Sunday, May 4, 2014

नितीन, माफ़ कर बाळा



   अहमदनगरच्या खर्डा नावाच्या गावात घडलेल्या घटनेइतक्याच त्यानंतरच्या प्रतिक्रिया मनाला यातना देणार्‍या आहेत. एका बारावी इयत्तेतल्या कोवळ्या पोराचा लांडगेतोड म्हणावी असा निकाल लावला गेला. त्याची जात कुठली आणि त्याची शिकार हिंस्रपणे करणार्‍या श्वापदांची जात कुठली; याचे विवेचन व मिमांसा सुरू आहे. पण त्यातल्या हिंसक पाशवी वृत्तीचा उहापोह कुठेच नाही. असली वृत्ती आजकाल माणसात कुठून आली व रुजली; त्याची चिंता कुठेच आढळू नये, ही बाब मनाचा थरकाप उडवणारी आहे. ज्यांनी असला गुन्हा केला, त्यांना आपण अमानुष वागतोय आणि श्वापदासारखे शिकार करतोय; याचेही भान नव्हते. समोर जो कोणी आहे, तो माणूस आहे आणि माणसाला बुद्धी असते, याचेही भान सुटलेल्या वृत्तीने उफ़ाळलेल्या ‘मर्दानगी’चा हा परिपाक आहे. आपली जात श्रेष्ठ किंवा दुसर्‍याची जात तुच्छ; असल्या जाणीवांनी पेटलेला हा विस्तव आहे. त्याच्यासमोर बसून सेक्युलर, समता असल्या जपमाळा ओढून भागत नसते. कोणी असल्या वैचारिक जपमाळा ओढल्याने विस्तव विझत नसतो. किंवा त्या निमित्ताने निखार्‍यावरची राख फ़ुंकून तर विस्तवाने विझावे; अशी अपेक्षाही मुर्खपणाची असते. अशा कृत्याचा नुसता निषेध करूनही उपयोग नसतो. कारण वार्‍याची झुळूकही त्या विझल्या वाटणार्‍या निखार्‍यावरची राख बाजूला करून पुन्हा आगडोंब उसळवू शकत असतो. पूजापाठ वा होमहवनाने जसे प्रारब्ध बदलता येत नाही, तशाच सेक्युलर समतेच्या नामजपाने अशा विनाशक प्रवृत्तीवर मात करता येत नाही. ती प्रवृत्ती समाजात खुप खोलवर रुजलेली आहे आणि तिला त्या सुप्तावस्थेतील मानसिकतेतून मूळासकट उपटून काढायला लागेल; हे वास्तव आधी मान्य करावे लागेल. तिथून मग सुरूवात होऊ शकेल. निव्वळ प्रतिकात्मक टोप्या घालून, जयंत्या पुण्यतिथ्या साजर्‍या करून, मनात खोलवर दबा धरून बसलेल्या या समाजशत्रूचा बिमोड होऊ शकत नाही.

   नितीन आगे नावाच्या कोवळ्या पोराचा बळी गेल्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, म्हणूनच जास्त भितीदायक आहेत. त्यातून मग बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फ़ुले वा शाहूमहाराज यांच्या महाराष्ट्राची जपमाळ पुन्हा ओढली गेली आहे. पण खरोखरच त्या महात्म्यांचे नाव नित्यनेमाने घेतल्याने महाराष्ट्रात समतेची गंगा वाहू लागली काय; याचा कोणी काडीमात्र विचारही करायला तयार नाही. उलट त्यानिमित्ताने मग बाबासाहेबांचे गुणगान करणार्‍या दलितेतर जाती वा कार्यकर्त्यांविषयीच शंका व्यक्त करण्याची शर्यत सुरू झाली. पण असे गुणगान करणारे कधी व कोणत्या प्रसंगी फ़ुले शाहू आंबेडकरांचे नामस्मरण करतात, त्याकडे बारकाईने बघितले गेले काय? मुंबईत बसून कुठल्या देवस्थानाला मनिऑर्डरने पैसे पाठवले, की अभिषेक होतो आणि अंगारा घरपोच पोस्टाने मिळू शकतो. त्याला श्रद्धा वा भक्तीचा बाजार म्हणून हिणवणारे नित्यनेमाने बाबासाहेबाचा नामजप करून वेगळे काय करीत असतात? हजार, पाच हजार वेळा अमुक देवाचे नाव घ्यावे; मग कुठल्या तरी पापातून मुक्ती मिळते. या धारणेपेक्षा प्रसंगानुसार बाबासाहेबांचे नाव उच्चारण्याचे हेतू भिन्न असतात काय? अन्य कुठल्या जातीची निंदा करताना वा तिच्यावर हल्ला करण्यासाठी, शाहू फ़ुले असली नावे हत्यारासारखी वापरता येतात. पण जेव्हा तीच साधने दुधारी होऊन आपल्याच जातीय अस्मितेवर उलटण्याची वेळ येते, तेव्हा धार बोथटते. बाबासाहेब कुठल्या जातीचे नसतात किंवा फ़ुले शाहू कुणाचा द्वेष शिकवत नाहीत. त्या सर्वच महात्म्यांनी समतेचा मंत्र जपला होता आणि त्याचे धडे आपल्याला दिले होते. आम्ही त्यातले आपल्या सोयीचे उचलतो आणि बाकीचे महात्मे झाकून वागतो. ही खरी समस्या आहे. तीच समस्या मग उफ़ाळते आणि श्वापदाचे रूप धारण करून नितीन आगेचा बळी घेत असते. ज्यांनी त्याचा बळी घेतला, त्यांना तरी आपली इज्जत, अस्मिता, प्रतिष्ठा, अभिमान म्हणजे काय, त्याचा गंध होता काय? जीवानिशी गेला, त्यालाही जात होती आणि जीव घेणार्‍यानाही फ़क्त जात होती. 

