Sunday, November 9, 2014

शिवसेना फ़ुटली तरी ‘बेहत्तर’

 


सत्तेत गेली नाही तर शिवसेनेत फ़ुट पडेल, अशा बातम्या आल्या व अजून तो युक्तीवाद सुरू आहे. त्याला कारणही आहे. ज्याप्रमाणे भाजपाने राष्ट्रवादीचा बाहेरून देऊ केलेला पाठींबा अजून नाकारलेला नाही, त्याप्रमाणेच शिवसेनेलाही विरोधात बसायचा ठाम निर्णय घेता आलेला नाही. आपल्याशिवाय भाजपाचे सरकार स्थीर राहू शकत नाही, याची सेनेलाही पुर्ण जाणिव आहे. पण त्याच्या बदल्यात सत्तेचा पुरेसा हिस्सा मिळावा, ही शिवसेनेची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे काहीकाळ राश्ट्रवादीच्या पाठींब्याने सत्ता चालेल आणि तेवढ्या वेळात अन्य मार्गाने बहूमताचा पल्ला गाठता येईल; अशी भाजपाची अटकळ आहे. आजची आकडेवारी बघितली तर तमाम लहान पक्ष व अपक्ष सोबत घेऊनही भाजपाला १४२ चा पल्ला गाठणेच शक्य आहे. पण मग उर्वरीत तीन पक्ष विरोधात एकत्र जमले, तर त्यांची बेरीज १४६ म्हणजे नेमके बहूमत होते. म्हणूनच नुसते इतर पक्ष-अपक्ष भाजपासाठी पुरेसे नाहीत. अन्य पक्षातले आमदार फ़ोडून बहूमत गाठावे लागेल. त्यासाठी अशा पक्षातले दोन तृतियांश आमदार फ़ोडावे लागतील. ते सोपे काम नाही. म्हणजे कॉग्रेस वा राष्ट्रवादीतील २८ किंवा सेनेतील ४२ आमदार फ़ोडावे लागतील. ते काम जव्ळपास अशक्य आहे. मग त्यापेक्षा सोपा मार्ग म्ह्णजे अशा पक्षातल्या आमदाराने स्वत:वर बडतर्फ़ी ओढवून घ्यायची, ते झाल्यास त्या आमदाराला कायदा तटस्थ मानतो आणि तो पक्षादेशाच्या कचाट्यात सापडत नाही. तिसरा मार्ग अन्य पक्षातल्या आमदारांनी सामुहिक वा व्यक्तीगत राजिनामे देऊन नव्याने भाजपाच्या तिकीटावर निवडून येणे. असे किमान दिडदोन डझन आमदार आणणेही सोपे काम नाही. शिवाय असली तुकडेजोड करण्यात दोन वर्षे तरी खर्ची पडतील आणि तोपर्यंत सरकार डळमळीतच रहाणार. त्यापेक्षा एकहाती शिवसेने्च्या ६३ आमदारांचा पाठींबा सुरक्षित व खात्रीचा असेल. म्हणूनच ‘सकारात्मक’ चर्चा चालू आहे.

