Wednesday, April 22, 2020

‘माणूस’ केव्हा ‘जागा’ होतो?

Fearless Godavari Parulekar Led the Warli Tribes in the Freedom ...

गोदुताई परुळेकरा

पालघर येथील अमानुष घटनेनंतर आता त्यावर राजकारण सुरू झाले आहे. वास्तविक अशा घटना घडल्यावर शासन यंत्रणा तात्काळ कार्यरत झाली असती, तर मुळातच दोन पोलिसांना निलंबित करण्याची वेळ आली नसती आणि आता राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यावर राजकारण नको, अशीही पुस्ती जोडायची वेळ आली नसती. लॉकडाऊन सुरू झाल्यावर एका मंत्र्याच्या बंगल्यात करमुले नावाच्या अभियंत्याला पोलिसांनीच उचलून नेले व बेदम मारहाण झाल्याचा गवगवा सोशल मीडियातून झाला. ती याची सुरूवात होती. त्यानंतर वाधवान यांचे सहकुटुंब महाबळेश्वरला पलायन व त्यात पोलिसांसह गृहसचिवांना सहभाग उघडकीस आला. पहिला लॉकडाऊन संपायच्या किंवा विस्तार होण्याच्या दिवशीच बांद्रा येथील हजारो लोकांनी रेल्वे टर्मिनसच्या भागात गर्दी करण्याचा प्रसंग आला. हे राजकारण झाले होते का? मुळात गृहमंत्र्यांचे आपल्या खात्यात व कारभारावर बारीक लक्ष असते, तर ह्या घटनाच घडल्या नसत्या आणि त्याची परमावधी पालघर येथे दिसली नसती. पण गृहमंत्र्यांना कारभारापेक्षाही राजकीय बाजी मारण्याची घाई झालेली आहे आणि त्यांच्या कृतीतूनच प्रशासनाला दिशा व मार्गदर्शन मिळण्याला पर्याय नसतो. आपल्या राज्यातला लॉकडाऊन यशस्वी करण्यापेक्षा अनिल देशमुख यांनी राजकारणाचा आरंभ केला होता. तबलिगी प्रकरण उघडकीस आल्यावर त्याच संदर्भाने बातम्या येऊ लागल्या आणि त्यात इथे वसई नजिक तबलिगी जमातीचा मेळावा भरण्याची परवानगी नाकारली जाण्याची बातमी उघडकीस आली. त्याचे श्रेय घेण्यापासून देशमुख यांनी राजकारण सुरू केले. आज तेच चहूकडून टिकेचे लक्ष होऊ लागल्यावर देशमुखांना राजकारण नकोसे झाले आहे. त्यांच्यातला माणुस डहाणू तालुक्यातील समुह हत्याकांडाने जागृत झाला असेल, तर त्यांनी पुढल्या काळात ‘माणूस केव्हा जागा झाला’ अशा शीर्षकाचे पुस्तक लिहायला हरकत नाही. पण त्यासाठी आधी गोदुताई परुळेकरांचे तशाच शीर्षकाचे पुस्तक फ़ावल्या वेळात वाचून काढावे.

