Tuesday, October 15, 2019

थकले-भागलेले नेते

Image result for pawar shinde

लागोपाठ दोनदा लोकसभा निवडणूकीत आपल्या हक्काच्या मतदारसंघात आणि बालेकिल्ल्यात पराभूत झालेल्या सुशीलकुमार शिंदे, यांना आता आपला थकवा जाणवू लागलेला आहे. म्हणूनच त्याची कबुली देऊन त्यांनी आगामी कालखंडात महाराष्ट्रातल्या दोन्ही कॉग्रेसचे विलिनीकरण होईल असे भाकित केले. पण ते शरद पवारांना रुचलेले नाही. रुचणारही नाही. पण म्हणून सत्य बदलत नसते किंवा त्याचे परिणामही टाळता येणार नसतात. सुशीलकुमार यांना आपण व्यक्तीगत थकलो असे वाटलेले नाही, तर आपला पक्ष थकलाय असे ते म्हणतात. त्यात तथ्य आहे आणि ते शिंदे यांना समजायला उशीर झालेला आहे. २०१३ म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपुर्वी आणि नरेंद्र मोदी नावाचा नवा झंजावात राजकारणात घोंगावू लागण्यापुर्वी, शिंदे-पवारांचे केंद्रीय मंत्रीमंडळातील एक सहकारी जयराम रमेश यांना त्याची जाणिव झालेली होती. तितकेच नाही तर दुसरे ज्येष्ठ सहकारी दिग्विजय सिंग यांनाही तसाच साक्षात्कार झालेला होता. त्यांनीही राजीव गांधींच्या सोबत राजकारणात आलेल्यांची एक्स्पायरी डेट उलटुन गेल्याचे साफ़ सांगितले होते. पण तेव्हा ते शिंदे वा इतरांना कुठे ऐकू आलेले होते? समजूही शकलेले नव्हते. तेव्हा असे बहुतांश कॉग्रेसनेने आपण अजून म्हातारे झालेलो नाही असे पवारांच्याच भाषेत ठामपणे बोलत होते. म्हणून परिणाम बदलले नाहीत. हळुहळू नेतेच नव्हेतर कॉग्रेस पक्षच म्हातारा वा कालबाह्य होत गेला. पण ते सत्य कोणी कोणाला दाखवायचे आणि समजवायचे असा प्रश्न होता. त्याचेच दुष्परिणाम आता साफ़ दिसू लागले आणि अनुभवास येऊ लागल्यावर शिंदे वा इतरांना जाग येते आहे. पण सावरण्याची वेळ टळून गेली आहे. पक्ष थकला म्हणजे त्याची झुंजण्याची उमेद संपली असा अर्थ होतो. त्याच्यात लढण्याची शक्ती राहिलेली नव्हतीच. पण उसने अवसान आणुन भुलभुलैय्या निर्माण केला जात राहिला आणि खरे आव्हान समोर आल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखा कॉग्रेसचा डोलारा कोसळून पडला आहे. शिंदे यांचा रोख तिकडेच आहे.

