Tuesday, July 2, 2019

पेरले तेच उगवते आहे

Image result for lakshmi parvati amma

आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता राज्यव्यापी पदयात्रा काढायचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कारण त्यांच्या हातातून राज्यातली सत्ता गेलेली आहे आणि तेव्हा त्यांना आंध्रप्रदेशात जनता किंवा मतदार असल्याचा साक्षात्कार झालेला असावा. कारण मागल्या वर्षभरात हेच चंद्राबाबू आपल्या राज्यात जनता असल्याचे पुरते विसरून गेलेले होते. किंबहूना आंध्र नावाचे राज्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तिथल्या जनतेचे आपण काही देणे लागतो, याचेही भान त्यांना उरलेले नव्हते. म्हणूनच की काय, त्यांनी आपल्या राज्याकडे साफ़ पाठ फ़िरवून केंद्रातील मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी आटापिटा चालविला होता. त्यासाठी देशव्यापी दौरा काढून विविध राज्याचे पक्षनेते व मुख्यमंत्र्यांना शाली घालून त्यांचे सत्कार करण्यात चंद्राबाबू रमलेले होते. मात्र त्यांच्या राज्यातला विरोधी नेता जगनमोहन रेड्डी सातत्याने पदयात्रा काढून जनतेला भेटत होता, किंवा तिच्या समस्या समजून घेत होता. सहाजिकच मतदानाची वेळ आली, तेव्हा मतदाराने जगनला प्रतिसाद दिला आणि बिचारे चंद्राबाबू अक्षरश: रस्त्यावर आलेले आहेत. कारण राज्यात सत्तांतर होऊन रातोरात चंद्राबाबू रस्त्यावर आलेले आहेत. त्यांचे फ़क्त मुख्यमंत्रॊपद गेलेले नाही, तर जिथे त्यांचे वास्तव्य होते, ती खाजगी इमारतही उध्वस्त करण्याचा फ़तवा नव्या मुख्यमंत्र्याने काढलेला आहे. अर्थात नवख्या लोकांना यात काही चमत्कारीक वाटले तरी राजकीय इतिहासाची जाण असलेल्यांना त्यात नवे काहीही वाटणार नाही. किंबहूना चंद्राबाबूंनी पुर्वायुष्यात जे पेरले तेच आता उगवून आले असेच म्हणावे लागेल. त्यांनी दोन दशकापुर्वी काय पेरले होते? आज त्यांच्या सासूबाई जावई देशोधडीला लागल्याने इतक्या कशाला सुखावल्या आहेत? कोण आहेत चंद्राबाबूंच्या सासूबाई? त्यांच्या अशा आनंदाचे कारण काय आहे? चंद्राबाबूंचे मुख्यमंत्रीपद कशातून आलेले होते?

