राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीतील् पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. त्याला आता महिन्याचा काळ लोटला आहे. इतक्या दिवसात त्या पक्षाला आपला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही, किंवा राहुलनाच अध्यक्षपदी कायम राहाण्यासाठी पटवण्यातही श्रेष्ठी यशस्वी झालेले नाहीत. कारण् सवाल या पराभवाची जबाबदारॊ कोणाची असा नसून, येऊ घातलेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे. कॉग्रेस पक्षातल्या प्रत्येक नेत्याची हीच गुणवत्ता असते, की त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते. सहाजिकच् त्यांना असा अध्यक्ष किंवा नेता लागतो, जो जबाबदारी घेईल आणि तरीही तोच कर्तृत्ववान असल्याची इतरांनी ग्वाही द्यायची असते. परिणामी राहुल भले राजिनामा देतील्, पण तो स्विकारायचा कोणी असा घटनात्मक प्रश्न पक्षासमोर उभा आहे. जर पक्षाने त्यांना अध्यक्षपदी निवडलेलेच नसेल्, तर पक्षाला राजिनामा तरी स्विकारण्याचा अधिकार कसा असेल? २०१३ च्या अखेरीस राहुल पक्षाचे उपाध्यक्ष झालेले होते. पण त्यापुर्वी कधी पक्षात असे पद उपलब्ध नव्हते, की कोणी उपाध्यक्षही झालेला नव्हता. मग अचानक आता हे पद आले कुठून् वा राहुलना ते मिळालेच कसे? कोणी असा प्रश्न विचारण्याची हिंमत तरी केलेली होती काय? अकस्मात एके दिवशी दोन दशकापुर्वी सोनिया पक्षाध्यक्ष झाल्या, तेव्हा तरी त्यांना कोणी त्या पदावर आणून बसवले होते? आणि त्याचा आधार काय होता? असे प्रश्न तेव्हा विचारले गेले नसतील, तर आता कोण विचारणार? पण् आज ज्या परिस्थितीत कॉग्रेस पक्ष आहे, त्याला त्यापासून मोक्ष देण्याची कुवत असलेले अनेकजण सध्या कॉग्रेस गोतावळ्यात आहेत. पण त्याकडे कोणाचेच लक्ष जात नसेल, तर सगळेच बुचकळ्यात पडण्यालाही पर्याय नाही ना? कुमार केतकर पक्षाचे खासदार आहेत आणि सुधींद्र् कुलकर्णी राहुलचे सल्लागार असल्याचे कोणा कॉग्रेस नेत्यांना कशाला आठवत नाही? इतके कर्तबगार अध्यक्ष कॉग्रेसला शोधूनही मिळणार नाहीत ना?
कुठल्याही राजकीय पक्ष वा संघटनेला मोक्ष हवा असेल, तर तिने शांतपणे ग्रंथप्रामाण्यवादी पुस्तकपंडितांना शरण जायचे असते. कारण पुस्तकपंडितांना व्यवहाराशी कधी कर्तव्य नसते. त्यात केतकर किवा त्यांच्यासारखे कॉग्रेसवादी बुद्धीमंत खुप उच्चपातळीवर आहेत. पण राहुलच्या जागी पर्यायी अध्यक्ष शोधताना कोणाचेच लक्ष तिकडे गेलेले दिसत नाही. सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गेहलोट अशा नावांची उगाच चर्चा चाललेली आहे. त्यांच्याकडून काय साध्य होऊ शकते? ते पक्षाला पराभवापासून वा़चवू शकत नाहीत किंवा नव्याने उर्जितावस्थेलाही आणू शकत नाहीत. अशावेळी बुडणार्या पक्षालाही तो प्रगतीपथावर असल्याचाच खोटा दिलासा देणार्यांची गरज असते. लोकसभेतील पराभवानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी नॅशनल हेराल्ड या कॉग्रेसच्या अधिकृत दैनिकात राहुल गांधींच्या नैतिक विजयाची ग्वाही दिलेली होती ना? जगातला इतर कोणी शहाणा वा राजकीय अभ्यासक त्या व्यवहारी पराभवातला विजय सिद्ध करू शकला होता काय? पण ती किमया कुलकर्णी यांनी दाखवली आहे आणि अशा जादूचीच सध्या कॉग्रेसला गरज आहे. तिथे व्यवहारी निवडणुका लढलेले वा मुख्यमंत्री म्हणून् कारभार हाकलेले शिंदे-गेहलोट काय दिवे लावू शकणार आहेत? त्यापेक्षा कुमार केतकर आणि सुधींद्र कुलकर्णी कॉग्रेसला सुखनैव मुठमाती देण्याचे काम करू शकतील. आपण संपलो कधी आणि कसे, याचा थांगपत्ता कुठल्याही राज्यातल्या कॉग्रेस नेत्यांना वा पक्षालाही लागणार नाही. दुर्दैव इतकेच, की अजून अशा कर्तबगार दोघांचे नावही कुठे चर्चेत आलेले नाही. की राहुल गांधींपर्यंत त्या दोघांना कोणी जाऊच देत नसावा का? अन्यथा फ़तवा काढूनच राहुलनी या दोघांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमून टाकले असते. मग मोदींची भिती कोणाला बाळगण्याचे कारण उरले नसते. कारण मोदी कसे संपणार, याचे पंचाग केतकरांनी खुप पुर्वीच एबीपी माझा वाहिनीच्या कट्ट्यावर बसून मांडलेले आहे.
