Monday, May 5, 2014

मतचाचण्यांची जादू



   सोमवारी अमेठीत अखेरच्या क्षणी भाजपाचे पतप्रधान पदाचे उमेदवार मोदी यांनी मोठी जाहिर सभा घेतली. खरे तर त्या सभेचा कार्यक्रम ऐनवेळी ठरला. मोदींच्या पुर्वनियोजित कार्यक्रमात रायबरेली वा अमेठीत प्रचाराला जायची तरतुद नव्हती. पण अखेरच्या दिवसात कॉग्रेसने जे पराभूत मानसिकतेचे संकेत दिले, त्यामुळेच मोदींची हिंमत वाढली आणि त्यांनी अधिक आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला. त्याला अन्य कशापेक्षाही प्रियंका गांधींनी अमेठीत केलेल्या व्यक्तीगत निंदानालस्तीचे कारण अधिक आहे. त्यातून राहुल व कॉग्रेसचा धीर सुटल्याचे संकेत मिळालेच होते. किंबहूना कॉग्रेसने पक्ष म्हणुनही पराभव मान्य केल्याचा सिग्नल या दोघा भावंडानी आपल्या वक्तव्यातून दिलेला आहे. रविवार व सोमवारच्या राहुल प्रियंकाच्या विधानाचे प्रयोजन काय होते? २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मतदान संपले तेव्हा संपुर्ण देशातील साडेतीनशे जागांचे भाग्य यंत्रामध्ये बंदिस्त झालेले होते. मग मोदींना रोखण्यासाठी तिसर्‍या आघाडीला सेक्युलर सरकार आणायला पाठींबा देण्याची भाषा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलले होते. त्याचाच पुनरुच्चार अन्य कॉग्रेस नेत्यांनीही केलेला होता. त्यावरून सनसनाटी माजवणार्‍यांना अशा शब्दाचे अर्थ कितीसे कळतात देवजाणे. अशी विधाने नेहमी सुचक असतात. तेव्हा तिसर्‍या आघाडीला पाठींबा देण्याच्या भाषेचा अर्थ इतकाच होता, की कॉग्रेसच्या अंदाजानुसार भाजपाला वा एनडीएला बहूमताचा पल्ला गाठता येणार नाही. पण तो गाठण्यासाठी अन्य छोट्या पक्षांनी तिकडे जाऊ नये, म्हणून त्यांना भाजपापासून रोखण्यासाठी तसे आमिष साखवण्याचा हेतू त्यात होता. पण त्या भाषेवर बरीच चर्चा झाली, तरी सोनिया वा राहुल यांनी त्याच एकदाही इन्कार केला नव्हता. म्हणजेच कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसली, तरी मोदींना सत्तेपासून दुर ठेवण्याचे राजकारण राहुलही मान्य करीत होते.
 
   पण पुढल्याच म्हणजेच ३० एप्रिलच्या मतदानानंतर चित्र पालटलेले आहे. त्याचे खरे कारण मतदानोत्तर मतचाचण्या हेच असू शकते, मतचाचणांच्या अंदाज व निष्कर्षाला नेहमीच आव्हान दिले गेलेले आहे. कारण अशा आधीपासून घेतलेल्या मतदानपुर्व मतचाचण्यांचे अंदाज अनेकदा चुकलेले आहेत. पण मतदानोत्तर चाचण्या म्हणजे मतदान करून बाहेर पडलेल्या मतदाराचे मत आजमावून काढलेले निष्कर्ष सहसा चुकलेले नाहीत. त्यातून स्पष्ट होणारा कल व कौल कधीच चुकलेला नाही. म्हणूनच मग त्यावर अनेक पक्ष जाहिर नाही, तरी खाजगीत विश्वास ठेवतात. किंबहूना बहुतेक पक्ष अंतर्गत कारणास्तव मतचाचण्या घेतच असतात. मात्र असल्या चाचण्या पुढे होणार्‍या मतदानाला प्रभावित करण्याचा धोका टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यावर निर्बंध घातलेले आहेत. सहाजिकच अशा चाचण्या मतदान होताना घेतल्या गेलेल्या आहेत, पण त्याचे निष्कर्ष जाहिर केलेले नाहीत. ज्या दिवशी मतदान संपेल त्याच दिवशी १२ मे रोजी संध्याकाळी ते निष्कर्ष जाहिर होणार आहेत. पण ज्यांनी त्या मतदानोत्तर चाचण्या घेतल्या आहेत, त्यांच्यापाशी त्यांचे निष्कर्ष उपलब्ध आहेत. त्यांनी जाहिर केलेले नसले, तरी काही पक्ष व पत्रकार मंडळींना ते विश्वासाने दिलेले असू शकतात. याचा पुरावा मग त्या नेते वा पत्रकारांच्या वर्तनातून दिसू शकतो. ३० एप्रिलला ४३८ जागांचे मतदान पुर्ण झाले आणि अकस्मात राजकारणाची दिशा व भाषा बदलून गेलेली आहे. त्याला हेच निष्कर्ष कारणीभूत असू शकतात. कॉग्रेसच्या वागण्यातली हताशा, राहुल प्रियंका यांचे अधिकच  बेताल बोलणे व दुसरीकडे मोदी व भाजपाची आत्मविश्वासपुर्ण वक्तव्ये; निकालाची दिशा दाखवतात. त्यानंतर मोदींच्या मुलाखती घेण्यासाठी विविध माध्यमांची झुंबड उडणे व त्या मुलाखतीमध्ये मोदींनी पत्रकारांना झापणे काय सांगते?