ज्या पद्धतीने गडचिंचले या गावात त्या दोन साधू व त्यांच्या ड्रायव्हरला जीवानिशी मारण्यात आले, त्यात ‘माणूस’ किती मेला वा ढाराढुर झोपी गेला आहे, त्याची साक्ष जगाला मिळालेली आहे. कधीकाळी डहाणू वा तलासरीचा हा वारली आदिवासी बहुल लोकसंख्येचा प्रदेश मार्क्सवादी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ख्यातनाम झालेला होता. कॉम्रेड शामराव परुळेकर आणि त्यांच्या पत्नी गोदुताई परुळेकर यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जात होता. जगापासून अलिप्त पडलेल्या त्या जंगलवासी किंवा पशूवत जीवन कंठणार्‍या लोकसंख्येला नव्या युगाची ओळख देऊन आधुनिक माणुस बनवण्याची प्रक्रीया या परुळेकर दांपत्याने १९६० च्या सुमाराला सुरू केली होती. आज टिव्हीच्या युगात किसान सभेच्या वतीने शेतकर्‍यांचे मोर्चे लाल बावटा घेऊन नाशिक ते मुंबईला येताना ‘लाल वादळ’ असली भाषा आपुलकीने बोलणार्‍यांना गोदूताई किती ठाऊक आहेत? तो माओ वा मार्क्सच जाणे. पण किसानसभेची सुरूवात महाराष्ट्रात त्याच पतीपत्नीने डहाणू तलासरी येथून केली होती. वारली आदिवासींच्या त्या उद्धार कार्याचा जीताजागत अनुभव मग गोदूताईंनी लिहून काढला. तो पुस्तक रुपाने प्रकाशित झाला आणि महाराष्ट्र शासनाने त्याचा गौरवही केला होता. त्या पुस्तकाचे नाव होते, ‘माणूस जेव्हा जागा होतो.’ ज्या डहाणूच्या अनुभवातून गोदूताईंनी ते पुस्तक लिहीले वा तिथल्या पशूवत जगणार्‍या आदिवासींमधला माणूस जागा केलेला, त्याचे आज असे काय झाले आहे? कारण त्याच परिसरात कालपरवा अमानुष जंगली श्वापदाच्या आवेशात साधूंची निर्धृण शिकार झालेली जगाला बघायला मिळाली आहे. आता त्यामध्ये डाव्यांच्या कुणा नेत्या कार्यकर्त्याचा हात होता वा कम्युनिस्ट वगैरे होते असेही सांगितले जात आहे. त्यामुळे मनात प्रश्न असा आला, की गोदूताईंनी ज्यांच्यातला माणूस जागा केला होता. तो कोणी झोपावला आहे? कोणी त्यांच्यातला तो जंगली पशू जागवला आहे?

साठ सत्तर वर्षापुर्वी आपले शहरातील सुखवस्तू जीवन गुंडाळून शामराव आणि गोदूताई डहाणू तलासरीला गेले, तिथे त्यांनी पशूवत जीवन कंठणार्‍यांना माणुस बनवण्याचा अथक प्रयास केला. तो माणूस जागलाही. किंबहूना अशा पाशवी जगण्यातून मुक्त झाल्यावरच माणूस आपोआप जागा होत असतो. माणुस विचार करायला प्रवृत्त झाला, मग त्याला खरी माणुसकी कळते. अन्यथा अन्याय करणे असो किंवा अन्याय सोसणे असो, दोन्ही गोष्टी पाशवीच असतात. कोणावर अकारण अन्याय करू नये वा कोणाचा आपल्यावर होणार अन्याय अत्याचार निमूट सहन करू नये; इतकीच मानवाची व्याख्या असते. मानसिक गुलामी माणसाला गुलामीत ढकलते किंवा इतरांना गुलाम करायलाही भाग पाडत असते. त्यासाठी मुळात माणसातला माणूस मारून टाकावा लागत असतो. गाढ निद्रेत त्याला गुंगवून ठेवावा लागतो. आजकाल वैचारिक भूमिका म्हणून तशा गुढ निद्रेमध्ये लोकांना गुंगवण्याचा खेळ चालतो. आपल्या विरोधकांना शत्रू वा पशू समजून त्यांच्याशी अमानवी गोष्टी करण्याचे जणू प्रशिक्षण दिले जात असते आणि त्यालाच क्रांती वा एल्गार म्हणून गुणगानही केले जात असते. आठव, पुण्यात शनवारवाडा येथे भरवण्यात आलेल्या परिषदेची भाषा काय होती? यानंतरचा लढा रस्त्यावर होईल. त्या भाषेला वा विषप्रयोगाला बौद्धीक उहापोह ठरवून त्याचे गुणगान ‘जाणते’ आजही करतात ना? त्याला माणूस जागवणे म्हणता येत नाही. ते माणसातला पशू जागवणे असते. अन्यथा अशी अंगावर शहारे आणणारी कृती त्या गावात घडलीच नसती. अर्थात तो जमाव तसा वागला तर दुरची गोष्ट होती. पण त्यावर चार दिवसांनी बातम्या सुरू झाल्या, तेव्हा त्या गावातला सरपंच भाजपाचाच असून त्यांनीच त्यात पुढाकार घेतल्याचे आरोप राजकारणाला बाजूला ठेवून चालले होते का? ती अधिक अमानुष बाब होती. ज्या काळातून देश जात आहे आणि जितकी हिडिस घटना घडलेली आहे, तेव्हातरी अशा राजकीय खोटेपणाचा मोह टाळला पाहिजे ना? अशी खोटी माहिती देणे अधिक अमानुष होते.