चंद्राबाबू मागल्या पाव शतकापासून तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. पण तो पक्ष त्यांनी स्थापन केलेला नाही, किंवा त्याचे संस्थापक सदस्य अशीही कुठे नोंद मिळू शकणार नाही. कारण हा पक्ष स्थापन झाला, तेव्हा चंद्राबाबू स्वत:च कॉग्रेस पक्षात होते आणि त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांनी या पक्षाची स्थापना कॉग्रेसला आंध्र प्रदेशातून संपवण्यासाठीच केलेली होती. त्याचेही काही कारण होते. १९८० नंतर इंदिराजी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्यावर त्यांचे वारस म्हणून संजय गांधींचा राजकीय उदय झाला होता. पण अल्पावधीतच एका विमान अपघातात त्यांचे आकस्मिक निधन झाले. तेव्हा त्यांच्या जागी त्यांचे थोरले बंधू राजीव गांधी यांची राजकीय वारस म्हणून निवड झाली. पक्षाध्यक्ष इंदिराजींनी राजीवना पक्षाचे महासचिव म्हणून नेमले आणि राजीव देशाच्या विविध राज्यात जाऊन आपला परिचय करून घेत होते. मग तिथले कॉग्रेस नेते त्यांच्या पाया पडायला तात्काळ हजेरी लावायचे. असेच राजीव आंध्रप्रदेशात आलेले होते आणि हैद्राबाद विमानतळावर त्यांच्या स्वागताला तिथले कॉग्रेस मुख्यमंत्री टी. अंजय्या अगत्याने उपस्थित होते. तर कारभार सोडून तोंडपुजेगिरी करायला इथे कशाला आलात, अशा शब्दात राजीवनी त्यांची अवहेलना केलेली होती. चारचौघात आपली अशी विटंबना अंजय्यांना सहन झाली नाही आणि ते तिथेच रडू लागले. त्याचे एक छायाचित्र ‘एनाडू’ नावाच्या दैनिकाने प्रसिद्ध केले आणि मग त्या राज्यात तेलगू अस्मितेचा विषय गाजू लागला. अनेक तेलगू मान्यवर संतप्त झाले आणि मुख्यमंत्र्याचा अवमान म्हणजेच तेलगू अस्मितेची पायमल्ली, असा अर्थ लावून मोठी मोहिमे छेडली गेली. तेव्हा रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुपरस्टार होते आणि अनेक मान्यवरांच्या आग्रहाला मान्यता देऊन त्यांनी प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेतला. त्यातून तेलगू देसम पक्षाची स्थापना झाली आणि तेव्हाही चंद्राबाबू अंजय्या सरकारमध्ये मंत्री होते.

१९८३ सालात जेव्हा विधानसभा निवडणूका आल्या, तेव्हा तेलगू देसम आणि रामाराव हे कॉग्रेससमोरचे मोठे आव्हान ठरले आणि त्या नव्या पक्षाने कॉग्रेसला पराभूत करून दाखवले. सासरा मुख्यमंत्री झाल्यावर चंद्राबाबू कॉग्रेसला रामराम ठोकून तेलगू देसम पक्षात आले. पुढे राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आणि रामारावांना सत्ता सोडावीही लागलेली होती. पण पुन्हा मध्यावधी घेऊन त्यांनी बहूमतासह सत्ता मिळवली आणि पाच वर्षांनी सत्ता गमावली सुद्धा. मात्र राजकारणात टिकून रहाण्याचे बक्षीस त्यांना मतदाराने पुन्हा दिले आणि १९९५ सालात रामाराव पुन्हा सत्तेवर आले. पण यावेळी त्यांच्या कुटुंबात मोठा बदल झालेला होता. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने एकाकी झालेल्या रामाराव यांनी उतारवयात एका विवाहितेशी दुसरा विसाह केला. ती त्यांच्या एका कार्यकर्त्याची पत्नी होती. पण तिला घटस्फ़ोट घ्यायला भाग पाडून रामारावांनी दुसरा विवाह केला. तो त्यांच्य कुटुंबाला व मुलांनाही मान्य नव्हता. तिथून मग घरातली सुंदोपसुंदी सुरू झाली आणि मुत्सद्दी मुरब्बी चंद्राबाबूंनी त्याचा पुर्ण लाभ उठवला. सासर्‍याच्या या दुसर्‍या विवाहाला विरोध करणार्‍या मुले मुलांची आघाडी भक्कम केल्यावर चंद्राबाबूंनी आमदार व पक्षातही रामारावांच्या विरोधातली फ़ळी उभी केली आणि रामाराव यांना सत्ताभ्रष्ट करीत चंद्राबाबूंनी मुख्यमंत्रीपद बळकावलेले होते. आपले संपुर्ण कुटुंबच विरोधात गेल्याने व सत्ताही गमावल्याने रामाराव खुप खचले होते. त्यांनी मतदार जनतेला आपल्या बाजूने उभे करण्यासाठी नव्याने पदयात्रा आरंभली. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि तेलगू देसम पक्ष दुभंगला होता. आज जसे एकामागून एक आमदार खासदार चंद्राबाबूंना सोडून भाजपा, कॉग्रेस किंवा जगन रेड्डीच्या पक्षात जात आहेत, तशीच काहीशी तेव्हाची स्थिती होती. ती सासर्‍यावर जावई चंद्राबाबूंनी आणलेली होती. रामाराव यांचा त्यातच मृत्यू झाला आणि त्यांचे उरलेले सहकारीही चंद्राबाबूंना शरण गेले.

