Friday, November 7, 2014

शिवसेना अधिक मनसे = ?



बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर १९९२ सालात विनाविलंब केंद्राने उत्तर प्रदेशातील बहूमत असलेले भाजपाचे कल्याणसिंग सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर ज्या निवडणूका झाल्या, त्यात भाजपाला हिंदूत्वाच्या बळावर पुन्हा बहूमत संपादन करायची खात्री होती. पण त्याला २०० जागांचाही पल्ला ओलांडता आला नव्हता. अशावेळी मुलायम सुद्धा बहूमताच्या जवळपास कुठे नव्हते. पण त्यांनी चतुराईने कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाला सोबत घेऊन, दिडशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या. तेव्हा राज्यात कॉग्रेस हाच प्रमुख तुल्यबळ पक्ष होता. पण चौरंगी लढतीमध्ये याला जेमतेम ९० च्या आसपास जागा मिळू शकल्या होत्या. मग भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या ‘सेक्युलर’ भूमिकेतून कॉग्रेसने मुलायम-कांशीराम यांच्या आघाडीला पाठींबा दिला आणि उत्तर प्रदेशात सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला होता. मात्र ते तिथल्या भाजपावाल्यांना मंजूर नव्हते. म्हणूनच त्यांनी मुलायम सरकार डळंमळीत करण्याचे डावपेच सुरू केले होते. त्यांच्याच चिथावणीने मग मायावतींनी मुलायमच्या विरोधात तोफ़ा डागण्य़ाची मोहिम उघडली. त्यातून अखेरीस बसपाने सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि प्रथमच तिथे मायावती मुख्यमंत्री बनल्या. त्या सरकारला भाजपाने पाठींबा दिलेला असला तरी तो बाहेरून होता. त्यामुळे भाजपा सत्तेत सहभागी झालेला नव्हता. पुढे काही काळानंतर भाजपाने पाठींबा काढून घेतल्यावर ते सरकार पडले. त्यानंतर बसपामे मुलायमची साथ सोडली. यावेळी बसपा व कॉग्रेस यांची युती झाली आणि नवलाची गोष्ट म्हणजे नरसिंहराव यांनी ४२५ पैकी ३०० जागा बसपाला देऊन टाकल्या. त्यातून तो पक्ष विस्तारला आणि कॉग्रेस त्या राज्यात देशोधडीला लागली. पण दोनतीन निवडणुका लढवून २२-२३ टक्के मतांपर्यंत गेलेला मायावतींचा पक्ष बहूमतापर्यंत काही मजल मारू शकत नव्हता.

हा इतिहास एवढ्यासाठी सांगायचा. की त्याच टक्केवारीचे गणित मांडून मायावती देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात स्वबळावर मुख्यमंत्रीपदाची मजल मारू शकल्या. दोनतीन निवडणूका २३ टक्क्यांच्या पलिकडे जाऊ न शकलेल्या मायावतींनी २००७ पुर्वी अतिशय चतुरपणे रणनिती आखली होती. ‘ब्राह्मण बनिया खत्री चोर बाकी सारे डीएस फ़ोर’ अशा घोषणेने राजकारणात आलेल्या बसपाने २००७ पर्यंत ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ इथपर्यंत मजल मारली होती. त्यासाठी त्यांनी वर्षभर ब्राह्मण संमेलने भरवून त्या राज्यात नेतृत्वहीन झालेल्या ब्राह्मण समाजाला सोबत घेतले आणि आणखी चारपाच टक्के मतांची बेगमी केली. त्यातून २००७ सालात आलेल्या निवडणूकीत मायावती ३० टक्के मतांपर्यंत पोहोचल्या आणि १९९१ नंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात चौरंगी लढतीमध्ये एका पक्षाला एकहाती बहूमत मिळू शकले. चौरंगी लढतीमध्ये हीच तर आकड्यांची गंमत असते. मायावतींच्या पक्षाची जडणघडण दलित मतांवर झाली, तशीच ती कडव्या सवर्ण व मनुस्मृती विरोधावर पोसलेली होती. पण निवडणुका व सत्ता जिंकण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांना सोबत घेण्याची हिंमत दाखवली आणि बहूमताची किमया करून दाखवली. ३० टक्के मते गाठली, तर आपले एकपक्षीय बहूमत मिळू शकते, हे गणित डोक्यात ठेवूनच मायावतींनी चारपाच टक्के ब्राह्मण समाजाला सोबत घेण्याची चतुराई केली होती. तेच गणित लक्षात घेतले, तर आज हाती आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या आकड्यांनी समोर आणलेल्या निकालांवर पुढले काही आडाखे बांधता येऊ शकतात. भाजपाला इथे संपुर्ण बहूमत मिळू शकलेले नाही. पण राष्ट्रवादी्च्या बाहेरून पाठींब्याचे आश्वासन घेऊन तोच भाजपा शिवसेनेला खेळवत आहे. त्याला तसेच राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सोपवून सेनेने विरोधात बसायचे ठरवले, तर हे सरकार अस्थीर होऊ शकेल आणि पाच वर्षाची मदत विधानसभा पुर्ण करू शकणार नाही.

