Wednesday, October 9, 2019

निवडणूकीतला ‘काळा घोडा’


raj thackeray के लिए इमेज परिणाम

मुंबईत पुर्वी विधानसभा जहांगीर आर्ट गॅलरी किंवा म्युझियम म्हणतात तिथे होती. आता ती वास्तु राज्यातील पोलिस मुख्यालय म्हणून रुपांतरीत झाली आहे. पण त्या काळात म्हणजे १९८० पुर्वी विधानसभेवर मोर्चा वगैरे आला, तर तो जहांगीर आर्ट गॅलरीपाशी रोखला जायचा. त्या भव्य चौकाला काळा घोडा असे म्हटले जायचे. तिथे एक ब्रिटीशकालीन कुणा सायबाचा अश्वारुढ पुतळा होता आणि तो १९६० च्या दशकात कधीतरी हलवला गेला. पण त्या स्मारकातील सायबापेक्षाही त्याचा घोडा अजरामर होऊन गेलाय. कारण आजही इतक्या वर्षांनंतर त्या परिसराला ‘काळा घोडा’ असेच संबोधले जाते. त्याच नावाने एक सांस्कृतिक महोत्सवही होत असतो. हा काळा घोडा वगळला, तर सहसा घोड्याच्या काळेपणाला काही महत्व नसते. इंग्रजी भाषेत मात्र काळ्या घोड्याचे महत्व मोठे आहे. त्यात कुठल्याही शर्यती स्पर्धेत अशक्य वाटणारा स्पर्धक जिंकण्याची शक्यता असेल, तर त्याला काळा घोडा संबोधले जाते. म्हणजे इंग्रजीत डार्क हॉर्स! सध्या जी विधानसभा निवडणूकीची शर्यत चालली आहे, त्यात कोण मुळ स्पर्धक आहेत आणि कोणाचा विजय होईल; याविषयी प्रत्येकाच्या मनात अनेक शंका आहेत. खेरीज कोण त्या स्पर्धेत आहे किंवा नाही, यावरही मतभेद आहेत. कारण नुसताच कोणी उमेदवारी अर्ज भरला वा अनेक उमेदवार उभे केले; म्हणून स्पर्धेत आला असे मानले जात नाही. त्याच्यापाशी निदान काही जागा निवडून आणण्याची, किंवा काही जिंकू शकणार्‍यांना पराभूत करण्या़ची क्षमता असली पाहिजे. तरच त्याला स्पर्धक मानले जात असते. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत असा काळा घोडा म्हणजे अनपेक्षित चांगले यश मिळवू शकणारा स्पर्धक कोण असेल? कारण कॉग्रेस व राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष आघाडी करून मैदानात उतरलेले असले, तरी त्यांना कुठल्याही विजयाची खात्री उरलेली नाही. म्हणूनच त्यांची जागा कोण घेणार, याला यंदाच्या निवडणूकीत महत्व आहे. मनसे असा ‘काळा घोडा’ असू शकतो का?

मुळात कालपरवापर्यंत म्हणजे निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर होण्यापर्यंत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे या आखाड्यात उतरायलाही राजी नव्हते. त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर इव्हीएम म्हणजे मतदान यंत्रातील गडबड, हा आपला राजकीय अजेंडा बनवलेला होता. पण त्याला फ़ारशी दाद कुठूनही मिळालेली नव्हती. लोकसभेच्या वेळी आखाड्यात उतरण्याची तयारी नव्हती. दोन्ही कॉग्रेसने त्यांना हुलकावणी दिली आणि उमेदवारही उभे केले नसताना राजनी एकाकी किल्ला लढवला होता. वंचित, कॉग्रेस व राष्ट्रवादी यांचे उमेदवार मैदानात असतानाही त्यांच्या प्रचारसभांचा जितका गाजावाजा झाला नाही, त्याहून अधिक राजच्या ‘लावरे तो व्हिडीओ’ सभांचा गदारोळ झाला. अर्थात त्यांनी कुठल्याही पक्षाला मते द्यायला आवाहन केलेले नव्हते. पण त्यांचा कल कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्या बाजूने असल्याचे लपून राहिलेले नव्हते. मात्र त्यांच्या सभांचा फ़ारसा प्रभाव निकालात कुठे पडलेला दिसला नाही, की भाजपा शिवसेनेला कुठ फ़टकाही बसला नाही. पण त्यांना मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद कौतुकस्पद होता. त्याने भले कुठल्या बाजूला मते दिली नसतील, पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सामान्य व युतीविरोधातले लोक आकर्षित झाले, हे नाकारता येणार नाही. किंबहूना जे मुळातच युती विरोधक मतदार आहेत, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात राज ठाकरे कमालीचे यशस्वी झाले. त्यातले अनेक मतदार मुळचे कॉग्रेसधार्जिणे वा कॉग्रेसजन असू शकतात. त्यांना युती विरोधात शड्डू ठोकून उभा रहाणारा नेता भावलेला असू शकतो. त्यामुळे तेव्हा राज यांच्या सभा आयोजित करण्यात ज्यांनी मदत केली, अशा कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षानेच राज यांना वाट खुली करून दिलेली आहे. नेमक्या त्या मतदारासाठी आज सर्वात आकर्षक व आक्रमक नेता राज ठाकरे आहे. पण त्याने कुठलीच लढायची तयारी केलेली नव्हती. अखेरच्या क्षणी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या आग्रहास्तव त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित खुद्द राजना यशाची कुठली खात्री नसावी. पण अनेकदा अनपेक्षित यश चालून येत असते.

