Sunday, October 27, 2019

एकलव्याची गोष्ट

Image result for fadnavis cartoon

विधानसभा निवडणुका ऐन भरात आल्या आणि प्रचाराचा अंतिम टप्पा गाठला गेला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि शरद पवार यांच्यात थेट जुंपलेली होती. त्यात फ़डणवीसांनी एक विधान केले होते. आमचे मल्ल अंगाला तेल लावून तयार आलेत आणि आखाड्यात लढायला कोणीच नाही. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले होते, कुस्ती ‘तशांची’ लढता येत नाही. ते बोलताना पवारांनी तृतियपंथी व्यक्तीमत्वाचा सूचक इशारा केला होता. त्यासाठी आपण कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असल्याचाही दावा केला होता. त्यावरून खुप चर्चा झाली. पण फ़डणवीसांना आखाड्यात लढत कुठल्या मल्लाशी आहे, ते निकालापर्यंत कळलेले नव्हते आणि पवारांना नेमके तेच ठाऊक असल्याने त्यांनी पावसात भिजूनही शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे प्रदर्शन मांडलेले होते. आपण जिंकणार नसून जिंकल्याचा आभास निर्माण करू शकतो, हे त्यांचा अनुभवच त्यांना सांगत होता. तर अननुभवी फ़डणवीसांना खरा मल्ल जवळ असूनही बघता आलेला नव्हता. तो कोणी परका नव्हता, तर त्यांच्याच पक्षातला वा युतीतला नाराज वा बंडखोर नावाचा होता. त्याने दगाफ़टका केला तरी चितपट केल्याचा विजय फ़डणवीस मिळवू शकत नव्हते आणि आपोआप कुस्ती बरोबरीत सुटल्याचा निकाल येणार होता. आखाड्यात उतरल्यावर अंगाला नुसते तेल लावून वा माती अंगाला लावून भागत नाही. त्यात डाव महत्वाचा असतो, तितकाच समोरच्याने टाकलेला पेच उधळून लावण्याला महत्व असते. इथे पवारांनी डाव टाकल्याचा आव जरूर आणला होता. पण पेच अजिबात टाकलेला नव्हता. पेच फ़डणवीसांच्याच गोटातून टाकलेला होता आणि त्यांना तो ओळखताही आलेला नव्हता. भाजपा शिवसेनेतील बंडखोरीच त्यांना मोठे यश मिळवण्यासाठी रोखणार आहे, हे आखाड्यात असूनही मुख्यमंत्र्यांना ओळखता आले नाही. पण अनुभवातून गेलेले असल्याने पवारांना समजू शकले होते. नुसते आखाड्यात उभे राहिले तरी कुस्ती बरोबरीत सुटल्याचा आभास उभा रहाणार, याची त्यांना खात्री होती आणि झालेही तसेच. बंडखोरांनी सत्ताधीशांच्या पायात पाय घालून पाडले आणि समोरचा मल्ल नुसता उभा राहिला म्हणून कुस्ती झाल्याशिवाय बरोबरीत सुटल्याचा निकाल समोर आला.