अर्थात अशा कॉग्रेसला नव्याने उभारी देता येईल असे शिंदे यांनी म्हटलेले नाही. शिंदेच कशाला, सलमान खुर्शीद, संजय निरूपम इत्यादी अनेक नेते आता तेच उघड बोलू लागले आहेत. पण म्हणून सत्य स्विकारण्याची हिंमत असायला हवी ना? अशी ताकिद यापुर्वी अनेकांनी दिलेली होती, पण ते सत्य स्विकारले गेले नाही, किंवा डागडुजी करण्यात आली नाही. उलट त्या डळमळीत झालेल्या तकलादू कॉग्रेसला खेळणे म्हणून राहुल गांधींकडे सोपवण्यात आले आणि त्यांनी अवघ्या पाच वर्षात त्या शतायुषी कॉग्रेस पक्षाचा पुरता पालापाचोळा करून टाकला. त्याच्या परिणामांची राहुलना कुठे चिंता होती? त्यांच्यासाठी ते निव्वळ महागातले खेळणे होते. टिकले काय किंवा मोडले काय? राहुलना त्याची पर्वा नव्हती. पण ज्यांचे भवितव्य त्या पक्षाशी जोडलेले होते, किंवा ज्यांचे जगणेच त्या पक्षावर अवलंबून होते, त्यांनी तरी पुढाकार घेऊन कॉग्रेस वाचवायला हवी होती. त्या पक्षाला भवितव्य नसल्याचे नरेंद्र मोदींनी पाच वर्षापुर्वीच साफ़ सांगितले होते. पण त्यांची टवाळी करण्यात धन्यता मानली गेली आणि आता तेच भाकित खरे ठरल्याचे शिंदे सांगत आहेत. राष्ट्रवादीशी विलिनीकरण करून त्या रुग्णाईत कॉग्रेसला नवी संजिवनी मिळू शकेल काय? मुळात जनतेला पुन्हा कॉग्रेस हवी आहे काय? मतदाराला भाजपा किंवा अन्य कुठला पक्ष नको असतो, तर त्याच्यातली उपयुक्तता जनतेला हवीशी वाटत असते. ती उपयुक्तता संपली, मग अशा पक्षाच्या जगण्यामरण्याची कोणाला फ़िकीर नसते. भाजपा असो किंवा कॉग्रेस असे कुठलेही पक्ष लोकांना समाजाच्या हितासाठी वा कल्याणाचा गाडा ओढण्यासाठी हवे असतात. जितका वेगाने गाडा ओढणारा पक्ष असेल, तितका तो लोकांना हवा असतो. पण तो थकला किंवा गाडा ओढू शकत नसेल, तर लोक त्याला हळुहळू कामापासून बाजूला करीत असतात. फ़क्त सत्ताधारी पक्षच लोकांना हवा असतो असेही नाही. विरोधी पक्षही लोकांना हवाच असतो. कारण मस्तवाल सत्ताधारी पक्षाला वेसण म्हणून विरोधी पक्षाची मोठी उपयुक्य्तता असते.

गेल्या पाच वर्षात जे राजकारण देशात झाले, त्यात भाजपाने आपल्याला सर्वात उत्तम सत्ताधारी पक्ष म्हणून सिद्ध केले, असे कोणी म्हणू शकणार नाही. पण आपण मेहनत करणारे व जनतेच्य उपयोगाचे पक्ष असल्याचे भाजपाने नक्कीच सिद्ध केलेले आहे. त्यापुर्वी विरोधातले राजकारण करून आणि गेल्या पाच वर्षात सत्तेत बसून, भाजपाने आपली लोकशाहीसाठी असलेली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. सध्या जनतेला भेडसावतो आहे, तो विरोधी पक्षाचा प्रश्न! मोदींचे यश किंवा भाजपाचे लागोपाठचे विजय, यावर चर्चा खुप होते. पण लोकशाहीत आवश्यक असलेला विरोधी पक्षच रिंगणात उरलेला नाही, याविषयी उहापोह होत नाही. कॉग्रेसचे काय होणार याची चर्चा रंगवली जाते. पण कॉग्रेस नसेल तर दुसरा कोणीतरी विरोधी पक्ष असायला हवा, असा विचार पुढे आणला जात नाही. लोकशाहीत आज सत्तेत असलेल्या पक्षाने उद्या विरोधातही तितकेच जोमाने काम करायला हवे. फ़क्त सत्ता असली तरच आपण काम करू. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आपण निरुपयोगी असल्याचे कोणी सिद्ध करत असेल, तर त्या पक्षाची जनतेला गरज नसते. हेच १९५२ पासून १९९० पर्यंत होत आले. सामान्य जनतेने कॉग्रेसशी झूंज देऊन विरोधात ठामपणे बसणारा पक्ष शोधण्यात चार दशके वाया घालवलेली आहेत. त्यानंतरच हळुहळू भाजपाला प्रोत्साहन देऊन मतदाराने देशात पहिलावहिला प्रमुख विरोधी पक्ष तयार केला. तिथून कॉग्रेसच्या मक्तेदारीला वेसण घातली गेली आणि जनतेलाही लोकशाही पर्याय उपलब्ध झाला. पण त्यानंतर भाजपा सत्तेवर आला, तेव्हा कोणीतरी तितकाच खंबीर विरोधी पक्षही हवाच असतो. कॉग्रेसला सत्तेबाहेर बसून सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम मतदाराने सोपवले होते. ते कितीसे पार पाडता आले? त्यापेक्षा कॉग्रेसनेही सत्ता संपादनासाठी पुरोगामी वा सेक्युलर पक्षांची मोळी बांधून पुन्हा संख्याबळावर सत्ता बळकावली आणि दहा वर्षात मतदाराला भाजपाच लौकर सत्तेवर आणून बसवण्याची आवश्यकताच पटवून दिली. त्यावेळी नरेंद्र मोदींसारखे आक्रमक नेतृत्व भाजपाकडे उपलब्ध होते हा योगायोग. पण कॉग्रेसपाशी नेतृत्वच उरलेले नव्हते, हे राजकीय वास्तव होते नि आहे.

