Friday, October 25, 2019

इतिहासाची पुनरावृत्ती?

Image result for bhajanlal devilal bansilal

हरयाणा विधानसभा पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्थेत गेली असून आता ३७ वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होते काय, हे बघण्यासारखे ठरेल. कारण राजकारण ही सत्तेची साठमारी असते आणि त्यात नैतिक अनैतिक असे काहीही नसते. हेच आजवर सत्ता टिकवण्यासाठी सगळ्या पक्षांनी केलेले असून, भाजपाही त्याला अपवाद नाही. हरयाणात आज जशी विधानसभा निवडली गेली आहे, जवळपास तशीच विधानसभा १९८२ सालात निवडली गेलेली होती. तो काळ असा होता, की हरयाणा म्हणजे तीन लाल असे म्हटले जाई. त्यात कॉग्रेसचे बन्सीलाल, विरोधातले देवीलाल आणि नंतर उदयास आलेले भजनलाल, हेच प्रमुख नेते होते. त्यातले भजनलाल हे १९७७ सालात जनता पक्षातर्फ़े विधानसभेत निवडून आलेले होते व पुढल्या काळात मुख्यमंत्री झाले. मुळात जनता पक्षाने देशाची सत्ता मिळवल्यानंतर नऊ विधानसभा बरखास्त करण्यात आल्या व तिथे नव्याने निवडणूका घेण्यात आल्या. त्यात जनता पक्षाला बहूमत मिळाल्याने देवीलाल मुख्यमंत्री झालेले होते, तर बन्सीलाल हा कॉग्रेसनेता आणिबाणीमुळे पुरता नामोहरम होऊन गेलेला होता. मात्र कॉग्रेस संपली या मस्तीत वागणार्‍या जनता पक्षात देशभर जी धुसफ़ुस व लठ्ठालठ्ठी सुरू झाली; त्यात हरयाणाही होता आणि वर्षभरातच देवीलाल यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची पाळी आली. त्यांच्या जागी भजनलाल हे मुख्यमंत्री झाले आणि पुढल्या काळात एकूण जनता पक्ष अंतर्गत विवादांनी रसातळाला गेला. त्यामुळे दिल्ली पुन्हा इंदिराजींच्या हाती आली आणि त्यांनी त्या सर्व विधानसभा नव्याने बरखास्त करण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्यातून बचावलेली एकमेव विधानसभा होती हरयाणाची. कारण भजनलाल यांनी जनता पक्ष आणि सरकार यांच्यासहीत इंदिरा कॉग्रेसमध्ये पक्षांतर केलेले होते. जिथे ते शक्य झाले नाही, तिथल्या विधानसभा बरखास्त करून इंदिराजींनी वेगळ्या मार्गाने आपल्या पक्षाला तिथे सत्तेत आणले. ही १९८० सालची गोष्ट. मुद्दा आहे १९८२ सालचा. कारण तेव्हा हरयाणा विधानसभेची मुदत संपली व नव्याने निवडणूका झाल्या होत्या.

कालपरवा आपल्याकडे भाजपात झालेल्या मेगाभरतीच खुप गवगवा झाला. जणु भाजपाने कॉग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार आपल्या पक्षात आणले म्हणजे लज्जास्पद वाटमारीच केली, अशा सुरात बहुतांश विश्लेषक व कॉग्रेस नेते बोलत होते. पण त्याचे सर्वात किळसवाणे स्वरूप म्हणजे हरयाणातील भजनलाल यांचे पक्षांतर होते. आज शरद पवारांपासून सगळे इडी इडी असले रडगाणे लावतात. पण तेव्हा भजनलाल तसे का वागले होते? त्यांना आपले मुख्यमंत्रीपद टिकवायचे होते आणि ते टिकायचे, तर मुळात बहूमतासह विधानसभा टिकायला हवी होती. पण इंदिरा गांधी सरसकट नऊ विधानसभा बरखास्त करायला निघाल्या होत्या. त्या घटनात्मक वरवंट्याखालून आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी भजनलाल सगळा पक्ष व मंत्रीमंडळच घेऊन कॉग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे इडी वा सीबीआयचा घाक घालून ब्लॅकमेल भाजपा करतो, असे म्हणायची गरज नाही. त्यापेक्षा नंगेपणाने कॉग्रेसने विविध पक्षांचे आमदार व नेते आपल्याकडे आणलेले आहेत. पुढे १९८२ साल उजाडले आणि विधानसभेची मुदत संपत आलेली होती. त्यातून जेव्हा निवडणूका झाल्या, त्यात भजनलाल व कॉग्रेसला आपले बहूमत टिकवता आले नाही, की सर्वात मोठा पक्ष म्हणूनही निवडून येणे शक्य झाले नाही. कॉग्रेसला ३६ जागा मिळाल्या. पण भाजपासह युती केलेल्या देवीलाल यांच्या लोकदल पक्षाला एकत्रित ३७ जागा मिळालेल्या होत्या. त्यांची निवडणूकपुर्व युती असल्याने मोठा गट म्हणून राज्यपालांनी देवीलाल यांना आमंत्रण दिले. पण नंतर तिथे भजनलाल येऊन राजभवनात धडकले. त्यांनीही बहूमताचा दावा केला आणि राज्यपालांनी देवीलाल यांना संधीही न देता भजनलाल यांचा शपथविधी उरकून घेतला होता. थोडक्यात सत्ता हाती आल्यावर अपक्ष वगैरे आमदारांना फ़ोडण्याचा अधिकारच राज्यपालांनी भजनलालना दिला. त्यावरून खुप काहूर माजलेले होते.

