Wednesday, January 6, 2016

शरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल



पठाणकोट हा विषय सध्या वाहिन्यांच्या चर्चेतला आहे. कारण स्पष्ट आहे. याच्या परिणामी पुन्हा भारत-पाक बोलणी फ़िसकटतील काय, असाही प्रश्न आहे. पाकिस्तान वा त्याचे नेते कितीही मैत्रीचे नाटक करीत असले तरी त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा; असे अनेक प्रश्न पठणकोट हल्ल्याने निर्माण केलेले आहेत. अशाच वाहिन्यांच्या चर्चेत पाकिस्तानात दिर्घकाळ राहिलेले भारताचे जाणते मुत्सद्दी पार्थसारथी यांचे मत बोलके आहे. त्यांनी काही वर्षे पाकिस्तानात भारतीय राजदूत म्हणून काढली आहेत आणि तिथे त्यांचे अनेक मित्रही आहेत. म्हणूनच पार्थसारथी यांच्या पठाणकोट घटनेनंतरच्या मतप्रदर्शनाला महत्व आहे. मुळातच मुत्सद्दी असल्याने त्यांच्यावर कोणी युद्धाची खुमखुमी असल्याचा आरोप करू शकत नाही. असा माणूस पठाणकोट हल्ल्यानंतर वेगळी भाषा बोलतो आहे आणि ती भाषाही कमालीची सुचक आहे. बाकी अभ्यासक मुक्ताफ़ळे उधळत असताना पार्थसारथी यांनी बोलणी थांबवावीत किंवा चालू ठेवावी, यासंबंधी मतप्रदर्शन केलेले नाही. ते म्हणाले, पाकिस्तानला असे हल्ले परवडणारे आहेत. म्हणून हा उद्योग चालू आहे. त्या देशात बलुचिस्तान वा अन्य अनेक भागात बंडखोर व तालिबानांचा उच्छाद माजला आहे. म्हणूनच सर्व सैन्य फ़क्त भारताच्या सीमेवर तैनात करणे पाकिस्तानला परवडणारे नाही. जितका आतला धुमाकुळ वाढत जाईल, तितके पाकसेनेला भारतशी लढणे वा सीमांचे रक्षण करणे अशक्य होऊ शकते. म्हणूनच मग जिहादी खेळ चालू ठेवणे परवडणारे नाही. त्याच दिशेने भारताला काही करावे लागेल. पाकसेनेला शह देण्याचा एकमेव तोच उपाय आहे. पार्थसारथी यांचे मत अतिशय सूचक भाषेतील आहे. त्याचा अर्थ असा, की पाकिस्तानातच पाकसेनेला जितके सुरक्षा व बचावात्मक कारवायांमध्ये गुंतून ठेवता येईल, तितके त्यांना जिहादी खेळापासून दूर रहाणे भाग पडेल.

याचा अर्थ फ़ारसा रहस्यमय नाही. पाकसेनेला तिथल्या राजकीय सत्तेत रस असेल तर त्यांना पाकिस्तान टिकवून ठेवणे भाग आहे. म्हणूनच पाकिस्तानचे तुकडे पडतील वा अंतर्गत बंडाळी माजेल, तर ती रोखण्याला पाकसेनेला प्राधान्य द्यावे लागेल. ते द्यायचे तर भारतात गडबडी करण्यासाठी त्यांच्यापाशी शक्ती वा सवड उरणार नाही. पाकसेनेला भारताशी बोलणी नको असली तरी त्यात नाक खुपसण्याची संधी नाकारणे, हाच त्यावरचा उपाय आहे. हे काम भारताने कसे करावे? त्याचा उलगडा हवा असेल तर आठ महिन्यापुर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेले सूचक वक्तव्य विचारात घ्यावे लागेल. एका सेमिनारमध्ये बोलताना पर्रीकर यांनी जिहादी घातपात्यांनाच पाकिस्तानी कारवायांच्या विरोधात उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. काट्याने काटा काढणे, असे त्यांचे नेमके शब्द होते. पाकिस्ताननेच तयार केलेले व नाराज निराश असलेले घातपाती पाकिस्तान विरोधात वापरले जाऊ शकतात, असेच पर्रीकरांना सुचवायचे होते. तसा एक प्रयोग माजी सरसेनापती जनरल व्ही. के. सिंग यांनी काश्मिरमध्ये वापरलाही होता. काश्मिर व व्याप्त काश्मिरात भारतीय सेनादलाच्या प्रेरणेने अनेक जिहादी पाकिस्तान विरोधातल्या कारवाया करीत होते. त्या खास विभागाला ‘टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन’ असे नाव दिलेले होते. पण त्यातून ज्या छुप्या कारवाया चालू होत्या, त्याला सुरूंग लावण्याचे पाप तीन वर्षापुर्वी भारतीय माध्यमातील काही दगाबाजांनी केलेले होते. काश्मिरात सुरक्षेच्या नावाखाली सेनादलाचे लोक राजकीय उचापती करतात, असा गाजावाजा बातम्यातून झालेला होता आणि त्यामुळे तात्कालीन सेनाप्रमुखांनी तो विभागच बरखास्त करून टाकला होता. पर्रीकर वा पार्थसारथी त्याच ‘टेक्नीकल’ कारवायांचा सूचक उल्लेख करीत आहेत. पाकिस्तानात अशा ‘टेक्नीकल’ कारवाया होऊ लागल्या, तर पाकसेनेला पठाणकोटकडे बघायला सवड मिळू शकणार नाही.

थोडक्यात भारतीय हेरखात्याने पाक हेरखात्याप्रमाणेच पाकिस्तानी भूमीत घातपात व हिंसाचाराचे थैमान घालावे, अशी ही सूचना आहे. इवलासा दरिद्री पाकिस्तान इथे भारतातल्या नाराज वा गद्दारांना हाताशी धरून इतकी धमाल उडवून देवू शकत असेल, तर अधिक साधनसंपत्ती असलेल्या भारताला इवल्या पाकिस्तानात घातपाताची मालिकाच घडवून आणणे अजिबात आघड नाही. अर्थात त्यासाठी दिर्घकाळ प्रयास करून प्रयत्नपुर्वक आपले विश्वासू हस्तक निर्माण करावे लागतात. त्यांच्यामार्फ़त मग विविध घटना घडवून आणल्या जाऊ शकतात. पाकिस्तानप्रमाणे प्रशिक्षित परकीय घातपाती पाठवण्याची गरज नाही. जे जिहादी पाकसेनेनेच सज्ज केलेले आहेत, त्यांना अधिक मोबदला देवून पाकिस्तान विरोधात वापरले जाऊ शकते. त्याची जबाबदारी कुठल्याही देशाचे सरकार घेत नसते. अशा कारवाया आजही चालू आहेत. पाकिस्तानी वर्तमानपत्रे चाळली तर तिथे भारतीय हेरखात्याचे हस्तक पकडले वा त्यांचे कुठले कारस्थान होते, त्याची माहिती सहज मिळू शकते. भारत सरकारने त्याचे उत्तरदायित्व कधी पत्करलेले नाही. फ़रक एकच आहे. भारतात मारले वा पकडले जाणारे घातपाती पाकिस्तानी नागरिक असतात. पाकिस्तानने पकडलेले घातपाती संशयित त्यांच्या देशाचे नागरिक असतात. त्यांची गद्दार म्हणून संभावना केली जाते. अशाच लोकांना मोठ्या प्रमाणात हाताशी धरून पाकिस्तान अंतर्गत अशांतता व अराजक निर्माण करणे हाच भारताने पाकिस्तानला मुहतोड जबाब देण्याचा उत्तम उपाय आहे, असेच पार्थसारथी सुचवत आहेत. त्याची दुसरी बाजूही लक्षात घेण्याची गरज आहे. बोलणी वा वाटाघाटी रद्द करण्याची गरज नाही, तर त्याचीच पाकसेनेला निकड वाटण्याइतकी त्यांची तारांबळ उडवून देणे, हाच उपाय त्यांनी सुचवला आहे. वाटाघाटी व बोलणी करण्यासाठी पाकसेनेला दबावाखाली आणणे, हा तो पर्याय आहे.

कुठलाही देश वा तिथले सरकार आपण परदेशी वा शत्रू राष्ट्रामध्ये घातपात दगाबाजी करतो, हे मान्य करणार नाही. पण म्हणून त्यात तथ्य नसते. भारतही त्यामधला अपवाद नाही. आपला शेजारी मित्र असो किंव शत्रू असो, त्याला दुर्बळ वा गुंतलेला ठेवणे, हा सुरक्षेचा उत्तम उपाय असतो. त्यासाठीच पडद्याआडून परदेशी कारवाया चालू असतात आणि तेच तर हेरखात्याचे काम असते. भारताचे तसे जाळे पाकिस्तानात नाही, असे म्हणण्यात म्हणूनच अर्थ नाही. तसा मुर्खपणा मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल यांनी पंतप्रधान असताना केलेला होता. अन्यथा भारतीय हेरखात्याने सतत आपल्या शत्रू किंवा शेजारी देशांना दबावाखाली राखलेले आहे. बांगलादेशची लढाई आपण त्यामुळेच जिंकू शकलो होतो. तिथल्या नेतृत्वाने म्हणजे शेख मुजीबूर रेहमान यांनी मदत मागितली आणि म्हणूनच त्या ‘राजकीय नेत्याला’ पाठींबा देताना तिथल्या तात्कालीन ‘पाकसेनेला’ भारताने पाणी पाजले होते ना? त्या विजयाचा खरा आधार तिथल्या जनतेला पाकसेनेपासून वेगळे पाडण्यात सामावला होता. आजही पाकसेना आणि पाक नागरी समाज वा राजकीय नेतृत्व यांना वेगळे पाडण्यात भारतीय मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली, तर त्याचाही बांगलादेश होऊ शकतो. लढाई वा प्रतिहल्ला यापेक्षा पाकसेनेला दाती तृण धरायची वेळ आणणे, हाच उपाय आहे. यात युद्धापेक्षा पाकसेनेला अंतर्गत सुरक्षेच्या समस्येखाली दडपून टाकणे आवश्यक आहे. दोन देशातले मुत्सद्दी वा राजकीय नेते आणि सेनादले काय करतात, यापेक्षा त्यापैकी कुणाचे हेरखाते कुरघोडी करून दाखवते, यावर परिणाम अवलंबून असतील. पाकिस्तानला आतून बाहेरून ओळखणारे पार्थसारथी काय म्हणतात, ते म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. त्यातला गर्भितार्थ ओळखला पाहिजे. भावनांनी प्रश्न सुटत नसतात. विचारपुर्वक योजलेल्या उपायांनी सुटू शकतात.