सकारात्मक चर्चा म्हणजे राष्ट्रवादीच्या बेभरवंशी पाठींब्यावर भाजपा सेनेला खिजवतो व अडवणूक करतो आहे. सत्तेचे वाटपच करायचे असेल, तर गरजवंताने पडती बाजू घेण्याला पर्याय नसतो. कर्नाटकात अवघ्या चाळीस आमदारांच्या सेक्युलर जनता दलाला निम्मा काळ मुख्यमंत्री व निम्मे मंत्रीपदे देणार्‍या भाजपाचे दुप्पट आमदार होते. मग तेव्हा त्यांनी तसा सौदा कशाला केला होता? तेव्हा आमदार संख्येची समिकरणे कशाला कुमारस्वामी यांना समजावली नव्हती? अखेर त्यांनी आपले मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यावर भाजपाला टांग मारलीच होती. त्यामुळे विधानसभा बरखास्तीची पाळी आलेली होती. अवघ्या सात वर्षापुर्वीची ती घटना आहे. तशी आणखी एक आठवण सांगता येईल. उत्तर प्रदेशात पावणे दोनशे आमदार भाजपाकडे होते. पण त्यांनी चाळीस आमदारांच्या बसपाला बाहेरून पाठींबा देत मायावतींना मुख्यमंत्री पदी बसवले होते. त्यानंतर पुन्हा तशीच वेळ आली आणि मोठा पक्ष असूनही निम्मा कालवधी मायावतींना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपाने सौदा केला होता. तिथेही आधी संधी मायावतींना दिलेली होती. पण मायावतींनी शब्दाचे पालन केले नव्हते. म्हणजे अशा प्रत्येक मित्राने भाजपाशी दगाफ़टका यापुर्वी केलेला आहे. त्या प्रत्येकाची मैत्री ही निवडणूका संपल्यावर सत्तेचे वाटप करतानाची तडजोड होती. यापैकी कोणाशीही भाजपाने कधी निवडणूकपुर्व किंवा दिर्घकालीन मैत्री केलेली नव्हती. मात्र सेनेची गोष्ट वेगळी आहे. पंचवीस वर्षात सेनेने भाजपाची सत्तेत वा विरोधात सोबत केलेली आहे. पण आज परस्पर विरोधात लढल्यावर आपल्या या नैसर्गिक मित्राला भाजपाने दिलेली वागणूक कशी आहे? आपल्या नैसर्गिक शत्रूशीही अत्यंत नम्रतेने व पडते घेऊन वागलेला भाजपा नैसर्गिक मित्राला मात्र शत्रूपेक्षा अपमानास्पद वागणूक देतो आहे. इथेच, घोडे कुठे फ़सले आहे त्याचा अंदाज येऊ शकतो.

नैसर्गिक मित्र वा नैसर्गिक शत्रू याची भाजपाची व्याख्या कोणती? कुमारस्वामी वा मायावती यांना आधी व अधिक वाटा देण्यातून शत्रूत्व दाखवले गेले होते काय? सेनेला प्रत्येक दिवशी अपमानित करणार्‍या बोलण्यात गुंतवून ठेवण्याला नैसर्गिक मैत्री म्हणायचे असेल, तर भाजपा कुठली तरी वेगळीच मराठी भाषा बोलतोय, असेच म्हणावे लागेल. कर्नाटकातले कुमारस्वामी किंवा उत्तर प्रदेशातील मायावतींनी निवडणुकात भाजपाचे गुणगान करून कमी जागा जिंकल्या होत्या काय? म्हणून भाजपाने पदरमोड करून त्यांना अधिक वाटा दिला असे म्हणायचे असेल, तर गोष्ट वेगळी. पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते, की त्या दोन्ही घटनांमध्ये जशी आकडेवारी होती तशीच महाराष्ट्रात आज असली, तरी राजकीय परिस्थिती तशी नाही. त्या बाबतीत भाजपाला बाहेरून कोणी बहूमतासाठी पाठींबा जाहिर केला नव्हता. म्हणूनच लाचार होऊन भाजपाला कुमारस्वामी वा मायावतीच्या पाया पडावे लागत होते. महाराष्ट्रात त्यांना पवारांनी बाहेरून पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे राज्यपालांकडे दावा करताना किंवा उद्या बहूमत सिद्ध करताना भाजपा सरकारचे गाडे सेनेच्या पाठींब्या शिवाय अडून पडणार नाही. सहाजिकच मायावती व कुमारस्वामी समोर लोटांगण घालणार्‍या भाजपाला कमालीचा अहंकार सतावतो आहे. सरकार स्थापन करून चांगले चालवण्यापेक्षा, त्यांना आपल्या नैसर्गिक मित्राला अपमानित करण्यात मौज वाटते आहे. सेनेतही एक गट सत्तेसाठी इतका लाचार व अगतिक झाला आहे, की आमदार फ़ुटतील असे भय दाखवले जात आहे. असल्या भितीने पछाडलेल्यांनी अभिमानाच्या गोष्टी करू नयेत. मान खाली घालावी आणि वाडग्यात पडेल ते मान्य करून अदबीने कुर्निसात करावा. अभिमान व व्यवहार यांची कधीच ‘नैसर्गिक मैत्री’ नसते. त्यांचे नैसर्गिक शत्रूत्वच असते. जसे मायावती व कुमारस्वामी याच्याशी भाजपाचे होते.