फ़डणवीसांना आपल्या पक्षातले वा युतीतले बंडखोर किती नुकसान करू शकतील, याचे आकलन झाले नाही. किंबहूना ती बंडखोरी रोखण्याची गरज वाटली नाही, हा राजकारणातला कच्चा दुवा होता. त्याहीपेक्षा लोकसभेत इतके मोठे यश मिळवल्यानंतर प्रतिपक्षातून आमदार फ़ोडून आणण्याची गरज नव्हती. मराठीतली एक म्हण आहे. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानी पाठवलं घोडं. इथे आणखी विचीत्र परिस्थिती होती. गेल्या विधानसभेत युती मोडल्याने दोन पक्षांत आलेले वितुष्ट संपलेले नव्हते. दोनशेहून अधिक मतदारसंघात आपापले उमेदवार सज्ज ठेवण्यात आलेले होते. त्या वितुष्टाला आधीच्या चार वर्षात सतत खतपाणी घालण्यात आलेले होते. अशा इच्छुकांनी युती झाल्यावर आपल्या तलवारी निमूट म्यान कराव्यात, ही अपेक्षा असू शकते. पण खात्री कोणी देऊ शकत नाही. म्हणजेच नुसती युती व जागावाटप केल्यावरही शिवसेना व भाजपामध्ये बंडखोरीचे तुफ़ान येणार, हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समजायला हवे होते. त्यामुळे आपल्याच इच्छुकांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची वेळ समोर होती आणि इतर पक्षातून अधिकचे भागिदार त्यात आणले गेले. त्यातून अधिकाधिक बंडखोरी होण्याला पोषक स्थिती सत्ताधारी युतीनेच निर्माण केलेली होती. तेही कमी म्हणून आपापल्या जागा व उमेदवार अखेरच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवून संकटात भर टाकली गेली. अशा बंडखोरीतून काय उदभवते, हे पवारांनी पंचवीस वर्षापुर्वी अनुभवलेले होते आणि तेव्हा प्रथमच महाराष्ट्रात युतीला सत्ताही दिलेली होती. कॉग्रेसचे मुख्यमंत्री व प्रमुख नेता म्हणून पवारांनी अनेक नावडत्यांना दिल्लीच्या आग्रहास्तव पक्षाचे तिकीट दिले आणि आपल्या विश्वासूंना तिथे बंडालाही प्रोत्साहन दिलेले होते. त्यात ३८ बंडखोर निवडून आले आणि कॉग्रेस बहूमताला वंचित होऊन ८० इतकी खाली घसरली. त्याचीच याहीवेळॊ पुनरावृत्ती झाली. मात्र तितके नुकसान झाले नाही. १९९९ सालात पवारांनी वेगळी राष्ट्रवादीची चुल मांडली, तेव्हा त्या बंडखोर अपक्ष आमदारातले बहुतांश त्यांच्या नव्या पक्षात दाखल झाले होते. पण त्यातून बेजार झालेली कॉग्रेस पुन्हा कधी सावरली नाही. त्याचीच पुनरावृत्ती युतीच्या नेत्यांनी यावेळी केली आणि एकमेकांना न मिळालेल्या जागी बंडखोरांना उभे करून आपलीच संख्या घटवण्याचा डाव छान खेळलेला होता.

१९९५ सालात पवारांनी बंडखोरीला उत यावा, असेच डावपेच इतके बेमालून खेळले होते, की तिथे विलासराव देशमुखांचाही बालेकिल्ल्यात पराभव झालेला होता. यावेळी सेना भाजपाचाही आपल्या अनेक बालेकिल्ल्यात तसाच पराभव झालेला आहे. मुद्दा इतकाच की फ़डणविसांना आपल्या समोरचा मल्ल दिसत नव्हता, कारण समोर खरेच कोणी मल्ल नव्हता. ज्याच्याशी खरी झुंज द्यायची होती, तो दगाफ़टका करायला त्यांच्याच पाठीशी बंडखोर म्हणून तयारीत उभा होता. तो दिसायचा कसा? पण समोरच्या पवारांना तो दिसत होता. म्हणून त्यांनी त्या बंडखोरीचा जितका लाभ उठवता येईल, तितका उठवण्याचा आतापीटा केला. त्याचा लाभही त्यांना पन्नाशी ओलांडून मिळू शकला. पण कुस्ती जिंकणे शक्य झाले नाही. कारण ते अशक्य असल्याची त्यांनाही खात्री होती. म्हणून तर मतदान उरकून आल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अतिशय सुचक विधान केलेले होते. ‘निवडणूक एकतर्फ़ीच होणार नाही, याची आपण काळजी घेतली’ असे पवार म्हणाले, त्याचा अर्थ विजयाची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. पण फ़डणवीस म्हणतात वा समजतात तितका सहज विजय त्यांनाही मिळणार नव्हता, हे ओळखूनच लढण्याचा आवेश पवारांनी दाखवला होता. फ़डणवीस वा उद्धव ठाकरे उत्साहात ज्या चुका करीत  होते, त्या ओळखुनच पवारांनी सावधपणे आपला पवित्रा घेतला होता. झुंज दिल्याशिवाय कुस्ती बरोबरीत सुटण्याचा फ़ायदा घेण्यातला मुरब्बीपणा मान्य करावाच लागेल. जिंकण्याची शक्यता नसते, तेव्हा बरोबरी सुद्धा विजय मानला जातो. त्यामुळेच दणदणित विजयाची शक्यता असताना बरोबरीपर्यंत युतीला खाली यावे लागले, तो पराजय मानला गेला. युतीने २३ जागा गमावल्या आणि तितक्या आघाडीला जादा जिंकता आल्या नसतील तर तो आघाडीचा विजय कसा ठरू शकेल? सत्ता युतीकडेच राहिली व बहूमताचा आकडाही घटला, तरी बहूमत टिकलेच ना? हरलो नसल्याचा आनंदोत्सव करण्याची संधी आघाडीला व पवारांना मिळालीच. विराट कोहलीच्या शतकाचे कौतुक होण्यापेक्षा हुकलेल्या शतकाची निर्भत्सना अधिक होते. उलट दिर्घकाळ चांगली खेळी न केलेल्या रोहित शर्माच्या शतक द्विशतकाचे गुणगान अधिक होते. त्यापेक्षा परवाच्या निकातातले कौतुक व टिकेमध्ये फ़ारसा फ़रक नाही.

