Saturday, October 12, 2019

लोकशाहीतले अमृतमंथन

Image result for raj thackeray ambedkar

पुराणात अमृतमंथन नावाचा एक शब्द आला आहे. त्या सागराच्या मंथनामध्ये देव दानवांनी समुद्र घुसळून काढला आणि त्यातून अमृतकुंभ हाती लागला, अशी ती कथा आहे. पण त्या घुसळणीतून फ़क्त अमृतच हाती लागलेले नव्हते. त्यातून हलाहल नावाचे अतिशय दाहक विषही समोर आलेले होते. त्याचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आणि ते भोलानाथ शंकराने एकट्याने पिवून पचवले, असेही कथेत म्हटलेले आहे. म्हणून तर अमृतापेक्षाही ‘हलाहल पचवणे’ हा शब्दप्रयोग अधिक वापरात आला. घुसळण्यातून प्रत्येकवेळी अमृतच, किंवा आपल्याला हवे तेच हाती लागते असे नाही. पण जे हाती लागेल ते पचवून पुढे जाता आले पाहिजे, हा त्यातला आशय आहे. पण ती घुसळण चालू असते, तेव्हा हलाहल सुद्धा हाती लागण्याची शक्यताही अनेकांच्या पचनी पडत नाही. मग हलाहल समोर आले, तर अशा लोकांची अवस्था काय होईल? त्या कथेतला आशय म्हणून महत्वाचा आहे. अमृताची अपेक्षा जरूर करावी, पण त्यावरच विसंबून भविष्याकडे बघू नये. हलाहल पचवण्याची तयारीही ठेवण्यात शहाणपणा असतो. मात्र भावनाविवश लोकांना त्याचे भान रहात नाही. ते फ़क्त अमृताखेरीज काहीच हाती लागणार नाही; अशा आशेवर जगतात. किंवा हलाहलाची कल्पनाही सहन करू शकत नाहीत. परिणामी त्यांच्या पदरी निराशा किंवा वैफ़ल्य आल्यास नवल नसते. लोकशाहीच्या युगात आणि निवडणूकीच्या मंथनात आपल्या हाती सर्वोत्तम काही असेल तेच लागेल; अशी प्रत्येकाने अपेक्षा जरूर नाळगली पाहिजे. पण प्रत्येकाचे सर्वोत्तम वेगवेगळे असते आणि म्हणूनच सर्वांनाच मंजूर होईल असे सर्वोत्तम वा अमृत हाती लागण्याची शक्यता जवळपास नसते. एकाची अपेक्षा पुर्ण होते आणि इतराना हलाहल पचवण्याची वेळ येते. त्यामुळेच कुठला पक्ष जिंकणार वा हरणार, यावरून वादावादी चालत असते. पण विश्लेषण करणार्‍याला अशा प्रत्येकाला जे अमृत वा सर्वोत्तम वाट,ते त्यांच्यामागे वाहून जाता येत नाही. मग त्याच विश्लेषणावर अनाठायी पक्षपाताचे आरोप होत असतात. मला हा अनुभव सातत्याने येत असतो.

राजकीय किंवा निवडणूकीचे विश्लेषण करताना, किंवा त्याविषयीचे भाकित करताना समोर दिसणार्‍या वास्तवाकडे पाठ फ़िरवून मतप्रदर्शन करता येत नाही. मग ते विश्लेषणकर्त्याला आवडणारे असो किंवा नावडते असो. वास्तव बदलण्याची कुवत विश्लेषणकर्त्यापाशी नसते. त्याने सत्य नाकारून विश्लेषण केले वा स्वत:च्या आवडीनिवडीनुसार भाकिते केली, तर ती तोंडघशी पडतात. त्यातून माझीही सुटका नाही. जेव्हा माझ्याकडून असे भावनांच्या आहारी गेलेले विश्लेषण झाले वा भाकित मांडले गेले, तिथे ते चुक ठरले आहे. त्याला पतर्याय नसतो. कारण विश्लेषण करणार्‍याने कुठल्या बाजूला झुकते माप दिले, म्हणून मतदार तसाच कौल देणार नसतो. मतदाराच्या मनात चाललेली घुसळण पत्रकार वा विश्लेषणकर्त्याला नेमकी ओळखता आली, तर त्याचे अंदाज योग्य ठरतात. मग ते त्याला स्वत:ला आवडणारे नसले तरी बेहत्तर. मात्र वाचकाला किंवा भावनावश कार्यकर्ते पाठीराख्यांना ते निष्कर्ष पटणे अशक्य होते. त्यांना तेच हलाहल वाटते. उदाहरणार्थ तीन वर्षापुर्वी अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचलेली होती आणि इथे बसून मीही त्यावर भाष्य करीत होतो. ते माझ्या अनेक वाचकांना आवडलेले नव्हते. मी डोनाल्ड ट्रंप निवडून येतील असे भाकित करीत होतो आणि अनेकांना ट्रंप नालायक माणूस असल्याने तो पडावा असेच वाटत होते. पण म्हणून ट्रंप पराभूत होण्याची बिलकुल शक्यता नव्हती. झालेही तसेच. मराठीतलेच काही संपादक पत्रकार अमेरिकेत जाऊन प्रत्यक्ष वातावरणाचा अभ्यास करून ट्रंप यांच्या पराभवाची हमी देत होते. ते तोंडघशी पडले. पण इथे बसुन मी केलेले भाकित खरे ठरल्याने अनेक वाचकांनी माझे कौतुक केले होते. त्यातला फ़रक लक्षात घेतला पाहिजे. मला ट्रंप जिंकणार असे वाटणे हे वास्तविक होते आणि माझ्या राजकीय निकषावर मला पटलेले होते. याचा अर्थ ट्रंप हा फ़ार महान माणूस आहे आणि म्हणून जिंकणार, असे माझे अजिबात म्हणणे नव्हते. तोच चांगला उमेदवार असल्याचा दावा मी केव्हाही केलेला नव्हता. पण नावडता म्हणून तो पडावा हा आशाळभूतपणा होता.

