Friday, October 18, 2019

पराभवाची मस्ती

महायुतीला जागा किती?  (२)
Image result for rahul in maharashtra
लागोपाठचे पराभव आणि गमावलेली सत्ता यामुळे कॉग्रेससहीत विरोधी पक्ष कमालीचे विचलित आहेत. पण त्यांना वास्तविक विचार करण्याची बुद्धी सुचलेली नाही. अन्यथा त्यांनाही समजू शकले असते, की २०१४ सालात युतीला अधिक जागा मिळाल्या, तरी मतांची टक्केवारी मोठी नव्हती. जागा कमी झाल्या, तरी दोन्ही कॉग्रेस पक्षांच्या एकत्रित टक्केवारीत फ़ार मोठी घट झालेली नव्हती. २००९ सालात चांगल्या जागा फ़क्त ३९ टक्के मतांवर मिळाल्या होत्या आणि २०१४ मध्ये फ़क्त ४ टक्के मतांची घट होताच, मोठा फ़टका बसलेला होता. त्यातून सावरणे अवघड नव्हते. कारण कारंण शिवसेना भाजपा यांच्या महायुती पक्षांची टक्केवारी ४० टक्क्याहून अधिक नव्हती. पाच वर्षात पुन्हा ३८-४० टक्केपर्यंत मजल मारण्याचे उद्दीष्ट दोन्ही कॉग्रेसनी राखले असते आणि विरोधी पक्षाची चांगली भूमिका बजावली असती, तर ताज्या लोकसभा निवडणूकीत त्या पक्षांना पुन्हा दारूण पराभवाचे तोंड बघायची पाळी आली नसती. इव्हीएमच्या नावाने शिमगा करावा लागला नसता. पण मरगळलेल्या पक्षांना पंधरा वर्षाच्या सत्तेची नशा संपतच नव्हती, की अजून संपलेली नाही. म्हणूनच सत्ताविरोधी मते संपादन करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केल्याशिवाय दोन्ही पक्ष लोकसभेला सामोरे गेले आणि आणखी चार टक्के मतांची घट करून पराभूत झाले. पण त्यातून तरी धडा घेतला काय? घेतला असता, तर राज ठाकरे यांच्या बाजूला बसून त्यांनी मतपत्रिकांवरील मतदानाची मागणी करण्यात वेळ दवडला नसता. किंवा पक्ष सोडून जाणार्‍यांच्या नावाने शिमगाही केला नसता. त्यापेक्षा मतमोजणीतून कुठल्या मतदारसंघात कमी पडलो वा कुठे डागडुजी शक्य आहे; त्याचा अभ्यास करून विधानसभेची तयारी पुढल्या दोन महिन्यात हाती घेतली असती. इव्हीएम यंत्राचा दोष शोधला, पण लाभ मात्र यापैकी एकालाही बघता आलेला नाही. याला कर्मदरिद्रीपण नाही तर काय म्हणायचे?

नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रत्येक केंद्रातील मतांची पक्षवार मोजणी व आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्या बुथवर आपापल्या पक्षाला किंवा अन्य पक्षांसह कुणाही उमेदवाराला मिळालेल्या मतांचे आकडे उपलब्ध आहेत. त्यातून प्रत्येक पक्षाला आपली रणनिती बनवणे सोपे आहे. कुठल्या बुथवर आपण कमी पडलो वा मतदार अधिक विरोधात गेला, त्याचा तपशील गोळा करून पुढली लढत देण्याला रणनिती म्हणता येते. पक्षश्रेष्ठींना सरसकट निकाल हवे असतात. पण उमेदवार म्हणून लढणार्‍यांना प्रत्येक मतदानकेंद्रात बुरूज लढवणार्‍या बुथप्रमुख व पन्नाप्रमुख अशा लढवय्यांची फ़ौज आवश्यक असते. भाजपाने सोशल मीडियावर लढाई लढवली हे खरे असले, तरी त्यापेक्षा मोठी फ़ौज बुथप्रमुख पन्नाप्रमुखांची उभी केलेली होती आणि त्यांनीच खरी लढाई जिंकून दिलेली आहे. प्रकरण तिथेच संपत नाही. याही निकालानंतर भाजपाच्या रणनितीकारांचा एक वेगळा गट निकालांचा अभ्यास करून कुठल्या केंद्रात वा बुथवर आपल्यापेक्षा अन्य पक्ष उमेदवाराला अधिक मते मिळाली, त्याचा तपशील गोळा करण्याता गर्क होता. विधानसभेला पुन्हा त्याच बुथवर मतदान व्हायचे आहे आणि जिथे लोकसभेत तोकडे पडलो, तिथला बुरूज आणखी भक्कम करून त्रुटी भरून काढण्याच्या कामाला भाजपाची अशी फ़ौज लागलेली होती. तर शरद पवार किंवा कॉग्रेसचे नेते प्रभारी, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात रमलेले होते. दोन्ही कॉग्रेसला जिंकून येणार्‍या उमेदवारांमध्ये रस आहे, तर भाजपाला उमेदवार जिंकून देऊ शकणार्‍या बुथवरल्या लढवय्यांची चिंता असते. तिथे मोठा फ़रक पडलेला आहे आणि तो फ़रक ज्यांना समजतो वा समजलेला आहे, त्यांना त्या लढवय्यांच्या आश्रयाला जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. कारण आकडे बोलत असतात आणि बुथप्रमाणे मिळालेले लोकसभेतील मतदानाचे आकडे ओरडून हे सत्य सांगता आहेत.   

मागल्या पाच वर्षात पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहांनी पक्षाची संघटना तळागाळापर्यंत नेली. त्याचा अर्थ ती मतदानकेंद्र म्हणजे बूथप्रमुख इतकी खोलवर विणून काढली आहे. एक बुथच नव्हेतर एका बुथच्या मतदारयादीत एका पानावरच्याच मतदारांशी संपर्क साधू शकतील, अशा कार्यकर्त्यांची देशव्यापी फ़ौज उभी केलेली आहे. त्याचेच परिणाम निकालात व मतमोजणीत दिसतात. ते जसे निकालात दिसतात, तसेच इतर पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या स्थानिक सहकार्‍यांनाही दिसत असतात. म्हणूनच शिवेंद्रराजे भोसले पक्ष सोडतात, तेव्हा त्यांना आपल्या मतदारसंघातील बुथवरील मतदान सत्य सांगत असते. संदीप नाईक पक्षाला कशाला रामराम ठोकतात, त्याचे उत्तर ऐरोली या मतदारसंघाचे आकडेच देतात. पवारनिष्ठेपेक्षा मतदार वेगळे मत दाखवून देतो, तेव्हा उमेदवार उमेद गमावून बसतो. २०१४ ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो, त्यातील आकड्यांचा असा अभ्यास इव्हीएमच्या नावाने शिमगा करणार्‍यांनी केला आहे काय? असता तर आपण कुठे कमी पडलो त्याची जणिव झाली असती. मग फ़ुटणार्‍या आमदारांना रोखण्याची वेळ आली नसती आणि मधल्या पाच वर्षात याही पक्षांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात तरी मतदानकेंद्रागणिक लढवय्ये असलेली फ़ौज उभी केली असती आणि त्यातून भाजपशी खरी टक्कर दिली असती. अमित शहा किंवा मोदींची लोकप्रियता भाजपाला यश मिळवून देते, हे अर्धसत्य अहे. त्यांनी उभारलेली अशी कार्यकर्त्या लढवय्यांची फ़ौज विजयाचा मार्ग प्रशस्त करीत असते. दिसायला नरेंद्र मोदी असतात आणि खराखुरा निनावी लढवय्या कार्यकर्ता कुठे पडद्यामागे असतो. ज्याची साधी कल्पनाही इतर पक्षांच्या नेत्यांना नाही, ते पक्षश्रेष्ठी म्हणून नक्कीच मिरवू शकतात. पण पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाण्यात मात्र अपेशी होतात. त्यात जसा राहुल गांधींचा समावेश होतो, तसाच शरद पवार यांचाही समावेश होतो.