जी स्थिती आज फ़डणवीसांची आहे त्यापेक्षा वाईट स्थितीत १९९० सालात शरद पवार होते. चार वर्षापुर्वी त्यांनी समाजवादी कॉग्रेसचा गाशा गुंडाळून कॉग्रेसमध्ये घरवापसी केलेली होती. मुळात आधीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्व पक्षाची पुलोद नावाची मोट बांधून ५५ पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या आणि तरीही वसंतदादांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने विधानसभेत १६२ जागांसह बहूमत मिळवलेले होते. अशा कॉग्रेसमध्ये १९८६ सालात पवार आपल्या पन्नासहून अधिक आमदारांसह सहभागी झाले. त्यामुळे १९९० सालची विधानसभा निवडणुक समोर आली असताना, कॉग्रेसच्या गोटात २२० पेक्षा अधिक आमदार होते आणि नंतर पक्षात आलेल्या पवारांकडेच पक्षाचे नेतृत्व होते. पण काही महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना भाजपा युती व जनता दलातर्फ़े जागावाटपाचा समझोता होऊन त्यांना मोठे यश मिळालेले होते. त्याचा फ़टका विधानसभेत आपल्याला बसेल, हे ओळखून पवारांनी रिपब्लिकन ऐक्य झालेल्या दलित मतांमध्ये फ़ुट पाडण्याचे डाव खेळले आणि त्यातल्या आठवले गटाल सोबत घेतले होते. इतकी त्यांना युतीच्या मतांची व शक्तीची धडकी भरलेली होती. प्रथमच कॉग्रेसने आघाडी करून आठवले गटला सोबत घेतले आणि तरीही पवारांच्या नेतृत्वाखाली बलवान कॉग्रेसला बहूमत गमवावे लागलेले होते. २२० हून अधिक आमदार संख्या असलेल्या कॉग्रेसला पवारांनी तेव्हा १४१ इतके खाली आणून दाखवले. फ़डणवीसांनी अल्पमताचे सरकार २०१४ अखेरीस बनवले आणि नंतर त्यात शिवसेना सहभागी झाली. त्या दोघांच्या आमदारांनी परस्पर विरोधात लढून संख्या १८५ होती आणि आज १६२ इतकी झाली आहे. २९ वर्षापुर्वी तशीच स्थिती पवारांची होती. आपल्या आमदारांसह ते कॉग्रेसमध्ये १९८६ सालात दाखल झाले, तेव्हा त्यांच्याशिवाय कॉग्रेस बहूमतात होती. पण चार वर्षात आलेल्या विधानसभा निवडणूकीत पवारांनी कॉग्रेसला २२० वरून १४१ इतके खाली आणून दाखवण्याची किमया केलेली होती. पण पवार आजच्या इतकेच तेव्हाही नशिबवान होते. पुरोगामी माध्यमांना त्यांच्या त्या दारूण पराभवातही मुरब्बीपणा दिसला होता आणि आज कुठलेही लक्षणिय परिवर्तन झाले नसताना पवारांच्या पराभवातही किमया दिसतेच आहे. पण १८५ वरून १६२ इतकी नगण्य घसरण होऊनही फ़डणवीस मात्र टिकेला पात्र आहेत.

