Saturday, May 3, 2014

किस्सा कुर्सीका



  यावेळची निवडणूक माध्यमातून अधिक लढवली जाते आहे. अगदी विनोदी कार्यक्रमापासून कथाकविता आणि व्यंगचित्रमालाही धुमधडाक्यात सुरू आहेत. शेवटच्या दोन फ़ेर्‍या मतदानाच्या उरलेल्या असताना, विविध वाहिन्याही रंगत आणायला धडपडत आहेत. मग त्याच वाहिन्यांवर जाहिराती करणार्‍यांनी मागे कशाला रहावे? राजकीय पक्ष व उमेदवारांनी आपापल्या जाहिराती झळकवल्या आहेतच. पण विविध माल व उत्पादनाच्या जाहिरातीमध्येही यावेळी निवडणूक झळकते आहे. कुठल्या तरी स्कुटरच्या जाहिरातीमध्ये गुणवत्तेला प्राधान्य द्यायची भाषा आलेली आहे; तर कुठल्या बनियानच्या जाहिरातीत गुंडागर्दीला झुगारून मतदानाला जाणारा एक मर्दही दाखवलेला आहे. थोडक्यात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणार्‍या निवडणूकांचा भव्यदिव्य सोहळाच सार्वत्रिक रुप धारण करून चालला आहे. जाहिरातीमध्ये अत्यंत कल्पकता मोलाची असते. कारण प्रासंगिक विषय घेऊन त्यात आपल्या विकावू मालाकडे लोकांचे लक्ष वेधायचे असते. म्हणूनच लोकांची अभिरूची काय व लोकांपर्यंत कोणते शब्द नेमके पोहोचतील; त्याचा बारकाईने विचार करूनच विषयाची मांडणी करावी लागत असते. ज्या माध्यमात अशा जाहिराती प्रदर्शित होतात, त्यामध्ये जाहिरातीला लक्ष वेधून घेण्याची कुवत असावी लागते. कारण लोक वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरच्या बातम्यांना प्राधान्य देत असतात. जाहिरातीसाठी वा कुठल्या मालाच्या जाहिरातीसाठी वृत्तपत्र वा वाहिन्यांकडे लोक वळत नसतात. सहाजिकच त्या बातम्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत जाहिराती घुसवल्या जातात, तिथे लोकांनी पाठ फ़िरवू नये याची काळजी जाहिरातकर्त्याला घ्यावी लागत असते. जाहिरात देखील बातमी इतकी उत्कंठापुर्ण व मनोरंजक असेल, तर ती अधिक परिणामकारक होत असते. म्हणूनच जाहिरातीवर यावेळी करोडो रुपये खर्च झालेले असताना निवडणूकीच्या संबंधाने झालेल्या जाहिरातीचा आढावा घेणेही अगत्याचे ठरावे.

   तसे पाहिल्यास आजही २००४च्या वेळी भाजपाने केलेल्या ‘शायनिंग इंडीया’ जाहिरातीचा उल्लेख हेटाळणीच्या स्वरूपात होत असतो. वास्तवाशी संबंध नसलेल्या जाहिराती कितीही दाखवल्या तरी निरूपयोगी असतात. कधीकधी तर अशा संदर्भहीन जाहिराती विपरित परिणामही घडवतात. कारण तुमचे विरोधक तुम्ही केलेल्या जाहिरातीतले दोष काढून तिची खिल्ली उडवण्याचा धोका असतो. मग त्याचेही विपरित परिणाम सोसवे लागणार असतात. तो धोका टाळण्यासाठीच जाहिराती सावधपणे कराव्या लागतात. विविध पक्षांनी केलेल्या जाहिरातीचा मुद्दा वेगळा आहे. त्यावर निकालानंतर बोलता येईल. पण आज जाहिरातीच्या जगातली निवडणूक बघता, सर्वात परिणामकारक व चाणाक्षपणे केलेली जाहिरात फ़ेव्हीकॉल या उत्पादनाची आहे. कारण ती आपल्या उत्पादनाची खुबी सहजतेने प्रेक्षकाच्या मनावर बिंबवणारी आहेच. पण त्याहीपेक्षा या जाहिरातीने एकूणच लोकशाही उत्सवाच्या सध्या गाजणार्‍या जत्रेवर केलेले भाष्य माध्यमांनाच चपराक हाणणारे आहे. किंबहूना माध्यमातून रंगवली जाणारी निवडणूक व त्यावरील विश्लेषण किती वरवरचे निरर्थक आहे, त्यावर फ़ेव्हीकॉलची जाहिरात टिप्पणी करते.