लोकसभेचे निकाल बारकाईने अभ्यासले तर त्यात विधानसभा क्षेत्रानुसार झालेल्या मतदानाचे आकडेही उपलब्ध आहेत. इव्हीएम विरोधी आंदोलन पेटवायला निघालेल्या एकातरी पक्षाने त्याचा अभ्यास केला आहे काय? त्यापैकी एका तरी नेत्याला लोकसभेत मतदाराने दिलेला कौल समजून घेता आला आहे काय? ते आकडे साफ़ सांगतात, की मतदान कसेही घेतले तरी युतीपक्षांना म्हणजे शिवसेना भाजपा एकत्रित लढल्यास मतदार २८८ पैकी १५० जागा द्यायला आधीच सज्ज होऊन बसला आहे. कारण लोकसभा निकाल विधानसभा क्षेत्रानुसार अभ्यासला तर त्यात किमान १५० जागी युती उमेदवाराला ५० टक्केहून अधिक मते मिळालेली आहेत. त्याचाच अर्थ तिथे युतीची मते किरकोळ घटली तरी तिथे युतीचा असेल, तो उमेदवार डोळे झाकून निवडून येणार आहे. अशीच काहीशी स्थिती २०१४ च्या विधानभेतही होती. युती मोडली नसती व आघाडीही कायम राहिली असती, तर युतीतल्या शिवसेना भाजपाने तेव्हाच दोन्ही कॉग्रेसचा सुपडा साफ़ केला असता. म्हणजे युतीतल्या दोन्ही पक्षांना एकत्रित लढून २१० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या आणि दोन्ही कॉग्रेस वेगवेगळ्या लढून युती एकत्र असती, तर २४० इतकी मोठी मजल युतीला मारता आली असती. पण तो इतिहास आहे आणि आता बदलता येणार नाही. आजची स्थिती अशी आहे, की युती व आघाडी एकत्र लढणार, हे निश्चीत आहे. त्यामुळेच त्यावर विचार करणे योग्य आहे. त्यामुळेच लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी अभ्यासून एक निष्कर्ष काढता येतो. विरोधकांनी कितीही बाजी पणास लावली तरी युतीला दोनशेहून अधिक जागा मिळण्याला आजतरी पर्याय राहिलेला नाही. अर्थात हा आकडा किमान आहे. म्हणजे विरोधी पक्ष जितका मुर्खपणा करीत जातील, तितकी हीच संख्या अधिक वाढत जाऊ शकते. कदाचित २४० च्याही पुढे जाऊ शकेल.

अनेकांना मतचाचण्या किंवा निवडणूकांच्या अभ्यासातून मांडल्या जाणार्‍या अंदाज व भाकितांविषयी कुतुहल असते. कशाच्या आधारे असे आकडे काढले जातात? त्याची विश्वासार्हता कितीशी असू शकते? तशी विश्वासार्हता कुठलीच देता येत नाही. कारण ही भाकिते असतात. रोहित शर्मा वा विराट कोहली त्यांच्या कुवतीनुसार खेळतील हे जसे गृहीत असते, तसेच वेगवेगळे राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत कसे वागतील वा कोणता मुर्खपणा करून प्रतिस्पर्ध्याला मदत करतील; यावर खरा निकाल ठरत असतो. प्रत्येक पक्ष व त्याचा नेता भाकितकर्त्याच्या अपेक्षेनुसार वागला, तर अदाज पुर्णपणे बरोबत येऊ शकतात. त्याच्या उलट भाकितकर्त्याच्या अपेक्षेविरुद्ध नेते वा पक्ष वागत गेले, तर अंदाजाचा पुरता बोजवारा उडून जातो. ताजे लोकसभेचे निकाल आणि त्यात युतीचे रणनितीकार काय करू शकतील, त्यावर माझे अंदाज अवलंबून आहेत. खेरीज विरोधी पक्ष शहाणपणानेच वागतील अशीही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना मला खोटेच पाडायचे असेल तर विचित्र वागून ते शिवसेना भाजपा युतीचे काम सोपेही करू शकतात. पण सामान्य वाचक वा नागरिकाला निकालातून पुढल्या निवडणूकांचे भाकित कसे करावे, किंवा निकाल कसा अभ्यासावा हे समजणेही खरे गरजेचे आहे. योगायोगाने आता निकालांचे बारीकसारीक आकडे इंटरनेटवर सहज उपलब्ध असतात आणि म्हणूनच बारकाईने कुणालाही आपापला अभ्यास करण्याची उत्तम संधी मिळालेली असते. युतीला निर्विवाद १५० हून अधिक जागा मी कुठून काढल्या? विरोधी पक्षांच्या मुर्खपणातून त्या २४० पर्यंत जाण्याचा अंदाज कसा निघू शकतो? त्याचे उत्तर पुढल्या प्रकरणात उलगडले आहे. किंबहूना तोच उद्याच्या विधानसभेचा निकाल माबावा, इतके हे आकडे स्वच्छ व स्पष्ट आहेत. आकडे खुप बोलतात. आपल्यामध्ये फ़क्त ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता व इच्छा असायला हवी.     (अपुर्ण)