१९८५ सालात इंदिराहत्या आणि नंतरच्या राजीव लाटेत शिवसेना वाहून गेलेली होती. गिरणी संपामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही दत्ता सामंत यांनी यशस्वी घुसखोरी केलेली होती. लोकसभा व विधानसभा अशा दोन लागोपाठच्या निवडणूकात शिवसेनेला मोठा फ़टका बसला होता. त्यानंतर लगेच आलेल्या महापालिका निवडणूकीत सेनेला कसलीही अपेक्षा नव्हती आणि बाळासाहेबांनी एक जुगार खेळल्यासारखी मुसंडी मारलेली होती. त्यांनी तेव्हा लोकसभा विधानसभेच्या पाठोपाठ आलेल्या महापालिका निवडणूकीत एक अतिशय चक्रावून टाकणारा निर्णय घेतला. त्यांनी कुठल्याही इच्छूकाचे अर्ज न मागवता, मुंबईच्या प्रत्येक वॉर्डातल्या शिवसेना शाखेच्या प्रमुखाला थेट उमेदवार करून टाकले. अनेक शाखाप्रमुखही लढायच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी उपशाखाप्रमुखालाही घोड्यावर बसवले होते. कारण अशा शाखाप्रमुखांनाही शिवसेना तेव्हा चमत्कार घडवू शकेल असे वाटलेले नव्हते. पण मतदाराने चमत्कार घडवला आणि त्या मतदानात शिवसेना स्वबळावर महापालिकेची सत्ता घेऊन गेली होती. आज ज्यांच्याकडे शिवसेनेचे वरीष्ठ नेता म्हणून बघितले जाते, असे अनेकजण त्यातूनच राजकारणातले यशस्वी उमेदवार बनून गेलेले आहेत. नारायण राणे, दिवाकर रावते असे नेते त्याच वेळी प्रथम नगरसेवक होऊन आले. दोन महिन्यापुर्वी ज्या गिरणगावातून दत्ता सामंतांचे तीन आमदार निवडून आलेले होते, तोच सगळा गिरणगाव आणि दक्षिण मध्य मुंबई वा उपनगरात शिवसेना मोठ्या संख्येने निवडून आलेली होती. त्यामागची जी मिमांसा होती, तशाच काहीशा अवस्थेत आजची मनसे उभी आहे. राज यांच्यापाशी नेते नाहीत, की संघटना नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांचे मोहवून टाकणारे वक्तृत्व नक्कीच आहे आणि त्यांच्यासारख्या नेत्याच्या प्रतिक्षेत दोन्ही कॉग्रेसचे अनेक तरूण कार्यकर्ते सज्ज आहेत. ज्यांना उमेदवारी हवी किंवा कुठल्यातरी पदाची अपेक्षा आहे, अशांखेरीज प्रत्येक पक्षामध्ये मोठ्या संख्येने वेगळा कार्यकर्ता असतो. त्याला ठराविक विचार वा विरोधासाठी नेता हवा असतो. त्यांच्यासाठी राज ठाकरे हा पर्याय असू शकतो.