थोडक्यात आज हरयाणात भाजपाने बहूमत गमावल्याचे सांगताना कॉग्रेसचे जे युक्तीवाद करीत आहे, तेव युक्तीवाद तेव्हा देवीलाल व भाजपावाले करीत होते. उलट विधानसभेत दाखवता येणारे संख्याबळ आम्ही जमवले म्हणून भजनलाल यांना मुख्यमंत्री करणे कसे घटनात्मक आहे, त्याचा दावा कॉग्रेसवाले करीत होते. हे युक्तीवाद नेहमी फ़सवे असतात. कारण जेव्हा संख्याबळ आपल्या पाठीशी नसते किंवा नियम कायदे आयल्याला समर्थन देणारे नसतात, तेव्हा नैतिकतेचा मुखवटा चढवला जातो. पण जेव्हा नैतिकता ओलांडून पुढे जायचे असते, तेव्हा घटनात्मक वा कायद्याचे हवाले द्यायचे असतात. ते पाप प्रत्येक पक्ष करतो. कारण राजकारणात नैतिकतेला स्थान नसते तर व्यवहारी सत्तेला महत्व असते. सत्तेच पाठबळ मिळाले, मग कुठलीही बाब नैतिक ठरवता येत असते आणि पापालाही पुण्य घोषित करता येत असते. सवाल असतो आज आपण कुठल्या बाजुला उभे आहोत, किंवा आपल्याला काय सिद्ध करायचे आहे. योगायोग असा आहे, की आज हरयाणामध्ये नेमकी १९८२ सालची स्थिती आलेली आहे. फ़क्त दोन बाजू बदलल्या आहेत. तेव्हा कॉग्रेस जो युक्तीवाद करीत होती, तोच आज भाजपा करीत आहे आणि मनोहरलाल खट्टर यांनी भजनलाल यांची भूमिका घेतलेली आहे. सहाजिकच कॉग्रेसला नैतिकता मोलाची वाटते आहे आणि भाजपाला घटनात्मक तरतुदी महत्वाच्या वाटत आहेत. यालाच राजकारण म्हणतात. प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीनुसार वळवायची किंवा वाकवायची असते. भाजपा आज सर्वात मोठा पक्ष म्हणून हरयाणात निवडून आलेला असला, तरी त्याचे बहूमत हुकलेले आहे आणि मुख्यमंत्री होण्यासाठी अपक्षांपैकी सहाजण पाठीशी उभे राहिले तरी भाजपाचे सरकार कायम होणार आहे. तेव्हा देशाची सत्ता कॉग्रेस राबवित असल्याने राज्यपालही भजनलाल यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. आज हरयाणाचे राज्यपाल मनोहरलाल खट्टर यांचा शपथविधी उरकून घ्यायला पुढे आले तर नवल नाही.