याच दरम्यान १९९६ सालात अकराव्या लोकसभेच्या निवडणूका आल्या, तेव्हा रामाराव हयात नव्हते आणि त्यांच्या विधवा दुसर्‍या पत्नी लक्ष्मी पार्वती यांनी त्याच्याच पुतळ्याची पदयात्रा काढून निवडणुका लढवल्या होत्या. पण त्यांच्यापाशी रामाराव यांचा करिष्मा नव्हता, की संघटनात्मक बळ नव्हते. त्यामुळे चंद्राबाबूंच्या हाती पडलेला तेलगू देसम हाच गट अधिकृत पक्ष ठरला. त्याला आता २३ वर्षाचा कालखंड होऊन गेला आहे. दरम्यान कॉग्रेसपाशी त्या राज्यात कोणी दमदार नेता नसल्याने नायडू १९९९ च्या विधानसभाही जिंकले होते आणि पुढल्या काळात त्यांनी हैद्राबादला माहिती तंत्रज्ञानाची राजधानी बनवण्यातून आपली किर्ती मिळवली होती. तेव्हा पत्रकार चंद्राबाबूंना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा आंध्राचे राजकीय मुख्याधिकारी म्हणूनच कौतुक करीत होते. त्याच दरम्यान देशाच्या राजकारणातही उलथापालथ झालेली होती. केंद्रात आघाडी बनवून भाजपाने सत्ता मिळवली होती आणि तिला हातभार लावण्याची कोलांटी उडी चंद्राबाबूंनी मारून दाखवली होती. तोवर पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवून फ़ेडरल फ़्रन्टचे संयोजक झालेल्या नायडूंनी १९९८ साली एनडीएला कमी पडणारी संख्या पुरवून वाजपेयींना निर्वेध सत्ता उपभोगण्याची सोय केली. मात्र आपल्या तंत्रज्ञान समर्थनाची त्यांना इतकी झिंग चढलेली होती, की सामान्य जनता शेतकरी कष्टकरी यांच्याकडे त्यांनी पाठ फ़िरवली होती. तीच पोकळी भरून काढणारा नेता तेव्हाच कॉग्रेस पक्षाला सापडला आणि चंद्राबाबूंचे ग्रह फ़िरत गेले. त्याचे नाव राजशेखर रेड्डी त्याने सहासात महिने आंध्रातील खेडोपाडी फ़िरून पदयात्रा केली आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला दिलासा देणारा प्रचार केला. त्याच्या परिणामी चंद्राबाबूंचा पक्ष २००४ च्या निवडणूकीत जमिनदोस्त झाला. कॉग्रेसला आंध्रानेच अशी संख्या दिली, की पुन्हा एकदा कॉग्रेसने आघाडी बनवून देशाची सत्ता सोनियांच्या नेतृत्वाखाली काबीज केली.

