Wednesday, November 12, 2014

आपले डोळेच आपल्याला फ़सवत असतात?



आपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. तेव्हा मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. त्यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.

एकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता खरेदी शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली. पण बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरात दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. पण अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. दोघांचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती.

शयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात व तिच्या समोर हजर होता. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. पण तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला, लाडके काय झाले? तू अशी विचलित का झाली आहेस? तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना? मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल? तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का? निष्ठा, बांधिलकी आपल्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके.

ती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला मंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत आपली ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिकलीचे आहेत, त्याची आताच घरी खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या.

असो. ही अर्थात एक भाकडकथाच आहे. पण त्यातला जो बोध आहे तो अस्सल राजकीय आहे. ज्या व्रतवैकल्याची पुरोगामी मंडळी हेटाळणी व टवाळी करण्यात धन्यता मानतात, त्याचे अनुकरण मात्र किती अगत्याने करतात, त्याची ही कहाणी आहे. शरद पवार यांनी गेल्या साडेतीन आठवड्यात त्याचीच साक्ष दिलेली आहे. त्याचवेळी भाजपानेही त्यातल्या नवर्‍याचे नाट्य छानपैकी रंगवलेले आहे. निकालाच्या पहिल्या दिवसापासून पवार व राष्ट्रवादी यांनी राज्यात स्थीर सरकार हवे असे सांगत भाजपाला बिनशर्त पाठींबा जाहिर केला होता. पण ज्यांचे सरकार आहे, त्यांना ज्या स्थैर्याची फ़िकीर नाही आणि पवार मात्र सरकारच्या स्थैर्यासाठी अगतिक झाल्यासारखी धावपळ करीत आहेत. त्यातून राजकारणातले पावित्र्य आणि पातिव्रत्य स्वच्छपणे समोर आलेले आहे. मात्र भाजपा व पवार यांची अशी अपेक्षा आहे की लोकांनी, मतदारांनी स्वत:च्या डोळ्यांना दिसते आहे त्यावर विश्वास ठेवू नये. त्यांनी नुसत्या पोकळ फ़सव्या शब्दावर विश्वास ठेवावा. आपलेच डोळे आपल्याला फ़सवत आहेत असे लोकांनी मानावे, अशी ती अपेक्षा आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी बहिष्कारातूनच नाही तर वेळप्रसंगी सभागृहात बसून भाजपा सरकारचे समर्थन करणार अशीही बातमी आली. त्यात नवे काय होते? गतवर्षी लोकसभा व राज्यसभेत एफ़डीआयचा मुद्दा गाजत होता. तेव्हा मुलायम व मायावती यांनी तावातावाने त्या परदेशी गुंतवणूकीच्या प्रस्तावाविरोधात भाषणे केली होती आणि त्या निर्णयामुळे देशाची व जनतेची किती घोर फ़सवणूक होणार; यावर पांडित्य सांगितले होते. पण जेव्हा विषय मताला टाकायची वेळ आली; तेव्हा मुलायमचा समाजवादी पक्ष कथेतल्या पतिव्रतेप्रमाणे सभात्याग करून बाहेर पडला होता आणि भाषण विरोधी करूनही मायावतींनी सेक्युलर सरकारला अभय देण्यासाठी राज्यसभेत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. मग त्या भाकडकथेतला गुलछबू नवरा कोण आणि सेक्युलर पतिव्रता किती व त्यांचे वटसावित्रीचे व्रत कुठले; ते आणखी स्पष्ट करून सांगायला हवे का?

इथे एक गोष्ट साफ़ लक्षात घ्यायला हवी, की मागल्या तीन वर्षापासून राज्यातला भ्रष्ट कारभार कॉग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडी सरकारने नव्हेतर भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संगनमताने चालला होता. त्यांच्या संगनमतामुळेच इतके भयंकर घोटाळे राजरोसपणे होऊ शकले. त्यावर कारवाई करायची म्हटल्यास, अनेक राष्ट्रवादी नेत्यांना गजाआड जाऊन बसावे लागले असते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चहाण खुलेआम बोलले आहेत. ते आरोप भाजपाचे विरोधी नेते एकनाथ खडसे करीत होते. परंतू त्या घोटाळ्यात गुंतलेल्यांची यादी बघितली, तर त्यात शिवसेनेच्या कुणाचे नाव जवळपास आढळत नाही. पण आदर्श, सिंचन, टोल वा साखर कारखाने भंगारात विकण्याचे घोटाळे असोत, त्यात राष्ट्रवादी इतकेच भाजपाचे कोणी ना कोणी सहभागी दिसते. आता त्यांच्यावर कारवाया केल्यास एकटे राष्ट्रवादी अडकणार नाहीत. भाजपावालेही गुंतणार. ही छुपी पडद्यामागची युती उघड करण्याचेच डावपेच उद्धव यांनी गेल्या चार दिवसात खेळले असावेत. शिवसेनेची अगतिकता वा सत्तेसाठी लाचारी भले दिसत असेल, पण त्यामुळे उद्धव यांनी भाजपाला राष्ट्रवादीची मदत खुलेआम घ्यायला भाग पाडले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात घोटाळ्यांविषयी भाजपाने उठवलेला आवाज व केलेले आरोप, निव्वळ ढोंगबाजी असल्याचे लौकरच उघड होत जाईल. मग तर घोटाळ्यात गुंतलेल्यांच्या व राष्ट्रपादीच्या पापांवर पांघरूण घालण्याखेरीज भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना दुसरे काहीच करता येणार नाही. अधिक त्या घोटाळ्यांना नुसता हात लावला, तरी सरकार कोसळू शकते. भाजपाच्या व्याभिचारी राजकारणाला चव्हाट्यावर आणायची ही खेळी म्हणूनच आज अगतिकता वाटू शकते. पण वर्षभरात त्यांची अब्रु चव्हाट्यावर आल्याशिवाय रहाणार नाही. त्यासाठीच सत्ता हाती असूनही भाजपा अखेरच्या क्षणापर्यंत सेनेच्या पाठींब्यासाठी ‘विश्वास ठेवा’ इतकेच बोलत राहिला. अगदी त्या भाकडकथेतल्या बदफ़ैली नवर्‍यासारखा ना?

3 comments:

  1. भाऊ, आता तुम्ही सांगताय त्या गोष्टी पटत आहे थोड्या थोड्या पण पूर्णपणे नाही.
    >>राज्यातला भ्रष्ट कारभार कॉग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडी सरकारने नव्हेतर भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संगनमताने चालला होता
    या संदर्भात अधिक माहिती देऊ शकाल का? कोणत्या भ्रष्टाचारत नेमके कोणते लोक होते? आपण काही आधार असल्याशिवाय असे बोलणार नाही. पृथ्वीराजांचे वक्तव्य हाच एक आधार आहे की आणखी काही गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत?

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या विविध लेखात त्याचा उल्लेख आलेला आहे. एकच उदाहरण पुरेसे. आदर्श सोसायटीत संचेती नामक भाजपा राज्यसभा सदस्याचे १० फ़्लॅट आहेत आणि हा गृहस्थ सिंचन घोटाळे झाली त्यात करोडोची कंत्राटे घेतलेल्या कंपन्यांचा मालक आहे.

      Delete
    2. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे. ही माहिती खूप उपयोगी आहे.
      जाता जाता मित्रांसोबत वाद प्रतिवाद करताना आपल्या ब्लॉगचे वाचन फार उपयोगी पडत आहे :)

      Delete