Monday, January 4, 2016

बलात्कार्‍याशी दोस्ती करावी?



एक गोष्ट मान्य करावीच लागेल, की भारतात कुठल्याही क्षेत्रातले जाणकार व विशेषज्ञ प्रचंड संख्येने आहेत. अर्थकारण, राजकारण असो किंवा समाजकारण वा सुरक्षेचा विषय असो, प्रत्येक बाबतीतले हजारो जाणकार भारतात पैशाला पासरी उपलब्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की त्यांच्या गुणवत्तेची या देशात कदर होत नाही. म्हणजे अर्थातच सरकारला वा सत्ताधार्‍यांना त्यांची पात्रता ओळखता आलेली नाही, असे वाटू शकेल. पण तेही खरे नाही. तुमची पात्रता इतरांनी ओळखून तुम्हाला तशी संधी देणे नंतरची गोष्ट असते. निदान तुम्हाला तरी आपल्यातली गुणवत्ता व पात्रता ओळखता यायला हवी ना? तसे असते, तर राजकीय वक्ता प्रवक्ता होण्यासाठी रत्नाकर महाजन वा कुमार सप्तर्षी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर कशाला झाले असते? पण आपल्यात ठासून भरलेली राज्यशास्त्राची पात्रता न ओळखताच ते डॉक्टर व्हायला गेले आणि उर्वरीत आयुष्यात राजकीय पोस्टमार्टेम करीत राहिलेत. बहूतेक क्षेत्रात हीच शोकांतिका दिसेल. म्हणूनच ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. अन्यथा जब्बार पटेल वा श्रीराम लागू अभिनेते कलावंत कशाला झाले असते? कुमार केतकर संपादक होऊन खर्डेघाशी कशाला करीत बसले असते? त्यांच्या जागी मोदी, जेटली, पर्रीकर किंवा अन्थोनी असे लोक देशाची सत्तासुत्रे कशाला संभाळत बसले असते? कुणा गावातील वा गल्लीतील शरद पवार किंवा निलंगेकरांना निवडणूका लढवण्याची वेळ कशाला आली असती? कुणा अजित डोवाल किंवा व्ही. के. सिंग अशा लोकांना सुरक्षेचे खास प्रशिक्षण घेऊन देशाच्या सुरक्षेचा गोंधळ घालण्याची संधी कशाला मिळू शकली असती? सचिन तेंडुलकर वा विराट कोहलीला क्रिकेट तरी कशाला खेळावे लागले असते ना? मोक्याच्या जागी असे चुकणारे बसलेत आणि ज्यांच्यात खरी पात्रता आहे, ते चुकचुकत बाहेर बसलेत. ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका झालेली आहे.

मुंबईवरचा हल्ला किंवा पठाणकोटचा हल्ला झाल्यावरच्या प्रतिक्रिया बघितल्या, मग याचे खुप वैषम्य वाटते. भारतात गुणांची काही किंमत नाही. गुणीजनांना असे कोपर्‍यात ठेवून भारताला प्रगती करणे कसे शक्य आहे? दोनतीन दिवस वाहिन्यांवरील चर्चा आरोप-प्रत्यारोप ऐकले, त्याचा यापेक्षा अधिक काही अर्थ होऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी वा कुणा संपादक पत्रकाराकडे देशाच्या सुरक्षेची सुत्रे असती, तर पाकिस्तानला वा जिहादींना भारताकडे वाकडी नजरही करायची हिंमत झाली नसती, याची खात्री पटून जाते. कुठल्या परिस्थितीत काय करावे आणि ज्यांनी काही केले ते नेमके कसे चुकले, याचे तपशील आपल्या पत्रकार व जाणकारांकडे सापडू शकतात. परराष्ट्र धोरण कसे असावे आणि त्यात कधी ठामपणा व कुठे लवचिकता असावी, हे सरकारला कधीच कळत नाही. पण सोशल मीडियापासून वाहिन्यांपर्यंत सर्वांना नेमके ठाऊक असते. मात्र ते काम करायला आपणच पुढाकार करायची बुद्धी अशा गुणवंतांना कधीच होत नाही. खरे तर देशाचे सुरक्षा व परराष्ट्र धोरण ठरवायचा अधिकार सरकारकडून काढून घेतला पाहिजे. ते धोरण वाहिन्यांच्या चर्चेतून वा वादावादीतून ठरवले गेले पाहिजे. त्यात पाकिस्तान व अन्य देशातले माजी अधिकारी व नेत्यांना समाविष्ट करून ठरवावे. तो मसूदा आपल्याकडे सोपवला जाईपर्यंत सरकारने हातावर हात ठेवून बसावे. किती छान कारभार होऊ शकेल ना? बंदुकीची एक गोळी सुद्धा झाडावी लागणार नाही, की सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी अब्जावधी रुपयेही खर्चावे लागणार नाहीत. देशात कुठे बलात्कार होणार नाहीत की कुठल्याही कोर्टात कुणाला न्यायासाठी दाद मागावी लागणार नाही. सामान्य भारतीय नागरिकांनी याचा विचार आता गंभीरपणे करण्याची गरज आहे. जाणते, प्रशिक्षित आणि राजकीय नेत्यांना नारळ देवून माध्यमातून झळकणार्‍यांना देशाची सुत्रे सोपवावीत.

इतके झाले, मग आपल्याला निश्चींत मनाने झोपता येईल. म्हणजे डोळे झाकून प्रश्न सुटले असे समजायला हरकत नाही. सैनिक व सेनाच शिल्लक उरणार नाही, तर सैनिकांची हत्या होऊन त्यांना शहीद व्हायची तरी वेळ कशाला येईल? भारताने शेजारी व शत्रू देशांचा विश्वास संपादन केला आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, म्हणजे भारताला सुरक्षा दलांची गरजही उरणार नाही. आक्रमणाचीच शक्यता राहाणार नाही, मग लढाईचा तरी प्रसंग कशाल येईल ना? पर्यायाने सैन्य शस्त्रास्त्रे वा दारूगोळाही अनावश्यक खर्च होऊन जाईल. बरखा दत्त, मणिशंकर अय्यर, दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी त्यासाठी किती अखंड झटत असतात ना? त्यालाच नेहरूवाद म्हणतात. जिथे युद्ध शत्रूत्व यांना स्थान नसते. सैन्याची गरज नसते. पाकने आपल्याशी क्रिकेट खेळावे आणि भारतात पाकिस्तानी गायकांनी मैफ़ली रंगवाव्यात. अधूनमधून कंटाळा आल्यावर तिथल्या जिहादींनी इथे काही माणसे घातपात करून मारावीत. आपल्याकडे मरायला माणसांची संख्या कुठे कमी आहे? वर्षभरात एकदिड लाख माणसे अशी मारली गेली, म्हणून किती फ़रक पडतो? सव्वाशे कोटी माणसे टिपून मारायला जिहादींच्या कित्येक पिढ्या खर्ची पडतील. तरीही भारताची लोकसंख्या संपवणे त्यांना शक्य होणार नाही. मारून संपणार नाही, इतकी प्रचंड लोकसंख्या हे आपले सर्वात मोठे हत्यार आहे आणि तेच तर नेहरूवादी पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपल्याला नसती हिंसेची व लढाईची खुमखुमी असते, म्हणून हा सैन्य व सुरक्षा खर्चाचा बोजा उचलावा लागतो. नेहरूंच्या एकट्याच्या हाती असते तर त्यांनी तेव्हाच भारतीय सेना बरखास्त करून टाकल्या असत्या. नव्हे तसा त्यांचा विचारही होता. पण पाकिस्तानी नेत्यांनी मुर्खपणा केला आणि भारताला हा लष्कर उभारण्याचा खर्चिक बोजा उचलावा लागला.

