Monday, April 6, 2020

डोळ्यापेक्षा डोळसपणा महत्वाचा

Image may contain: 3 people, people standing

सत्तर वर्षापुर्वी आजचा इस्रायल अस्तित्वात आला. त्याला तेव्हापासून आजपर्यंत कायम युद्धाच्या छायेतच जगावे लागलेले आहे आणि नजिकच्या काळात तरी त्यापासून त्या देशाची मुक्तता होईल, अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. कारण आपल्याला मित्र निवडता येतात, पण शेजारी वा शत्रू निवडणे आपल्या हाती नसते. तो त्यांचा विशेष अधिकार असतो. त्याला थोपवणे किंवा त्याच्याही दोन हात करणे वा दिर्घकाळासाठी निकामी करून सोडणे मात्र आपल्या हाती असते. त्यात आपण किती हलगर्जीपणा करतो, त्यावर भोगायचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे आता तबलिगी जमातमुळे काय झाले, किंवा त्यांचा वेळीच बंदोबस्त दिल्ली पोलिसांनी कशाला केला नाही? त्यांना परदेशातून इथे कशाला येऊ दिले, असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. असलीच तर बदमाशी असू शकते. असो, तो वेगळा विषय आहे. मुद्दा इतकाच आहे, की दोन आठवडे होत आलेल्या लॉकडाऊन वा सार्वत्रिक कर्फ़्युचे काय आणि ती आणखी किती लांबणार? त्यात कधी सुट मिळणार किंवा त्यात कसे जगावे, हा तातडीचा प्रश्न आहे. ही परिस्थिती येईल असे कॅलेंडरमध्ये कोणा भविष्यवेत्त्याने सांगून ठेवलेले नव्हते्, किंवा त्यासाठी तयारी करायला कोणाला मुदत दिलेली नव्हती. सहाजिकच अशा परिस्थितीत जसजशी कथा उलगडत जाते, तसे त्याचे उपाय शोधणे व उत्तरे शोधण्याला पर्याय नसतो. ते करण्याची क्षमता व हिंमत ज्यांच्यापाशी असते, असेच देश समाज कुठल्याही संकटावर मात करून जगू शकतात. त्याचाच अविष्कार रविवारी आपण सर्वांनी घडवला आहे आणि त्याचीच साक्ष दिलेली आहे. ह्यातली प्रतिकात्मकता अनेक शहाण्यांना उमजली नाही. पण त्याचे ज्वलंत उदाहरण इस्रायल हेच आहे.

साधारण दोन हजार वर्षापुर्वी तो देश पृथ्वीच्या पाठीवरून पुसला गेला असे म्हणतात. त्यानंतर जगभर पांगलेल्या ज्यु टोळ्यांनी मिळेल तिथे आश्रय घेतला आणि प्रतिवर्षी ते उत्सवानिमित्त एकत्र यायचे, त्यावेळी म्हणायचे पुढल्या वर्षी जेरूसेलमला भेटू. ते पुढले वर्ष उजाडायला तब्बल वीस शतकांचा काळ उलटावा लागला आणि १९४९ सालात इस्रायल खरोखरच जगाच्या नकाशात दिसू लागला. पण दोन हजार वर्षे ते स्वप्न उराशी बाळगलेले होते आणि एकदोन नव्हेतर लाखो ज्यू धर्मियांनी ते स्वप्न विझू दिले नाही. मरू दिले नाही. अखेरीस ते साकार होतानाही मोठी कुर्बानी त्या वंशाच्या व धर्माच्या लोकांना द्यावी लागलेली आहे. पॅलेस्टाईन हा देश तेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात होता आणि दुसर्‍या महायुद्धानंतर त्याचा ताबा सोडण्याची वेळ आली, तेव्हा ताबा कोणाकडे द्यायचा असा सवाल उभा राहिला. कारण तोपर्यंत जगातले ज्यु मोठ्या सख्येने तिथे वास्तव्याला आलेले होते. हिटलरच्या कत्तलीने सैरावैरा झालेल्या हजारो ज्युधर्मियांना तिथे आश्रय घ्यावा लागलेला होता. पण त्या काळात तरी तिथे अरबांची संख्या मोठी होती. त्यांचा ज्युवंशियांना स्वतंत्र देश वा भूमी देण्याला साफ़ विरोध होता. त्यामुळे हा विषय नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाकडे गेला. त्या जागतिक संघटनेने पॅलेस्टाईनचे तीन भाग पाडायचा निर्णय घेतला. त्यातला एक ज्युंसाठीचा देश, दुसरा अरबांचा देश आणि जेरूसेलम हे तीन धर्मांचे जन्मस्थान म्हणून त्याचा ताबा वा कारभार राष्ट्रसंघाच्या हाती असावा; असे ठरलेले होते. पण तो प्रस्ताव ज्युधर्मियानी मानला तरी अरबांनी साफ़ फ़ेटाळून लावला. जो जिंकेल वा काबीज करील, त्याची तितकी भूमी असा आडमुठेपणा अरबांनी केला. त्याचे काही कारण होते. सभोवती पाच अरबी देश होते आणि त्यांच्या आपापल्या अरबी फ़ौजा होत्या. उलट पॅलेस्टाईन देशात आश्रयाला आलेल्या ज्युंची संख्या मोठी असली, तरी त्यांची फ़ौज नव्हती. कारण तिथे ब्रिटीशांची सत्ता होती.

