Tuesday, May 6, 2014

दुर्गाबाई भागवत आठवतात?



   लोकसभा निवडणुकीच्या दोनच फ़ेर्‍यातील मतदान आता बाकी आहे. आज त्यातली एक फ़ेरी होत असून येत्या सोमवारी अखेरच्या फ़ेरीचे मतदान होईल. पण या संपुर्ण दोनतीन महिन्यातल्या प्रचारात देशभरचेच नव्हेतर जगातलेही वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचे प्रमुख कारण भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यांना भाजपाने पुढे आणण्यापासूनच मोदी हा वादाचा विषय झालेले होते. जसजसे ते पुढे येत गेले, तसा राजकारणच नव्हेतर सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोकांवरही राजकीय प्रभाव पडत गेला. आजवर चित्रपट किंवा तत्सम अन्य क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यक्तीगत पातळीवर राजकीय भूमिका घेतल्या असतील. पण सामुहिकरित्या राजकारणबाह्य मान्यवरांनी राजकारणात लुडबुड केली नव्हती. १९७७ सालात आणिबाणीने दुखावलेले साहित्यिक कलावंत तेव्हा खुलेआम इंदिरा गांधी व कॉग्रेसच्या विरोधात सामुहिक प्रतिक्रिया म्हणून बाहेर पडलेले होते. दुर्गाबाई भागवत, जयवंत दळवी, पु ल देशपांडे यांच्यासारख्य मान्यवरांनी प्रचारसभेत भाग घेण्यापर्यत मजल मारली होती. पण तो अपवाद करता सहसा राजकारणबाह्य मान्यवरांनी राजकीय प्रक्रियेत लुडबुड केलेली नव्हती. यावेळी भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्याही क्षेत्रात विभाजन घडवून आणले म्हणावे लागले. काही कलावंतांनी मोदींच्या पंतप्रधान होण्याला विरोध करण्यासाठी संयुक्त पत्रक काढल्यावर त्याची तीव्र प्रतिक्रिया कलाक्षेत्रात उमटली आणि तितक्याच आवेशात अन्य काही कलावंत मोदींच्या समर्थनाला खुलेपणाने मैदानात आले. त्यांनीही मोदीच पंतप्रधान होण्यात देशाचे कल्याण असल्याचा आग्रह धरणारी भूमिका मांडायचा अट्टाहास केला. थोडक्यात आजवर राजकारण आणि अन्य क्षेत्रात असलेल्या लक्ष्मणरेषेचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. किंबहूना आपापले छुपे राजकीय झेंडे लपवून तेच अजेंडे कलावंताचा मुखवटा लावून वावरणार्‍यांना मुखवटे उतरून ठेवायची पाळी आली. त्यातून मग जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ नोबेल विजेते डॉ अमर्त्य सेनही सुटले नाहीत किंवा ज्ञानपिठ विजेते अनंतमुर्ती यांच्यासारखे साहित्यिकही मागे राहिले नाहीत.

   यातल्या सेन यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलवरच शंका घेतल्या आणि तोफ़ा डागल्या; तेव्हा त्यांच्या इतकेच ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ भगवती यांनी सेन यांच्या दाव्याला आव्हान देऊन मुद्दे खोडण्याचे कष्ट घेतले. अनंतमुर्ती यांच्यासारख्या जाणत्या साहित्यिकाने मोदी पंतप्रधान झाल्यास भारत सोडून पळ काढावा लागेल, असली अतिशयोक्त भाषा वापरण्यापर्यंत खालची पातळी गाठली. इतकी जर जाणत्या बुद्धीमंत मान्यवरांची अवस्था झालेली असेल. तर विविध पक्षाच्या सामान्य कार्यकर्ते व दुय्यम नेत्यांनी शालीनता पाळून प्रचार करावा अशी अपेक्षा करता येईल काय? मोदींवर असहिष्णू असल्याचा आरोप करणार्‍यांनी आपली वक्तव्ये आणि कृतीतूनच स्वत:च्या असहिष्णूतेचे पुरावे जगासमोर सादर केले. यापेक्षा देशातल्या बुद्धीजिवींच्या घसरगुंडीची अन्य कुठली साक्ष असू शकते? जे लोक भिन्न विचार व मतभिन्नतेचा आदर व्हावा म्हणून आग्रही असतात, त्यांनी दुसर्‍याच्या विचार व भूमिकेला जनतेचा पाठींबा मिळतो, म्हणूनच त्याच्या विचारांची मुस्कटदाबी करण्याचा आगरह धरावा, याला विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार म्ह्णता येईल काय? हे सर्व झाले व होतच राहिले आहे. पण त्याची फ़ारशी चर्चा झालेली नाही. अमित शहा, आझम खान, मोदी किंवा सलमान खुर्शीद यांनी थोडेफ़ार कठोर शब्द आपल्या भाषण वक्तव्यातून मांडले; तर माध्यमांनी त्यांच्यावर काहूर माजवून निवडणूक आयोगाला आचारसंहितेचा बडगा उचलण्यास भाग पाडले. पण ज्यांना मान्यवर जाणते म्हणून ओळखले जाते, त्यांच्या वक्तव्ये किंवा भाषेवर कोणी आक्षेपही घेतला नाही. अर्थात निवडणूक प्रचार व त्यात बोलले जाणारे शब्द हे प्रचारापुरते असतात आणि नंतर धुरळा खाली बसल्यावर सर्वकाही विसरले जाते, असे एकाच व्यक्तीने बोलून दाखवले, ते खुद्द मोदींनी. प्रचारातले शब्द गंभीरपणे घ्यायचे नसतात, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. तेवढे सामंजस्य जाणत्या बुद्धीमंतांनी दाखवू नये हे दुर्दैवच म्हणायचे.