कॉग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे किंवा तत्सम जे कोणी आहेत, त्यांना कॉग्रेस थकलेली वाटते; त्याची मुळात मिमांसा होण्याची गरज आहे. त्यासाठी आत्मपरिक्षणाची गरज असते. कांगावखोरी कामाची नसते. कॉग्रेसने नुसत्या कांगाव्याने आपले अपयश लपवण्यातच धन्यता मानली आणि त्याच कांगाव्याला विश्लेषण बनवणार्‍या भाडोत्री पत्रकार माध्यमांनी, कॉग्रेसला आणखी निकामी नाकर्ते होण्याला हातभार लावलेला आहे. आज कॉग्रेस दुबळी झालेली आहे, कारण सत्तेशिवाय कॉग्रेस जगू शकत नाही, ही कॉग्रेसजनांची धारणा त्याला मुख्यत: कारणीभूत झालेली आहे. मात्र सत्ता मिळवण्यासाठी जी मेहनत आवश्यक आहे, ती घेणारा कोणी कॉग्रेस पक्षात उरलेला नाही. राहुल गांधी यांना घराणेशाहीच्या आधारे पक्षाध्यक्षपदी आणुन बसवणे सोपे असले, तरी जिथे कसोटीची वेळ येते तिथे नेतॄत्व गुणांची परिक्षा होत असते. तिथे असफ़ल झाल्यावर हा नेता फ़रारीच झाला. जबाबदारी झटकून त्याने पळ काढला. सलमान खुर्शीद त्याचीच कबुली देत आहेत. पण ह्याला कॉग्रेस व त्या पक्षाला धार्जिणी माध्यमे व पत्रकार जबाबदार आहेत. त्यांनी गेल्या दोन दशकात कॉग्रेसच्या चुका व अपराधांना पाठीशी घालण्यात धन्यता मानली, तिथून कॉग्रेसच्या र्‍हासाला आरंभ झाला. किंबहूना कॉग्रेसने आपली राजकीय लढाई करण्याचे काम विद्यापीठे, माध्यमे व तथाकथित उसन्या बुद्धीमंतांवर सोपवले आणि जनतेशी जोडून घेण्याचे कामच बंद करून टाकले. तिथेच त्या पक्षाचा दिवसेदिवस र्‍हास होत गेला आणि सगळी साधने विरोधात असताना व राजकारण प्रतिकुल असताना व झुंजण्याची शक्ती वाढवताना; भाजपा शक्तीशाली होऊन गेला आहे. आता भाजपाशी लढण्याच्याही अवस्थेत कॉग्रेस नाही आणि ज्यांच्यावर हे लढायचे काम सोपवले, त्या माध्यमांना, पत्रकारांना, बुद्धीमंतांना अस्सल राजकीय लढाई लढणेही अशक्य झाले आहे. कारण सत्ताधारी पक्षाशी विरोधी पक्ष लढत असतो आणि माध्यमे वा पत्रकार हा विरोधी पक्षच नसतो. तो फ़ारतर भाडोत्री मदतनीस असतो.