थोडक्यात समान संख्येने ज्यु व अरब असल्याने आतले अरब आणि शेजारी अरब फ़ौजा मिळून ज्युधर्मियांना सहज पराभूत करू वा कत्तल करून संपवू; असा अरबांना आत्मविश्वास होता. तर इथून अन्यत्र जायचे कुठे व कसे; ही ज्युंसाठी जीवनमरणाची समस्या होती. म्हणून त्यांनी राष्ट्रसंघाचा प्रस्ताव निमूट मान्य केला होता. पण अरबांनी तो फ़ेटाळल्यावर लढाईला पर्याय उरला नाही आणि अखेर ती स्थिती उदभवली. तेव्हा हातात कुठले भेदक शस्त्र नव्हते की दारुगोळा नव्हता. प्रशिक्षीत सेनाही नव्हती. इतक्या प्रतिकुल स्थितीत ज्युधर्मियांना इस्रायलची नव्याने स्थापना करायची होती. मग रक्त सांडून भूमी संपादन करायची नाही तर मरायचे; इतकाच पर्याय होता. ज्युधर्मिय त्यासाठी कटीबद्ध झाले आणि त्यांनी शेजारच्या पाचही अरबी देशांना व त्यांच्या फ़ौजांना पाणी पाजले. त्यामध्ये तेव्हा राष्ट्रसंघाने हस्तक्षेप केला नसता, तर सगळा पॅलेस्टाईन ज्युधर्मियांनी काबीज केला असता. गाझा पट्टी वा वेस्ट बॅन्क असले विषय उरले नसते्. आज सतत धुमाकुळ घालणारा पॅलेस्टाईन विषय भेडसावू शकला नसता. असो, तो इतिहास इथे सांगण्याची गरज नाही. त्या युद्धात लढूनच भूमी मिळवायची तर जेरूसेलमही हाती राहिले पाहिजे, असे तात्कालीन इस्रायली नेतृत्वाने ठरवले आणि चहूकडून अरबी फ़ौजांनी वेढलेल्या अवस्थेतही बाजी मारली. उंचवट्यावरच्या जेरूसेलमला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अरबी फ़ौजांनी तोडून टाकलेली होती. सहाजिकच दोन आठवडे युद्ध आटोपण्यापर्यंत जितके पाणी व खाद्यपदार्थ उरले होते, त्या शिध्यावर लढणे अपरिहार्य होते. त्यातले अनेक प्रसंग मोलाचे आहेत. शॅटनेल नावाचा इस्रायली अधिकारी त्या शहराचे प्रशासन संभाळत होता. असलेल्या लोकसंख्येला त्यातून जगवता येईल, इतकीच काळजी घेत होता. प्रत्येक दिवशी एका माणसाला किती पाणी पुरेल व किती किमान अन्नावर जगवता येईल; त्याची गणिते मांडून समिकरणे सोडवून ती बाजी मारली गेली. पण जेरूसेलमवर इस्रायलचा ताबा कायम राहिला व आजही कायम आहे.