   माणूस असणे हीच मोलाची प्रतिष्ठा आहे, याचेच भान नसलेल्यांना कुठली जात असली, म्हणुन कुठला फ़रक पडतो? श्वापदासारखे वागणारा प्राणी माणसासारखा दिसत असला, म्हणुन काय उपयोग? नितीन नावाचा वयात आलेल मुलगा मानवी उपजत जाणिवांनी एका तरूणीच्या प्रेमात पडलेला होता. हा त्याच्यातल्या माणूसकीचा पुरावा होता. पण त्याच्यावर हल्ला करणार्‍यांना त्याच्यातला माणूस ओळखता आला नाही, उमगला नाही. आपण उच्च जातीचे आहोत, अशा वेडसर समजूतीने त्यांच्यातला पशू जागवला आणि नितीन त्याला बळी पडला. ही शेकडो पिढ्या व हजारो वर्षे सुप्तमनात रुजवलेली व जोपासलेली विषमतेची भेदभावाची जाणीव, समतेच्या मार्गावरचा सर्वात मोठा अडथळा आहे. जी सुप्त जाणिव समोर दिसत नाही, पण खोलवर दबा धरून बसलेली असते. चवताळलेल्या बिबळ्याने दबा धरून बसावे आणि अकस्मात झेप घ्यावी, तशी ती उफ़ाळून येते. तिला शोधून, मनाच्या खोल खाचरातून, खबदाडीतून बाहेर काढून तिचा बंदोबस्त करायची गरज आहे. त्यावर फ़ुले-शाहू नामजपाने उपाय होऊ शकत नाही. असले नामजप फ़सवे असतात, असे ज्यांनी सांगून आपल्याला माणूस बनवण्यात हयात खर्ची घातले; त्यांच्याच नावाच्या जपमाळा ओढण्याच्या उद्योगाने नितीन, भोतमांगे किंवा असेच शेकडो बळी जात असतात. तेव्हापुरत्या बातम्या होऊन त्यांचे बलीदान व्यर्थ जाते. त्यानिमित्ताने एकमेकांच्या जातीचा उद्धार करायची संधी शोधणारे आपण सगळेच त्या हल्लेखोरांपेक्षा कितीसे माणसाळलेले असतो? दुसर्‍याला कुठल्याही कारणास्तव हीन लेखून आपले मोठेपण, उच्चता सिद्ध करण्याची सौम्य वा उग्र वृत्ती सर्वत्रच दिसते. त्यातल्या उग्रतेचा निषेध करीत आपल्याही अंतरंगात लपून बसलेल्या सौम्य भेदभावी द्वेषमूलक वृत्तीला जोपासणारे आपण सगळेच कमीअधिक नितीनच्या हत्याकांडाचे छुपे साथीदार असतो. पण आळ आपल्यावर येऊ नये, म्हणुन मग तावातावाने निषेधाचे सूर काढू लागतो. त्यात मग दाभोळकरांची हत्या असो किंवा नितीन आगेची शिकार असो, आपण त्यांना सावजासारखे आपापल्या राजकीय मतलबासाठी वापरणारे धुर्त शिकारीच नसतो काय? नितीन, माफ़ कर बाळा, अशा बदमाश दांभिक समाजाला. तुझ्यासारख्या समतेच्या पुत्रासाठी हा समाज योग्य नसताना जन्मलास इथे.

2 comments:

  1. भाऊ,

    नितीन त्या मुलीच्या प्रेमात नव्हता. लोकसत्तेतल्या बातमीनुसार ती मुलगीच त्याच्या मागे होती (http://www.loksatta.com/maharashtra-news/dalit-youth-brutally-killed-in-ahmednagar-district-479936/).

    यावरून ही हत्या कशी घडली असावी त्याचा अंदाज बांधता येतो. मुलीचे आणि भावाचे भांडण झाले असावे. मुलगी ऐकत नाही म्हणून भावाने नितीनला संपवायचं ठरवलं असणार. तशी तयारीही केलेली दिसते. वर्गात ते दोघे बोलत होते असा निरोप मिळाल्यावर खुन्यांनी घाला घातला. नितीनचा तसूभरही दोष दिसत नाही.

    सत्तेचा माज माणसाचा पशू बनवतो. या नराधमांना फाशी झाली पाहिजे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊ , झाले ते वाईट झाले व्हायला नको होते , पुरोगामी नाटक कंपनी नेहमीची टेप वाजवेल व नंतर सगळे विसरले जाईल . पण नेहमी मला जो प्रश्न पडतो तो या घटने नंतरही पडलाच . त्यात तुमच्यावरही आक्षेप आहे . तुम्ही पत्रकार लोक नेहमी बातमी देताना किंवा लेख लिहताना असे का लिहता कि अमुक समुदायाने धार्मिक स्थळातून दगड फेकले . विशिष्ठ समुदायाची मिरवणूक चालली होती . वगैरे वगैरे . नुकतेच आसाम मध्ये बोडो आदिवासींनी बांगलादेशी लोकांना मारले ५००० बांगलादेशी मुस्लीम स्थलांतरित झाले . अशी बातमी का नसते ? आता ज्या घटने बद्दल तुम्ही लिहले आहे त्यातील तरुण कोणत्या जातीचा होता व मारणारे कोणत्या जातीचे होते ? हे विचारणे किंवा जाणून घेण्याची इच्छा असणे म्हणजे मागासलेपण आहे का ? कि तो गुन्हा आहे ? का लपवताय ? हे लपवणे म्हणजे पुरोगामित्व असते का ?

    ReplyDelete