Sunday, May 25, 2014

दोन दिवट्यांची गोष्ट

  एका बाजूला सध्या भाजपानेते व भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्याची स्पर्धा माध्यमात सुरू झाली आहे आणि दुसरीकडे पराभूतांना जाब विचारण्याची अहमहमिकाही लागली आहे. पण याच सोबत ज्यांनी मागल्या दोनतीन वर्षात राजकीय विश्लेषक म्हणुन आपल्या अकलेचे तारे तोडण्याचाही विक्रम केला आहे; त्यांचे काय व कुठे चुकले, त्याबद्दलचे आत्मचिंतन कधी व कोण करणार आहे? भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींना पुढे केल्यावर देशात अध्यक्षीय लोकशाही नाही, किंवा दक्षिण वा पूर्व भारतात भाजपाचे नामोनिशाण नाही, मग पक्ष मोदींसाठी बहूमत कुठून मिळवणार असे, सवाल भाजपाच्या विरोधी पक्षांनीच विचारलेले नव्हते, माध्यमातील राजकीय अभ्यासक व विश्लेषकांनी ते सवाल उपस्थित केले होते. आज आपल्या त्याच मुर्खपणावर ‘मोदीलाट’ किंवा मोदींचा ‘करिष्मा’ असल्या शब्दांची पांघरूणे घालणार्‍यांना, पराभूत पक्षांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार उरतो काय? म्हणूनच केवळ पराभूत पक्षांनी वा त्यांच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज नसून, माध्यमातल्या शहाण्यांनीही आपल्या तथाकथीत ‘अभ्यासाचेही’ नविनीकरण करण्याची आवश्यकता आहे. मोदींनी कुठलाही चमत्कार केलेला नसून बदलत्या जगाची चाहुल लागलेला तो एकमेव नेता असल्याने त्याने एकविसाव्या शतकातील भारत साद घालत होता, त्याला प्रतिसाद देण्याची समयसूचकता दाखवलेली आहे. पण दुसरीकडे बाकीच्यांनी व्यक्तीद्वेषातून, राजकीय हेतूसाठी भ्रमात रहाणे पसंत केले. तर दोन दिवट्यांनी आपल्या पुर्वजांची पुण्याईच मातीमोल करून टाकली. त्यात कॉग्रेसच्या चौथ्या पिढीचे नेते राहुल गांधी यांचा समावेश होतो, तसाच पहिल्या पिढीतल्या सेवाभावी चळवळीचे वारस अरविंद केजरीवाल यांचाही समावेश होतो. त्यांनाही पुर्वपुण्याईची धुळधाण करण्याचा जाब विचारला गेला पाहिजे.

   राहुल गांधी यांना कुठलाही अनुभव नसताना आणि त्यांनी कसले कर्तृत्व दाखवलेले नसताना, त्यांच्याकडे शतायुषी कॉग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आलेली होती. एखाद्या लाडावलेल्या पोराच्या हाती मूल्यवान वस्तू वा दागिना द्यावा, तसाच काहीसा प्रकार होता. देशासाठी लाखो लोकांनी आपले जीवनसर्वस्व पणाला लावले, त्यातून कॉग्रेस नावाची संघटना उभी राहिली व तिच्याशी जनभावना जोडल्या गेल्या आहेत, याची कुठलीही जाणिव राहुल वा प्रियंका यांच्यात दिसत नव्हती. आपण जनतेचे वा पक्षाचे नेतृत्व करतोय, म्हणजे रयतेवर फ़ारच मोठे उपकार करतोय; अशा मस्तीत हे नेहरूंचे वारस वागत होते. सत्ता हाती असलेल्या पक्षाच्या पंतप्रधानाची व त्याच्याकरवी चालविल्या जाणार्‍या भारत सरकारच्या निर्णय प्रक्रियेची चुरगळून फ़ेकायचा कागद; अशी लायकी राहुल गांधींनीच केली तिथे त्यांचे दिवटेपण समोर आलेले होते. त्यांनी जे विधेयक पत्रकार परिषदेत फ़ाडून टाकायच्या लायकीचे म्हणून सांगितले, तेच विधेयक अनेक प्रक्रियेतून गेलेले व राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवलेले होते. या महिनाभर चाललेल्या प्रक्रियेत कधीही हस्तक्षेप करून राहुल तेच विधेयक रोखू शकले असते. त्यातून पक्षा्ची व देशाच्या सार्वभौम सरकारची प्रतिष्ठाच राखली गेली असती. देशाचे सरकार व त्याचे अधिकार राजपुत्र राहुलच्या हातचे खेळणे नव्हते आणि नाही. पण या राजपुत्राने मनात आल्यास सरकारशी आपण खेळू शकतो असेच दाखवले. त्याला केवळ दिवटेगिरी म्हणता येऊ शकते. पण किती संपादक, जाणते वा विश्लेषकांपासून कॉग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता? त्याचीच पुढली पायरी राजपुत्राने शतायुषी कॉग्रेस पक्षालाही एखाद्या फ़डतूस खेळण्याप्रमाणे मोडीत काढल्यास नवल कुठले? हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत बसलेल्यांनी दंगल झाली, त्याचे निमित्त करून मोदींना निरो ठरवण्यात कितीसे तथ्य असू शकते?

   अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी व जनलोकपाल आंदोलनातून समोर आलेला असाच एक चेहरा अरविंद केजरीवाल यांचा होता. गेल्या दिड वर्षात त्यांनी अण्णांचा आग्रह झुगारून राजकारणात उतरण्याचा पवित्रा घेतला. त्यात काही गैर नव्हते. पण दिल्लीतल्या छोट्या यशानंतर केजरीवाल यांना तेही यश पचवता आले नाही. यशाची नशा अन्य कुठल्याही अंमली पदार्थापेक्षा भयंकर असते. केजरीवालांची झिंग त्याचे परिणाम दिसल्यानंतर सुद्धा उतरलेली नाही. वास्तवात आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेले यश मुठभर नेत्यांचे नव्हते, शेकडो कार्यकर्त्यांचे होते; तसेच काही दशके ज्यांनी राजकारणापासून अलिप्त राहुन सामाजिक चळवळी केल्या, त्यांची पुण्याई आम आदमी पक्षाच्या मागे उभी होती. जनतेने तिलाचा प्रतिसाद दिलेला होता. पण केजरीवाल व त्यांच्या टोळीने असा समज करून घेतला, की आपल्याच दिव्यशक्तीने दिल्लीत यश मिळालेले आहे. त्यांच्या असल्या भ्रामक यशाच्या जाळ्यात मेधा पाटकर यांच्यासारखे अनेक सेवाभावी कार्यकर्तेही फ़सले. त्यांनीही मग लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. आता संन्यस्त वृत्तीने समाजिक चळवळी केल्याचे त्यांचे पावित्र्य निवडणूकीच्या निकालांनी धुवून नेले आहे आणि केजरीवाल यांच्या तमाशाची उत्तरे देण्य़ाची नामुष्की मेधाताईंच्या वाट्याला आलेली आहे. देशातल्या लहानमोठ्या शेकडो सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांची पुण्याई केजरीवाल नावाच्या दिवट्याने मातीमोल करून टाकली आहे. पुर्वपुण्याईच्या वारशाचे त्यांना भानही नसावे, याचे वैषम्य वाटते. त्याअर्थाने केजरीवाल व राहुल एकाच पातळीवरचे आहेत. आपण जुन्यानव्या हजारो निस्सीम कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या, तपस्येच्या जमीनीवर उभे आहोत, याचे भान सुटलेला कोणीही वारस हा दिवटाच असतो. मग तो घराण्य़ाचा वारस असो किंवा संस्था चळवळीचा वारसा चालविणारा असो.