ट्रंप मलाही नावडणारा माणूस आहे. पण तिथली राजकीय वस्तुस्थिती त्याच्या यशाचे संकेत देत होती आणि त्याकडे पाठ फ़िरवून मी त्याच्याच अपयशाचे भाकित करणे स्वत:चीच फ़सवणूक ठरली असती. जे अन्य संपादकांच्या बाबतीत झाले. तेव्हाही अमेरिकेत स्थायीक अनेक भारतीय मित्रांनी माझी निर्भत्सना केलेली होती. म्हणून निकाल बदलला नाही. कुठल्याही विश्लेषणकर्त्याच्या लिहिण्यामुळे कोणी उमेदवार जिंकत नसतो वा शापवाणीमुळे कुठला पक्ष पराभूत होत नसतो. मतदाराला वा निवडणुकीच्या घुसळणीचा नेमका अंदाज बांधला, तरच हाती काय लागणार याचे भाकित करता येते. ते हलाहल असेल, तर विश्लेषणकर्त्याच्या नावाने शिव्याशाप देऊन काय उपयोग? कारण विश्लेषणकर्ता तिथे हलाहल वा अमृत आणून ठेवत नसतो. विश्लेषणकर्ता वास्तववादी असला पाहिजे. आताही इथे ब्लॉग लिहीताना किंवा अनेक व्हिडीओ निवेदनात राज ठाकरे यांच्या राजकीय जिर्णोद्धाराविषयी मी अनेकदा मतप्रदर्शन केलेले आहे. त्यांनी काय करावे, हे सुचवलेले नाही. सल्लेही दिलेले नाहीत. त्यांची कुवत व संघटनात्मक पाठबळ, अधिक सद्यकालीन राजकीय वातावरण यांच्या घुसळणीतून काय होऊ शकते; त्याची भाकिते केलेली आहेत. वंचित बहूजन आघाडीच्या बाबतीतही माझी लोकसभा निवडणूकीतली भाकिते इथे आजही उपलब्ध आहेत. त्यापैकी काय खरे ठरले वा काय चुकले, हे कोणीही तपासू शकतो. पण यापैकी काहीही माझ्या भाकितामुळे घडले असा दावा मी करणार नाही. प्रत्येकाची कुवत क्षमता व तात्कालीन स्थिती यावर आधारीत ही भाष्ये असतात. त्यामध्ये संबंधित पक्ष वा नेता तसाच वा त्याच्या कुवतीनुसार वागला नाही, तर भाष्य निकामी ठरत असते. राज ठाकरे असोत, शिवसेना-भाजपा असोत किंवा राष्ट्रवादी व कॉग्रेस असोत. त्यांच्या कुवतीनुसार वागतील व सद्य परिस्थितीत काय होऊ शकेल, यावर भाकित आधारलेले असते. वंचित व मनसे यांना नव्याने उभे रहाण्यासाठी वातावरण पोषक आहे आणि नवा विरोधी पक्ष उदयास येण्याची शक्यता मला दिसते आहे. त्यात आधी निराश असलेल्या राज ठाकरेंनी अखेरच्य क्षणी उडी घेतली असेल, तर त्याचे कुठलेही श्रेय माझ्या लिखाणाला असू शकत नाही. उद्या वंचित वा मनसेला तसे यश मिळाले, तरी त्याचे श्रेय त्यांचेच असेल. त्यात माझा मुंगीचाही वाटा असू शकत नाही.