नेहरूंना मुळातच देशावर कुठून हल्ला होईल वा लढाई करावी लागेल असे वाटत नव्हते. म्हणूनच ब्रिटीशांनी उभारलेली भारतीय सेना बरखास्त करून टाकण्याचा त्यांचा मनोदय होता. पण तेव्हाच पाकिस्तानने काश्मिरमध्ये घुसखोरी केली व सेना घुसवल्या आणि त्याचा प्रतिकार सैन्यबळाने करावा लागला. थोडक्यात पाकिस्तानने जी चुक केली, त्यामुळे भारतीय सेना बचावली. अन्यथा नेहरूंनी सेनादले बरखास्त करायचा विचार पक्का केलेला होता. आजचे त्यांचे वैचारिक वारस म्हणूनच पाकिस्तानशी दोस्ती हवी आणि त्यासाठी लष्करी कारवाईला विरोध करीत असतात. त्यांनाच गेल्या अर्धशतकात बुद्धीमंत जाणकार किंवा अभ्यासक मानण्याची आपल्या देशात प्रथा आहे. म्हणून सुधींद्र कुलकर्णी पाकनेत्यांची शांततावादी पुस्तके भारतात प्रकाशित करतात. मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी मुशर्रफ़ यांची मदत मागू शकतात. कारण तोच शांततेचा व मैत्रीचा मार्ग आहे. बलात्कार्‍याशी तडजोड केली व त्याला शरण गेले, तर कधी कुठल्या मुलीवर महिलेवर बलात्कार होऊ शकेल काय? हल्लेखोराला बलात्कारापासून वंचित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या इच्छेला आक्रमणाला शरण जाणे. मग त्याला बलात्काराचे सुख मिळू शकत नाही. यापेक्षा असल्या भूमिका किती भिन्न असतात? बलात्कारीतेने किती व कसा आपला बचाव केला किंवा केला नाही, असे प्रश्न कोर्टात विचारण्याची कुशाग्र बुद्धी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचे युक्तीवाद किती समान आहेत ना? सुरक्षेतील गाफ़ीलपणा हलगर्जीपणा क्षम्य नसतोच. पण जखमा ओल्या असताना त्यावर असा मिठाचा मारा करण्याला बुद्धीमत्ता मानले जाते, तिथे कुठलीही गोष्ट सुरक्षित असू शकत नाही. सुरक्षा दले किंवा यंत्रणांना खच्ची वा गाफ़ील करण्यासाठी आपले बौद्धिक युक्तीवाद कसे कारण झालेत, याचाही कधी विचार कोणी करणार आहे काय?

गुलाम अलीची गझल आणि पझल



गेल्या दोन दिवसात पाकच्या जिहादी हल्लेखोरांनी पठाणकोट येथील हवाई तळावर हल्ला केल्यावर गादारोळ सुरू झाला आहे. त्यात भारतीय गुप्तचर व सुरक्षा यंत्रणा यांना नालायक ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात काही नवे नाही. कारण सुरक्षा जितकी माध्यमातून बकवास करणार्‍यांना कळते, तितकी सैनिकांना वा हेरांना उमजत नसावी. जिहादी भारतात घुसूच कसे शकतात, इथपासून गुप्तचर विभाग झोपा काढत होता काय, असे सवाल विचारले जात आहेत. पण हेच सवाल करणार्‍यांना पाकिस्तानच्या घातपाती धोरणांबद्दल इतका राग कशाला? घातपात करणे हा पाकिस्तानचा अधिकारच आहे, अशीच त्यांची समजूत आहे ना? भारत-पाक नागरिकांना दोस्ती हवी म्हणून सतत प्रवचन करणारे, आता कशाला हातपाय आपटत आहेत? काही महिन्यांपुर्वी कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत होण्याच्या विरोधात मुंबईत शिवसेनेने निदर्शने केली होती. आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासले होते. तेव्हा शिवसेनेच्या नावाने शिव्याशाप देणारेच आता पाक नागरिकांना घातपाती म्हणत आहेत. जे कोणी पठाणकोट येथे आले ते पाक सैनिक नाहीत, तर पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना भारतीय नागरिकांशी ‘मैत्री’ साधायची आहे. त्यातूनच मग पठाणकोटची घटना घडत असते. कारण पाकिस्तानात भारत मैत्री कधीच शिकवली जात नाही. कोवळ्या वयातल्या मुलांना शाळकरी अभ्यासक्रमातून भारतद्वेष शिकवला जात असतो. त्यापासून जे वंचित रहातात त्यांना मदरश्यातून भारताशी शत्रूत्व शिकवले जात असते. म्हणूनच भारताशी प्रेमाचे संबंध ठेवायचे म्हणजे भारत व तिथल्या नागरिकांना रक्तबंबाळ करायचे, अशी मानसिकता पाकिस्तानात जोपासली जात असते. त्याच मानसिकतेचे चोचले करणार्‍यांना पठाणकोटच्या हल्ल्यापेक्षा अन्य काय अपेक्षित असू शकते? गुलाम अलीची गझल हा त्यावरचा निव्वळ मुखवटा असतो.

सुधींद्र कुलकर्णीच्या दरम्यानच मुंबईत गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्या आयोजकांशी बोलून शिवसेनेने तोही रद्द करायला भाग पाडले. तेव्हा अनेक कलाप्रेमी संगीतप्रेमी रडकुंडीला आलेले होते. केजरीवाल सारख्यांनी तर गुलाम अलीला दिल्लीत आमंत्रित करायला पुढाकार घेतला होता. गुलाम अली हा पाकिस्तानचा चेहरा नव्हे तर मुखवटा असतो. त्याच्या मागे कसाब वा तत्सम कोणाचा हिडीस चेहरा असतो. गझल गावून तुम्हाला गुंग करायचे आणि गाफ़ील झालात मग तुम्हाला रक्तबंबाळ करायचे, ही रणनिती त्यामागे आहे. आज ज्यांनी माध्यमात लेफ़्टनंट कर्नल निरंजन याला श्रद्धांजली वहाण्याचे नाटक चालविले आहे. त्यांनाच कालपर्यंत गुलाम अलीची गझल ऐकायची होती ना? ती गझल ऐकून दोन देशातले संबंध सुधारू शकतील काय? तसे असते तर अशा पाकिस्तानी गायकांनी आपल्या देशात हिंसेचे कारखाने चालवणार्‍यांचा खुलेआम निषेध तरी नक्कीच केला असता. इथले तथाकथित कलावंत गुलम अलीच्या समर्थनाला उभे राहून शिवसेनेचा निषेध करताना आपण नेहमी बघतो. पण ज्याच्यावर मुंबई हल्ला वा अन्य घातपाताचे शेकडो आरोप आहेत, त्या सईद हाफ़ीजचा गुलाम अलीने एकदा तरी निषेध केल्याचे कोणी ऐकले आहे काय? नसेल तर त्याचे वा त्याच्यासारख्या पाकिस्तानी कलावंताचे मौनच त्या जिहादी हिंसेचे समर्थन करीत नसते काय? ज्यांना साधा हिंसाचाराच्या निषेधाचा सूर आळवता येत नाही, त्याच्याकडून कुठले गाणे वा गझल गायली जाऊ शकते? त्याच्या गाण्यातून कुठली संस्कृती जोपासली जाऊ शकेल? पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाहोर दौर्‍याचे हेच काय फ़लित, असा प्रश्न विचारणारे कित्येक आहेत. पण गुलाम अलीच्या गझलेला मिळालेली हीच दाद आहे काय, असा प्रश्न त्यांच्या मनात कशाला आलेला नाही?

दोन शेजारी देश शत्रू असले तरी तिथल्या नेत्यांना परस्परांशी बोलचाल ठेवावीच लागते. तो राजशिष्टाचार असतो. पण जेव्हा शत्रूत्व इतक्या टोकाला गेलेले असते, तेव्हा त्यांच्यात कुठलीच सांस्कृतिक कलात्मक देवाणघेवाण व्हायला काही कारण नसते. प्रामुख्याने जेव्हा एका देशातले लोक नुसताच द्वेष करतात आणि शत्रुत्वानेच वागतात, तेव्हा कला-संस्कृतीशी त्यांचा संबंध उरलेला नसतो. म्हणूनच गुलाम अली वा अन्य कोणी पाकिस्तानी कलावंत कितीही उत्तम गायक असला, तरी त्याला मुखवटाच म्हणावे लागते. गुलाम अली त्याला अपवाद नाही. मोदींच्या लाहोर भेटीने काय साधले हा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना गुलाम अलीच्या गझलेतून आजवर काय साध्य झाले, त्याचे उत्तर अजून का देता आलेले नाही? दोन देशात क्रिडा वा कलेची इतकी देवाणघेवाण होऊनही घातपाती कृत्ये कशाला थांबू शकलेली नाहीत? कारण स्पष्ट आहे. कला हा पाकिस्तानचा मुखवटा आहे. तर जिहाद हाच चेहरा आहे. त्यावर राजकीय उत्तर सापडत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या कलात्मक मुखवट्याला भुलणे, हा मुर्खपणा नव्हे तर आत्मघात असतो. म्हणून कसुरी वा गुलाम अली यांना इथे मिरवायला येऊ देता कामा नये. चांगुलपणाची कदर होत नसेल, तर असला चांगुलपणा हे संकटाला दिलेले आमंत्रण असते. हे खरेच कलावंत असतील आणि कलेला सीमेच्या व राजकारणाच्या मर्यादा नसतील, तर पाक कलावंतांना नावे घेऊन ह्सईद हाफ़ीज वा तत्सम जिहादींचा निषेध करता आला पाहिजे. कोणी एक क्रिकेटपटू वा पाक कलावंताने आजवर शब्दाने तरी अशा जिहादी संघटनांचा निषेध कशाला केलेला नाही? करणार कसे? मुखवटा कधी अस्सल चेहर्‍याचा निषेध करीत नसतो. तसे केल्याच हिडीस चेहराच मुखवटा उतरून त्याला पायदळी तुडवू शकतो. गुलाम अलीचा तोच खरा चेहरा आहे.