मला याचीच गंमत वाटते, की केतकर राहुलना सल्ला देतात आणि त्यांचा सल्ला नरेंद्र मोदी काळजीपुर्वक उपयोगात आणतात. याकडे तरी कोणा कॉग्रेसवाल्याने थोडे गंभीर होऊन बघायला नको काय? मध्यंतरी केतकरांनी हमीच दिलेली होती, की मोदींचा सतराव्या लोकसभेत दारूण पराभव होणार् आहे आणि त्यातून त्यांना अयोध्येचा श्रीराम अवतरला तरीही वाचवू शकणार नाही. हा इशारा केतकरांनी मोदींना किंवा भाजपाला दिलेला नव्हता. तो कॉग्रेस व राहुलना दिलेला होता. त्याचा अर्थ असा होता, की मोदींनी अयोध्येतील रामाच्या मंदिराच्या उभारणीत फ़सावे आणि त्यांचा राजकीय निवडणूकीत पराभव व्हावा. सापळा खुप छान व सोपा होता. पण कपील सिब्बल किंवा अन्य कॉग्रेसवाल्यांनी केतकरांना तो सापळा लावूच दिला नाही. मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत मंदिरच्या कामात जितके अडथळे आणता येतील, तितके आणले आणि मोदी त्यापासून अलगद दुर राहिले. परिणाम असा झाला, की मोदींनी अध्यादेश काढला नाही किंवा संघाच्या कुठल्या संस्थेला मंदिराची उभारणी करण्यास मुभा दिली नाही. सुप्रिम कोर्टात सिब्बलांनी अडथळे आणले नसते, तर मंदिराचा मार्ग मोकळा झाला असता आणि मोदींचे सरकार व भाजपा मंदिरातच फ़सत गेला असता. त्यांनी पुलवामा, बालाकोट किंवा गरीबांना गॅसजोडणी वा वीजपुरवठ्याच्या गोष्टीच केल्या नसत्या. त्यापेक्षा मंदिराच्या उभारणीसाठी छाती फ़ुगवून मोदी प्रचारात मिरवले असते. अयोध्येतला राम आपल्याला निवडणूका जिंकून देईल, अशा भ्रमात मोदी राहिले असते, तर राहुलना ७२ हजार रुपयात निवडणूक सहज जिंक्ता आली असती. पण केतकरांचा इशारा मोदींनी गंभीरपणे घेतला. रामाच्या मंदिरापेक्षाही पुलवामा बालाकोटवर भर दिला आणि पुन्हा एकदा लोकसभा जिंकली. रामाची मदत घेण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय केतकरांचे नाही, तर काय अमित शहांचे आहे?
आताही इतके मोठे बहूमत मिळवल्याने नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार कसे मस्तवाल होऊन गाळात जाणार आहे, त्याचे पंचांग केतकरांनी ‘द प्रिंट’ नावाच्या संकेतस्थळावर प्रदिर्घ लेखातून मांडलेले आहे. म्हणजेच अशा वेळी मोदी सरकारला कुठलाही प्रतिकार करण्यापेक्षा मस्तवाल होऊ देणे, असा सापळा केतकरांनी सुचवलेला आहे. पण तिकडे पुन्हा कुणाही कॉग्रेसवाल्याचे लक्ष नाही. सगळे मुर्ख लेकाचे राहुलची समजूत घालून अध्यक्षपदी कायम राखण्यात गर्क आहेत्. विधानसभा लढवण्य़ाचे मनसुबे रचण्यात रमलेले आहेत. पण मोदींना केतकरी सापळ्यात अडकवण्याचा विचारही कोणा कॉग्रेसवाल्याच्या मनाला शिवलेला नाही. दुसरे सुधीद्र कुलकर्णी. त्याना नैतिक विजयानेही सत्ता मिळवण्याची किमया साधलेली आहे. राहुलना पक्ष संभाळता येत नसेल आणि निवडणूका जिंकून सत्ता मिळवणे शक्य नसेल, तर निवडणूकांशिवायच सत्ता मिळवण्याला कॉग्रेसने प्राधान्य देणे भाग आहे ना? मग ती किमया ज्याला साधली आहे, त्याचाच सल्ला बहूमोलाचा नाही काय? त्यात फ़क्त कुलकर्ण्यांचाच हातखंडा आहे. त्यामुळे जुन्यापान्या कुणा नेत्यांना कॉग्रेसची सुत्रे सोपवण्यापेक्षाही केतकरांना पक्षाध्यक्ष करावे आणि कुलकर्णींना महासचिवपदी नेमले, तर किती बहार येईल ना? हुड्डा किंवा अशोक चव्हाणांना बाजूला ठेवूनही हरयाणा व महाराष्ट्रात कॉग्रेसला नैतिक विजय संपादन करता येतील. कार्यकारिणी वा श्रेष्ठी असल्या सर्व दगदगीतून राहुलना कायमची मुक्ती मिळून जाईल. मराठीत आपण म्हणतो ना काखेत कळसा नि गावाला वळसा? घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना कॉग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनितीकाराची कॉग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धीबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात ता दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी पासष्ट घरे असलेला बुद्धीबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील. त्यांनी त्यावर यापुर्वी दोनदा अग्रलेखरुपी प्रबंध लिहीलेले आहेतच.
