डाव खेळला गेला. गोध्रानंतर गुजरातभर उमटलेली हिंसक प्रतिक्रीया म्हणजे मोदींनीच मुस्लिमविरोधी दंगलीला दिलेले प्रोत्साहन असा निष्कर्ष काढला गेला. त्यासाठी पुरावा म्हणून संजीव भट नावाच्या एका दुय्यम पोलिस अधिकार्‍याचे निवेदन पुरावा मानले गेले आणि त्यातच कॉग्रेस बारा वर्षानंतर नामशेष होऊन गेली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी गोध्रा जळितकांड घडल्यावर वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक आपल्या निवासस्थानी योजली आणि त्यात हिंदू संतप्त भावनांना मोकळीक द्यावी. कुठेही दंगलीला आवर घालू नये; असे आदेश दिल्याचा दावा संजीव भट्टने केलेला होता. मोदी विरोधात काहूर माजवण्याचा तो एकमेव आधार होता, तो धडधडीत खोटा होता आणि त्याचा खोटेपणा सुप्रिम कोर्टातच अखेरीस सिद्ध झाला. ज्या मोदी विरोधी मोहिमेतून त्या सुप्रिम कोर्टाने एस आय टी नेमली होती, त्याच तपासपथकाने संजीव भट्ट निखालस खोटे बोलत असल्याचे सिद्ध केले. आता तर तो इसम तुरूंगात खितपत पडलेला आहे. त्यातले सत्य इतकेच होते, की भट्ट अशा कुठल्याही बैठकीला मुख्यमंत्री मोदींच्या निवासस्थानी उपस्थित नव्हता आणि त्याला तिथे आमंत्रणही नव्हते. त्याने निव्वळ थापेबाजी केली होती आणि त्यासाठी आपल्या सरकारी ड्रायव्हरलाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करायला भाग पाडलेले होते. हे सर्व सिद्ध् होईपर्यंत कॉग्रेसने आपली देशातील सत्ता गमावली आणि आता तर दोनदा लोकसभा गमावलेली आहे. मोदीद्वेष यापेक्षा त्याचे दुसरे कुठलेही कारण नाही.

संजीव भट्ट असो किंवा ट्रंप, फ़्रान्सचा माजी अध्यक्ष असो; त्याच्यावर कॉग्रेस कशामुळे विश्वास ठेवून इतका मोठा जुगार खेळते वा खेळली. तर त्यांची विधाने किंवा आरोप मोदी विरोधातले होते. कोणिही काहीही मोदी विरोधात बोलले, मग कॉग्रेस बुडत्याला काडीचा आधार असल्याप्रमाणे त्या खोटेपणाला घट्ट पकडून ठेवते. त्याच्या आधारे महापुर ओलांडून जाण्याचा मुर्खपणा करून जाते आणि नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटून जाते. जे संजीव भट्टच्या बाबतीत घडले आणि इतका मोठा तमाशा उभा करण्यात आला, त्यातून कॉग्रेसने आपल्याला दिल्लीच्या सत्तेतही हरवू शकणारा जबरदस्त नेता भाजपाला मिळवून दिला. दिल्लीतल्या दिग्गज मानल्या जाणार्‍या सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी किंवा अरूण जेटली इत्यादी भाजपा नेत्यांना ज्या सोनियांशी सामना करता येत नव्हता, तितकी कुवत असलेला नरेंद्र मोदी हा नेता कॉग्रेस व त्यांच्या पुरोगामी मुखंडांनी देशाचा नेता म्हणून पुढे आणला. संजीव भट्टने इतके बुडवल्यानंतर तरी खोट्याच्या नादी लागून खराखुरा मोदी हरवता येणार नाही, हा धडा कॉग्रेससहीत पुरोगाम्यांनी शिकायला हवा होता. पण अतिशहाण्यांना कोणी शिकवावे? संजीव भट्ट उपयोगाचा राहिला नाही, तर दिवाळे वाजवणारा नवा थापेबाज कॉग्रेसने शोधून काढला आणि राफ़ायलचे कागदी विमान उडवण्याचे उद्योग सुरू केले. त्याचे एकूण लोकसभा निवडणूकीत इतके भांडवल करण्यात आले, की जणू देशातील जनतेला अन्य कुठल्याच विषयावर मतदान करायची इच्छा नसावी. चौकीदार चोर ही घोषणा झाली आणि परिणामी राहुल गांधींच्या कागदी राफ़ायल विमानात बसलेल्या सगळ्यांचाच कपाळमोक्ष होऊन गेला. आजकाल त्यातले सगळे मुर्ख संजीव भट्टला विसरून गेलेत आणि मागल्या दोन महिन्यापासून कोणालाही राफ़ायल वा अनील अंबानीही ओळखीचा वाटेनासा झाला आहे. त्यांना आता ‘ट्रंप’कार्ड हाती लागलेले आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातला कळीचा विषय काश्मिर आहे आणि त्यात अन्य कोणी तिसरा देश वा व्यक्ती मध्यस्थी करू शकत नाही, ही भारताने घेतलेली खुप जुनी भूमिका आहे. सत्ताधारी पक्ष वा पंतप्रधान कितीही बदलले, म्हणून ती भूमिका बदललेली नाही. इंदिराजींपासून नरेंद्र मोदींपर्यंत दहा पंतप्रधान भारताला लाभले. पण कोणी कधी काश्मिर विषयात बाहेरच्या देशाची मध्यस्थी मागितलेली नाही आणि तसा कोणी आगावूपणा केला, तरी त्याचे कान उपटलेले आहेत. आजही काश्मिर विषयी पाकिस्तानशी बोलणी करावीत किंवा संवाद साधावा, म्हणून इथलेच काही दिवाळखोर आग्रह धरीत असतात. पाकिस्तानही हट्ट धरून आहे. पण दहशतवाद आणि बोलणी एकाच वेळी होऊ शकत नसल्याचे स्पष्ट सांगून भारताने संवाद साफ़ नाकारलेला आहे. ती मोदींची भूमिका खुप आडमुठी वा कठोर असल्याची तक्रार कॉग्रेसनेच केलेली आहे. मग असा आडमुठा पंतप्रधान अमेरिकेच्या अध्यक्षाला काश्मिर प्रश्नी मध्यस्थी करायला कसा सांगू शकेल? कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसाला इतके सहज कळू शकते. पण पुरोगामीत्वाने गंजलेल्या कॉग्रेसी व अन्य पुरोगामी नेत्यांना ती साधी गोष्ट लक्षात येऊ शकत नाही. अन्यथा त्यांनी अध्यक्ष ट्रंपच्या बेछूट विधानाचे राजकीय भांडवल करून संसदेत इतका तमाशा केला नसता. पण त्यांनाही पर्याय नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे असते, तसेच स्वभावालाही औषध नसते. त्यामुळे मोदींच्या बाबतीत कोणीही काहीही खोटे बोलावे, की कॉग्रेसला तो मोठा आधार वाटतो. त्यामुळे ट्रंपचा मुर्खपणा कॉग्रेसला राजकारणातले ‘ट्रंप’कार्ड किंवा हुकूमी पत्ता वाटला असेल, तर नवल नाही. पण लौकरच त्यातून त्यांचाच कपाळमोक्ष होईल, तेव्हा तेही दुसरे कागदी राफ़ायल विमान निघाल्याचा साक्षात्कार त्यांना होऊ शकेल. अर्थात त्यातून त्यांना शहाणपण येणार नाही, ते तितक्याच उत्साहात नव्या कागदी विमानाचा शोध घ्यायचे काम सुरू करतील. पण शुद्धीवर येणार नाहीत.