जेव्हा असे काही होते व घडतच रहाते, तेव्हा कुणाही सामान्य बुद्धीच्या माणसाला प्रश्न पडतो, यांच्यातला ‘माणूस’ केव्हा जागा होणार? पालघरची घटना घडल्यावर खुद्द गृहमंत्र्यांमधला माणुस जागा व्हायला किती दिवस खर्ची पडले होते? जी काही वर्णने पुढल्या काळात समोर आली, किंवा प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती समोर आल्या. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. म्हणजेच हे हत्याकांड झाकून ठेवण्याचा आटापिटा झालेला होता. अन्यथा अजूनही तिथला माणूस जागा झाला नसता. राजकारण व्हायला नको असेल आणि करायचेही नसेल, तर देशमुखांनी जरा केरळचे अनुकरण करावे. तिथले मुख्यमंत्री कोणी भाजपाचे नाहीत. मार्क्सवादी पक्षाचेच डावे आहेत. विजयन यांनी तिथे सुरूवात स्वपक्षाकडून केली. कुन्नूर हा विजयन यांचाच जिल्हा. तिथे त्यांच्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपा संबंधित म्हणून एका मुलीवर आणि तिच्या पित्यावर हल्ला केला. त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यास मुख्यमंत्री म्हणून विजयन यांनी विलंब लावला नाही. चौकशी वा निलंबिन असे नाटकही रंगवले नाही. नुसती पोलिस कारवाई करून विजयन थांबले नाहीत. त्यांनी पक्षातूनही त्या हुल्लडबाज कार्यकर्त्यांची हाकलपट्टी केली. म्हणून केरळात कोरोनाला आवर घालताना राजकारण झालेले नाही. होऊ शकलेले नाही. उलट मुख्यमंत्र्याने कृतीतूनच राजकारण करायचे नाही हा धडा घालून दिला आहे. गोदूताईंचे पुस्तक मराठीत असल्याने विजयन यांनी वाचलेले नसेल. पण आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ महिलेने लिहीलेल्या पुस्तकातला आशय त्यांनाही समजलेला आहे. म्हणूनच त्यांच्या राज्यात कॉग्रेस, संघ परिवार आणि डावे खांद्याला खांदा लावून कोरोना विरोधातली लढाई एकजुटीने लढत आहेत. उलट देशमुखांच्या राज्यात राजकारण नको म्हणून आवाहन करतानाही राजकारण खेळणे रंगले आहे. यांच्यातला ‘माणूस’ केव्हा ‘जागा’ होईल?

11 comments:

  1. भाऊ, अत्यंत परखड लिहिता. अहो, या तिघाड्यांना तेवढी अक्कल असती तर आज कोरोनात राज्याची जी प्रगती आहे ती दिसली नसती. स्वतः मोदी, राज्यपाल यांच्यावर अश्लाघ्य टिका करायची व विरोधात कोणी बोलले की त्यांना राजकारण करु नका म्हणून बोंब मारायची. हीच यांची रणनिती आहे. हे असच चालायचं.