विश्लेषणकर्त्याने अलिप्तपणे भाष्य करायचे असते. कुठला पक्ष चांगला उपयुक्त म्हणून जिंकावा किंवा पराभूत व्हावा, म्हणून प्रयत्न करण्याला विश्लेषण म्हणता येत नाही. म्हणूनच मनसे किंवा वंचितला विरोधी पक्ष म्हणून नव्याने आकार घेता येईल, असे मला वाटते. ते भाकित आहे. तसा माझा प्रयत्न अजिबात नाही. राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांची दुर्दशा कुणाच्या लिखाणातून होऊ शकत नाही, किंवा कुणाच्या भाकितामुळे ते पक्ष सत्तेवर  येण्याची बिलकुल शक्यता नाही. त्या दोन्ही पक्षांनी प्रयत्नपुर्वक आपली दुर्दशा करून घेतलेली आहे. त्यातून त्यांना सावरण्याला पोषक वातावरणही आज नाही. मग शरद पवारांनी कितीही धावपळ केली तरी उपयोग नाही. भाजपाने फ़ोडाफ़ोड केल्यानेही त्या दोन्ही पक्षांचा र्‍हास होऊ शकणार नाही. तो र्‍हास त्यांनी़च आपल्या कर्माने घडवून आणला आहे. युती व आघाडीत चारही मोठे राजकीय पक्ष विभागले गेल्याने व प्रत्येकाला सत्तेचीच आस लागलेली असल्याने; विरोधी पक्ष म्हणूनच कामासाठी कटीबद्ध असेल अशा पक्षाची वा नेत्याची लोकशाहीला गरज आहे. ती भूमिका राजनी ओळखलेली असेल, तर त्यांना परिस्थितीचा लाभ उठवणे शक्य आहे. गेल्या पाच वर्षात आपली तीच जबाबदारी ओळखून पार पाडली नाही म्हणून दोन्ही कॉग्रेस पक्ष बाजूला फ़ेकले गेल्यास नवल नाही. यात मग अनेकांना मनसे आवडत नसेल किंवा वंचित आघाडीविषयी पुर्वग्रह असू शकतात. हे दोन पक्ष वा त्यांचे नेते उत्तमच आहेत किंवा त्यांची कार्यपद्धती अचुक आहे; असे मी कुठेही म्हटलेले नाही. पण म्हणुन त्यांना उपलब्ध असलेली संधी संपत नाही. कदाचित विरोधी पक्ष म्हणून हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी व कॉग्रेसपेक्षाही नालायक ठरू शकतील. तर त्याला हलाहल म्हणावे लागेल. पण हलाहलच असणार अशा समजुतीपोटी तशी शक्यता नाकारण्याला विश्लेषण म्हणता येत नाही. अमृत असो किंवा हलाहल असो, ते समोर येण्यापर्यंत नाकारून काहीही साध्य होणार नाही. अमृताची अपेक्षा करावी आणि हलाहल समोर आल्यास तेही पचवण्याची हिंमत राखावी; यालाच लोकशाहीचे अमृतमंथन मानून पुढे गेले पाहिजे.

15 comments:

  1. "आताही इथे ब्लॉग लिहीताना किंवा अनेक व्हिडीओ निवेदनात राज ठाकरे यांच्या राजकीय जिर्णोद्धाराविषयी मी अनेकदा मतप्रदर्शन केलेले आहे. त्यांनी काय करावे, हे सुचवलेले नाही. सल्लेही दिलेले नाहीत."
    एकदम मान्य...पण गेले दोन दिवस राज ठाकरे यांची भाषणं बघतोय TV वर, असं वाटतयं, आमच्या सारखेच तेही तुमचे लेख वाचत असावेत...

    ReplyDelete
  2. भाऊ कदाचित मी चुकीचा असेल पण मी एक निरिक्षण केलय,युती झालेली असतांना ही शिवसेना ही नेहमीच भाजपाला विरोध करनारी भुमिका घेते मैट्रो असो वा आरे किवा नानार म्हणजे भाजपा हो म्हटल तर सेना नही म्हणनार. आणी भाजपने सावध भुमिका घेत सेनेच्या प्रेत्येक गोष्टीकडे कानाडोळा करत मम म्हणते आहे.
    वरिल निरीक्षणावरुन असे दिसते की, ज्या मतदारसंघांत शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजपचे मतदार मनसेला मत देतील अन मनसेच्या जागा किवा वोट शेयर हे शिवसेना,राष्ट्रवादी आणी कॉंग्रेस यांच्या मतदारसंघात असेल.

    ReplyDelete
  3. लेख अत्यंत बरोबर आहे. प्रथमच निवडणूक विशेषज्ञ आणि वृत्तपत्राशी संबंधीत अशा व्यक्ती यांच्यासाठी असलेला लेख मी वाचत आहे. प्रत्येक मतदार एका पक्षाला मत देतो. त्याप्रमाणे वरील व्यक्तीपण तेच करतात. पण निवडणूकीसंबंधी वृत्त देताना किंवा लेख लिहिताना अशी वृत्ती सोडली जाते. आणि स्वतःला गुदगुल्या होतील असेच लिहिले जाते.