   वारसा हा शब्द सोपा नाही. त्यामागे आधीच्या पिढ्यांचे व कित्येक लोकांचे श्रम व मेहनत समावलेले असतात. पित्याने वा आजोबाने जितके यश संपादन केले, त्याची फ़ळे वारसाच्या हाती येत असतात. त्याने तीच यशाची मालिका पुढे घेऊन जावे, अशी अपेक्षा असते. तेवढे शक्य नसेल तर तितक्या कर्तृत्वाचा पुढला वारस येईपर्यंत जितके यश असेल, तितके शाबुत ठेवण्याचे कर्तव्य तरी पार पाडावे, अशी किमान अपेक्षा असते. सोनियांच्या हाती पक्षाची सुत्रे आल्यावर त्यांनी कॉग्रेस विस्तारली नसेल. पण टिकवली होती. राहुलनी तितक्याही पक्षाचा पुरता बोजवारा उडवला. केजरीवाल यांनी सामाजिक चळवळीविषयी जे आकर्षण युवापिढीच्या मनात होते, त्यांची घोर निराशा करून टाकली. त्याचबरोबर या चळवळींना गेल्या अर्धशतकात जे मानाचे स्थान जनमानसात लाभले होते, त्यावरच प्रश्नचिन्ह लावून टाकले. अशा पार्श्वभूमीवर विजयीवीर असलेल्या नरेंद्र मोदींकडे बघता येईल. इतका दैदिप्यमान विजय मिळवण्यासाठी वारसा टिकवून ठेवणार्‍या अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठाचा रोष त्यांना पत्करावा लागला होता. फ़ार कशाला मोदींच्या उत्साहाने पक्षाचा वारसा मातीमोल होऊ घातल्याची तक्रार वडीलधार्‍यांकडून होत राहिली होती. तरीही त्यांचा सन्मान राहून मोदींनी पक्षाची पुर्वपुण्याई जपून तिच्यात भरघोस वाढच केली. पण त्याची फ़ळे समोर आल्यानंतर विजयाचे श्रेय स्वत:कडे घेण्यापेक्षा वारसात मिळालेल्या पुण्याईमुळे यशाची पायरी चढता आल्याची जाहिरपणे तात्काळ कबुली दिली. एका बाजूला राहुल वा केजरीवाल आहेत, ज्यांना किरकोळ यश पचवता आलेले नाही आणि दुसरीकडे मोदी आहेत, ज्यांनी लिलया इतके मोठे यश पचवून वास्तवाचे भान दाखवले आहे. म्हणूनच मोदीची यशोगाथा सांगताना राहुल व केजरीवाल हे उपकथानक विसरून २०१४ च्या निवडणूकीचा इतिहास सांगता येणार नाही.

1 comment:

  1. भाऊ हे दोघेच नाहीत. असे अनेक दिवटे आहेत. ज्यांनी मोदींच्या विजयात खारीचा वाटा नाही तर हत्तिचा वाटा उचलला आहे.
    दिवटा क्रमांक 3- नितीश कुमार- इतकी वर्षे भाजप बरोबर सत्ता भोगली. पण मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहिर केल्याबरोबर भाजपची साथ सोडून दिली. पण मुख्यमंत्री पद काही सोडले नाही. जे लोक निवडणुक पूर्व युती करतात ते हे विसरतात की आपल्या पक्षाला मिळालेली मते ही आपल्या एकट्याची नसून युतीतिल भागीदार पक्षाच्या मतदारांचीही आहेत. जर वेगवेगळे लढले तर मतांची टक्केवारी कमी होऊन दोन्हीही पक्ष हरु शकतात. 2010 च्या विधानसभेत जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला 112 जागा मिळाल्या अर्थात बहुमतापेक्षा फक्त 10 जागा कमी. म्हणून त्यांना वाटले की भाजपशी असलेली युती तोडली तरी 10 जागा इथून तिथून मिळवू अणि बहुमत सिद्ध करू. अणि ते मुख्यमंत्री पदाला चिटकून राहिले. अर्थात लोकांना हे पटले नसेलच. त्यात मोदिंनी बिहारच्या पुरग्रस्त लोकांसाठी पाठविलेली मदत परत केली. उपाशी पोटाला अन्न पाहिजे असते तेव्हा ते पोट हे पहात नाही की अन्न कोण देतय. बाकी कोणत्याही पक्षाबरोबर पटत नसल्यामुळे नितीश एकाकी लढले अणि स्वत:ची वाट लाऊन घेतली. भाजपने पासवानला बरोबर घेतले अणि सर्वांच्या चिंध्या करुण टाकल्या.