२००४ सालातच नव्हेतर राजशेखर रेड्डी यांनी पुन्हा २००९ सालातही त्या राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करताना मोठे यश मिळवले आणि चंद्राबाबू पराभवाच्या गर्तेत ढकलले गेले. मात्र कॉग्रेसश्रेष्ठींना आंध्र आपल्या हातात ठेवता आला नाही. म्हणून २०१४ सालात् पुन्हा मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन नायडूंना मुख्यमंत्रीपद मिळू शकले. २००९ची निवडणूक जिंकल्यावर् राजशेखर रेड्डी यांचा लौकरच अपघाती मृत्यू झाला आणि त्यांचा वारसा आपल्याला मिळावा असा त्यांचे सुपुत्र जगनमोहन यांचा अट्टाहास होता. तो सोनियांनी जुमानला नाही आणि जगन ऐकेना तेव्हा त्याच्यामागे सूडबुद्धीने आयकर व अन्य यंत्रणांच्या तपासाचे शुक्लकाष्ट लावले. त्यामुळे जगन कॉग्रेसमधून बाहेर पडला आणि कुवत नसलेल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून सोनियांनी तिथे आपल्याच पक्षाची कबर खोदून घेतली. कॉग्रेसमधून हळुहळू एक एक नेता जगनच्या आश्रयाला जात राहिला. किंवा चंद्राबाबूंच्या गोटात दाखल होत गेला. तेव्हा जगनला संपवण्यासाठी सोनियांनी आंध्रचे विभाजन करण्याची मागणीच मान्य करून टाकली आणि त्याचा जगनला अधिकच लाभ मिळाला. तेलंगणा व आंध्र अशा दोन्ही राज्यातून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले गेले आणि मोदींलाटेवर स्वार होऊन चंद्राबाबू पुन्हा उरलेल्या आंध्राचे मुख्यमंत्री होऊ शकले. दरम्यान कॉग्रेस नेस्तनाबुत झाली होती आणि बहुतांश नेते जगनच्या आश्रयाला गेलेले होते, तेलगंणाताले कॉग्रेसनेते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात निघून गेले. पण तरीही उरलेल्या आंध्रामध्ये चंद्राबाबू हा लोकप्रिय नेता नव्हता. सासर्‍याची पुण्याईच त्यांना राजकारणात तगवू शकलेली होती. कारण तेलगू देसम व जगनच्या पक्षाची मते समसमान होती. तरी भाजपाच्या किरकोळ मतांच्या भारामुळे तेलगू देसमला २०१४ सालात बहूमत व सत्ता मिळालेली होती. पण गेल्या वर्षी नायडूंनी मोदींना हुलकावण्या दिल्या आणि आपल्याच पा्यावर धोंडा पाडून घेतला.

२००३ सालात गुजरात दंगलीनंतर नायडूंनी एक मोठी राजकीय चुक केली होती. त्यांनी आपल्या लोकप्रियतेच्या भ्रमात वहावत जाऊन एनडीए सोडली आणि विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकीचा जुगार खेळला होता. त्यातच त्यांनी सत्ता गमावली. नेमकी तीच चुक त्यांनी पंधरा वर्षानंतर २०१९ सालात राज्याला विशेष दर्जा मिळावा म्हणून एनडीए सोडून केली. तेव्हा म्हणजे २००३ सालात शेतकरी आत्महत्येचा गाजावाजा करीत राजशेखर रेड्डी राज्यभर पदयात्रा करीत फ़िरले होते आणि त्याकडे नायडूंनी ढुंकूनही बघितले नव्हते. आताही रेड्डीफुत्र जगन अनेक महिने पदयात्रा करून राज्यव्यापी फ़िरत असताना नायडू काय करीत होते? चंद्राबाबू देशव्यापी दौरे करून मोदी विरोधातली आघाडी उभारण्यासाठी अनेक प्रादेशिक नेत्यांना शाली घालून सत्कार करीत होते. दिल्ली, चेन्नई, बंगलोत वा कोलकात्याच्या यात्रा करीत होते. त्याची किंमत मतदानात मोजावी लागलीच आहे. पण् पक्षातही आता कोणी त्यांच्या विश्वासाचा उरलेला नाही. तेलंगणा असो किंवा आंध्रात असो, त्यांच्या पक्षाचे नेते व आमदार त्यांना सोडून अन्य पक्षात निघून जात आहेत. तेव्हा कुठे चंद्राबाबूंना जनतेची आठवण झालेली आहे. आपल्या विरोधकांनीच नव्हेतर पक्षसंस्थापक सासरे रामाराव यांनी पदयात्रा करूनच जनतेचा विश्वास संपादन केल्याचे स्मरण या दिर्घकालीन मुख्यमंत्र्याला झालेले आहे. आपल्याला कुमारस्वामी, ममता किंवा मायावती, येच्युरी, राहुल गांधी मते मिळवून देऊ शकत नसल्याचा साक्षात्कार, सत्ता गमावल्यानंतर नायडूंना झाला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यभर पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नव्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्याविरुद्ध बोलण्यासारखे त्यांच्या हाती आज तरी काहीही मुद्दे नाहीत. सासरे रामाराव यांच्यासारखा करिष्माही नायडू यांच्यापाशी नाही. म्हणूनच आताच पदयात्रा काढण्यापेक्षा त्यांनी पक्षाला लागलेली गळती थांबवायला प्राधान्य देण्याची गरज होती.