मुद्दा कोण किती काय गमावून बसला असा असेल तर १९९० सालात मुरब्बी अनुभवी पवारांनी ८० आमदार गमावण्यात मोठा पराभव होता आणि अननुभवी फ़डणवीस यांनी पाच वर्षात २३ आमदार गमावण्यात नगण्य पिछाडी आहे. पण पटकथा लेखकामध्ये नायक खलनायक रंगवण्याचे अधिकार सामावलेले असतात. तो पराभवालाही विजयाचे रुप देऊ शकणारा कलाकार असतो आणि विजयालाही पराजयाची नामुष्की सिद्ध करू शकत असतो. पवार १९७२ सालात मंत्री व १९७८ सालात मुख्यमंत्री झाले. त्यांचा दांडगा अनुभव १९९० च्या निवडणूकीत पाठीशी होता आणि देवेंद्र यांच्या पाठीशी प्रशासनाचा फ़क्त पाच वर्षाचाच अनुभव होता. पण तो पडला एकलव्य. आधुनिक द्रोणाचार्यांचा नावडता नाकारलेला विद्यार्थी. त्यामुळे त्याने कितीही उत्तम नेमबाजी दाखवली, तरी त्याच्याकडे अंगठा कापून मागला जाणे स्वाभाविकच आहे. आपला अर्जुन वा त्याचे अपयश झाकण्यासाठी एकलव्याचा बळी घेण्यालाच तर महाभारत म्हणतात. तो पक्षपात करणारे तर द्रोणाचार्य वा आचार्य बुद्धीमंत मानले जातात. म्हणून तर १९९० सालात बहूमत गमावणारे पवार किमयागार असतात. आज इतके भिजून व इडीचा गाजावाजा करूनही ४१ ते ५४ गाठणारे पवार महान योद्धा असतात. पण तारेवरची कसरत करीत पाच वर्षे सरकार चालवणारा वा युतीतून बहूमताचे आकडे टिकवणारा देवेंद्र अपयशी ठरवला जाऊ शकतो. कारण स्पष्ट आहे. कसोटी एकलव्याची होत असते, अर्जुनाची नाही. अर्जुन लाडका असतो. निकष वगैरे झुट असतात. सर्व निकष पटकथा लेखकाच्या इच्छेनुसार बदलत असतात. केंद्रीय वा राज्यातलाही कोणी नेता सगळीकडे न फ़िरता कॉग्रेसला मिळालेल्या जागा खर्‍या पक्षीय ताकदीचा पुरावा आहे. पण त्याही पक्षाची तितकीच निर्भत्सना चालू आहे. उलट सहानुभूतीचा वाडगा घेऊन इतका आटापिटा करूनही पन्नाशीच्या पाढ्यातच अडकून पडले, तरी गुणगौरव पवारांचाच होणार. कारण ती श्रींची इच्छा असते. आणि अशा कथानकात पटकथा लेखक हाच ‘श्री’ असतो. ज्याला आधुनिक जमान्यात प्रसार माध्यम अशा नावाने ओळखले जाते. अर्थात त्यामुळे भाजपा, त्यांचे श्रेष्ठी, त्यांचे तथाकथित डावपेच वा फ़डणवीसांच्या चुका यावर पांघरूण घातले जाऊ शकत नाही. त्याचा समाचार पुढल्या भागात घेऊ. आज उठलेल्या भुलभुलैयाच्या धुरळ्याला खाली बसवण्याला प्राधान्य आहे.

20 comments:

  1. अभ्यासपूर्ण सडेतोड विश्लेषण....
    भाऊ शंभर टक्के सहमत.... ं ं

    ReplyDelete
  2. सडेतोड अभ्यासपूर्ण विश्लेषण

    ReplyDelete
  3. अगदी मार्मिक आहे टिपण्णी

    ReplyDelete
  4. पण भाऊ, फडनवीसांवर पडलेला पेच त्यांना माजी मुख्यमंत्री करायला पुरला! असे तुम्हाला नाही वाटत का?

    ReplyDelete
  5. अत्यंत समर्पक विश्लेषण.उभयतांचे, किमान भाजप वाल्यांचे डोळे उघडावेत इतके परखड टीका,विश्लेषण केले आहे.
    भाऊ साहेब खूपचं छान.दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत .

    ReplyDelete
  6. Pan bhau bandkhorich mhnyach tar vanchit mule Congress ncp chya 33 jaga kami zalyat.

    ReplyDelete
  7. खरं आहे.भाऊ सूंदर लेख.

    ReplyDelete
  8. १)माननीय मुख्यमंत्री यांच्या काही चुका झाल्या हे अप्रत्यक्षरीत्या मान्य करणेही चांगले. त्यांना सल्लागार कमी असतील.२) समोर विरोधक नाहीत असा अवास्तव पणा, पूरस्थिती बद्दल काय केले,ते सांगणे,ईडी प्रसंग टाळणे, इ. होवू शकले असते.