    दिवटा क्रमांक 4 : मुलायम सिंग यादव - मुस्लिमांचे लान्गुलचालन करण्याची परिसीमा. त्यांची मजल तर इथपर्यन्त गेली की शक्तिमिल कंपाउंड मधे बलत्कार करणाऱ्या मुलांची बाजु घेतली. 'लडके है, गलती हो जाती है तो क्या फासी देंगे। हम ऐसा कानून बदल डालेंगे।' हे बोलण्याचे कारण त्या बलात्कार करणाऱ्या मुलांमधे दोन मुस्लिम तरुण आहेत. मुस्लिम मतांसाठी केलेले हे वक्तव्य. त्यात सोनिया गांधींनी घेतलेली इमामाची भेट. उत्तर प्रदेशातील बीचाऱ्या मुस्लीमान्ना कळेनासे झाले की कोणाला मत देऊ. मुस्लिमांची बाजु घेणाऱ्या मुलायामला की इमामाने फतवा काढलेल्या कांग्रेसला की सोसिअल इंजीनियरिंग करणाऱ्या मायावतिला. त्यामुळे झाले काय ही सगळी मुस्लीम मते विभागली गेली तिघात. त्या मधे भाजपचा झाला फायदा. कधी कधी असही वाटतं की मुस्लीम मतांचं जसं ध्रुवीकरण होतं तसं हिंदूंच्या मतांचं झाले असेल काय ? शंका आहे.

    दिवटा क्रमांक 5- दिग्विजय सिंग- मुस्लीम लान्गुल चालनाचा महामेरु. जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी ओसमाला हे 'ओसामाजी' असे संबोधतात. तसेच अमेरिकेने ओसमाला सुमुद्रात फेकायचे नव्हते तर व्यवस्तीथ दफन करायला पाहिजे होते असे सांगतात. हेच दिग्विजय रामदेव बाबाला महाठग म्हणतात.

    दिवटा क्रमांक 6- अजीत पवार-फक्त महाराष्ट्रा पुरता. अजीत पवारांनी धरनातील पाणी मिळवन्यासाठी उपोषण करत असलेल्या उपोषण कर्त्याला उद्देशून जहिररित्या असे सुनवले की ' धरनात पाणी नाहीतर मी त्यात अता मुतु कां ?' तसेच लोकसभेच्या निवडणुकी आधी अशी धमकी दिली की जे गाव माझ्या बहिणीला मतदान करणार नाही त्यांचे पाणी तोडू. या सगळ्या चा परिणाम म्हणजे आघाडीचे महाराष्ट्रात पानिपत.

    आणखी बरेच दिवटे आहेत ज्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की नरेन्द्र मोदींवर हे लोक अन्याय करत आहेत. हिन्दू व मुस्लीम दंगे भारतात सगळीकड़े होतात व झाले आहेत. परन्तु 2002 च्या गुजरात दंगलीचे एव्हड़े अवडंबर माजविले की सांगता सोय नाही. त्यामधे मग माद्ध्यमे, अनंतमुर्ती, अमेरिका (वीसा नाकारने) सोनियाचे 'मौतका सौदागर', 'नरेन्द्र मोदी पंतप्रधान होणं म्हणजे एक संकट' मनमोहन सिंग (Narendra Modi as PM will be disasterous), विजय तेंडुलकर 'मला बंदूक मिळाली तर मी मोदींना गोळ्या घालेन.

    बघा भाऊ एव्हडे दिवटे असल्यामुळे मोदींचा विजय आणखी सुकर झाला.

    आपला नम्र,
    रामदास पवार

    ReplyDelete