आज एकशेतीस कोटी लोकसंख्येला काटेकोर कर्फ़्युमधून जगवणे व आवश्यकतेनुसार साधनांचा पुरवठा करणे किती अशक्य कोटीतले काम आहे त्याचा अंदाज जेरूसेलमच्या इतिहासावरून लक्षात येऊ शकते. तिथे काही हजार लोकसंख्या होती आणि इथे अखंड भारताचा लॉकडाऊन म्हणजे त्याच्या लाखोपटीने अधिक लोकसंख्येला जगवायचे व धीर धरायलाही समजवायचे आहे. तिथे गणिते, विज्ञान वा बुद्धीवाद कामाचा नसतो. कालचे नियोजन आज निरूपयोगी ठरत असते. कालचा किमान पुरवठाही आज चैनीचा वाटावा इतकी हलाखीची परिस्थिती ठरू शकत असते. त्यामुळे क्षणाक्षणाला उपलब्ध साहित्य व त्याचा अधिक गरज असलेल्यांपर्यंत वेळेतला पुरवठा, निर्णायक महत्वाच असतो. आज भारतातला प्रत्येक मुख्यमंत्री, अधिकारी, सामान्य डॉक्टर वा अन्य धोरणकर्ते अंमलदार कुठल्या चक्रव्युहातून देशाला बाहेर काढू बघत आहेत; त्याचे हे जगडव्याळ वर्णन आहे. कुठे काय किती पोहोचले, त्यापेक्षा कसे पोहोचले त्याची नवलाई अधिक आहे. तिथे प्रत्येक नागरिकाने कुठलेही शब्द बोलल्याखेरीज दुसर्‍याची कृती व भावना समजून घेण्याला प्राधान्य आहे. जेरूसेलमच्या त्या युद्धात ज्युधर्मियांकडे पुरेशी हत्यारे बंदुकाही नव्हत्या. अशा वेळी सहासात लढू बघणार्‍यांना एकच बंदुक आळीपाळीने वापरावी लागत होती आणि एका चर्चचा आडोसा घेऊन लढणार्‍या एका सैनिकाला गोळी लागली. तो कलंडला तर दुसर्‍याने तीच बंदुक घेऊन खिंड लढवायला सुरूवात केली. तो जखमी ज्यु सैनिक कुशीवर वळला विव्हळत होता. त्याला वेदना असह्य झालेला होता. त्याच्या जवळच एक लढवय्या तरूणी त्याला दिलासा देत होती. त्याने तिच्या शर्टमध्ये हात घालून काही क्षण तिचे स्तन कुरवाळत प्राण सोडला. बघणार्‍यांना दिसणारे दृष्य विचित्र होते. पण तो मरणारा सैनिक काय करतोय व का करतोय, हे त्या मुलीला कळत होते का? या विषयातले तिचे उत्तर वा खुलासा चक्रावून सोडणारा आहे. ते कुठल्या शाळा कॉलेजात वा अभ्यासवर्गात शिकवले जात नाही. परिस्थिती व अनुभवातून त्याचे धडे मिळतात व गिरवले जातात.

पुढे युद्ध संपल्यावर अनेकांनी त्या मुलीला त्याविषयी विचारले. तो मरताना तिच्या स्तनाशी खेळलेला सैनिक तिचा प्रियकर वा नवरा नव्हता. पण त्याने मृत्यूच्या अंतिम टप्प्यात तिच्याशी असे लैंगिक चाळे कशाला करावेत? तिने असा चावटपणा सहन तरी कशाला करावा? असे वागणे त्या युद्धस्थितीत किती योग्य होते? समोर मृत्यु दिसत असताना तो ज्यु सैनिक असा कशाला वागला? आपल्याही मनात असे कितीतरी प्रश्न येऊ शकतात. कारण आज आपण त्या परिस्थितीत नाही किंवा तेव्हाही त्या घटनेचे साक्षिदार नव्हतो. असतो तर आपल्या मनात असा प्रश्न आला असता काय? त्या मुलीला वा तिच्या अन्य सोबती साथीदारांना त्या मृताच वागणे खटकले कशाला नाही? या सगळ्या प्रश्नांनी उत्तरे त्या मुलीने त्याबाबत दिलेल्या एका वाक्याच्या मोजक्या शब्दात सामावलेली आहेत. ती त्यावर बोलताना उत्तरली, ‘त्या क्षणी माझ्या देशासाठी शहीद होणार्‍या सैनिकाच्या मरणयातना हलक्या करायला अन्य कुठले वेदनाशामक उपलब्ध नव्हते.’ लैंगिक वागण्यातून वा तशा स्त्री देहाच्या स्पर्शातून मृत्यूच्या वेदना कमी होऊ शकतात काय? त्याचे उत्तर शरीरशास्त्राचे अभ्यासक देऊ शकतील वा स्पष्टीकरणही मिळू शकेल. पण मुद्दा वेगळाच आहे. तसे वागल्याने आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत वेदनांवर मात करता येईल, हे त्या सैनिकाला सुचले कसे? त्याला सुचले असेल तरी त्याचा हेतू त्या मुलीला कसा उमजला असेल? त्याचे उत्तर कधीच मिळू शकणार नाही. कारण आपण त्या परिस्थितीत नसतो आणि जे त्यातून जात असतात, त्यांनाच तिथली उत्तरे व उपाय शोधावे लागत असतात. अंमलात आणावे लागत असतात. आपल्या दिवाणखान्यात सुरक्षित जागी बसून त्यावर चर्चा करणे सोपे असते, तितके त्या अनुभवातून जाणे अशक्य असते. ज्यांना ते कळू शकते वागताही येते, त्यांना कोरोना वा कुठलाही महाशक्तीशाली देश शत्रू पराभूत करू शकत नाही.