    ReplyDelete
  9. कस सोन्याचा लागतो

    ReplyDelete
  10. तुमचं डिस्क्लेमर वाचूनच आलो होतो, आणि विश्वास ठेवा, बिलकुल भ्रमनिरास झाला नाही.
    भाजपा हरली बंडखोरांमुळे? ओके? मग मला सांगा, साताऱ्यात कुणी बंडखोरी केली? परळीत कुणी बंडखोरी केली? कर्जत जामखेडमध्ये कुणी बंडखोरी केली? मुख्यमंत्र्यांना नागपूरमध्ये कोण बंडखोर मिळाला?
    उघडा डोळे, बघा नीट. इथे बंडखोरांना नव्हे, तर आयारामाना जनतेने जागा दाखवली. काँग्रेसमुक्त भारताऐवजी काँग्रेसयुक्त भाजप बनवला, आणि याच भाजपला मतदारांनी नाकारलं. विकतची मीडिया, विकतचे ब्लॉगर यांना साथीला घेऊन एक विदारक चेहऱ्याला रंगरंगोटी केली गेली, आणि त्याचा भेसूरपणा जास्तच नजरेसमोर आला.
    जरा प्रत्येक मतदारसांघातला निकाल बघा. नाशिक पश्चिमच उदाहरण घ्या. सेनेने उघड बंडखोरी केली, पण तिथे सेनेला ६००० मतेच मिळाली. नाशिक पूर्वमध्ये भाजप आमदाराने बंडखोरी केली, तिथेही त्याचा पराभव झाला.
    बस, जनता विटली होती. आता सक्षम विरोधी पक्षांनी नीट भूमिका बजवावी हीच इच्छा!

    ReplyDelete
  11. भाऊ देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव कमी पडला असावा,स्वतःच्या पक्षाचे बहुमत या ऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवून टाकायला निघाले पण असे विरोधी पक्षाचे अस्तित्व संपत नसते,लोकसभा निवडणुकीत भाजप सेना स्वतंत्र लढले असते तर भाजपचे 25 ते 30 सेनेचे 3 ते 4 आणि उरलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला असे कल अनेक चाचण्या दाखवत होत्या म्हणजे भाजपच्या लोकसभेतील जागा तेवढ्याच राहिल्या असत्या,सत्तेत राहून विरोधात भूमिका करायची ही सेनेची भूमिका भाजपने मोडून काढायला हवी होती ती न काढल्याने ते काम मतदाराने केले आहे, आताचा कलच असा आहे की सेना भाजपचे सरकारच फक्त बनू शकते,अन्य कोणतेही समीकरण बनू शकत नाही हे वास्तव जर सेनेने स्वीकारले नाही आणि स्वतःच्याच सरकारविरोधात सामना मधून तलवारबाजी सुरूच राहिली तर मात्र मतदारराजा सेनेचे अस्तित्व कायमचे संपवून टाकल्या शिवाय राहणार नाही,अडीच वर्षांनी येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत याचे प्रत्यन्तर येईल,कारण सेनेची ही वर्तणूक 1977 ते 80 च्या काळातील अती हुशार समाजवाद्यांनासारखी आहे.

    ReplyDelete
  12. भाऊ, परखड विश्लेषण. आपल्यासारख्या निष्पक्ष विश्लेषक पत्रकारांची आज गरज आहे. आहेत ते कोणाचे ना कोणाचे भाट आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. ' निष्पक्ष ' ������.
      लेखक स्वतः म्हणतो की तो भाजप - शिवसेनेकडे झुकलेला आहे.

      Delete
  13. भाऊ, एक विनंती आहे.
    यावेळेस लोकसभेच्या आधारावर केलेले तुमचे अंदाज का चुकले याचे देखील काही विश्लेषण केले असेल तर ते देखील प्रकाशित करावे.
    आमचे ज्ञान वाढते.

    ReplyDelete
  14. मला पण काँग्रेस ने कोणताही गाजावाजा न करता मिळवलेलं यश राष्ट्रवादी पेक्षा मोठं वाटतय.

    ReplyDelete
  15. I wonder if such a beautiful analysis would be evaluated in the right sense. The fact of the matter is regardless of any explanation, the overconfidence did the undoing sme like " India Shining " Do you need to say any further?

    ReplyDelete
  16. आपलाच पाच वर्षांपूर्वीचा लेख शरद पवारांविषयी

    http://jagatapahara.blogspot.com/2014/10/blog-post_21.html?m=0

    ReplyDelete
  17. तुमचा आदर करून सांगू icchito की dronacharyanchi tulna पूर्ण chukichi आहे. Eklavya ha jya jamaticha hota ती jamat kuru rajyala trasdsyak hoti. Ti jamat lutalut करत hoti. Jar Eklavya ला shikvile असते तर rajyala अजून त्रास vadhla असता म्हणून khalya mithala jagun dronacharyanchi nahi म्हणाले. Dusri gost guru ne nahi म्हणाले astanna सुद्धा त्याची pratima banvun dynan sampadan ha guru चा apman आहे. Tisri आणि सर्वात mahatvachi gost, jya dronacharyana माहीत hote ki drupad rajachya mulakadun त्यांचा mrutyu आहे तरी tya mulala tyani shishya म्हणून swikarle आणि सर्व dnyan दिले.
    अश्या thor आचार्य चा आपण gairsamjatun apman karu नये ही vinanti..

    ReplyDelete