आज कुठल्याही वाहिनीवर अधिकृत कॉग्रेस प्रवक्ता येत नाही आणि जे कोणी हिरीरीने कॉग्रेस वा गांधी घराणेशाहीची पाठराखण करायला हजेरी लावतात, त्यांची ओळख काय करून दिली जाते? राजकीय विश्लेषक म्हणून ना? इथे लक्षात येईल, की कॉग्रेसपाशी संघटना उरलेली नाही किंवा कार्यकर्त्यांची फ़ौज उरलेली नाही. म्हणूनच आता कॉग्रेस हा राजकीय पक्ष राहिलेला नसून, ती एक पोकळ कल्पना झालेली आहे आणि त्याच्या मदतीने भाजपाशी राजकीय टक्कर देता येणार नाही. याचा अर्थ भाजपाला पुर्ण मोकळीक आहे आणि विरोधी पक्षाशिवायही लोकशाही चालेल, असेही नाही. लोकशाही टिकायची असेल वा चालवायची असेल, तर विरोधी पक्ष असायला हवा आणि तो कॉग्रेसच असण्याची काहीही गरज नाही. त्याखेरीजही अन्य पक्ष असू शकतो. किंवा उदयास येऊ शकतो. भाजपाला तीनशेहून अधिक जागा मिळाल्या म्हणजे निर्दयी बहूमत असे म्हणतात, त्यांच्या दुधखुळ्या बुद्धीची कींव कराविशी वाटते. कारण १९५२, १९५७, १९६२ किंवा १९७१, १९८० व १९८४ अशा सहा निवडणुकांमध्ये कॉग्रेसला याहीपेक्षा अधिक जागा मिळालेल्या होत्या. पण त्याला यापैकीच अनेक जाणत्या बुजूर्ग पत्रकारांनी कधी निर्दयी बहूमत संबोधलेले नव्हते. मग आता हा शब्द आला कुठून? तर भाडोत्री बुद्धीमंत वा माध्यमांनी कॉग्रेसला पुरक वाटणार्‍या विश्लेषणातून ह्या शब्दाला जन्म दिला आहे. म्हणून ते सत्य होत नाही. आज कॉग्रेसपाशी ५२ लोकसभेतील खासदार आहेत आणि तितकेही १९७७ पर्यंत कुठल्या एका विरोधी पक्षाला लोकसभेत मिळवता आलेले नव्हते. मुद्दा असा आहे, की सरकारला धारेवर धरू शकेल आणि  मुद्दे उपस्थित करून सरकारी पक्षाची कोंडी करू शकेल; अशा विरोधी पक्षाची व नेत्यांची वानवा आहे. तिथेच लोकशाहीची आबाळ होते आहे. त्यातून सावरायचे तर योगेंद्र यादव म्हणतात, तशी कॉग्रेस मेलीच पाहिजे. तिच्या जागी कोणी अन्य भक्कम व ध्येयवादी विरोधी पक्ष उदयास आला पाहिजे. ज्याला सत्तेची हाव नसेल, पण सत्तेत बसलेल्या भाजपाला सतत धारेवर धरून जनहितासाठी काम करायला भाग पाडणार्‍या विरोधी पक्षाची गरज आहे.