10 comments:

  1. ह्या सगळ्या रणधुमाळीत, सुप्रिया सुळे कुठेच दिसत नाहीत. काय कारण असावे?

    ReplyDelete
  2. वा भाऊ वा ! खरे सांगू का भाऊ ? दरवेळेस तुमचा हा लेख अतिशय उत्तम झाला आहेअसे सांगायच आता संकोच वाटू लागला आहे कारण तुमचा प्रत्येक पुढचा लेख मागच्या लेखापेक्षा काकणभर सरसच आणि अत्यंत वस्तुस्थितीला धरून असतो असा सर्वांचा अनुभव आहे . खरोखरीच माझ्या उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या इतका अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार पाहिला नाही भाऊ

    ReplyDelete
  3. भाऊ महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांचा माझा अंदाज पुढील प्रमाणे
    महायुती भाजप आणि शिवसेना=243
    आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी=<40
    मनसे + वंचित +अपक्ष =5

    ReplyDelete
  4. सध्या सोशल मीडियावर एक खोटा संदेश फिरतोय ज्यात "महाराष्ट्रातले मराठा आरक्षण हायकोर्टाने रद्द केले" असल्याचे सांगितले जाते आहे. तशी काही बातमी इतर कुठल्याही संकेतस्थळावर उपलब्ध नाही. कदाचित विरोधी पक्षांचा हा युतीची मते फोडण्याचा एक प्रयत्न असू शकतो. ह्या विधानसभेला भाजप-सेनेची युती असल्याने त्यांची निदान काही मते फोडण्यासाठीच राज ठाकरेंनी उमेदवार दिले असण्याची शक्यता तुम्हाला किती वाटते?अर्थात जिथे आदित्य ठाकरे उभे आहेत तिथे राजनी उमेदवार दिलेला नाही.

    ReplyDelete
  5. भाऊ, तुमचे म्हणणे पटते. एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. एका बाजूला 125 वर्षाचा अनुभवी पक्ष व त्यांच्या बरोबर एका मुरबी राजकारण्याचा पक्ष, एक नव्या पक्षाच्या नेत्या मागे उभे राहून, मतदान यंत्रावर अविश्वास दाखवतात तेव्हाच ते आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रमाणपत्र कपाळावर लावून हिंडत आहोत हे कळले नाही त्यांना. ह्याच्या शिवाय आणखी वेगळी काय शोकांतिका असेल या पक्षांची. कदाचित हे सर्व महात्मा गांधींना आगोदरच कळाले असावे व म्हणूनच त्यांनी पक्ष विसर्जन करावा हे म्हंटले. असो देर सही दुरुस्त सही ।

    ReplyDelete
  6. मान गए भाऊसाहेब! आपकी पारखी नजर और विश्लेषन दोनोंको।

    ReplyDelete
  7. भाऊ bjp जर 130-135 पर्यंत अडकली तर ncp ,cong. कर्नाटक pattern वापरून bjp ला दूर ठेऊ शकतील का
    या बाबत विश्लेषण करावे

    ReplyDelete
  8. भाऊ मला तर अस वाटत की, युतीला कशा बशा ऐकशे पन्नास जागा मिळतील. मला पण वाटत तुम्ही म्हणताय तस व्हाव.पण शक्यता कमी वाटते.

    ReplyDelete
  9. भाऊ bjp जर 130-135 पर्यंत अडकली तर ncp ,cong. कर्नाटक pattern वापरून bjp ला दूर ठेऊ शकतील का
    या बाबत विश्लेषण करावे

    ReplyDelete