   याच निमित्ताने म्हणजे अमर्त्य सेन वा अनंतमुर्ती यांच्या आक्रस्ताळी विधानांमुळे जुना इतिहासही आठवला. तेव्हा आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्या लेखिका दुर्गाबाई भागवत जनता पक्षाच्या लाटेत इतक्या वाहून गेल्या, की निवडणूका संपून गेल्यावरही त्यांचा कॉग्रेस वा इंदिरा गांधी विरोध संपला नव्हता. जनता लाट ओसरली आणि जनता पक्षाचा बोर्‍या वाजला, म्हणून १९७९च्या अखेरीस मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागल्या होत्या. त्यावेळी पुन्हा कॉग्रेसमध्ये दुफ़ळी माजली आणि यशवंतराव चव्हाण व ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षला झुगारून इंदिरा गांधींनी नव्याच पक्षाची स्थापना केलेली होती. आज त्यालाच कॉग्रेस (आय) संबोधले जाते. तो पक्ष पुर्णपणे इंदिरा या एकाच व्यक्तीभोवती फ़िरणारा होता. त्यामुळे पुन्हा तोच सत्तेवर आला तर आणिबाणीवर जनतेचे शिक्कामोर्तब होईल, असे अनेकांना भय वाटत होते. त्यामुळेच दुर्गाबाईंप्रमाणे अनेकजण भयभीत झाले होते. पण जनता लाटेचा विचका करून टाकणार्‍या राजकारण्यांच्या मागे कोणी जाणता उभा रहायला धजावत नव्हता. अशावेळी दुर्गाबाईंनी इंदिराजींवर थेट तोफ़ा डागल्या होत्या. अमर्त्य सेन वा अनंतमुर्तींची देश सोडून जाण्याच्या भाषेने त्या जुन्या इतिहासाची आठवण झाली. तेव्हा दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. इंदिरा पुन्हा सत्तेवर आली तर आपण गगनचुंबी इमारतीवरून उडी घेऊन जीव देऊ. अर्थात त्यामुळे भारतीय मतदाराने राजकीय वास्तवाकडे पाठ फ़िरवली नव्हती आणि इंदिराजींना सत्तेपासून वंचित ठेवले नव्हते. चांगल्या दोन तृतियांध बहूमताने इंदिराजींचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. पण म्हणून खरेच दुर्गाबाईंनी ‘आपला शब्द’ खरा केला नाही की जीव दिला नाही. इंदिरा सरकार स्थापन झाले व चालले आणि दुर्गाबाई सुद्धा आपले उर्वरीत जीवन गुण्यागोविंदाने नांदल्या. आपल्या देशातला अजाण सामान्य नागरिक जितका राजकारण्यांना ओळखतो तितकाच कोणत्या वेळी बुद्धीमंत जाणत्या मान्यवरांकडे दुर्लक्ष करायचे तेही जाणतो. कोणाकडे केव्हा दुर्लक्ष करावे आणि कोणाचे कुठल्या बाबतीत ऐकावे, हे सामान्य माणूस जाणतो. म्हणून हा देश हजारो वर्षे इतकी आक्रमणे पचवून शिल्लक राहिलेला आहे. हीच सर्वकालीन वस्तुस्थिती आहे ना?

1 comment:

  1. Prachand paise deun kinva kasletari pralobhan dakhun sen,mufti ya lokanna congresne swatache pracharak banavle asave

    ReplyDelete