सुशीलकुमार शिंदे कॉग्रेस थकली आहे, असे म्हणतात, तेव्हा त्यांना सत्ता मिळवण्याच़्या बाबतीत थकली, असे म्हणत आहेत. आपल्या बळावर आता कॉग्रेस कधीच सत्तेपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे त्यांना म्हणायचे आहे. पण ५२ खासदार पाठीशी असलेल्या पक्षाला मुद्देसुद विरोधाचे राजकारण करायला कुठे अडचण आहे? मार्क्सवादी, समाजवादी, जनसंघ असे डझनभर लहानमोठे पक्ष पुर्वीच्या लोकसभांमध्ये बलाढ्य कॉग्रेस पक्षाला पुरून उरत होते आणि चारपाच कारकिर्दीत विरोधी पक्षात बसले, म्हणून त्यांचा कुठलाही नेता थकलो असे कधी म्हणाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांना सरकारी कारभार चोख असण्यासाठी विरोधी राजकारण करायचे होते आणि कॉग्रेसला विरोधी राजकारणाशी कर्तव्यच उरलेले नाही. त्या पक्षाला फ़क्त सत्तेत बसायचे आहे आणि सत्तेशिवाय काहीच नको आहे. अशा पक्षाला लोकशाहीत स्थान नसते आणि असूही नये. मग विरोधाशिवाय भाजपाला मोकळे रान द्यायचे काय? अजिबात नाही. १९९० नंतर भाजपाने पद्धतशीर नियोजन करून स्वत:ला विरोधी पक्ष म्हंणून प्रस्थापित केले आणि सत्तेची हाव धरल्याशिवाय जबाबदार भूमिका पार पाडली. तशा नव्या पक्षाची चेहर्‍याची भारतीय लोकशाहीला गरज आहे. १९८९ सालात जनता दलाच्या सरकारला बाहेरून पाठींबा देऊन भाजपा सत्तेबाहेर राहिला होता. त्याने सत्ता तात्काळ मिळवण्यापेक्षा आपले बळ वाढवण्याला प्राधान्य दिले. आजही कोणी तसा पक्ष आपले विरोधी राजकारण घेऊन पुढे सरसावला, तर जनता त्याला बळ देत जाईल. पण त्याने मात्र सत्तेच्या हव्यासाचे कॉग्रेसप्रमाणे नागडे प्रदर्शन मांडता कामा नये. तशा वास्तविक विरोधी पक्षाची लोकशाहीला जनतेला गरज असते आणि म्हणूनच भाजपा १९९० ते २०१४ पर्यंत इतकी मोठी मजल मारू शकला. आज पुढल्या दहापंधरा वर्षाचे दिर्घकालीन लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोणी नेता व पक्ष तयारीला लागला, तर भाजपाला समर्थपणे आव्हान देऊ शकणारा पक्ष २०२५ पर्यंत नक्कीच आकाराला येऊ शकेल. अन्यथा थकलेले भागलेले कॉग्रेसवाले किंवा त्यांचे उसने लढवय्ये उरल्यासुरल्या विरोधी पक्षांनाही नामोहरम करून टाकतील.