    ReplyDelete
  2. उध्दवा अजब तुझे सरकार.. जुलमी राजा प्रजा आंधळी... अधांतरी दरबार ... अजब तुझे सरकार.. उध्दवा अजब तुझे सरकार

    ReplyDelete
  3. पालघर मध्ये जी घटना घडली त्याबद्दल माझे आजोबा अप्पा जोशी यांच्याशी बोलणे झाले. गडचिंचले सारखी घटना या भागात फक्त काल झाली असे नाही. गेली कित्येक वर्षे अश्या प्रकारच्या घटना ह्या वनवासी भागात घडत आल्या आहेत. अशीच घटना माझ्या आजोबांच्या बाबतीत सुद्धा घडली आहे . आजोबा तलासरी येथील विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी कल्याण केंद्र येथे ३२ वर्षे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. हा आश्रम तेथे चालू करण्यासाठी पुढाकार घेत आणि संघटनेने सांगितले म्हणून त्या काळात कल्याणच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन वनवासी कल्याण केंद्राकडे लक्ष द्यायला आलेले माधवराव काणे हे होते. ह्या केंद्रामुळे या वनवासी आणि ग्रामीण भागातील मुलांच्या राहण्याची सोय झाली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडू लागले. आपल्या राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, स्व. खासदार चिंतामण वनगा हे या केंद्रातील माजी विद्यार्थी.
    त्या काळात ख्रिश्चन मिशनरी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांद्वारे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात चालू होते. वनवासी कल्याण केंद्राद्वारे तेथे संघाच्या शाखा लावल्या गेल्या. हे बघून ख्रिश्चन मिशनरी आणि डाव्यांच्या पोटात दुखायला लागले. ह्यामुळे हे केंद्र बंद करायचे, ह्या सर्व संघाच्या लोकांना पाळवायचे असे षड्यंत्र आखण्यात आले.
    १४ ऑगस्ट १९९१ च्या ह्या भ्याड हल्ल्याबाबत बऱ्याच जणांना माहिती असेलच. नागपंचमी चा दिवस होता साधारणत: सकाळी ११:३०-१२:०० च्या सुमारास हल्ला झाला .
    वेळ ११:३० ची असल्याने केंद्रात जास्त कोणी नव्हते. विद्यार्थी शाळेत गेले होते आणि काही कॉलेज चे विद्यार्थी तयार होत होते. अचानक ७००-८०० जणांच्या जमावाने आश्रमावर हल्ला केला. त्यांचे मुख्य Target होते वनवासी कल्याण केंद्राचे संचालक माधवराव काणे. माधवरावांना जीवे मारण्याच्या हेतूनेच ते तेथे आले होते. सुदैवाने त्या ठिकाणी माधवराव उपस्थित नव्हते. मग तिथे व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या माझ्या आजोबांच्या घरावर संपूर्ण जमावाने ने हल्ला सुरू केला. दगड, काठ्या आणि लोखंडी रॉड ने दोघांना मारहाण सुरू केली. या जमावाने हे सुद्धा नाही बघितले की यात पुरुष आहे की स्त्री. या हल्ल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस जोरात सायरन वाजवत घटना स्थळी आले. जर पोलिसांना येणास उशीर झाला असता तर जमावाद्वारे द्वारे हत्या झाली असती. पोलिसांच्या सायरन च्या आवाजाने संपूर्ण जमाव पळून गेला. जाता जाता पोलिस येऊ नाही म्हणून मोठ्या दगडांनी रस्ता बंद केला. या हल्ल्यात आजीला बऱ्यापैकी मार लागला होता. आजोबांच्या डोक्यात जोरदार रॉड ने मारल्यामुळे मेंदू जवळील काही भाग / त्वचा निघाली होती. त्यामुळे संपूर्ण डोक्यावर सव्वाशेच्या वर टाके पडले होते. एक बोट Fracture होते आणि संपूर्ण शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. ज्या वेळेस मारले तेव्हा घरातून बाहेर खेचत आणत मारले. मारल्या नंतर शरीर मिळू नये म्हणून चिखलात फेकून दिले होते. ह्या हल्ल्यातून आजी व आजोबा सुदैवाने वाचले. ह्या सोबतच संपूर्ण आश्रमाची नासधूस केली गेली. आश्रमातील रिक्षा जाळण्यात आली. तिथे असलेल्या एका विद्यार्थ्यांला सुद्धा मारले. हा हल्ला कोणी केला तर हा हल्ला डाव्या विचारांच्या लोकांनी केला.
    त्याच परिसरातील गडचिंचले हल्ला प्रकरणी आई, आजी आजोबां बरोबर बोललो. त्यांच्या सुद्धा या घटनेबाबतच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    © ओजस जयवंत