थोडीही तो पी ली है, हंगामा है क्यु बरपा? असा सवाल तोच गुलाम अली विचारतो. त्याचा अर्थ आपण कधी उलगडून बघितला आहे काय? इतका मोठा तुमचा देश हिंदूस्तान, त्यातली शेदोनशे माणसे आमच्या जिहादींनी मारली, तर कल्लोळ कसला करता? सव्वाशे कोटीतली सव्वासे माणसे मेली, तर हंगमा कशाला माजवता? हाच त्या गायकाचा सवाल नाही काय? गुलाम अलीच्या गझलचे हे पझल म्हणजे कोडे, कुणा बुद्धीमंताला कधी सोडवावे असेही वाटू नये? क्रिकेटपटू असोत की गायक कलावंत कुणा पाकिस्तान्याने त्याच्याच देशबांधवाने भारतात माजवलेल्या हिंसेचा चुकून निषेधही कशाला करू नये? हे पझल आजवर का सुटलेले नाही? शिवसेनेने हुल्लड माजवली तर निषेधाला आमचे एकाहून एक बुद्धीमंत कलावंत सज्ज असतात. पण त्याचे प्रतिबिंब पाकिस्तानच्या कला सांस्कृतिक क्षेत्रात पडताना का दिसत नाही? सेनेच्या हुल्लडबाजीच्या शेकडो पटीने पठाणकोटची घटना भयंकर आहे. पण एका तरी पाक मान्यवराने त्यासाठी नाव घेऊन जिहादी संघटनेचा निषेध अजून केलेला नाही. हेच ते गझल मागचे पझल आहे. पण ते सोडवायची बुद्धी इथल्या बुद्धीवादी प्रांतात नाही. त्यापेक्षा त्यांची अक्कल गुलाम अलीची गझल ऐकायला उतावळी आहे. जोवर असे बुद्धीमंत भारतात आहेत, तोवर कुठलाही जिहादी हिंसाचार भारतीयांचे बळी घेतच रहाणार आहे आणि त्यात जवानांचे हकनाक बळी पडतच रहाणार आहेत. शत्रू सीमेपलिकडे नाही, की जिहादी छावण्यामध्ये नाही. शत्रू इथे आपल्यातच उजळमाथ्याने वावरत आहेत. पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा गुलाम अलीच्या गझला ऐकत मरणाला शरण जावे, हा आपला सेक्युलर मंत्र झालेला आहे. मग आपल्याला कुठला सैनिक वा सुरक्षा यंत्रणा वाचवू शकणार? हजार सैनिकांना एक गुलाम अलीचा गझलभक्त मारत असतो ना?

Saturday, January 2, 2016

मोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी



२ मे २०११ रोजी एका आकस्मिक हल्ल्यात अमेरिकन कमांडो पथकाने पाकिस्तानच्या लष्करी तळावर मर्यादित छापा मारून तिथे दडलेल्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केलेला होता. त्यातला तपशील जगजाहिर आहे. तो सगळा प्रसंग इथे नमूद करण्याची गरज नाही. पण त्यामुळे पाकिस्तानचे जगभर नाक कापले गेले होते. पाकिस्तानी सेनेला तर तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. त्यानंतर तिथे शिव्याशापाचे नाट्यही रंगले आणि पाकिस्तानी सार्वभौमत्वाचे अमेरिकेने उल्लंघन केल्याचाही खुप गाजावाजा झालेला होता. पण अमेरिकेला ‘धडा’ शिकवण्य़ाची कुवत नसलेल्या पाकसेना किंवा हेरखात्याला अधिक काही करता आलेले नव्हते. पण ठुसठुसणारी वेदना त्यांना शांत बसू देत नव्हती. आपल्याच जनतेसमोर काही पराक्रम करून दाखवण्य़ाला पर्याय नव्हता. म्हणून मग पाकिस्तानने अमेरिकेचे आपण मांडलिक नसल्याचे नाटक रंगवणारी एक कृती केलेली होती. कराची बंदरातून अफ़गाणिस्तानला जाणार्‍या अमेरिकन साहित्य पुरवठ्याची रसद तोडलेली होती. त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे फ़ारसे काही नुकसान झाले नाही, की अमेरिकेच्या अफ़गाण राजकारणाला धक्का बसला नाही. पण आपण अमेरिकेचे गुलाम नाही वा अमेरिकेलाही दाद देत नाही, असे भासवण्यात पाक सेना व गुप्तचर खात्याला यश मिळाले होते. ओसामाची हत्या हा पाकसेना व हेरखात्याची देशाच्या घडमोडींवर असलेली पकड ढिली पडल्याचा पुरावा होता. कारण लष्कराच्या मुख्यालयाच्या नजिक असलेल्या सुरक्षित घरात घुसून अमेरिकन कमांडोंनी ती धाडसी कारवाई केली होती. नुसती कारवाई केली नाही, तर ओसामाच्या मृतदेहासह हे कमांडो सुखरूप पाकिस्तानातून निसटले होते. कुठल्याही सुरक्षा दल वा हेरखात्यासाठी ही नामुष्कीची गोष्ट असते. साडेचार वर्षांनी काहीशी तशीच घटना आठवड्यापुर्वी घडली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाभेट उरकून माघारी मायदेशी येत असताना काबुल येथे काही कार्यक्रमासाठी थांबले होते. मग दिल्लीला येताना त्यांनी अकस्मात पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला आणि अवघ्या दोन तासात ते लाहोरला पोहोचले सुद्धा! त्यांच्या स्वागताला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही अगत्याने उपस्थित राहिले आणि मोदींना घेऊन आपल्या घरीही गेले. घरगुती कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली आणि त्यांच्यासोबत त्यांचे निवडक अंगरक्षकही होते. ही बाब वरकरणी अगदी साधी सोपी किंवा आगावू धाडसाची वाटणेही स्वाभाविक आहे. कारण भारतीय पंतप्रधानाच्या जीवाला पाकिस्तानात धोका आहे. विशेषत: मोदीद्वेष त्याचे आणखी एक कारण आहे. म्हणून मोदींनी हा आगावूपणा करायला नको होता, असेही मानले जाते. त्यात तथ्य जरूर आहे. पण खरेच धोका होता काय? कोणाकडून असा धोका मोदींना होता? ज्यांच्यापासून धोका संभवत होता, त्यांनाच गाफ़ील ठेवले तर धोका उरत नसतो. नेमकी तीच काळजी लाहोर भेटीच्या निमीत्ताने घेतली गेलेली होती. अवघा एक तास आधी काबुलहून बातमी आली, की भारताचा पंतप्रधान लाहोरला धावती भेट देणार आणि तिथेच नवाज शरीफ़ व मोदी भेट होणार आहे. प्रत्यक्षात मोदी लाहोरला पोहोचले, तेव्हा अखेरच्या क्षणी शरीफ़ त्यांना हेलिकॉप्टरने आपल्या खानदानी घरी घेऊन गेले. म्हणजे मोदी लाहोर विमानतळ सोडून बाहेर जाणार याविषयीही शेवटच्या क्षणापर्यंत पाक प्रशासनाला अंधारात ठेवले गेले. पर्यायाने हेरखाते व पाकसेनेलाही अंधारात ठेवले गेले. आपल्याशिवाय पाकच्या नागरी सरकारचे पानही हलत नाही अशी मस्ती असलेल्यांना त्यामुळे मिरच्या झोंबल्या तर नवल नाही. पाकचा पंतप्रधान असे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मोदींच्या लाहोरभेटीने त्यालाच तडा गेलेला आहे. त्यामुळे पाकसेना व हेरखात्याला डिवचले गेले आहे.

यातली एक महत्वाची बाब भारतीय वा जागतिक माध्यमात कुठेच चर्चिली गेली नाही. मोदींनी वा भारतीय विमानाने पाकिस्तानी विमानतळावर उतरणे वा शरीफ़ यांनी तिथे येऊन मोदींची भेट घेण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. कुठलेही गैरलागू कृत्य त्यातून झाले असेही म्हणायला जागा नाही. कारण आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेली शासकीय यंत्रणा कोणाला देशात प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेत असते. विमानतळाच्या बाहेर तुम्ही त्या देशाच व्हिसा असल्याशिवाय जाऊ शकत नाही. पण मोदी आपल्या मोजक्या अंगरक्षकांसह तिथून हेलिकॉप्टरने विमानतळाच्या कक्षेबाहेर गेलेले होते. निदान सव्वा तास मोदींचा ताफ़ा शरीफ़ यांच्यासोबत लाहोरपासून दूर असलेल्या खानदानी घरी गेलेला होता. यातल्या कितीजणांपाशी पाकिस्तानचा व्हिसा होता? मोदी पंतप्रधान असल्याने त्यांच्यापाशी विविध देशांचा व्हिसा असू शकेल. पण त्यांच्या सर्व सहकारी व अंगरक्षकांपाशी पाकिस्तानचा व्हिसा नक्कीच नव्हता. त्यात कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याविषयी पाक सरकारलाही संपुर्ण माहिती नव्हती. म्हणजेच मोदींनी शरीफ़ यांच्या घरगुती कार्यक्रमाला हजर रहाण्यातून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला तडा दिला गेला आहे. भले त्यांना शरीफ़ घेऊन गेले असतील. पण त्यात राजशिष्टाचारच नव्हेतर कायदाही मोडला गेलेला आहे. त्यातून एकप्रकारे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला व कार्यशैलीला बगल दिली गेलेली आहे. दोन देशांचे प्रमुख कितीही व्यक्तीगत मित्र असले, तरी त्यांना देशाचे वा कुठलेही कायदे मोडण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत शरीफ़ सौदी अरेबियात परागंदा जीवन जगत होते आणि त्यांनी पाकिस्तानात येण्याचा आगावूपणा केला, तेव्हा त्यांना विमानतळावरून पिटाळून लावल्याचे राजकीय नाट्य रंगलेले होते. मग त्याच कृतीला मोदी अपवाद कसे असू शकतात?