राष्ट्रवादी वा कॉग्रेस या पक्षांमध्ये भरपूर असा कार्यकर्ता आहे, की ज्याचा आपल्या गर्भगळित झालेल्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. पण असा कार्यकर्ता भाजपा वा शिवसेनेशी झुंजायला उत्सुक आहे. त्याला आक्रमक नेतृत्व हवे आहे. मुसंडी मारण्याची क्षमता असलेला नेता, त्याला हवाच आहे. त्याच्यासाठी राज ठाकरे मेड टू ऑर्डर नेता आहेत. पण मतदानाला दोन आठवडे उरलेले असताना हे शिवधनुष्य पेलले जाऊ शकेल काय? कारण यात उडी घ्यायची तर निदान २८८ पैकी शे-दिडशे उमेदवार तरी मैदानात हवेत. त्याची चिंता खरेच आहे काय? कारण नुसती लढायची घोषणा केल्यावर मनसेतर्फ़े निदान पन्नास उमेदवारांची घोषणा लगेच झालेली आहे. मुळात २०१९ च्या जानेवारीपर्यंत शिवसेना व भाजपा यांच्या युतीची शक्यता नव्हती. दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षात आगामी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवायची तयारी आधीपासून केलेली होती. म्हणूनच आता ऐन भरात प्रत्येक मतदारसंघात शिवसेना वा भाजपा यांच्यात युती झालेली असतानाही कुरबुरी आहेत आणि बंडाची भाषा बोलली जात आहे. या दोन्ही पक्षातल्या अनेकांनी विधानसभेसाठी जय्यत तयारी केलेली होती. ही तयारी म्हणजे काही लाखांची गुंतवणूक असते. कार्यकर्ते समर्थकांची फ़ौज उभी करणे. त्या तैनाती फ़ौजेला खाऊपिऊ घालून त्यांची मशागत केलेली असते. असा खर्च करून बसलेल्या किमान दोनतीनशे इच्छुकांना युती झाली म्हणून पक्षशिस्त मान्य होत नसते. त्यांनी तयारी केली म्हणजे वीसतीस हजार मतांची जमवाजमव केलेली असते. त्यात प्रस्थापित पक्षाचे उमेदवार म्हणून आणखी पंधरावीस हजाराची भर पडल्यास, आमदार होणे शक्य असते. अशा सेना व भाजपातील नाराजांना निवडणूक लढवायचीच आहे. त्यातून शंभर दिडशे इच्छुक मनसेच्या गळाला लागू शकतात. त्यांना नुसते अधिकृत उमेदवार म्हणून पत्र देणे आणि त्यांच्या भागात जाऊन भव्यदिव्य सभा घेणे, इतकेही पुरेसे आहे. त्यातून किती विजयी होतील?

अशा शे-दिडशे उमेदवारांची बेरीज करून मनसे सहज मोठी लढाई करू शकते. अशा प्रस्थापित पक्षातील इच्छुकांना अपक्षही लढता येत असते. पण त्याखेरीज कुठल्या तरी नावाजलेल्या पक्षाचे लेबल लागले, तर अधिकची मते मिळत असतात. म्हणून तर पराभूत होणार्‍या पक्षातील प्रस्थापित उमेदवारही दुसर्‍या पक्षात येतात. त्यांना ही वरची मते हवी असतात. अन्यथा त्यांना हक्काची मते त्या त्या मतदारसंघात असतातच. गणेश नाईक नव्या मुंबईतून एकट्याने महापालिका ताब्यात घेतात. पण आमदार होण्यासाठी त्याना मोठ्या पक्षाचा बिल्ला आपल्या छातीवर मिरवावा लागतो. त्यापेक्षा विविध मतदारसंघातील इच्छुकांची स्थिती वेगळी नसते. आज तिकीट वाटपानंतर शिवसेना व भाजपा यांच्यात अशा दोनशेहून अधिक इच्छुकांची हालत गंभीर आहे आणि त्याना कॉग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्ष सामावून घेऊ शकत नाहीत. अशांसाठी मनसे हा जवळचा व सोपा पर्याय आहे. कारण विरोधातल्या कुठल्याही पक्षापेक्षा मनसेपाशी एक मोठा हुकूमाचा पत्ता म्हणजे राज ठाकरे नावाची धडाडणारी तोफ़ आहे. तेवढ्या भांडवलावर राज या मैदानात उतरलेले आहेत. विविध नवागतांना त्यांनी आपली उमेदवारी देण्याचा सपाटा लावला आहे. ही संख्या जितकी मोठी असेल, तितके त्यांचे आगामी निवडणूकीतले यश मोठे होऊ शकेल. त्यांच्या अशा लढण्याचा शिवसेना व भाजपाला कितपत तोटा होईल, सांगता येत नाही. पण मनसे मैदानात उतरल्याचा मोठा फ़टका कॉग्रेस आघाडीला बसू शकतो. गेल्या लोकसभेच्या वेळी त्याच राज ठाकरेंना ज्यांनी ‘लावरे तो व्हिडीओ’ कार्यक्रमासाठी अगत्याने बोलावले, तिथे आज राज यांचा चहाता अनुयायी तयार झाला आहे. तिथे आता मनसेचा कोणी उमेदवार उभा ठाकला, तर असा चहाता मनसेला मते देईल. किंबहूना लोकसभेत वा आजही, अन्य पक्षांपाशी आक्रमक प्रचारक नसेल तर राज हाच पर्याय म्हणून अशा मतदाराला आकर्षित करू शकणार आहे.