विधानसभा मुदत पुर्ण करू शकत नाही, कारण राष्ट्रवादीवर अवलंबून असलेले सरकार त्याच्या जुन्या भ्रष्टाचाराला हात लावू शकणार नाही. सहाजिकच ते बदनाम होत जाते. अधिक मतदाराला दिलेली आश्वासने पुर्ण न केल्याने अल्पमत सरकारची लोकप्रियता घटत जाते. अधिक असे दुबळे सरकार नको तेव्हा शरद पवार कधीही पाडू शकतात. पण त्या सरकारच्या नाकर्तेपणाची जबाबदारी सेनेवर येत नाही. म्हणुनच दिडदोन वर्षात बदनाम होऊन पडलेल्या सरकारला पुन्हा मते मिळणे अशक्य होऊन जाते. अधिक आधीच बदनाम असलेल्या राष्ट्रवादी वा दुबळ्या कॉग्रेसला त्याचा लाभ अजिबात पुढल्या निवडणूकीत मिळू शकत नाही. उलट सत्तास्पर्धेपासून अलिप्त राहून विरोधात बसलेल्या शिवसेनेची पाटी कोरी असल्याने तोच मग मतदारापुढे एकमेव पर्याय उरतो. पण म्हणून आपल्या बळावर शिवसेना बहूमताचा पल्ला गाठू शकेल काय? तितकी सेनेची आज राजकीय ताकद आहे काय? इथे आपण उत्तर प्रदेशातील मायावती फ़ॉर्म्युला लावू शकतो. आज सेनेने मोदी लाटेच्या विरोधात एकाकी लढून १९.३ टक्के मते मिळवली आहेत. पण तेवढ्याने फ़ारतर १०० जागांचा पल्ला गाठता येईल. कारण त्यात दोनतीन टक्के वाढ दिडदोन वर्षात होऊ शकते. पण त्यात मराठी बाणा म्हणून मिळू शकणार्‍या आणखी ३-४ टक्के मतांची भर पडली तरी बेरीज २६ टक्क्यांपर्यंत जाते. ही मते सेनेला मनसेकडून मिळू शकतात. जर मनसेला सोबत घेतले तर पंचवीस टक्के मतांचा पल्ला दोघांना गाठता येतो. यावेळी त्यांची अशीच बेरीज तेवीस टक्क्यांच्या घरात आहे. पण दोघांनी भाजपा जोरात असताना व मोदी लाटेच्या विरोधात ही २३ टक्के मते मिळवली आहेत. म्हणूनच त्यांची ती एकत्रित किमान (कमाल नव्हे) ताकद आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी आधीच बदनाम व खच्ची आहेत आणि त्यात भाजपा सत्तेत अपेशी ठरल्यावर होणार्‍या निवडणूकीत अपेक्षांची दोनचार टक्के सेनेला अधिकची मिळू शकतात.