पाकसेना व हेरखात्याला म्हणूनच मोदींची लाहोरभेट खुपलेली आहे. शरीफ़ यांनी मोदींशी संगनमत करून आपल्याला उल्लू बनवले, ही त्यांची वेदना असल्यास आश्चर्य नाही. शरीफ़ भारताशी कितीही दोस्तीला प्रयत्न करतील, पण शरीफ़ हा पाकिस्तानचा अखेरचा शब्द नाही आणि त्यांनी मान्य केलेल्या गोष्टी पाक सेना व हेरखाते मान्य करणार नाही, हे कुठून तरी दाखवून द्यायला हवे ना? ते दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतात कुठेतरी मोठा धमाकेबाज घातपाती हल्ला करणे होय. तीच गोष्ट शनिवारी पठाणकोटच्या हल्ल्यातून साधली गेली आहे. त्या हल्ल्याचे नियोजन बारकाईने केलेले होते. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण अशा हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे आधीपासून प्रतिकाराची सज्जता राखलेली होती. पण असा हल्ला इतक्या घाईगर्दीने करण्यामागे पाक सेना व हेरखात्याचे नैराश्य मात्र स्पष्ट होते. काहीतरी तातडीने करायचे म्हणून हा हल्ला झालेला आहे. आणि त्यावरच्या भारत सरकारच्या अधिकृत प्रतिक्रीयाही बोलक्या आहेत. प्रथमच भारत सरकार थेट पाकिस्तानला दोष देत नसून पाक सेना व हेरखात्यावर हल्ल्याचे खापर फ़ोडते आहे. सेना व हेरखाते यांच्यापासून पाक नागरी सत्ता व राजकारणी यांना वेगळे पाडण्याचा हा प्रयत्न लपून रहात नाही. दोन देशातली बोलणी हा देखावा असू शकतो, यापेक्षा पाकिस्तानवर असलेली लष्कर व हेरखात्याची पकड सैल करण्याचा डावपे़च यामागे असावा अशीच शंका येते. शरीफ़ व मोदी असे दोन राष्ट्रप्रमुख कुठले समान संयुक्त उद्दीष्ट गाठण्याचा प्रयास करीत आहेत, त्याचे विवेचन विश्लेषण म्हणूनच नुसता जुना इतिहास उगाळून होऊ शकणार नाही. त्यामागची कुटनिती व हेतू शोधून अभ्यासावे लागतील. आपल्याच सेना व हेरखात्याला शरीफ़ अंधारात ठेवून काय साधू इच्छितात? पाक सेनापती इतके हताश का झालेत? (अपुर्ण)

मधाचे गद्दार सापळे



रणजित के. के. नावाचा एक हवाई दलाचा अधिकारी पाकिस्तानी हस्तक म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अर्थात असा पकडला गेलेला तो पहिलाच भारतीय सुरक्षा दलाचा अधिकारी नाही. आजवर अनेकदा असे हस्तक पकडले गेले आहेत आणि भारताखेरीज अनेक देशातले असे घरभेदी पकडले जात असतात. त्यांना घरभेदी म्हणता येईल, पण गद्दार म्हणणे कितपत रास्त होईल याची शंका आहे. कारण हे लोक मतलबासाठी देशाशी गददारी करीत नसतात, तर कुठल्या तरी सापळ्यात अडकून वापरले जात असतात. रणजित ज्या सापळ्यात अडकला होता त्याला हेरगिरीच्या भाषेत हनी ट्रॅप म्हणचे मधाचा सापळा म्हटले जाते. पुरूषाचे स्त्रीविषयक आकर्षण ओळखून मोक्याच्या जागी असलेल्या अधिकार्‍यांना गुंतवायला आकर्षक व्यक्तीमत्वाच्या महिलांचा त्यात वापर होत असतो. कुठलीही तरूण देखणी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली, तर पुरूषाला त्याच्या मर्दानगीचा तो पुरावा वाटतो आणि अनेकदा ते मायाजाल असते. खाजगी जीवनात किंवा महत्वाच्या जागी बसलेल्या व्यक्तींसाठी असे सापळे लावले जात असतात. कधी त्यांचा वापर गुन्हे करून घेण्यासाठी होतो, तर कधी ब्लॅकमेल करून त्यांना गद्दार व्हायला भाग पाडले जात असते. कधीकधी उलटेही होत असते. महत्वाच्या महिला अधिकारी व्यक्तीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून भावनांच्या खेळात गद्दारी करायला भाग पाडले जात असते. हवाई दलाचा अधिकारी रणजित त्याचाच बळी आहे. आपण कधी अशा सापळ्यात अडकलो आणि भरकटत गेलो, याचा त्याला अंदाजच आला नाही. जेव्हा अंदाज आला तेव्हा मग ब्लॅकमेल सुरू झाला होता. जाळ्यात फ़सलेली शिकार जशी जीवाच्या आकांताने त्यातून निसटण्याचा प्रयत्न करते आणि अधिकच त्यात गुंतत जाते; तशीच त्याची अवस्था झाली. त्याचे प्रकरण महत्वाचे नाही इतका असा सापळा समजून घेण्य़ाची गरज आहे.

अशा गोष्टी आपल्याला नव्या नाहीत. कुठल्याही सिनेमा, मालिका वा कथाकादंबर्‍यात आपण अनेकदा वाचल्या बघितलेल्या या गोष्टी आहेत. आपण त्यापासून अलिप्त प्रेक्षक वाचक असतो, म्हणून त्यात फ़सणारा आपल्याला गाफ़ील वा मुर्ख वाटतो. पण व्यवहारी जगात आपण सगळेच तितके गाफ़ील वा बेफ़िकीर असतो. म्हणूनच अगदी सहज अशा शिकारी जाळ्यात ओढल्या जात असतात. रणजित सोशल माध्यमातून गंमत करत असताना एका ब्रिटीश महिलेने त्याला मैत्रीची विनंती पाठवली, तिचे व्यक्तीमत्व बघून हा पाघळला आणि मैत्री स्विकारून गप्पा करू लागला. ठराविक गप्पा झाल्यावर तुम्ही गाफ़ील होत जाणे अपरिहार्य असते. समोरच्या व्यक्तिवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापर्यंत घसरण होते. तो मानवी स्वभाव आहे. पण जेव्हा समोरची व्यक्ती; मग ती महिला असो किंवा पुरूष असो, चमत्कारीक अपेक्षा करू लागते, तीच सावध होण्याची संधी असते. मानवी मनात संशय निर्माण करण्याची जी व्यवस्था उपलब्ध आहे, तिच्यावर विश्वास ठेवणे भाग असते. पण विवेकापेक्षा माणूस मित्र परिचितांवर विश्वास करू लागला, मग त्याला कोणी वाचवू शकत नाही. रणजितसारख्या लोकांची तीच समस्या असते. ते आपल्या विवेकबुद्धीला नाकारून कुणावरही विश्वास ठेवायला सज्ज असतात. कितीही जवळचा मित्र वा आप्तस्वकीय ज्या गोष्टी आपल्यासमोर मांडतो, तेव्हा त्या खर्‍याच असतात असे नाही. आपण काय मान्य करावे असे त्याला वाटत असते, त्यानुसारच समोरची व्यक्ती आपल्याला माहिती सांगत असते किंवा काही माहिती-तपशील लपवितही असते. जिथे खर्‍या मित्र परिचितांची ही स्थिती असते, तिथे तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठीच जवळ आलेल्यांची काय कथा? ते तुम्हाला आवडणार्‍या व चटकन पटू शकणार्‍या तर्कानेच माहिती वा तपशील पेश करीत असतात. तुमच्या भल्यासाठीच बोलल्याचा आव आणत असतात.

आपण रोजच्या रोज लाखो फ़सलेल्या गुंतवणूकदार वा ग्राहकांच्या कहाण्या बातम्या ऐकत असतो. व्यवहार बघितले तर त्यांना कोणी धाकदपटशा करून लुटलेले नसते. तर स्वेच्छेनेच या लोकांनी आपली कष्टाची कमाई भामट्याकडे सोपवलेली दिसेल. त्याचे कारण काय असते? तर त्याने तुमच्या मनातल्या हव्यास व लोभी मनोवृत्तीला साद घातलेली असते. काही महिन्यात दुप्पट रक्कम करणारी योजना आपल्याला भुरळ घालणारी असते. पण त्यात तथ्य किती असते? खरेच अशा रकमा अल्पावधीत दुप्पट तिप्पट होऊ शकत असतील, तर टाटा वा अंबानी यांच्यासारखे दिग्गज कंपन्या उभ्या करून सरकारी कायद्याच्या कचाट्यातून व्यवसाय करून कित्येक वर्षे का खर्ची घालतील? त्यांनाही अशा झटपट योजनांमध्ये पैसे ओतून झटपट अब्जाधीश होता आले असते ना? पण ते तिकडे पाठ फ़िरवतात आणि कष्टप्रद मार्गानेच उद्योग करतात. कारण दुप्पट चौपट पैसे करून देणार्‍या योजना ही शुद्ध भामटेगिरी असते. पण त्यात फ़सणारे कोण असतात? ते निव्वळ मुर्ख असतात का? तसेही नसते. दुकानात बाजारात किरकोळ वस्तुंच्या किंमतीवरून हुज्जत करून पैसा पैसा वाचवणारे लोकच डोळे झाकून लाखो रुपयांची गुंतवणूक फ़सव्या योजनांमध्ये करतात. कारण त्यांना त्याची भुरळ पडलेली असते. नेमक्या त्याच मानवी वृत्तीचा उपयोग अशा सापळ्यात केलेला असतो. महिलांना प्रेमात ओढून फ़सवले जाते आणि पाप करायला भाग पाडले जाते. आईवडीलांना झुगारून प्रियकरासोबत पळून जाणारी मुलगी आणि प्रेमाच्या आहारी जाऊन आपल्या कर्तव्याशी गद्दारी करणारी महिला अधिकारी, यांच्यात तिळमात्र फ़रक नसतो. यालाच हनिट्रॅप म्हणले जाते. भावनांचा गुंता निर्माण करून त्यात माणसे ओढली जातात आणि त्यांना आप्तस्वकीय किंवा देश समाजाच्या विरोधात हत्याराप्रमाणे वापरले जात असते.