   एका सुताराच्या कार्यशाळेत लाकुडकाम चालू आहे आणि एक चहाविक्रेता किटलीभर चहा घेऊन आलेला आहे. तिथे दिसणार्‍या विविध लाकडी वस्तूमध्ये विशिष्ट आकाराच्या अनेक खुर्च्यांविषयी तो सुताराला प्रश्न विचारतो आणि त्याबद्दल बोलतो. त्यात एक खुर्ची भाजपाच्या कमळाच्या आकाराची आहे तर दुसरी कॉग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजाच्या आकाराची आहे. तिसरीकडे चारपाच जुन्या मोडक्या खुर्च्यांना एकत्र सांधून बनवलेल्या बाकड्याच्या आकाराची वस्तू आहे. त्या खुर्च्यांच्या आकाराचे वैशिष्ट्य सुतार समजावतो. तर फ़ेव्हीकॉल लावून खुर्ची पक्की कर, कारण ती दिर्घकाळ टिकणारी असावी असे चहावाला सुचवतो. पण पुढे जाऊन म्हणतो, ‘ताऊ, जी खुर्ची विकशील, ती तिप्पट किमतीत विक, कारण बाजारात एकच खुर्ची विकली जाणार आहे. बाकीच्या इथेच अडगळीत पडून रहातील’. इथेपर्यंत मजा ठिक आहे. पण त्यापुढे ताऊने चहावाल्याचे कान उपटताना केलेले भाष्य माध्यमातील विद्वानांचेही कान उपटून काढणारे आहे. ताऊ म्हणतो, ‘लल्लू, चाय बेचनेका काम छोड दे और चुनाव विशेषज्ञ बन जा, चॅनेलवाले तुझे पकडे रखेगे’.

   वाहिन्यांवर गेले तीनचार महिने निवडणूकीच्या निमित्ताने जे चर्‍हाट व गुर्‍हाळ लावण्यात आलेले आहे, त्यातून प्रेक्षकांचे किती प्रबोधन झाले? निव्वळ गल्लीबोळातल्या गावगन्ना चकाट्या म्हणाव्यात, त्यापेक्षा कुठलीही गंभीर राजकीय चर्चा वाहिन्यांवर होत नाही. गावाच्या पारावर पाणवठ्यावर किंवा चाळीतल्या नळावर भांडकुदळ महिलांमध्ये जशा उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात, तशाच या चर्चा होतात. देशाच्या संसदीय निवडणूका होत आहेत आणि पुढल्या पाच वर्षासाठी देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती असणार आहे, त्यांना निवडण्याची प्रदिर्घ प्रक्रिया चालू आहे. पण वाहिन्यावर होणार्‍या चर्चेमध्ये कुठे त्या भवितव्य घडवणार्‍या कल्पना, योजना वा धोरणावर चर्चा होताना कानी पडल्या आहेत काय? त्यापेक्षा विभिन्न पक्षाच्या प्रतिनिधी प्रवक्त्यांना बोलावून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढायला प्रवृत्त करण्याचेच काम वाहिन्यांचे संयोजक करताना दिसतात. त्यातून मग कोण जिंकणार, कोण हरणार वा कोणाला कसली संधी आहे, त्यावरचे भाष्य त्या जाहिरातीतल्या चहाविक्रेत्यापेक्षा उच्च दर्जाचे नसते. तर उथळ विधाने असतात, त्यावर फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीने नेमके बोट ठेवले आहे. म्हणूनच या निवडणुकीच्या महोत्सवातली सर्वात लक्षवेधी व चाणाक्ष जाहिरात म्हणून हा ‘किस्सा कुर्सीका’ कायमची लक्षात राहू शकणार आहे.

No comments:

Post a Comment