शिवसेना भाजपा युतीला लोकसभेत ५२ टक्के मते मिळाली असली तरी ४८ टक्के मते युतीच्या विरोधात पडलेली आहेत आणि त्यापैकी बहुतांश मतदार हा कट्टर मोदी विरोधक आहे. युतीचा द्वेष करणारा आहे. त्याला कुठल्याही आश्वासन वा अजेंडापेक्षाही युतीचे नाक कापलेले बघण्यातच रस आहे. अशा प्रत्येक मतदारासाठी राज ठाकरे हा पर्याय् होऊन जातो. तो परंपरने कॉग्रेसला वा राष्ट्रवादीला मते देणारा असू शकतो. पण आज त्या दोन्ही पक्षांकडे भाजपाशी झुंजणारा नेता नसल्याची खंत बाळगणार्‍या त्या मतदारासाठी राज ठाकरे व मनसे हा उत्तम पर्याय असणार यात शंका नाही. २००९ सालात मनसेने पहिल्यांदाच निवडणूकांमध्ये उडी घेतली, तेव्हा काय होईल अशी अपेक्षा लोकांनी बाळगली होती? पण  एकट्या मुंबईत राज ठाकरे यांनी सहा आमदार स्वबळावर निवडून आणलेले होते. लोकसभेत युतीचे सर्व उमेदवार पराभूत होतील असा झटका दिला होता. तेव्हा त्यांच्या मागे गेलेला मतदार ज्या मनस्थितीचा होता, तसाच मतदार आजही आहे. तो यापुर्वी विविध पक्षात विखुरलेला असेल. पण आहे आणि त्यात विविध गटांची भर पडू शकते. उदाहरणार्थ युती झाली म्हणून नाराज असलेला शिवसैनिक आहे. त्याला भाजपाशी जाणेही मानवलेले नाही. अशा भागातल्या शिवसैनिकासाठी नजिकचा पर्याय मनसे असू शकते. विविध पक्षातले लोक भाजपात आणल्यानेही वैतागलेले भाजपा़चे समर्थक मनसेकडे काही प्रमाणात वळू शकतात. म्हणूनच उद्या सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यावर जे उमेदवार खरोखर मैदानात शिल्लक असतील, त्यापैकी कितीजण मनसेचे उमेदवार आहेत, ते तपासून बघणे योग्य ठरेल. असे किती अन्य पक्षात पुर्वतयारी करून अखेरच्या क्षणी मनसेत दाखल झाले, त्यांचाही हिशोब मांडावा लागणार आहे. त्यांचे मतदारसंघ अभ्यासावे लागतील. कारण खरा चमत्कार तिथेच घडणार आहे. मुद्दा युतीला बहूमत मिळेल असा नसून, विरोधात कोणता पक्ष आकार घेतो याला यावेळच्या निवडणुक निकालात महत्व आहे.