थोडक्यात राष्ट्रवादी पाठींब्यावर आज भाजपा सरकारला अवलंबून ठेवल्यास आणि मध्यंतरीच्या दिडदोन वर्षात मनसेला सोबत आणल्यास मध्यावधी निवडणूका अपरिहार्य होतात आणि शिवसेना-मनसे यांना संयुक्त प्रयत्न करून स्वबळावर विधानसभेत बहूमत गाठणे शक्य गोष्ट आहे. जी सेना आज मुठभर मंत्रीपदांसाठी मित्र पक्ष मानलेल्या भाजपाकडे इतक्या गयावया करते आहे, तिला ‘नाते’संबंधातील मनसेकडे मदतीचा हात मागण्यात कमीपणा बाळगण्याचे कारण नाही. दोघांचा वारसा एक व रक्ताचेच नाते आहे. पण दोघे एकत्र आल्यास त्याची राजकीय क्षमता महाराष्ट्राच्या राजकारणाला आगामी दोन वर्षात आमुलाग्र कलाटणी देण्याइतकी आहे. कारण विपरित परिस्थीतीत दोघांनी मिळवलेली यावेळची मते तेवीस टक्के, ही लक्षणिय पण किमान आहेत. उलट भाजपाने मोदीलाट अधिक अन्य पक्षातून आयात केलेले उमेदवार यातून मिळवलेली २७ टक्के मते, त्याच्यासाठी कमाल मर्यादा आहे. सत्ता अपेशी ठरली व आयात उपरे सोडुन गेले तर भाजपाला त्यातली किमान दहा टक्के मते गमावण्याची वेळ येईल. आणि उरलेली मते म्हणजे ४०-५० जागा होतात. त्याची अवस्था कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्या पातळीला जाऊ शकते. मात्र त्यासाठी दोन गोष्टी करायला हव्यात. पहिली गोष्ट सेनेने ठामपणे विरोधात बसण्याचा संयम आता दाखवला पाहिजे आणि दुसरी गोष्ट दोन भावांनी जगाशी लढताना एकत्र येण्याइतकी आपापल्या अहंकाराला मुरड घालायला हवी. तर ४० जागांपासून मायावती बहूमतापर्यंत पोहोचल्या, तसा चमत्कार ठाकरेबंधूंना घडवता येऊ शकेल. कारण चौरंगी लढतीत २३ टक्के मते विजयाचे दार ठोठावत असतात. आणि या दोघांना मिळालेली मते मराठी अस्मिता व भाजपा विरोधात मिळालेली आहेत. म्हणूनच त्यांची बेरीज उद्याही कायम राहू शकणारी आहे. किंबहूना भाजपाच्या अपेशामुळे त्यात भरघोस वाढही सहजशक्य आहे.

7 comments:

  1. फारच आशावादी गणित .पण मग मुंबई महापालिकेतील सत्तेचे काय ?खमक्या मोदीने सेनेचे पाणी जोखले आहे.हेच खरे !

    ReplyDelete
  2. good say bhavu ........... maharashtrasathi Shivsena+MNS combination garjeche ahe

