Thursday, May 1, 2014

निष्ठावान आणि दगाबाज?

 राजकारणात म्हणजे कुठल्याही पक्षात आजकाल निष्ठावान किंवा गद्दार असले शब्द नित्यनेमाने वापरले जात असतात. पण मतदाराला कोणी कधी नावे ठेवत नाही. १९७७ सालात इंदिरा गांधी यांनाही मतदारांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात रायबरेली येथे पराभूत केले होते. त्यामुळेच कुठल्याही मतदारसंघाला सुरक्षित जागा असे संबोधण्यात अर्थ नाही. वाराणशी येथून मोदींनी निवडणूक लढवायचे ठरवल्यावर सुरक्षित मतदारसंघ अशी भाषा सतत वापरली गेली. पण भाजपाने नेहमी ती जागा जिंकलीच होती असे नाही. पण देशभरात काही मतदारसंघ असे आहेत, ज्यांनी कधीच एका पक्षाला वा उमेदवाराला कायम साथ दिलेली नाही. उलट काही मोजके असेही मतदारसंघ आहेत, ज्यांना आपण निष्ठावान म्हणू शकतो. ही माहिती मोठी मजेशीर आहे.

   उत्तरप्रदेशातील बाराबंकी हा असा एकमेव मतदारसंघ आहे, की त्याने कधीच एका पक्षाला दुसर्‍यांदा संधी दिलेली नाही. आजवरच्या चौदा निवडणूकीत तिथून प्रत्येकवेळी आधीच्या विजयी पक्षाला मतदाराने धुळ चारली आहे. काही पक्षांनी वारंवार तिथून विजय मिळवला आहे. पण सलग कुठल्याही पक्षाला बाराबंकी येथे आपला झेंडा फ़डकावता आलेला नाही. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत हा मतदारसंघ नव्हता. १९५७ सालात त्याची निर्मिती झाली. तेव्हापासून त्याचा विक्रम कायम आहे. भाजपा, समाजवादी व बसपा असे करीत मागल्या खेपेस तिथे मतदाराने कॉग्रेसला संधी दिली. यावेळी तिथे कॉग्रेस इतिहास बदलते काय, ते १६ मे रोजी कळू शकेल. त्याच्या खालोखाल उत्तरप्रदेशच्याच जौनपुरचा नंबर लागतो. तिथे १९६७ आणि १९७१ हा अपवाद वगळता कुठलाही पक्ष लागोपाठ विजयी होऊ शकलेला नाही. अपवाद केला तो कॉग्रेसने १९६७ आणि १९७१साली. बिहारच्या मोंघीर मतदारसंघातही तीच कहाणी आहे. १९५७ आणि १९६२ अशी सलग दोनदा ही जागा प्रजा समाजवादी पक्षाने जिंकली होती. त्यानंतर तिथे लागोपाठ दुसर्‍यांदा कुठला पक्ष जिंकू शकलेला नाही. कमीअधिक अशीच कहाणी गुवाहाटी, मिर्झापूर, अमरोहा, हिस्सार, मोतीहारी, खलीलाबाद, आझमगड, महेंद्रगड, लालगंज, प्रतापगड व संगरूर या मतदारसंघांची आहे. 

   दुसरीकडे छिंदवाडा हा देशातला एकमेव असा मतदारसंघ आहे, जिथे पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीपासून कॉग्रेसचे अबाधित वर्चस्व राहिलेले आहे. तिथे एकदाही बिगर कॉग्रेस उमेदवाराला मतदाराने थारा दिलेला नाही. सलग पंधरा वेळा तिथून कॉग्रेस उमेदवारानेच बाजी मारलेली आहे. त्याच्या खालोखाल महाराष्ट्रातले दोन मतदारसंघ येतात, जिथे कॉग्रेसला पराभूत करणे कुठल्याही विरोधकाला कधी साधलेले नाही. गेल्या नऊदा तिथून केंद्रीय मंत्री कमलनाथ निवडून आलेले आहेत. यावेळी ते दहाव्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यात तेरा वेळ कॉग्रेसला यश देणार्‍या नंदूरबार मतदारसंघाचा समावेश होतो. याची निर्मिती १९६२ सालात झाली आणि तेव्हापासून सलग तिथे कऑग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राल्याच सांगलीचा. १९६७ सालात हा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आजपर्यंत तिथून कॉग्रेस उमेदवारच निवडून येऊ शकला आहे. थोडक्यात आपण त्या जागांना कॉग्रेसचे निष्ठावान मतदारसंघ म्हणू शकतो. याखेरीज असे काही मतदारसंघ आहेत जिथे क्वचितच कॉग्रेसला पराभवाचे तोंड बघावे लागले असेल. त्यात मालदा, कोलार, नागपूर, जोरहाट, अमेठी, कोरापुट, नेल्लोर, चिकबल्लापूर, तिरूपती, गुंटुर व अनंतपूर अशा मतदारसंघांचा समावेश होतो. या जागी एखाद दोनदा कॉग्रेसला पराभवाचे तोंड बघावे लागले असेल. पण अन्यथा तिथला मतदार कॉग्रेसचा निष्ठावान राहिला आहे.  

   मजेची गोष्ट म्हणजे यात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अशा दिग्गजांच्या मतदारसंघांचा समावेश होत नाही. त्यापैकी महाराष्ट्रातल्या नागपूरची गोष्ट अजब आहे. १९७१ सालात तिथून फ़ॉरवर्ड ब्लॉकचे जाबूवंतराव धोटे निवडून आले होते. पण सात वर्षानंतर तेच कॉग्रेसमध्ये सहभागी झाले. दुसर्‍यांदा नागपूर येथे कॉग्रेस पराभूत झाली ती भाजपाच्या बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून १९९६ सालात. पण गंमत अशी, की पुरोहितच मुळात कॉग्रेसमधून भाजपात आलेले होते. म्हणजेच तसा तिथे कॉग्रेसचाच प्रभाव राहिला. यावेळी प्रथमच भाजपाने नितीन गडकरी यांच्या रुपाने तिथे आपला दांडगा उमेदवार उभा केलेला आहे. त्याचे भवितव्य आपल्याला पंधरा दिवसात कळेलच. हा मतदारसंघ निष्ठा सोडून मतदान करतो काय, त्याची प्रचिती तेव्हाच येईल. 

आजवर सर्वाधिक फ़रकाने मोठे यश मिळवलेल्या उमेदवाराचे नाव अकाली दलाच्या सिमरनजीत सिंग मान असे आहे. त्याने पंजाबच्या तरणतारण या मतदारसंघातून तब्बल ८१ टक्क्याहून अधिक फ़रकाने निवडणूक जिंकली होती. पण तेव्हा खलीस्तानचा धुमाकुळ चालू होता आणि अकाली दलाचा मुख्य गट निवडणूकीपासून अलिप्त राहिलेला होता. आकड्यांच्या बाबतीत म्हणायचे तर सर्वाधिक मतांच्या फ़रकाने मार्क्सवादी उमेदवार अनिल बासू २००४ च्या निवडणूकीत आरामबाग येथून विजयी झाले. त्यांनी ६१ टक्के म्हणजे ५ लाख ९२ हजार मतांच्या फ़रकाने विजय मिळवला होता. १९७७ सालात जनता लाटेवर स्वार झालेल्या रामविलास पासवान यांनी हाजीपुर येथून पाच लाखाच्या फ़रकाने निवडणूक जिंकल्याने त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले होते. त्यांचा विक्रम अनिल बासू यांनी २००४ सालात मागे टाकला. अशी ही मतदारसंघांची कहाणी.

No comments:

Post a Comment