भाजपाला आजकाल कुठलाही समर्थ विरोधक नाही, म्हणून गाफ़िल राहिलेला नाही. नुसती सत्ता हातात आली, म्हणून त्या पक्षाने आपली संघटना विस्कळीत होऊ दिलेली नाही. पण म्हणून त्याला पर्यायी कुठला समर्थ शक्तीशाली पक्ष विरोधात असू नये, असे अजिबात नाही. लोकशाहीत जनतेला नेहमी पर्यायी राजकीय पक्ष उपलब्ध असावा लागतो. त्याने विरोधात असताना सत्ताधारी पक्षाला आसूड हाती घेऊन शिस्त लावायला हवी. प्रसंग ओढवला तर सत्ता संभाळण्याचीही तयारी असली पाहिजे. ही सत्ता मिळवणे संख्येने शक्य असले, म्हणून चालवणे बिलकुल आवाक्यातली गोष्ट नाही. सतरा पक्षांचे कडबोळे जमवून बहूमताची संख्या जमवता येते. पण ती लोकशाही नसते. तर संख्याशाही असते आणि त्याच संख्याशाहीने युपीएच्या हाती दहा वर्षे सत्ता गेली व दिवाळखोरीची वेळ आली. विरोधात अनेक पक्षांचे संख्याबळ मोठे असून चालत नाही. तर एकदिलाने काम करू शकतील व समंजसपणे कारभार हाकू शकतील, अशा समजूतदार नेत्यांची एक संघटना असावी. त्याला विरोधी पक्ष म्हणता येईल. १९८४ नंतर भाजपाने प्रयत्नपुर्वक कॉग्रेसला पर्यायी पक्ष म्हणून आपली उभारणी केली. आता कॉग्रेस थकली वा विरोधी जबाबदारी पुर्ण करू शकत नसेल; तर अन्य कुठल्या पक्षाने ती जबाबदारी पार पाडायला पुढे आले पाहिजे. नुसता भाजपा किंवा मोदींच्या नावाने शंख करणे म्हणजे विरोधी राजकारण नाही. तर त्यांना बाजूला करायचे असेल, तर जनतेच्या हिताला जपणारी नेत्यांची एक फ़ौज सज्ज असायला हवी. तशा नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची निष्ठावान फ़ौज तयार करायला हवी. ते करणे कॉग्रेसच्या आवाक्यातली गोष्ट नाही, असेच सुशीलकुमार सांगत आहेत आणि त्यालाच पवारांनी नकार दिला आहे. दिवाळखोर भाडोत्री विश्लेषक व पत्रकारांनाही लोकशाहीत कसा विरोधी पक्ष असायला हवा, त्याचा गंध नाही. त्यांना कॉग्रेस वाचवायची आहे किंवा भाजपाता हरताना बघायचे आहे. पण भाजपा पराभूत झाला, तर देशाचे व कारभाराचे काय? त्याचे उत्तर कोणापाशी नाही. म्हणून तर भाजपासाठी निवडणूका सोप्या झाल्या आहेत. पण ज्या राज्यात स्थानिक पातळीवर असा भाजपाला पर्याय उपलब्ध आहे. तिथे विरोधी पक्ष संपल्याची वा थकल्याची कोणालाही चिंता म्हणूनच नाही.

10 comments:

  1. वास्तव लिहीलय���� तरी पण भाऊ एक तरूण मतदार म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून माझी आपणास एक विनंती आहे,सक्षम विरोधक कसा असावा? यावर तुमच मत काय...कारण,कांग्रेस असो वा रा.कांग्रेस त्यांच्यातला विरोधक संपलाय पण तुम्ही म्हणाल्या प्रमाणे मनसे किंवा वंचित विरोधक म्हणून उदयास जरी आली तरी हे पक्ष राज्याच्या समस्यांवर उपाय काय एक चकार शब्दही काढत नाही आणि देशपातळीवरील समस्यांवर बोलत राहतात. देशातील सुरक्षायंत्रणावर बोलतात. हेच आम्हा नवमतदारांना खटकते. उद्याला कधी युद्धाची वेळ आलीच तर ही लोक केंद्र सरकारला पाठिंबा देतीलच का याबद्दल शंकाच वाटते? आजच्या विरोधकांमध्ये राष्ट्रभक्ती का दिसत नाही ?? म्हणून एकदा सक्षम विरोधक कसा असतो यावर तुम्ही लिहावं.��

    ReplyDelete
  2. भाऊ तुमचे सगळे लेख राज ठाकरे वाचत असतात त्यामुळे त्यांनी यावेळी मातांची बेगमी करताना लोकांना चक्क मला विरोधी पक्षनेता करा असे आवाहन केले आहे

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्हाला भाजपचे समर्थक म्हणणाऱ्या लोकांनी हा लेख जरुर वाचावा.मला ही तुमची निःपक्षपाती असणारी पत्रकारिता खुप आवडली आणि पत्रकारिता अशीच असावी,कोणाची री ओढण्यापेक्षा वाचकांना अभ्यासपुर्ण विश्लेषण वाचायला देणे हे फक्त तुमच्यासारख्या हाडांच्या पत्रकाराला जमू शकतं.सगळ्या लेखांमध्ये हा लेख जास्त आवडला.