जेरूसेलम म्हणून ज्युधर्मिय काबीज करू शकले व आजपर्यंत आपला कब्जा राखू शकले आहेत. त्यांना त्याचे कोणी प्रशिक्षण दिलेले नव्हते. असे कुठले प्रशिक्षण नसतेच. परिस्थिती उदभवली की उपजत भावनाच तुमच्याकडून अशी कामे करून घेतात. सचिन किंवा विराट कुठल्या चेंडूवर कसे बाद झाले, त्याचे विश्लेषण करू शकणारे त्या चेंडूचा सामनाही करण्याच्या कुवतीचे नसतात. विश्लेषण, चिकित्सा, टिका वा भाष्य जितके सहज सोपे असते, तितके परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसते. प्रयोगशाळेतली गणिते समिकरणे मांडणार्‍यांना कधी म्हणूनच चंद्रावर पाऊल टाकता आले नाही. पण त्यांनी तितका आगावूपणा कधीच केला नाही. त्या मर्यादा संभाळू शकतो, त्याला विचारवंत, विज्ञानवादी, बुद्धीमान म्हणतात. बाकीचे नुसते तोंडाची वाफ़ दवडणारे वाचाळवीरच असतात. त्यांच्यापाशी आपल्या बुद्धीपुरताही आत्मविश्वास नसतो आणि कशावरचा उपायही नसतो. असे शहाणे परोपजिवी बांडगुळे असतात. खायला फ़ार आणि धरणीला भार असे त्यांच्याविषयी आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवलेले आहे. त्यांना रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनीटे लाईट घालवून दिवे पेटवण्यातून काय साधले ते कधीच कळणार नाही. पण ते भारतातल्या उपाशी पोटी झोपणार्‍या् करोडोंना कळते म्हणून त्यांनी डोक्यावर धड छप्पर नसलेल्या झोपडीच्या दारातही पणती मेणबत्ती पेटवली. दुसरीकडे देशातला सर्वात श्रीमंत म्हटले जाणारे मुकेश अंबानी किंवा उद्योगपती रतन टाटांनीही आरतीचे तबक घेऊन त्या झोपडीवासी उध्वस्त भारतीयाची बरोबरी केली. मात्र सदोदीत समतेच्या गप्पा छाटताना आपल्या तोंडाची वाफ़ दवडणार्‍यांना त्यातला समतेचा संदेशही समजून घेता आलेला नाही. येणारही नाही. दिवे पेटवून किंवा सूर्योदय होऊन काही उपयोग नसतो. त्या किरणांचा प्रकाश वा सिग्नल मेंदूपर्यंत घेऊन जाणारी डोळ्यांची यंत्रणा कार्यरत असावी लागते. निर्बुद्धतेने तीच निकामी करून टाकली असेल तर बिचारा सूर्य काय करणार? सुर्य बघता येत नसतो, अशा शहाण्यांना मेणबत्ती कशी दिसावी. त्यामागचे उद्दीष्ट कसे उमजावे ना?

10 comments:

  1. भाऊ, सुंदर विवेचन. हे पुरोगामी किंवा मोदी विरोधक कधीच सुधारणार नाहीत, हेच खरे.

    ReplyDelete
  2. भाऊ, सुंदर विवेचन.

    ReplyDelete
  3. आतापर्यंतचा तुम्ही लिहिलेला सर्वात भारी लेख.

    ReplyDelete
  4. भाऊ कँडल मार्च काढला की पुरोगाित्वाचा पुरावा मोदींनी पणती लावली की प्रतिगामी झाले

    ReplyDelete
  5. करोना बाधित मृत्यू नेतर फोटो समोर दिवा लावण्या पक्षा घरात राहून सर्वाबरोबर दिवा लावून आपल्या परीसरातील शेजाऱ्याना आधार देणे महत्वाचे होते.

    ReplyDelete
  6. Very true 👍🕯️✅🙏🙏🙏

    ReplyDelete
  7. सर, त्या झोपडी बाहेर पणत्या पेटवणाऱ्या मुली आम्हाला जीवन, जगण्यातली जिद्द शिकवून गेल्या. पंतप्रधानानीं उद्ध्रुत केलेला श्लोकाचा खरा अर्थ त्या मुलींना कळला आहे. आणि त्यांनी आपल्या कृतीतून साऱ्या देशाला शिकविला.

    शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा । शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते ॥

    शत्रुत्वापेक्षा शत्रुबुद्धी आपला नाश करते. शत्रुत्व असेल तर आपण संबंध तोडू. पण शत्रुबुद्धी बाळगली तर आपण शत्रुच्या नाशाचाच विचार करत राहतो आणि आपली प्रगती थांबवतो. पाकिस्तानने भारताप्रति सतत शत्रुबुद्धी बाळगली. आज त्या देशाची अवस्था काय आहे आणि भारत कुठच्या कुठे पोहचला आहे. तथाकथीत पुरोगाम्यांनी आणि पुरोगामी पत्रकारांनी श्री नरेन्द्र मोदींबद्दल सतत शत्रुबुद्धी बाळगली, त्यांना चायवाला म्हणून हिणविले. आज समस्त पुरोगामी, निखिल वागळे, कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, मणीशंकर अय्यर वगैरे लोक कुठे आहेत आणि तो चायवाला कोठे पोहचला आहे.

    नरेन्द्र थत्ते

    पुणे

    ReplyDelete
  8. खुप छान विश्लेषण, ...थोडक्यात परिस्थिती जाणून घेणाऱ्यांच्या ज्ञानात भर, आणि बुद्धिवाद्यांना सणसणीत चपराक...

    ReplyDelete
  9. भाऊ नेहेमी प्रमाणे अत्यंत प्रभावीपणे मुद्दे मांडले आहेत. कोराना पसरु नये म्हणुन लाॕक डाउनला जनतेने मनापासुन सहकार्य केले व अडचण आली असुन देखिल समजुतदार पणा दाखवला. तबलिगे जमातच्या नतद्रष्ट आमानवी वृत्तीने शासनाच्या व जनतेच्या लढ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावले.अनेक वाहिन्यांवर जेव्हा तबलिगे जमातला पुराव्यानिषी उघडे पाडले जाते व त्यांच्या समर्थकां कडुन जाब विचारला जातो तेव्हा काही बुद्धिवादी व सेक्युलरअशा राजकीय विश्लेशकांना अस्वस्थ व्हायला होते व पोट तिडीकेने सांगतात की काही अपवादात्मक व मर्यादित घटनाःचा वारंवार उल्लेख करुन पूर्ण मुस्लीम समाजाला व या संघटनेला जबाबदार धरु नका. ही बांडगुळे मग सरकारच्या प्रयत्नां मधिल तांत्रिक चुका दाखवून व खोटे आकडे दाखवून तबलिगे जमातचे केविलवाणे समर्थन करतात.या अशा तथाकथित राजकीय विश्लेशकांचा व मोदी विरोधकांचा अतीशय संताप होतो. जाणता राजा जे गांधी वधासाठी अजुनही ब्राह्मण समाजा बद्दल अढी बाळगुन आहेत ते मात्र तबलिगे जमातला कोरोना प्रसारा साठी जबाबदार धरल्यावर आस्वथ होतात.भाऊ आपण तबलिगे जमातच्या कोरोना पसरवण्याच्या अमानवीय कृष्णकृत्यावर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या शक्ती यावर आपले अभ्यास पूर्ण विचार व्यक्त करावे व तबलिगे जमातच्या लज्जास्पद व संतापजनक कृत्ये करणाऱ्या लोकांना कसे वठणीवर आणता येईल यावर कृपया लिहावे.

    ReplyDelete
  10. i have been following you on you tube for some time now almost an year and half. i was working on the analysis for 2019 elections, how modi would win the elections. i got the book Modinomics and followed the links in the book. than understood the work that was undertaken by the government. and the reach it had made. i was sure that this would not become Atalji shining India and Modi would come in thumping majority. i started following Amits shahs work and the way it was carried out till the booth level. collected all the information. and than came across your video by accident a lecture you delivered in Thane this increased my curosity in listening to you. there you said the number 2 and number 3 seats BJP could wwin and this gave a tremendous boost to my data search, i started digging more information. and concluded that BJP (Modi would win minimum 300 seats) and NDA a whole would win around 350 seats and month and half before the elections i told my friends about my analysis. i owe you this knowledge. nakalat tumhe majhe Mentor banlat. though this is not my forte. but this gave me new zeal to look at things in a different way and more profound way with facts. thank you Bhau. though my comment is not relevet to the post but i thought of showing my gratitude for the knowledge i gained. last 3 days there are no new videos of you comming on you tube so i was worried.

    ReplyDelete