रणजित नावाचा हवाई दलाचा अधिकारी काही गोपनीय माहिती शत्रूला दिल्याने पकडला गेलेला आहे. आजवर असे अनेकजण पकडले गेले आहेत. पण म्हणून तितकेच गद्दार नसतात. अशा रितीने फ़सलेले वा गद्दार झालेले अनेकजण आपल्यातच उजळमाथ्याने वावरत असतात. त्यांचे काय करायचे, हा खरा प्रश्न असतो. खरे तर तोच अधिक गंभीर चिंताजनक प्रश्न आहे. कारण अशा गद्दारांना पकडणेही शक्य नसते. उदाहरणार्थ इशरत जहान नावाच्या तोयबा हस्तकाचा चकमकीत मृत्यू झाला, तेव्हा तिला निरागस निरपराध ठरवण्यासाठी अहोरात्र झटलेले लोक रणजितपेक्षा भिन्न असतात काय? आता हेडलीने माफ़ीचा साक्षीदार व्हायचे ठरवले आहे. त्यानेही इशरत तोयबाची हस्तक असल्याचे पुर्वीच कथन केलेले आहे. आता नव्या साक्षीत त्यावर शिक्कामोर्तब झाले मग काय? इशरतसाठी ज्यांनी भारतीय गुप्तचर खात्याला व त्याच्या अधिकार्‍यांना आरोपी बनवण्याचा घाट घातला होता, त्यांचे काय करायचे? रणजितपेक्षा त्या इशरत भक्तांचे पाप कितीसे कमी आहे? रणजितने सुरक्षास्थळे वा अन्य कुठली माहिती दिली असेल. पण ज्यांनी इशरतसाठी पोलिस व गुप्तचरांनाच आरोपी बनवण्याचा घाट घातला, त्यांनी अशा सुरक्षा कर्मचार्‍यांचे जे मनोधैर्य खच्ची केले, त्यांना कोणी पकडायचे? कशी शिक्षा द्यायची? कारण असे सर्व लोक आजही समाजात उजळमाथ्याने वावरत आहेत, रणजितसारखे पकडले जातात. पण जे खुलेआम देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा गवगवा करीत असतात, त्यांना कुठला कायदा शिक्षा देवू शकणार आहे काय? कारण विविध सापळ्यात फ़सलेले शेकडो शत्रूचे हस्तक आपल्यात प्रतिष्ठीत म्हणून वावरत आहेत. हे सगळे खर्‍या अर्थाने हनिट्रॅप आहेत. पण त्यांचा बंदोबस्त करण्याची कुठली उपाययोजना नाही.

काही महिन्यांपुर्वी पाकव्याप्त काश्मिरमध्ये स्थानिक जनतेने पाक सत्तेविरोधात उठाव केला आणि हिंदूस्तान झिंदाबादच्या घोषणा दिलेल्या होत्या. त्यांच्यावर लष्कर लादून पाकिस्तानला त्यांचा आवाज दडपावा लागला होता. पण हे व्याप्त काश्मिरी अकस्मात भारतप्रेमी कसे झाले, त्याचा कोणी शोध घेतला काय? त्यासाठी किती वर्षे छुप्या पद्धतीने भारतीय गुप्तचरांनी काम चालविले होते, त्याचा तपास कोणी केला काय? कोण होते असे भारतीय गुप्तचर आणि त्यांच्या कारवाया हाणून पाडण्याचे काम कोणी केले, कसे केले? युपीए सरकार सत्तेत असताना जनरल व्ही. के. सिंग यांचे संरक्षणमंत्र्यांशी काही वादविवाद झाले होते. त्यांना त्रास देण्यासाठी अनेक गोपनीय गोष्टी चव्हाट्यावर आणण्यात सरकार व पत्रकारांनी भाग घेतला होता. दिल्ली नजिकच्या राज्यातून सैन्याची एक तुकडी दिल्ली काबीज करायला निघल्याची अफ़वा पसरवली गेली. मग सिंग यांच्याच आदेशावरून काश्मिरच्या राजकारणात ढवळाढवळ करणार्‍या कारवाया कारण्यासाठी एक वेगळा विभाग कार्यरत होता आणि त्याच्याच मार्फ़त काश्मिरी निवडणूकात पैसा खेळवला गेला, असेही आरोप झाले होते. पु्ढे सिंग निवृत्त झाल्यावर हा खास विभाग (टेक्निकल सपोर्ट डिव्हीजन) नव्या सेनाप्रमुखांनी थेट विसर्जित करून टाकला होता. त्याचा गवगवा कशासाठी करण्यात आला? ज्या काश्मिरमध्ये रोजच्या रोज सैनिकांवर हल्ले होत असतात आणि घातपाताच्या घडामोडी नित्यनेमाने चालू आहेत, तिथल्या सैनिकी कारवाईच्या गोपनीय कारवायांना उघड्या पाडण्याचे काम भारताल्या माध्यमांनी केले. भारतीय सैन्यदलाची माहिती उघड करणे जर गुन्हा असेल, तर हा गवगवा माध्यमातून करून त्या ठराविक गोपनीय कारवाईला हाणून पाडणार्‍यांची तुलना रणजित बरोबर होते ना? सिंग यांनी निर्माण केलेली गोपनीय तुकडी कोणते देशद्रोहाचे काम करीत होती?

सीमावर्ति भागात शत्रूला शह देण्यासाठी अनेक कारवाया चालू असतात. त्या फ़क्त बंदुका व तोफ़ा चालवण्याच्या नसतात. त्यात शत्रूच्या प्रदेशात वा आपल्या प्रदेशात परकीय हस्तकांना शह देण्यासाठी असतात, तशाच शत्रूला शह देण्यासाठीही असतात. सिंग यांनी निर्माण केलेली तुकडी नेमके हे काम व्याप्त काश्मिरात करीत होती आणि भारतीय काश्मिरातही पाक हस्तकांना गोत्यात आणायचे काम करीत होती. त्यांना उघडे पाडून कोणाला मदत केली गेली? हे काम पाक हेरखात्याला उपकारक होते आणि तेच करणारे भारतातले एकाहून एक मान्यवर पत्रकार होते. त्यांना आवश्यक अशी माहिती वा धागेदोरे देणारेही राजकीय मान्यवर होते. त्यांचे कर्तृत्व रणजितपेक्षा कितीसे भिन्न आहे? पण त्यांना कोणी हात लावू शकत नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत गुन्हेगार ठरवले जाऊ शकत नसतात. पण रणजितपेक्षाही गद्दार असतात. रणजितने दिलेली माहिती फ़ारशी महत्वाची नाही, जितकी हानी प्रतिष्ठीत भारतीयांकडून केली जात असते. यातले अनेकजण अशाच कुठल्या ना कुठल्या सापळ्यात ओढून शत्रूने कामाला जुंपलेले असतात. त्यात कोणाला परदेशी वार्‍या करायला मिळतात, कोणाला अन्य कुठल्या मार्गाने प्रचंड पैसे पुरवले जात असतात. काही प्रसंगी निव्वळ मैत्री वा प्रेमाचे जाळे विणलेले असते. उदाहरणार्थ बरखा दत्त ही भारताची एक आघाडीची पत्रकार आहे. ती अनेक नाजूक विषयांना हात घालत असते. पण तिचा पती कोण किंवा त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत, याविषयी गुपित कशाला राखले जाते? बरखाविषयी अनेक वदंता आहेत. पण त्याबद्दल प्रश्नही विचारला, तर बरखा त्याचे उत्तर देत नाही. याला योगायोग म्हणता येईल काय? मधाचे असे सापळे जागोजागी आहेत आणि ते उध्वस्त करणे सोपे नाही. रणजित सहज पकडला जाऊ शकतो. त्याला बेड्या ठोकल्या जातात. मान्यवरांचे काय?