राजकीय सत्तेची साठमारी अशीच असते. ती सत्ता मिळवताना कोणाला नैतिकता आठवत नाही आणि सत्ता गमावली, मग प्रत्येकाला नैतिक मूल्ये मोलाची वाटत असतात. असले शब्द व्यवहारी जगापासून मैलोगणती दुर बसलेल्या व जगाची चिंता वहाणार्‍या बुद्धीजिवी लोकांना खुप कौतुकाचे असतात. म्हणून राजकारणी त्यांना अशा शब्दांनी खेळवित असतात. तसे नसते तर चौथ्यांदा भाजपाने गुजरात विधानसभा जिंकताना जागा कमी झाल्या, म्हणून तमाम राजकीय विश्लेषकांनी राहुल गांधींचा तिथे नैतिक विजय झाल्यासा डंका कशाला पिटला असता? पण त्याच ढोलकरी बुद्धीमंतांना कर्नाटकात १२४ आमदारांवरून कॉग्रेस ८० आमदार इतकी घसरली, त्यातला नैतिक वा घटनात्मक पराभव दिसलाही नव्हता. विरोधी पक्षात पाच वर्षे बसलेला भाजपा तिथे सर्वात मोठा पक्ष झाल्याचे कौतुक कोणाला होते? त्यापेक्षा चार जागांनी भाजपाचे बहूमत हुकल्याचा मोठा आनंदोत्सव बौद्धिक प्रांतामध्ये साजरा झाला होता. लगेच दुसर्‍या क्रमांकावर फ़ेकल्या गेलेल्या कॉग्रेसने तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला मुख्यमंत्रीपद देऊ केले, ती नैतिकता होती? तेव्हा सर्वात मोठा पक्ष भाजपा असूनही त्याला सत्तेपासून वंचित ठेवणे, किंवा सत्तेतून बाहेर फ़ेकलेल्या कॉग्रेसने सत्तेसाठी केलेली कसरत घटनात्मक ठरवण्यातच सगळी बुद्धी खर्ची पडत होती ना? इतकी बौद्धिक प्रांताची प्रतिष्ठा लयाला गेलेली असेल, त्या समाजात नैतिकतेच्या गोष्टी बोलणेही विनोद नाही, तर हलकटपणा असतो. हमाममे सब नंगे म्हणतात, तसे राजकारण झालेले असल्यावर कुणा एकाला नागडा ठरवण्यासाठी बुद्धी राबू लागली; मग बुद्धीभ्रंश झाला असे खुशाल समजावे. आपोआप राजकीय पक्ष या सत्ता बळकावणार्‍या टोळ्या होतात आणि अशा झुंडशाहीत कोणालाही नैतिक पाठींबा देण्यात शहाणपणा नसतो. जो जीता वही सिकंदर असली अवस्था आलेली असते. याच निकषावर आता सगळे खेळ चालू आहेत.

हरयाणामध्ये बहूमत हुकले तरी भाजपाला सत्ता मिळणार आहे. कारण बंडखोर अपक्ष म्हणून त्यांचेच सहा आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना एकत्र करून सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत कॉग्रेस नाही. जननायक जनता पार्टी नावाचा नवा पक्ष जे आमदार घेऊन पुढे आला आहे, त्यांना सोबत घेऊनही कॉग्रेस बहूमत सिद्ध करू शकत नाही. बंडखोर अपक्षांच्या हातीच सत्तेची किल्ली आहे. पण जनादेश गमावूनही पुन्हा भाजपा कसा सत्तेला चिकटून बसला आहे, त्याचे युक्तीवाद आपल्याला आता ऐकायला मिळणार आहेत. कारण सोपे सरळ आहे. ज्यांना कॉग्रेसचा आजवरचा इतिहास ठाऊक नाही, किंवा १९९० पुर्वीचे राजकारणही माहित नाही, त्यांना यातला गंध नसतो. पण तेच विश्लेषक म्हणून शेखी मिरवत असतात. त्यांना भारतीय संसदीय राजकारणात कॉग्रेसनेच निर्माण करून ठेवलेल्या परंपरा व पायंडेही ठाऊक नाहीत. किंवा तिकडे दुर्लक्ष करायचे असल्याने ते भाजपाला गुन्हेगार ठरवण्यात कायम रमलेले असतात. त्याला कॉग्रेस व पुरोगामी शहाण्याचे खतपाणी मिळाले मग त्यांची बकवास सुरू होत असते. भाजपाही कुठे दुधाने धुतलेला पक्ष नाही. जे राजकारण व डावपेच कॉग्रेसने केले आहेत आणि इतर पक्षांनी घटनात्मक म्हणून रेटून नेलेले आहेत, त्याचा आधार घेऊनच भाजपा आता आपले डाव साधतो आहे. त्यासाठी भाजपाने पावित्र्याचा व शुचितेचा आव आणलेला नाही व आणायचे कारणही नाही. सत्ता हा नंगेपणाचा बेशरम खेळ असतो आणि समोरचे जितका नंगेपणा करतील, त्यांच्यापेक्षा अधिक नंगेपणा केल्याशिवाय मात करता येत नाही. भजनलाल यांना पक्ष व मंत्रीमंडळासह कॉग्रेसमध्ये आणणार्‍या इंदिराजींचा गौरव ज्यांना वाटतो; अशा लोकांनी इडी सीबीआय वा राज्यपालांच्या अनैतिक वापराविषयी तक्रार करण्यात अर्थ नसतो. आज सत्ता भाजपाच्या हाती आहे आणि तेव्हा सत्ता कॉग्रेसच्या हाती होती. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे आपले वडीलधारे सांगून गेले. पण इथल्या देशी बुद्धीजिवींचा बाप स्वदेशी असला तर ना?