    ReplyDelete
  4. सुशीलकुमार शिंदे हे कदाचित मोठे नेते असतील, पण त्यांनी स्वतःच काबुल केल्याप्रमाणे ते "फक्त पक्षश्रेष्टींचे ऐकतात, आणि त्याचप्रमाणे वागतात." म्हणूनच ह्या नेत्याने "भगवा दहशतवाद" असल्याचा दावा करून स्वतःला बहुसंख्य जनतेपासून दूर नेले. कदाचित त्यांना पक्ष "थकलेल्या" अवस्थेत आहे असे वाटते कारण त्यांना "पक्षश्रेष्टींकडून" तसे संकेत मिळत असावेत. ते काही स्वतः झडझडून कामाला लागणारे नाहीत, किंवा शरद पवारांसारखे स्वतःला "तरुण" म्हणवून घेत जोरदार प्रचार करायचा प्रयत्नहि करणार नाहीत. जे नेते गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधीच कसे योग्य आहेत, आणि काँग्रेसचा पराजय हा सांघिक आहे, पण यश मात्र एकट्या राहुल गांधींचे आहे हे सांगण्यासाठी धडपडत होते तेच सध्या तिथले "बडे" नेते आहेत - बाकीचे बरेच पक्ष सोडून गेलेले दिसतायत. त्यामुळे ह्या नेत्यांना एकदम आताच "पक्ष थकलेला" का जाणवू लागला असावा? २०१४ च्या लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर ह्या नेत्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नसावा? का अनेकांनी तो खासगीत केला, पण बाहेर पडू दिला नसावा? कि त्यांना खरोखरच राहुल गांधी २०१९ ला चमत्कार करतील असा विश्वास वाटला असावा?

    ReplyDelete
  5. Bhau atishay sunder lekh aahe. satya paristhitiche varnan aahe.lekh kuthhi biased nahi.

    ReplyDelete
  6. अप्रतिम, अत्यंत रॅशनल, परखड लेख. सुशीलकुमार शिंदे हे
    कधीही स्वयंभू नेता नव्हतेच. ते फक्त राजकारणाच्या एका
    ठराविक काळात चतुरपणे गांधी घराण्याचे पेड भाट होते. थोरामोठ्या कलाकारांमध्ये ललित साहित्यकांमध्ये लिपस्टिक
    आर्टिफिशियल छापाचे वाईड हास्य करून उठबस केल्याने कुणीही मोठा राजकारणी होउ शकत नाही. बस्स सुशीलकुमार शिंदे कळसूत्री बाहुलं बनून बावळट बनून ऍड
    बनून सत्तेचा पेढा मचमच आवाज करत हादडत खुर्च्या उबवणारे टिपिकल काँग्रेसी नेता राहिले. सत्ता नाही म्हणून थकले..