Friday, January 1, 2016

पठाणकोट हल्ल्याची पार्श्वभूमी



आज पहाटे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला. पाचपैकी चार हल्लेखोर ठार झाले व त्या कारवाईत दोन भारतीय सैनिकही शहीद झाले. एक घातपाती जखमी अवस्थेत सापडला. असा हल्ला झाला, मग तात्काळ सुरक्षा वा गुप्तचरांच्या कामात ढिलाई झाल्याचा सरसकट आरोप सुरू होतो. आजही तसेच झाले तर नवल नाही. कारण जीभ उचलून टाळ्याला वा ओढांना लावली, मग विविध शब्द उच्चारले जात असतात. पण त्याचे नेमके अर्थ बोलणार्‍याला कळतातच असे नसते. मग अशा दिवट्यांना सुरक्षा वा गोपनीयता कशासाठी असते वा तिला कुठून कसा धोका असतो, त्याची अक्कल असायचे काही कारण नसते. पठाणकोट हल्ल्याच्या ज्या बातम्या ब्रेकिंग न्युज म्हणून झळकत होत्या, त्यात सातत्याने टेक्निकल क्षेत्राला धक्का लागलेला नाही, असे सांगितले जात होते. परंतु हे टेक्निकल क्षेत्र म्हणजे काय? तर जिथे लढावू विमाने उभी वा सज्ज करून ठेवलेली असतात, असे अतिशय सुरक्षित क्षेत्र असते. हल्लेखोर त्यालाच लक्ष्य करायला आले असणार, हे वेगळे सांगायला नको. पण प्रचंड विस्तार असलेल्या या तळावर हे सुरक्षित क्षेत्र नेमके कुठे आहे, त्याची माहिती हल्लेखोरांना होती, ही खरी बातमी आहे. अन्यथा आजवर अनेक पोलिस ठाणी वा लष्करी तळावर असे हल्ले झालेले आहेत. पठाणकोटचा हल्ला नेमके लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून झालेला होता. म्हणजेच त्या हल्ल्याची योजना आखणार्‍यांपाशी हवाई तळाचा बारीकसारीक तपशील उपलब्ध होता. म्हणूनच इतका लक्ष्यवेधी हल्ला होऊ शकला. सुदैवाने ठरल्या लक्ष्यापर्यंत जिहादी पोहोचू शकले नाहीत. पण ते सुदैव होते की तशी प्रतिकारक सज्जता होती, म्हणून तो हल्ला हाणून पाडण्यात यश आले? उहापोह त्याचा व्हायला हवा किंवा करायला हवा. नुसतेच हवेत बुडबुडे उडवण्याने मनोरंजन होईल. पण साध्य काहीच होणार नाही.

पठाणकोटच का? हल्लेखोरांनी हेच लक्ष्य कशाला निवडले, इथून उहापोह सुरू होतो. हल्ला करणार्‍यांना नेमकी माहिती असल्याशिवाय अशा जागी हल्ला करता येत नाही. म्हणजेच पंजाबमध्ये असलेल्या अनेक लष्करी वा हवाई तळांपैकी पठाणकोट निवडण्याचे कारण तिथली संगतवार माहिती हल्लेखोरांकडे होती. मग ती माहिती त्यांना कधी, कोणी व कशी पुरवली, ही खरी बित्तंबातमी असू शकते. पण नेमकी माहिती असूनही हल्ला फ़सला, म्हणजेच हल्ल्याची शक्यताही तितकीच गृहीत धरून सज्जता राखलेली असणार ना? तर त्याची सुरूवात दोन वर्षापुर्वी झालेली होती. सुशीलकुमार हे नाव आजच्या बातम्यांमध्ये कुठे कानी आले नाही. कोण हा सुशीलकुमार? पठाणकोटच्या याच हवाई तळावरचा एक कर्मचारी सुशीलकुमार याला तब्बल दोन वर्षापुर्वी एका महिलेने सोशल माध्यमातून गाठले. त्या माध्यमातून मैत्री करताना ही महिला त्याच्याशी खुप सलगीने बोलू लागली आणि नंतर त्याच्याकडून माहिती मिळवू लागली. याच तळावरील सायबर सेलची दक्षता सज्ज होती म्हणून सुशीलकुमार व त्या महिलेच्या सोशल माध्यमातील देवाणघेवाणीवर पाळत ठेवली गेली. तो परस्पर या मैत्रिणीला तळावरची गोपनीय माहिती देत असल्याचे उघडकीस आल्यावर स्थानिक पोलिसांना कल्पना देवून सुशीलकुमारला अटक करण्यात आली. कालपरवा असाच एक हवाई दल कर्मचारी रणजित याला अटक झाली होती. त्याला संरक्षण विषयक एका मासिकाची संपादिका म्हणून ब्रिटीश महिलेने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुशीलकुमारला असेच जाळ्यात ओढून माहिती काढली जात होती. या सुशीलकुमारने तिला पठाणकोट तळाची महत्वपुर्ण माहिती दिली होती. त्यानंतरच त्याला आत्काळ अटक करण्यात आलेली होती. जुलै २०१४ मध्ये त्याला पकडले आणि आज इतक्या महिन्यांनी तिथेच हल्ला झाला.

कुठल्याही लष्करी वा हवाई तळावर महत्वाच्या जागा गोपनीय असतात. आधुनिक काळात असे तळ हे एकप्रकारचे किल्लेच असतात. त्या किल्ल्यातल्या अतिशय मोक्याच्या जागा म्हणजे बालेकिल्ला असतो. तशा जागांवर हल्ला केला, मग त्या तळाची भेदकता व सुरक्षा संपुष्टात येत असते. म्हणूनच अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न शत्रू करतो. सुशीलकुमार वा रणजित या हवाई दल कर्मचार्‍यांकडून नेमकी तशीच माहिती मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यापैकी कुठली माहिती दिली गेली त्याचीही कल्पना भारतीय यंत्रणांना होती. म्हणून अशा जागी हल्ला होण्याची शक्यता गृहित धरलेली असते. किंबहूना दिली गेलेली माहिती वापरली जाऊ नये, म्हणून असलेल्या रचना व सज्जता यात निर्णायक फ़ेरबदल केले जात असतात. बाकी हल्ला टाळणे आपल्या हाती नसते. कारण हल्ल्याची वेळ व जागा शत्रू ठरवित असतो. पण त्यात कुठलेही मोठे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे आपल्या हाती असते. इथेही नेमकी तीच सज्जता असल्याचे दिसून आलेले आहे. आकस्मिक हल्ला करूनही पाचपैकी एकही हल्लेखोर महत्वाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही, किंवा कुठलेही मोठे नुकसान यात होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याला गुप्तचर खात्याचे अपयश म्हणता येणार नाही. तर पुरेपुर सज्जता म्हणता येणार नाही. दोन दिवस आधी गुरदासपूर येथील पोलिस अधिकार्‍याचे अपहरण करण्याचे नाट्य रंगलेले होते. अशा काही किरकोळ घटना गेले काही दिवस सातत्याने घडत आहेत आणि त्याची तुलना मोदींच्या लाहोर भेटीशी करता येणार नाही. मुत्सद्देगिरी आणि गुप्तचरांनी परस्परांना शह देण्याच्या कारवाया यात सांगड घालणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. मात्र ज्या गतीने पठाणकोटचा हल्ला झालेला आहे, त्यातून पाक गुप्तचरांच्या हवालदिल होण्याचे संकेत नक्की मिळतात.

सुशीलकुमार वा रणजितला पकडल्यामुळे त्यांना माहिती देणारे नेटवर्क उध्वस्त होत असते. पण त्याच कालखंडात पाकिस्त्तानात अकस्मात भारताच्या पंतप्रधानांनी भेट देण्याची घटना निर्णायक काटशह आहे. पाकचे सेनाप्रमुखच नव्हेत तर गुप्तचर खातेही मोदींच्या लाहोर भेटीविषयी गाफ़ील राहिले. किंबहूना आपल्याला संपुर्ण गाफ़ील ठेवून नवाज शरीफ़ यांनी मोदींना पाकिस्तानात येऊ देतात, याचा पाक गुप्तचर व सेनादलाला धक्का बसलेला आहे. ते नुसते पंतप्रधान मोदींचे धाडस नाही किंवा भारत-पाक संबंधातील महत्वाचे पाऊल नव्हे. भारतीय मुत्सद्देगिरीने आणि गुप्तचर खात्याने पाक सुरक्षा व्यवस्थेला व घातपाती डावपेचांना दिलेला मोठा शह आहे. त्यानंतर पाक गुप्तचर वा भारतद्वेषी सेनाधिकारी मंडळींनी निमूट पराभव मान्य करण्याची अपेक्षा कोणी बाळगू शकत नाही. आजही आपण भारताला शत्रूच मानतो आणि शरीफ़शी दोस्ती केल्याने घातपात थांबणार नाहीत, असे कोणी शब्दात सांगणार नाही. किंबहूना पंतप्रधान शरीफ़ म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्यांच्याशी संगनमत केल्याने पाकिस्तान निमूट बसेल अशा समजूतीत राहू नका, असे सांगण्याचा हा मार्ग आहे. पाकिस्तान शरीफ़ चालवत नाहीत तर तिथली सेना व गुप्तचर विभाग यांची हुकूमत चालते, हा पठाणकोट हल्यातला खरा संदेश आहे. हा सावल्यांचा खेळ समजून घेता आला तर अकस्मात मोदी लाहोरला कशाला गेले आणि त्यातून काय साधले गेले, त्याला अर्थ लागू शकेल. पण तेवढे करायला आजच्या ब्रेकिंगन्युज पत्रकारितेला वेळ वा संयम आहेच कुठे? ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही. दोन देशात कुठला डाव वा जीवघेणा खेळ चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही. त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही. (अपुर्ण)