थोडक्यात आता पदयात्रा काढून त्यांना काहीही साध्य होणार नाही किंवा हाती लागणार नाही. त्यापेक्षा शांतपणे आपल्या कुठे कुठे चुका झाल्या, त्याचा ताळेबंद मांडावा आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होणार नाही अशी रणनिती आधी बनवावी. कारण् दोनतीन दशकाच्या राजकीय अनुभवातून हा नेता काहीही शिकलेला नाही. जर शिकला असता, तर त्याने जुन्या चुका तशाच्या तशा करून आपला राजकीय कपाळमोक्ष करून घेतला नसता. मोदींना दिल्लीतून हुसकावून लावण्यापेक्षा, आपलेच आंध्र राज्यातील सत्तास्थान पक्के करण्याला प्राधान्य असावे, इतकेही त्याला समजू शकले नाही. त्याला मुरब्बी तरी कशाला म्हणायचे? उलट आता निवडणूक निकालानंतर त्यांच्याच पक्षातले अनेक खासदार नायडूंची साथ सोडून भाजपात दाखल झाले आहेत. किंबहूना त्याच खासदारांच्या विरोधात आयकर विभागाने कारवाई केल्यने सुडाचे राजकारण म्हणून नायडूंनी बोंब ठोकली होती. सीबीआयला आपल्या राज्यात येण्यावर प्रतिबंध घातला होता. तर तेच खासदार आता मोदींना शरण गेले आहेत आणि नायडूंना मिळाले काय? हाती आले धुपाटणे? पण त्यांच्या सासूबाई नायडूंची सत्ता जाण्याने जितक्या सुखावलेल्या नाहीत, तितक्या नायडूंना त्यांच्याच पक्षातले सहकारी सोडून जात असल्याने सुखावल्या आहेत. कारण नायडूंनी अशीच स्थिती लक्ष्मी पार्वती व त्यांचे दिवंगत पती रामाराव यांच्यावर आणलेली होती. घरातल्या विश्वासघात व दगाबाजीने रामाराव यांचा इहलोकीचा अवतार आटोपला होता आणि तसाच् काहीसा अनुभव आता नायडूना घ्यावा लागत असल्याने सासूबाई खुश झालेल्या असाव्या. तो त्यांचा घरातला कुटुंबातला मामला आहे. बाकीच्या जगातील राजकारण्यांसाठी हा एक कठोर धडा आहे. लबाडीने किंवा चतुराईने कर्तबगारीला कायम उल्लू बनवता येत नाही किंवा अन्य कुणाचे यश लुबाडता येत नाही. असा तो धडा आहे. जे पेराल ते उगवते आणि ते विषारीच असते.

7 comments:

  1. Mast bhau...नायदुची पूर्ण माहिती मिळाली...

    ReplyDelete
  2. धन्यवाद भाऊ आंध्र प्रदेशच्या राजकारणाचा उभा पटच उलगडतात

    ReplyDelete
  3. खूप सविस्तर, पहिल्यापासून माहिती. सारांश चांगला. अनेक प्रादेशिक पक्षांनी लक्षात घ्यावे

    ReplyDelete
  4. भाऊ, आता कळलं सर्व जण तुम्हाला ज्येष्ठ पत्रकार का म्हणतात ते, लोकांच्या राजकीय ज्ञानात तुमच्या लिखाणामुळे सतत भर पडत असते.

    ReplyDelete
  5. भाऊ अगदी सुरवाती पासून शेवट पर्यंत इतिहास खरोखर तुम्ही GR 8 आहात

    ReplyDelete