काहीही झाले तरी आता पुन्हा चौरंगी निवडणूका होऊ घातल्या आहेत. गेल्या खेपेसही चौरंगी लढतीच झालेल्या होत्या. यावेळी फ़रक इतकाच आहे, की गेल्या खेपेच्या चार प्रमुख पक्षांनी आपसात गट्टी करून आघाडी व युती केलेली आहे. त्यामुळे सगळी लढाई दोघातच होईल अशी त्यांची अपेक्षा आहे, पण तसे होणे नाही. कारण विरोधात आता झुंज देण्याइतके बळही दोन्ही कॉग्रेसपाशी शिल्लक उरलेले नाही. किंबहूना लढण्यापेक्षा पुर्वपुण्याईवर तगून रहाण्याची कसरत दोन्ही कॉग्रेस पक्ष करीत आहेत. त्यातूनच तिसर्‍या वा चौथ्या नव्या विरोधी पक्षाला आपले स्थान निर्माण करण्याची ऐतिहासिक संधी प्राप्त झालेली आहे. ती जशी वंचित बहूमज आघाडीला मिळालेली आहे, तशीच ती मनसेलाही उपलब्ध आहे. त्यात फ़रक इतकाच आहे, की मनसेला भाजपा वा शिवसेनेच्या जुन्या मतदाराला फ़ोडणे शक्य आहे, तसेच कॉग्रेस राष्ट्रवादीच्याही आक्रमक तरूणांना राज यांची भुरळ पडलेली आहे. वंचितचे मात्र तसे नाही. वंचित आघाडीला जुन्या नामशेष पुरोगामी पक्षाचा उरलासुरला मतदार ओढता येईलच. पण अन्य पक्षात पांगलेला दलित पिछडा आपल्याकडे खेचताना कॉग्रेस राष्ट्रवादीचाही काही मतदार मिळवता येऊ शकतो. त्यासाठी आंबेडकरांनी चार महिने तयारीही केलेली आहे. मनसेची तितकी तयारी नाही. त्यामुळे त्यांच्याकडे किती इतर पक्षीय नाराज एकवटतात, त्यावर लक्ष ठेवायला हवे. ते किती भक्कम व तगडे उमेदवार असतील, तितके मनसेचे यश मोठे असेल. राजकारण व प्रामुख्याने निवडणूकीचा जुगार हा आळवावरचे पाणी असते. ते एका जागी किती ठामपणे टिकून राहिल, याची हमी कोणी देऊ शकत नाही. शिवाय आपले बलस्थान कुठला पक्ष व नेता किती चतुराईने वापरतो, त्याला निर्णायक महत्व असते. राज यांच्यासाठी युती होणे व त्यात भरपूर नाराजांची संख्या असणे, हा चांगला योग आहे. त्यातून ते काय साध्य करतात, हे निकालाच्या दिवशीच कळेल. पण याक्षणी तो विधानसभा निवडणूकीतला ‘काळा घोडा’ नक्कीच आहे.

20 comments:

  1. kharay bhau.virodhi pakhsha MNS kiva vanchit bahujan asel.

    ReplyDelete
  2. मनसे हा फुसका फटाका आहे.
    बंडखोर, दोन्ही काँग्रेस आणि मनसे यांचा कुठलाही लक्षणिय प्रभाव निकालांवर पडेल असे वाटत नाही.

    ReplyDelete
  3. छान विश्लेषण केलंत आपण , तुम्हाला फार दुरचं राजकीय गणितं कळतात पण तुम्ही जे सांगतात ते कळुन घेणारा हवा

    ReplyDelete
  4. निवडणुकीत न उतरल्यास आपण इडी चौकशीला घाबरून गप्प बसलो असा अर्थ लावला जाईल म्हणूनही राज ठाकरे यानी हे पाऊल उचलले असेल आणि त्याच कारणाने ते अधिकाधिक आक्रमक होताना दिसतील हेही लक्षात घेतले पाहिजे .सभाना गर्दी करणारे केवळ टाईमपास म्हणूनही येत असतील .ट्रॉट्स्कीच्या मते सामान्य माणूस काही तशीच अपवादात्मक परिस्थिती असल्याखेरीज कधीच राजकीयदृष्ट्या गंभीर नसतो .People are politically vulgar. शिवाय मनसेचा वाघ सेनेत दाखल झाला त्याचे कारण पाहता मनसेत राज यांची हुकुमशाही चालते असे कोणालाही वाटू शकेल .तसे असेल तर मोदिशहा याना दोष देण्याचा राज याना काय अधिकार असा विचार काही कुंपणावर बसलेले मतदार करतील .

    ReplyDelete
  5. भाउचे सगळे लेख आवडतात पण हा लेख काही पटला नाही
    भाऊ राज ठाकरे ना जरा जास्तच महत्त्व देत आहेत

    ReplyDelete
  6. भाऊ,मला असे वाटते की, १९८५ साली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशाचे खरे श्रेय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या "मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही" या विधानाला द्यावे लागेल. आपले काय मत आहे?

    ReplyDelete
  7. Nahi farak padnar kahi....lok tayar nahit navin taste ghyayla

    ReplyDelete
  8. निव्वळ चमकदार भाषणे ऐकून मतदार प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना बदलत नाही, असं तुम्हीच वारंवार सांगता. जोवर पुरेसा सक्षम पर्याय लोकांसमोर येत नाही, तोवर जेमतेम १०० जागा लढवणारा व शून्य विश्वासार्हता असलेला पक्ष कितपत प्रभाव पाडेल, यात शंका आहे. उलटपक्षी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते खाऊन भाजपा-सेनेला प्रचंड मतदान होऊ शकते.