सीटवरल्या रुमालाची गोष्ट



विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि त्याचवेळी ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने अध्यक्षही आहेत. भाजपाच्या बुद्धीमान प्रतिभावान नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच भाजपाच्या वा एकूण राजकीय स्थितीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. मागल्या एका वर्षात देशातली मोदीलाट ओसरत चालली असल्याचे अनेकांनी वक्तव्य केले. त्याची अनेक कारणेही दिली आणि विवेचनही केले. त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे भाजपापाशी प्रतिभावान लोकांचा दुष्काळ! सर्वात प्रथम ही गोष्ट कोणाच्या नजरेस आलेली असेल, तर सागरिका घोष नामक विदुषीच्या! सीएनएन-आयबीएन नामे वाहिनीच्या ज्येष्ठ संपादिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि योगायोगने संपादक राजदीप सरदेसाई यांच्या पत्नीही आहेत. फ़िल्म इन्स्टीट्य़ुट या सरकारी संस्थेच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नेमणूक मोदी सरकारने केल्यावर कल्लोळ माजला, त्याच्या आसपास सागरिकाने ही त्रुटी लक्षात आणून दिलेली होती. ती भाजपापुरती नव्हती. तर भारतीय उजव्या राजकारणात विचारवंतांचा अभाव आहे, असे तिचे म्हणणे होते. किंबहू्ना उजव्या राजकारणाने विचारवंत प्रतिभावंतच निर्माण केले नाहीत अशी सागरिकाची तक्रार होती. पण त्याचे कारण मात्र तिला स्पष्ट करता आलेले नव्हते. कोणी शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याची गरजही नसते. एकदा ‘उजवा’ असा शिक्का मारला, की आपोआप समोरचा माणूस निर्बुद्ध होत असतो. आणि मग ती माणसे निर्बुद्ध असतील, तर त्यातून कोणी प्रतिभावंत निर्माण होण्याचा विषयच कुठे शिल्लक उरतो? त्याच्या उलट ‘डावा’ असा शिक्का मारला, मग उकिरडे फ़ुंकणारे गाढवही आपोआप बुद्धीमान होत असते. त्याला प्रतिभा म्हणजे तरी काय तेही ठाऊक असण्याची गरज नसते. प्रतिभावान असण्याची व्याख्या-पात्रता इतकी सोपी आहे. सहस्त्रबुद्धे यांनाही आता तसेच वाटू लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घकाळ आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार व फ़ेरबदल करायचे आहेत. पण त्यांना उपयुक्त ठरतील अशा प्रतिभावंतांचा भाजपात दुष्काळ आहे अशी उपयुक्त माहिती सहस्त्रबुद्धे यांनी एका मुलखतीतून दिलेली आहे. अर्थात तिथेच थांबतील तर सहस्त्रबुद्धे भाजपाचे उपाध्यक्ष कसले? म्हणूनच त्यांनी आपल्या मूळ विधानाला एक पुस्ती जोडली आहे. भाजपापेक्षा कॉग्रेसमध्ये प्रतिभावंत अधिक आहेत आणि तुलनेने भाजपात नगण्य आहेत, असेही त्यांनी म्हटलेले आहेत. त्यांचे हे प्रवचन ऐकल्यावर त्यांनी हे प्रतिभासंपन्नतेचे धडे कुठे गिरवले, असा पहिला प्रश्न मनात येतो. कारण आज सहस्त्रबुद्धे यांना झालेला साक्षात्कार काही महिन्यापुर्वी सागरिका घोष यांना झालेला होता. किंबहूना त्यानंतरच मोदी सरकारने केलेल्या अनेक नेमणूका व अन्य बाबतीत सांस्कृतिक क्रांती सुरू झालेली होती. असंहिष्णुतेचे वादळ त्यातूनच उठले. तमाम प्रतिभावंत मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आणि पुरस्कार वापसीची लाट आलेली होती. खरे तर त्याचे सहस्त्रबुद्द्धे यांनी बाहू पसरून स्वागत करायला हवे होते. मोदी नाही तरी पक्षाध्यक्ष अमित शहांची तातडीने भेट घेऊन पुरस्कार वापसीत गुंतलेल्या डझनावारी रिकामटेकड्या प्रतिभावंतांना भाजपात आणायची मोहिमच हाती घ्यायला हवी होती. म्हणजे एका बाजूला संहिष्णूतेचे भाजपा विरोधात उठलेले वादळ शमले असते आणि दुसरीकडे पक्षात असलेली प्रतिभावंतांची टंचाई भरून काढणेही शक्य झाले असते. पण तेव्हा तर यापैकी कुठलीच गोष्ट सहस्त्रबुद्धे यांनी केली नाही. मग आजचे त्यांचे प्रतिभा दुष्काळाचे वक्तव्य खरे मानायचे, की तेव्हाचे त्याविषयीचे मौन खरे मानायचे, असा प्रश्न पडणार ना? आणि भाजपात प्रतिभेचा असा दुष्काळ असेल तर त्याला जबाबदार कोण? खुद्द सहस्त्रबुद्धेच नाही काय?

सव्वा वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका चालल्या होत्या. तेव्हा कुठल्याही पक्षातला जिंकू शकणारा उमेदवार म्हणून कोणालाही भाजपात आणायचा सपाटा लावलेला होता. त्याविषयी पक्षनेत्यांना खुपच उलटसुलट प्रश्न विचारले जात होते. कालपर्यंत ज्यांच्यावर विविध आरोप केलेत, त्यांना भाजपा आता सुधारणार कसे? हा प्रश्न विचारला जात होता. तर मुनगंटीवार यांनी अशा नवागतांना म्हाळगी प्रबोधिनीत नेवून संस्कार करणार असल्याची खास उपाययोजना कथन केलेली होती. म्हणजे भाजपात प्रतिभासंपन्न नेते कार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य प्रबोधिनीकडेच असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मग त्यातच दुष्काळ पडलेला असेल, तर जबाबदारी सहस्त्रबुद्धे यांचीच नाही काय? दोनतीन दशके प्रबोधिनी आपले काम करते आहे. त्यांना इतक्या वर्षात भाजपाची सत्ता आल्यास मंत्री होऊ शकतील, असे प्रतिभावान नेते का तयार करता आलेले नाहीत? खुद्द सहस्त्रबुद्धे काही कमी प्रतिभासंपन्न नाहीत. जो प्रतिभावान माणसांचे निर्माण करतो, त्याची प्रतिभा तर उत्तुंग असणार ना? मग पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मोदींचे लक्ष कशाला गेलेले नाही? जी काही प्रतिभेची त्रुटी मोदी सरकारला सतावते आहे, त्यात सहस्त्रबुद्धे यांना सोबत घेतल्यास थोडीफ़ार त्रुटी तरी भरून येईल ना? तिथे घुसायचा प्रयत्न करण्यापेक्षा सहस्त्रबुद्धे अशी वक्तव्ये करण्यात आपली प्रतिभा कशाला खर्ची घालतात? की योग्यवेळी सीटवर रुमाल टाकायला सहस्त्रबुद्धे विसरून गेलेत? महाराष्ट्रात सत्तेचे गणित जमवताना शिवसेना रुसून बसली, तेव्हा बहुमताचा आकडा पुर्ण करण्यात अडचण आलेली होती. शरद पवारांनी बाहेरून फ़डणवीस सरकारला पाठींबा देवू केला. तेव्हा त्याच लबाडीला सहस्त्रबुद्धे यांनी दिलेले प्रतिभासंपन्न उत्तर कितीजणांच्या आज लक्षात राहिलेले आहे?

बस सुटायची वेळ जवळ येते आहे आणि रिझर्व्हेशन केलेला प्रवासी रुसून बसला आहे. पण अन्य कोणी खि्डकीतून सीटवर रुमाल टाकलेला आहे. बस सुटली तर रुमाल टाकणार्‍याला आत घ्यावेच लागेल ना? असा काहीसा युक्तीवाद सहस्त्रबुद्धे यांनी तेव्हा केलेला होता. ह्याला प्रतिभावंत म्हणतात. किंबहूना त्यावेळी तरी भाजपाचे अनेक नेते त्याच भाषेत बोलत होते आणि खुद्द सहस्त्रबुद्धे यांनीच हा युक्तीवाद उभा केलेला होता. त्यातून भाजपातील प्रतिभासंपन्न नेत्याची कल्पकता कशी ओसंडून वहाते आहे, त्याचीच साक्ष त्यांनी दिली होती. मग आताच त्यांना पक्षात प्रतिभेचा दुष्काळ कशाला जाणवू लागला आहे? की त्यांना डावे राजकारण किंवा भूमिका म्हणजेच प्रतिभा असल्याचा काही नवा साक्षात्कार झालेला आहे? सुधींद्र कुलकर्णी वा कुमार केतकरांच्या सहवासात जास्त काळ राहिल्याचाही तसा परिणाम असू शकतो. पण तोही विषय बाजूला ठेवून एक शंका सहस्त्रबुद्धे यांना विचारावीशी वाटते. कॉग्रेसपाशी इतकी प्रचंड प्रतिभा व गुणीजन असतील, तर त्यांच्यावर अशी नामशेष व्हायची पाळी का यावी? एका नेहरू घराण्याच्या पलिकडे कोणी पक्षाचे नेतृत्व करायला पुढे कशाला येऊ शकलेला नाही? पक्षाच्या मुखपत्रातच पक्षाचा मुखभंग करणारी प्रतिभा कालपरवाच जगाने बघितली. तशा लोकांची भाजपात भरती केली जावी, असे सहस्त्रबुद्धे यांना म्हणायचे आहे काय? की मोदींना जो मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, त्यात आपल्याला ‘सीट’ मिळावी म्हणून सहस्त्रबुद्धे प्रतिभेचा ‘रुमाल’ या वक्तव्यातून टाकत आहेत? म्हणजे निवडून आलेले सदस्य भले रिझर्व्हेशन केलेले प्रवासी असतील. पण त्यांची लायकी नसेल तर पंतप्रधानांनी सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या खिडकीतून ‘सीटवर रुमाल’ टाकणार्‍यांना मंत्री बनवावे, असे त्यांना सुचवायचे आहे? रुमाल टाकणारा भांडतो आणि सहस्त्रबुद्धे मात्र विनयाने सीटवर दावा करत आहेत काय?