   एका बाजूला मोदींचा वाढता आत्मविश्वास आणि दुसरीकडे राहुलची बदललेली भाषा तपासून बघण्यासारखी आहे. ३० पुर्वी कॉग्रेस तिसर्‍या आघाडीला पाठींबा देऊन मोदींना रोखण्य़ाची भाषा बोलत होती. रविवारी ४ मे रोजी राहुल यांनी अन्य कुठल्या पक्ष वा आघाडीला पाठींवा देण्यास साफ़ नकार देऊन टाकला आहे. तेवढेच नाही, तर कॉग्रेसलाच स्पष्ट बहूमत मिळेल इथपर्यंत मजल मारली. दुसर्‍याच दिवशी म्हणजे मोदींची सभा अमेठीत व्हायची असताना प्रियंकाने कुठल्याच पक्षाला बहूमत मिळणार नाही, असे सांगून टाकले. दोन भावंडात इतकी तफ़ावत? राहुलना बहूमत मिळायची खात्री आहे आणि प्रियंका कुणालाच बहूमत नाही, असे ठामपणे सांगते? तर तिच्या बोलण्यातले तथ्य इतकेच आहे, की कॉग्रेसला बहूमत मिळणार नाही, याची तिला खात्री आहे. मग राहुल इतक्या ठामपणे बहूमताचे कशाला बोलतात? तर त्यांनाही माहित आहे वा कळलेले आहे, की कॉग्रेसची सत्ता जाणार असून मोदीना बहूमताचा पल्ला सोपा झालेला आहे. मग मोदींना रोखण्याच्या भाषेला अर्थच रहात नाही. तर त्याबद्दल बोलायचेच कशाला? त्यापेक्षा स्वबळावर लढणार्‍या कार्यकर्त्याला विजयाची आशा दाखवून झुंजीला प्रवृत्त करणे, अधिक लाभदायक नाही काय? म्हणून अशी भाषा बदललेली आहे. तिसरीकडे पत्रकार व माध्यमातील मोदींशी बोलण्याची झुंबड बघा. उद्याचा पंतप्रधान म्हणुन त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी गोडीगुलाबी निर्माण करण्याचे प्रयास त्यातून लपत नाहीत. ३० नंतर मोदींच्या मुलाखती घेणार्‍यांचे प्रश्न व विषय; मोदी पंतप्रधान झालेतच अशा स्वरूपाचे असावेत, याचे अन्य काय कारण असू शकते?  विविध घटना व सूचक विधाने यांचा एकत्रित विचार केला व संदर्भ जोडले तरच त्यातले रहस्य उलगडता येत असते. २४ व ३० एप्रिलच्या मतदानानंतर राजकारणातल्या घडामोडींचा बदलता चेहरा त्यातूनच स्पष्ट होतो. मतदानोत्तर मतचाचण्यांची ही सगळी जादू आहे.

No comments:

Post a Comment