    ReplyDelete
  7. आतापर्यंतच्या राजकारणी समुदायाला निवडणुकीत यश मिळविणे म्हणजे तुमड्या भरायची संधी मिळणे हेच अपेक्षित होते... भाजपचे आमदार खासदारही त्याला अपवाद नव्हते.. राजकीय पटलावर असलेले सर्वजण त्या परिक्षेत विषेश प्राविण्य मिळवलेलेच होते... तो जमाना सर्व 'बूथ छपवाना'मधूनच निवडून येणारा होता.. गावगुंडांना हाताशी पाळून जिस की लाठी उसकी भैंस.. दाम करी काम.. वगैरे पैकी! मोदी हा एकमेव नेता हा त्यात वेगळाच चमकू लागला धृवाप्रमाणे एक ध्यास घेऊन यात उतरला. बघता बघता गुजरातला नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या मॉडेलचा डंका वाजू लागला. ही संधी साधून BJP च्या धुरीणांनी त्यांना 'चेहेरा' बनवला पण त्यांना वेळी ही कल्पनाच नव्हती की हा स्वयंभू तारा आहे त्यामुळे धृपद मिळाल्यावर त्याने योग्य माणसे मोक्याच्या ठिकाणी आणताना कुणाही धुरीणांना धूप घातली नाही.. पर्रीकर.. डोभाल.. सुरेश प्रभू.. वगैरे.
    हे वाचून मी त्यांच्या भक्तांपैकी वाटेल पण त्यांनी दुसऱ्या टर्म मध्ये आणलेले अमीत शहा, एस्. जयशंकर ह्या क्लासिक नेमणूक नाकारून चालणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला राहुलला मांडीवर घेऊन 'कारभार' करण्यासाठी उत्सुक काँग्रेसचे बोके या माहोल मधे 2019 मधेही BJP येणे अपरिहार्य तर होतेच पण मोदींसारखा तन मन धन देणारा पंतप्रधान होणे हे देशाचे भवितव्य उज्ज्वल अगदी नाही पण रसातळाला नेण्याकडून रोखणारा आहे हे मान्य करायला सुद्धा काही गटांना जड जाते.
    समर्थ व सच्चे पक्ष तयार व्हायला अजून वेळ आहे आहेत ते फक्त सेल्फसेंटर्ड नेते बंडखोरांच्या डोक्यावर पाय देऊन गाजर मिळवू पहाणारे!

    ReplyDelete
  8. Taj thakre and diplicate ambedkar can never be good opposition leaders ad they are involved in dirty local politics. They are selfish and have no real concern eith the intetest of majority people and this country.

    ReplyDelete
  9. खरं आहे भाऊ, विरोधक पूर्ण गलितगात्र झाले आहेत. शरद पवार गेले की रा. काँग्रेस ची पण अवस्था अशीच होणार या मध्ये कोणालाही शंका नाही. कारण त्यांनी एखाद्या CEO सासखेच पक्ष चालविला आहे आणि सॅम्पसणार आहेत. मनसे चे पुनरुत्थान होऊ शकते पण ते देखील शिवसेने पासून दूर गेल्यावर शरद रावांच्या फारच जवळ जेलर आहेत. असो येणाऱ्या काळात तुम्ही म्हणता तसे कोणी प्रयत्न पूर्वक विरोधी पक्ष होईल असे आज वातस्त नाही. आपले निर्भीड परकरिता आणि परखड मत नक्कीच जनतेला व कॅम्पउशाही पत्रकारिता करणार्यांना आवडेल.

    ReplyDelete
  10. भाऊ, समर्थ विरोधी पक्ष लोकशाहीत असायलाच हवा, असा पक्ष जो सत्तधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर योग्य अभ्यास करून त्यांचे कान पकडेल आणि योग्य धोरणांवर साथ देखील देईल.देशाच्या शत्रुबरोबर आम्ही १०५ आहोत हे देखील ठासून सांगेल.
    योग्य अभ्यास म्हणजे जे धोरण सत्ताधारी पक्षाने जाहीर केलेले धोरणांवर सर्वकष विचार करुन चर्चा व चुका दाखवून देईल, केवळ कुणाचीतरी मते ऊचलून, देशातील कोणत्याही घटनेला मुख्य माणसाला जबाबदार धरणे यातून होत काय लोकांना विरोधी पक्ष जबाबदारी पार पाडत नाही याची खात्रीच होते. राहूलचे राफेलास्त्र म्हणूनच फेल गेले पण त्यातून तो सुधारणार नाहीच कारण त्याची ती लायकी नाही.

    ReplyDelete