17 comments:

  1. भाऊ,महाराष्ट्रातील निकालांवर तुमच्या विश्लेषणाची वाट बघत आहे.

    ReplyDelete
  2. राजकीय इतिहास पुढच्या पिढीला कळेल यातून
    शेवटच्या वाक्याला वंदन
    चपखल

    ReplyDelete
  3. बरोबरच आहे भाऊ

    ReplyDelete
  4. बरोबरच आहे भाऊ

    ReplyDelete
  5. व्वा, काय मारलीये ! अप्रतिम !!!

    ReplyDelete
  6. Right या wrong ऐसा कुछ नहीं होता है....
    जिसके पास power होता है, उसका सब Right होता है....

    ReplyDelete
  7. दर्शन वसंत कोळीOctober 25, 2019 at 5:01 AM

    काय भाऊ, आम्ही कधीचे थोड्या थोड्या वेळाने ब्लाॅग चेक करतोय महाराष्ट्राबद्दल वाचायला आणी भाऊ अगोदर पोहोचले हरियाणाला....स्वरराज ठाकरे व वंचित बद्दल तसेच भाजपा 220 लक्ष्याबद्दल भाऊंचा नेहमीप्रमाणे अपेक्षीत अगदी अचूक व बिनचूक अंदाज चिंब पावसात न्हालेल्या व ED चा वग सादर केलेल्या शरद पवार यांनी चुकविला याचे वाईट वाटत आहे.लोकं पण सहानुभूतीचं दान भरभरून देतात हो..

    ReplyDelete
  8. भाऊ ..खरंच बोललात. नगेपणा हेच तर भारतीय राजकारण ची संस्कृती होऊन बसली आहे. आज भाजप जात्या मध्ये आहे.उद्या काँग्रेस असेल. पण ही बहूपक्षीय पद्धत केव्हा संपुष्टात येणार.

    ReplyDelete
  9. इंदिरा गांधींनी राज्यपालांना आदेश दिला की भजनलाल यांचा शपथविधी करा. तेव्हा मुठभर लोकांसमोर प्रसिद्धी न देता शपथविधी उरकला. राज्यपालांनी औपचारिकपणे बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली.
    देविलाल बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्व अपक्ष आमदारांशी संपर्क करत होते. त्यांनी ही घटना ध्यानीमनी नसताना रेडिओवर बातमीमध्ये ऐकली. वस्तुतः राज्यपालांनी प्रथम सर्वात मोठ्या पक्षाचे नेते या नात्याने देविलाल यांना संधी द्यायला हवी होती. पण राज्यपाल पंतप्रधानांच्या आदेशानुसार बेकायदेशिररित्या वागले.
    या राज्यपालांचे नाव होते, गणपतराव तपासे. ते मूळचे इंदिरा गांधींच्या विरुद्ध असलेल्या मोरारजी देसाई, कामराज यांच्या संघटना काँग्रेसमधले. इंदिराविरोध विसरून इंदिरा गांधींचा आदेश मानला.
    त्या गणपतराव तपासे यांच्या मुलांनी चंदिगडमध्ये बोगस फायनान्स कंपन्या काढल्या. त्यात गणपतरावांचे जावई तत्कालीन शिवसेना नेते रमेश प्रभू यांचा सहभाग होता.
    सायन (शींव) वरून रस्ता+धारावीवरून येणारा रस्ता आणि कलानगरकडे जाणारा रस्ता अशा तीन रस्त्यांचा चौक आहे. त्या चौकाला गणपतराव तपासे चौक नाव दिले आहे.

    ReplyDelete
  10. शेवटचे वाक्य भन्नाटच आहे...बाकी लेख नेहमीप्रमाणे उत्तमच!

    ReplyDelete
  11. Very nice analysis
    Asmita Phadke

    ReplyDelete
  12. Thanks Bhau. Would like to hear more on how CM term can be retained by BJP.

    ReplyDelete
  13. Bhau maharashtra baddal cha tumach BJP 200+ ch bhakit chukal, Tyabaddal kahi vishleshan

    https://www.youtube.com/watch?v=HADNf5LIK8o

    ReplyDelete
  14. Tumchi bhakit khoti tharali bhau

    ReplyDelete
  15. भाऊ आपल्यातल्या संशोधकाला नमस्कार !!!

    ReplyDelete
  16. लेख नेहेमी प्रमाणेच झकास, शेवटच वाक्य अस्सल शालजोडीतल, पण त्या बुध्दिजीवींना कुठुन समजणार? एकतर मराठी समजत नाही, वाचता आलं तरी अर्थ डोक्यावरुन जाणार.बिच्चारे !!

    ReplyDelete