शिवसेना खरेच इतकी सत्तेसाठी अगतिक लाचार झालेली असेल, किंवा सेना नेतृत्वाला इतकेच आमदार फ़ुटीचे भय असेल, तर त्यांनी अटी घालणे वा प्रस्ताव पाठवण्याचा घोळ कशाला घालायचा? त्यांनी मस्त भरजरी वस्त्रे परिधान करून मुजरे करतच दिल्लीला जाऊन शरणागती पत्करावी. ज्यांना कोणाला अभिमानाच्या गोष्टी करायच्या असतील, ते दिल्लीला लाथ मारून उरलेली शिवसेना गल्लीत चालवतील आणि नव्याने उभे रहातील. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत, असे म्हणणार्‍या यशवंतराव चव्हाण किंवा पुढे सेनेच्या मराठी बाण्याला झुगारणार्‍या अत्रे-डांगे-एसेम यांच्यासारख्या दिग्गजांना अभिमानाने ‘कुठे नेऊन ठेवले?’ याची जाण आजच्या सेना वा भाजपा नेतृत्वाला नसेल, तर नव्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती व्हायची थांबणार नाही. भाजपाकडून जी ‘सकारात्मक’ बोलणी चालू आहेत, त्यातून शिवसेनेच्या नेत्यांना अपमानित केले जात आहे. असे त्यांनाच वाटत नसेल, तर हरकत नाही. पण सामान्य मराठी माणसाने एकवटून सेनेला १९ टक्केहून अधिक मते दिलीत, याचे भान राखायला हवे. ज्यांना त्याचे भान असेल त्यांना राजकीय इतिहास घडवता येईल. शिवसेना आजवर कितीदा फ़ुटली आणि सत्तालोलूप नेते निघून गेले. त्यांची जागा नव्या पिढीने घेतली आणि इतिहासात सेनेने प्रथमच इतक्या मतांचा मोठा पल्ला गाठलेला आहे. त्याची कदर सन्मानाचा वाटा डेऊन भाजपा करणार नसेल, किंवा सेना नेतृत्व त्याकडे काणाडोळा करणार असेल, तरी सामान्य मराठी माणुस त्याकडे डोळेझाक करणार नाही. तो दबा धरून बसेल आणि त्याला संधी मिळेल तेव्हा वचपा काढल्याशिवाय रहाणार नाही. २७ टक्के मिळवणारे १९ टक्क्यांना अपमानित करण्यात धन्यता मानतात, त्यांची सोनिया-राहुल होतात. ते मागल्या दोन लोकसभा निकालांचे आकडेच सांगतात. म्हणूनच शिवसेना फ़ुटली तरी बेहत्तर. आणि मराठीतच नव्हेतर हिंदीतही ‘बेहतर’.

7 comments:

  1. शेवटी भाऊ तुम्ही म्हटले तसेच पवारलंबी.

    ReplyDelete
  2. भाऊ, प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या वरुन भाजप शिवसेनेचा कुठे ही जाहीर अपमान करत आहे असे दिसत नाही .परंतु आपण म्हणता त्या प्रमाणे behind the doors वाटाघाटी त भाजपवाल्यामधे अहंकार नसून व्यावहारिक पणा असावा.

    ReplyDelete
  3. प्रत्येकाचे दिवस असतात, सगळे दिवस सारखे नसतात. एक मात्र खरे की यानंतर भाजप शी युती करायची हिंमत प्रादेशिक पक्ष करणार नाहीत. आणि असलेले मित्रपक्ष केवळ बहुमत मिळाले (लोकसभा) म्हणून तोडून टाकणे कितपत फायद्याचे? बर्‍याचदा सभागृहात बहुमतपेक्षा जास्त सहमती, पाठिंबा लागतो, त्यामुळे कारभार अवघडच होईल. 1996 साली 13 दिवसात कोसळलेले वाजपेयी सरकार, 1998 मधे अवघ्या एका मताने कोसळलेले सरकार यातून भाजप काहीच शिकला नाही हे दिसून येते.

    ReplyDelete
  4. बरोबर भाऊ शिवसेना कधीच संपणार नाही

    ReplyDelete
  5. सेनेला नेहमीच अहंकार नडत आलेला आहे, त्यांनी १५१ आणि १४५ च्या वादात आपली ही अवस्था करून घेतलेली आहे. सेना लगेच संपेल किंवा नाही याबद्दल मला काही म्हणता येणार नाही पण या सर्व वादामध्ये सेनेबद्दल खूप चांगले मत तयार होते आहे असे मुळीच नाहीये. या उलट भा.ज.प. संयमाने वागून आपली `सकारात्मक' भूमिका स्पष्ट करत आलेला आहे.

    ReplyDelete
  6. Shivasenecha Ahankar jagojagi prakat hot ahe ...

    ReplyDelete