    ReplyDelete
  4. भाऊ, आजचा लेख फार वेगळा आणि त्यात आपली बहुतांश राजकीय विश्लेषणे, भाकीते काळाच्या कसोटीवर खरी का होतात व इतर राजकीय विश्लेषक तोंडघशी का पडतात याचे सुंदर विवेचन आपण केले आहे, किंबहूना आपण रहस्य उघड केले आहे. हीच प्रांजळ कबूली शेखर गुप्ता या मोदी विरोधक पत्रकारांनी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिली आहे.

    ReplyDelete
  5. या विश्लेषणाचा प्रत्यय लवकरच येईल तेंव्हाच कळणार हलाहल का अमृत तें.

    ReplyDelete
  6. सर पश्चिम महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व आपल्या मतावर/भाकितावर लेख लिहावा ही विनंती

    ReplyDelete
  7. वास्तव हे चिरंतन असत

    ReplyDelete
  8. खूपच छान विचारमंथन!

    ReplyDelete
  9. भाऊ आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण व सटीक आहे.

    ReplyDelete
  10. भाऊ।

    राज ठाकरे आता म्हणतात मला विरोधी पक्ष बनवा आता लावरे तो विडिओ गायब झाले जसे राफेल , 72000 , गायब झाले एक धोरण निश्चित करत नाहीत तिथेच सगळा घोटाळा होतो

    ReplyDelete
  11. भाऊ, तुमचा मुद्दा मान्य आहे, पण लोकांनी राज ठाकरेंना, म्हणजे मनसेला, मते द्यायची काश्याच्या भरोशावर? ठाणे, नाशिक नगरपालिकेतला घोटाळा, २०१४ ला कोणीही न मागता मोदींना पाठिंबा देणे, नोटबंदी नंतर एकदम पलटी मारून मोदी विरोध चालू करणे, त्यावर "गरीब जनतेचे पैसे गेले" म्हणून विरोधात सूर मिसळणे, २०१९ ला राष्ट्रवादीकडून प्रचार करणे, उरी आणि इतर सर्जिकल स्ट्राईक संबंधी "शंका" उपस्थित करणे, असल्या कृत्यांमुळे ह्या माणसावर सामान्य जनतेने का विश्वास ठेवावा हे कळत नाही. तोच मुद्दा "वंचीत" च्या बाबतीत आहे. ह्यांना "आरक्षण" पलीकडे काहीही दिसत नाही. देशहित वगैरे गोष्टी तर लांबच राहिल्या. जनतेने ह्यांना का निवडून द्यावे हे निदान मला तरी समजत नाही.

    ReplyDelete
  12. भाऊ, आपले निरीक्षण ढोबळ मानाने खरे असले तरी राज ठाकरे पक्षाचे पुनरूज्जीवन करू शकणारे आहेत ह्या विषयी शंका वाटते.कारण एका विष्लेषकाच्या म्हणण्याप्रमाणे राजसाहेबांकडे कितीही भाषणकला असली तरी राजकीय क्षेत्रात किंबहुना प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या मेहनत करण्याच्या तयारीची वानवा आहे. कुठलेही नविन योजना किंवा विचार त्यांच्याकडे नाही.याउलट राज शिवसेनेतून राज बाहेर पडल्यानंतरच्या आघातानंतर उद्धव यांनी संघटन कौशल्य दाखवून सेनेचे अस्तित्व सांभाळून ठेवले ते मान्य करावेच लागते. आता काही प्रमाणात नाविन्य असलेले आदित्य ठाकरे शिवसेनेचा चेहरा बनू पाहताहेत. विनाकारण आरडाओरडा किंवा आक्रस्ताळेपणा करताना दिसत नाही.मुख्य म्हणजे वय हा मोठा फायदा त्याच्या पारड्यात आहे. न जाणो, कदाचित ह्याचा फायदा घेऊन आदित्य एक वेगळी आश्वासक शिवसेना पुढे घेऊन येऊ शकेल.ही एक काळाची गरज आहे.पुढील काळात धार्मिक नव्हे तर भाषिक अल्पसंख्यकत्व हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येण्याची शक्यता आहे. तेंव्हा शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष असण्याची गरज भासेल. हे पण तितकेच खरे की,महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षाच्या दिल्लीतील नेत्रुत्वाला(हायकमांड) शह देण्यासाठी शिवसेनेचा वापर केलेला आहे.त्यामुळे शिवसेना कमजोर झालेली कुठल्याही मुख्यमंत्र्याला परवडत नाही.

    ReplyDelete