very good satire
ReplyDeleteमोदींना परत निवडून देण्यात राहुलचा पण हात आहे ,पाहिल्यान्दा मोदी २०१४ साली अंबानींचे हॉस्पिटलचे उदघाटन करणे,भू संपादन कायदा आणणे यातच मग्न होते ,पण जेव्हा राहुलने सूट बूट कि सरकार म्हणून चिडवले तेव्हा मोदी लगेच सावध झाले ,त्यांनी पूर्ण मार्गच बदलला , आणि आता तो बदलणे शक्य नाही ,राममंदिर ३७० ना होताही परत सत्तेवर यायचं हे त्यांना चांगलच कळलंय ,त्यांनी हे विषय सरळ कोर्ट मध्ये ढकललेत
ReplyDeleteभाऊ, केतकर आपल्या नावाप्रमाणेच कुमार आहेत, म्हणजे बालबुद्धी. खरं म्हणजे बालबुद्धी म्हणण्याने लहान मुलांचा अपमानच आहे.
ReplyDeleteसुमार केतकरची मस्त घेता राव भाऊ तुम्ही
ReplyDeleteखूप छान जोड शांत बुवा तुम्ही!!!
ReplyDeleteVA Bhau. Chuan khechali ketkar kulkaKul yanchi. Great.
ReplyDeleteनैतिक विजय हा राहुलचाच होणार असे नैतिक विजय मोदींना हवेच आहेत. राहिला प्रश्न अध्यक्ष पदाचा त्या साठी आपले आहेतच शिंदे साहेब .पाहू पुढे काय होतंय पण करमणूक छान आहे.
ReplyDeleteGandhi garanyachya navavarach khup jananchi dukandari chalu aahe, yada kadachit congress ne Pruthviraj Chavan sarakhya pramanik ani kartavyadaksha manasala adhyaksha banavile tar khup jananchi dukandari band hoel, manun Kahi karyakartyala ugachch phashiche dhong karayala lavayache ani aplen dukan chalu dyayache.....
ReplyDeleteSumar Manus aahe, tyala mahatwa dewu naka. Undir Kulkarni la suddha. Otherwise you're great, your article is very good. Salute.
ReplyDeleteमस्तच नामकरण केले
Deleteत्यांनी त्यावर यापुर्वी दोनदा अग्रलेखरुपी प्रबंध लिहीलेले आहे
ReplyDeletePlease provide link
😂😂😂✔️
ReplyDelete1985 मधे राजीव गांधी च्या काळात अर्जुन सिंघ कोंग्रेस उपाध्यक्ष होते
ReplyDeleteकुमार केतकर आणि सुधींद्र कुलकर्णी यांचे शतशः आभार! ते अशेच पदांवर राहिले आणि अशाच प्रतिक्रिया देत राहिले, तर भाजप विनासायास २५ ते ३० वर्षे निवडणूक जिंकतील.
ReplyDeleteशाल जोडीचा छान उपयोग....
ReplyDeleteकेतकर व कुळकर्णी सारखेच त्यांच्या प्रवक्त्यांनीच काँग्रेस ला बुडविले.बाकी समीक्षण नेहमी प्रमाणे अप्रतिम..जयहिंद!!
ReplyDeleteया सुमार केतकर बेशर्माला लाज पण वाटत नाही एका नॅशनल चॅनेलवर येऊन कल्पना विलासातल्या भविष्यावण्या करायला.त्यांनी खुशाल त्यांच्या फिक्शनल स्टोरीज ची पुस्तके लिहावीत पण एका राष्ट्रीय चॅनेलवर येऊन आपला पोपट का करून घेतात हे समजत नाही.निर्लज्ज सदा सुखी.
ReplyDelete