    ReplyDelete
    Replies
    1. त्या लोकांना कदाचित शिक्षा झाली की नाही? किमान ह्या वेळस लोक विसरणार नाहीत आणि दोषींना शिक्षा होईतो पर्यंत शांत राहणार नाही अशी अपेक्षा आहे

      Delete
    2. एक्यानव साली कुणाचे राज्य होते. कुणीच कसे काही केले नाही???

      Delete
  4. यांच्यात माणूस नाहीच आहे.बुद्धिभेद झालेले विकृत जातीवादी किडे आहेत ते....

    ReplyDelete
  5. Swatahala Hindu mhantle ki tyala jatiywadi aslyacha shikka marla jatoy.👍🙏🌹💯✔️🙂😔

    ReplyDelete
  6. भाऊ अपेक्षे प्रमाणे अत्यंत सडेतोड लेख,भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस राजवटीत सेक्युलारिज्म हा शब्द संविधानात मागच्या दाराने घुसवला.नेहरुंच्या काळापासुनच सेक्युलारिज्म बोकाळला व बुद्धिवादी व राजकारण्यांमध्ये मुस्लिम समाजाचे फाजिल लाड व हिंदू समाज व हिंदुत्व याची यथेच्छ टवाळी हे ठरवुन केले गेले.पालघर येथे २ साधु व एक वाहन चालक यांची निर्घृण हत्या केली पण एकाही विरोधी पक्षाच्या प्रमुखा कडून या घटनेचा निषेध झाला नाही. बाॕलिवुड,लेखक वर्ग,अॕवार्ड वापसी गँग ,मेणबत्ती गँग ईत्यादीं कडून निषेध तर सोडाच साधि दखलही घेतली गेली नाही.माँब लिंचीग (म्हणजे मुस्लिमाची हत्या व यात संशयित जमाव नेहमी हिंदू असतो )झाले की लगेच ट्वीट करणारे सोनिया ,राहुल ,ममता,माया अखिलेश ,जाणता राजा एकदम तोंडात मिठाची गुळणी घेउन गप्प बसले आहेत. अर्णव गोस्वामी याने सोनिया गांधीला थेट जाब विचारल्यावर काल अर्णव व त्याच्या पत्नि वर काल त्च्यांच्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला व आर्णवच्या विरुद्ध आनेक ठिकाणी पोलिस स्टेंशन मध्ये तक्रारी सोनियाच्या आदेशा वरुन केल्या. पालघर प्रकरणा मध्ये नक्की कुणाचा हात आहे व कुणाचा आशिर्वाद आहे यावर आपण विवेचन करावे. अर्णव गोस्वामी सारख्या पत्रकाराची तक्रार पोलिस स्टेशन घ्यायला तयार नाही याचा आर्थ काय लावायचा?

    ReplyDelete
  7. हे डाव्या विचारांचे आणि कोंग्रेस्सचे लोक म्ह्न्णजे मानवजातीला कलंक बाकी काही नाही.

    ReplyDelete
  8. Bhau tumhi andharatil ek diva ahat, asach kam chalu theva.samajat khup andhar aahe ani ek panti ya andharat dimakaht tevat ubhi aahe.

    ReplyDelete
  9. Dear Bhau.
    Kindly upload video of Palghar/Arnab in Hindi on your Pratipaksha channel. What you have shared is very effective. Waiting for its next part. Do make an Hindi video of it. My non marathi friends are waiting.

    ReplyDelete