9 comments:

  1. सावध नका करू त्यांना भाऊ. अजकाल सर्व कॉंगरडे तुमचा ब्लॉग वाचतात

    ReplyDelete
  2. भाऊ , नेहमीप्रमाणे छान गोष्टीच्या मुळापर्यंत नेणारे वर्णन . धन्यवाद !

    ReplyDelete
  3. भाऊ, मला यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे असे वाटते. मध्यंतरी पाकिस्तानातील कोणत्या तरी विषयाबद्दल देखील असेच पिल्लू सोडून दिले होते, आणि संतप्त प्रतिक्रिया आल्यावर मागे घेतले होते.. आत्ता देखील त्यांच्या मनात काय आहे हे सांगणे कठीण आहे.

    ReplyDelete
  4. इकडे कांग्रेस संसदेत गोधंळ घालत आहे व तिकडे त्यांचेच नेते शशी थरुर,मोदीच्या बाजुने बोलत आहे.

    ReplyDelete
  5. पुरोगामीत्वाने गंजलेल्या !! वा छान भाऊ

    ReplyDelete
  6. आदरणीय भाऊ...तुम्ही देशांतर्गत राजकारणातल्या घडामोडींचं जसं सुंदर विश्लेषण करता तसं कधी कधी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या घडामोडींचं पण विश्लेषण कराल का...उदा. ब्रेक्झीट...थेरेसा मे च्या जागी बोरीस जाँन्सन येणं...सिरीयात इसीस ने कब्जा घेतल्यावर लाखो मुस्लीमांचे युरोपात आश्रय घेणे (जगात ५७ मुस्लीम देश असतांना सुध्दा )आणि त्याचे युरोपीय समाज जिवन आणि राजकारणावर झालेले परिणाम...त्यातुन उजव्या विचारसरणीला मिळत असलेला वाढता पाठींबा...याविषयी तुमचं विश्लेषण वाचायला उत्सुक आहोत.

    ReplyDelete
  7. भाऊ सगळा सावळा गोंधळ झाला आहे या पक्षाचा . एक राष्टीय पक्ष आणि त्याला अध्यक्ष नाही अहो अध्यक्ष नाही म्हणजे कार्यकारणी नाही .पराभव हे होतच असतात त्यातूनच पर्याय शोधायचा प्रयत्न करायचा असतो . इथे प्रॉब्लेम असा आहे की बाहेरचा अध्यक्ष मिळाला तरी त्याला free hand मिळणार नाही . त्यामुळे कोणीही पुढे येणार नाही म्हणजेच पुन्हा प्रियांका , राहुल . एका मोठ्या पक्षाची ही वाताहत पाहवत नाही . असो .

    ReplyDelete