    ReplyDelete
  9. बरच आहे thakaryansathi पण निवडून आल्यावर काहीतरी तर काम करावेच लागेल त्याची तयारी असुंदेत

    ReplyDelete
  10. लेख एकदम सडेतोड.! मस्तच..!
    पण भाऊ, ह्या काळ्या घोड्याच्या चालीचा आणि हालचालींचा वजीराला अंदाज नसेल का? हा लेख वाचल्यानंतर मला पडलेला प्रश्न.! कदाचित तो चुकीचा पण असू शकतो, पण काळ्या घोड्या समोरचे वजीर, उंट हत्ती ह्यांना पण हे समजत असेलच ना.! 🙏

    ReplyDelete
  11. भाऊ तुमचं राज ठाकरेंबद्दलचं मत वाचलं पण राज मला तयारी न करता परीक्षेला बसणाऱ्या मेघावी मुलासारखा वाटतो. सगळं आहे (वक्तृत्व, तरुण मनांचा वेध घेण्याची क्षमता) पण अभ्यासाचा(मेहनतीचा) कंटाळा आणि हा कंटाळाच तुम्हाला अपेक्षित यश मिळु देत नाही.

    ReplyDelete
  12. आ. भाऊ, माजी आमदार बावनकुळे यांना तिकीट का नाकारले या बद्दल काही माहिती असेल तर सांगावे.

    ReplyDelete
  13. आंबेडकरांनी कोरेगाव प्रकरणात दलित नसलेले मतदार विनाकारण दुखावले आहेत. काहीच कारण नव्हते विचित्र वागण्याचे. दलितांपैकी एका गटाच्या मतांच्या गठ्ठ्यावर निवड़ून येणे अशक्य आहे.

    ReplyDelete
  14. राज ठाकरे यांच्याबद्दल तुमचे फार चांगले मत आहे. असे दिसते. राज ठाकरे यांनी सुरुवातीला जनतेचे प्रश्न हाती घेतले होते. त्यामूळे त्यांना काही प्रमाणात यश लाभले होते. त्याच अवस्थेत त्यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेत बहुमत मिळण्याइतके घवघवीत यश मिळाले होते. परंतू दिशाहीन धोरणांमूळे त्यातील बरेचसे नगरसेवक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षात गेले. आताही त्यांची वृत्ती संथ तळ्यात अथवा ट्रेनवर दगड फेकण्याची आहे. अशा वृत्तीमूळे त्यांच्या सभेला बाजारबुणगे गर्दी करतात. गर्दीमूळे राज ठाकरे यांना अधीक गमजा मारायची संधीशिवाय काहीही मिळत नाही.
    वंचीत आघाडीकडे ठराविक मते आहेत. ते पडले तरी त्यांना काही स्थान आहे.

    ReplyDelete
  15. राज ठाकरेंनी कालच्या भाषणा मध्ये विरोधी पक्ष नेते पद मागितले आहे यावरून त्यांना नक्की काय करायचे आहे हे समजलेले दिसते आहे यावर एखादा व्हीडिओ किंवा ब्लॉग नक्की करा

    ReplyDelete
  16. तुम्ही लिहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हेच होतंय. Great

    ReplyDelete
  17. पण हा घोडा फक्त खिंकाळतो पण शर्यतीत धावायला सांगितल तर झोपून राहतो

    ReplyDelete
  18. हा घोडा बेलगाम आहे त्याला यश टिकवण्यासाठी स्थीर रहाणे शक्य होईल का त्यावर पुढचे यश अवलंबून असेल.. नाहीतर उतून मातून दुगाण्या झाडत उधळण्याचीच शक्यता जास्त.. नाशिकच्या 'रेसकोर्स' ची पुनरावृत्ती!
    😁

    ReplyDelete
  19. अतिशय उत्तम लेख भाऊ, खूप चांगला नेता, खूप कष्ट घेतले तर चांगलं भविष्य असणारा पक्ष

    ReplyDelete
  20. As usual the analysis is beautiful and apparently appear to be logical but the most irrefutably correct fact is that he has completely lost his credibility. How do you justify that the same man who was a great fan of Mr Modi has now become his adversary without giving any cogent reasons

    ReplyDelete