    ReplyDelete
  3. भाऊ,
    आता केवळ मनोरंजन म्हणून ही गोष्ट वाचायला छान आहे. मी कालच्या प्रतिक्रियेमध्येही लिहिले होते की शिवसेनेने विकासाच्या मुद्द्यावर मते मागायला हवी होती. अफझलखान वगैरे भाषा करुन नाही. तुम्ही एवढी शिवसेनेच्या बहुमताची तजवीज करताय तेव्हा बहुमताजवळ पोचण्यासाठी शिवसेनेला प्रगल्भता वाढवावी लागेल, विकासाचे राजकारण करावे लागेल हे तुम्ही कुठे लिहिले नाही. भाजपला मते का मिळाली तर मोदी लाटेमुळे असंच तुमचं मत दिसतं. शिवाय भाजप सरकार वाइटच काम करेल कशावरुन? त्यांनी चांगलं काम केल तर लोक म्हणतील अरे भाजपलाच पूर्ण बहुमत देऊया म्हणजे स्थिर सरकार मिळेल. शिवाय काही वर्ग कॉंग्रेसकडे परत जाईल स्थिरतेच्या मुद्दयावरुन. नुसती आकडेमोड करुन बहुमत मिळतं असं नाही. त्यासाठी राजकारण आणि जनमानस उमगावं लागतं, नेत्यांची फळी तयार करावी लागते. राज उद्धव दोघे मुंबईत बसून असतात. यांना विदर्भात मराठवाड्यात प. महाराष्ट्रात चांगली कामगिरी करावी लागेल. ती नुसत्या एकत्र येण्याने सुधारणार नाही.

    ReplyDelete
  4. Uddhav Thakrey cha sakhya bhavasi patat nahi te chulat bhavabarober jamavun ghetil ka?

    ReplyDelete
  5. प्रादेशिक पक्ष हवेतच कशाला ?? तामिळनाडुचे उदाहरण घ्या. कोणतेही राष्ट्र फुटीर भुमिका मान्य करणार नाही. श्रीलंकेत कोण किती बरोबर हा प्रश्न सध्यातरी संपलेला आहे. श्रीलंका शत्रु नाही हे तमीळ सोडुन सर्व भारत मान्य करेल पुर्णपणे आपल्या कह्यात असलेल्या श्रीलंकेला आपण चीनकडे ढकलला. आता बसा बोंबलत. चीनच्या पाणबुड्या तुमच्यापासुन २०० मैलावर अलगद आल्या. अजुन कोठे डोळे उगडताहेत तमिळांचे. बसा प्रादेशिक अस्मितेच्या नावाने बोंबलत. दामोदरगुरूजी उर्फ देवधर समीर तसेच Rajendra Joshi यांच्या पोस्ट काळजीपुर्वक वाचा. मनाली ताई (नव्हे सर्व शिवसैनिक भक्त) भाजपाच्या एवढ्या कडव्या टीकाकार नका होऊ. सगळे चोर आहेत एक कदाचित आशा निर्माण झाली आहे चला त्यांना एकदा मनःपुर्वक साथ देवुन बघुया. श्री. मोदींच्या प्रांजळपणावर विश्वास ठेवु. तथाकथीत सेक्युलर कॉंग्रेसच्या राजवटीत लष्कराने काश्मीरमधे माफी मागितलेली कधी बघितली आहे का? नुसते निवडणुक स्टंट म्हणून झटकणे सोपे नाही. मुळात माफी मागणेच सोपे नव्हते. (याबद्दल खुप सव्विस्तर पोस्ट आपल्या समुदायावर येणे आवश्यक. ) आणि मोदी किमान आपल्यापुढच्या पिढ्यांची सोय बघत नाही आहेत. (एक लंडन रिटर्न युवा नेता भारतात आला कधी आणि युवा नेता झाला कधी हे समजले पण नाही. खळ्ळ खटॅक हाक सोपी आहे. टोल वर नविन सरकारला काम करायला काही वेळ द्याल कि नाही? का टोल हाच महाराष्ट्रापुढचा नंबर एकचा प्रश्न आहे? ) साखरेच्या भावावर आंदोलनाची हाक आली आहे. अहो साखर हा एका मोठ्या पोस्टचा विषय आहे. आत्ताच गेल्या वर्षाची निम्मी साखर कारखान्यांमधे पडुन आहे. आपली महाग साखर बाहेरच्या जगात खपत नाही. २०२० पर्यंत ५०% भारत डायबेटीस ग्रस्त होईल असा एक अंदाज आहे. मग साखर खपवाल कोठे? आता पासुन धान्य उत्पादनाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे पण प्रचंड पाणी पिणा-या आळशी शेतक-याला हे सांगणार कोण? या ऊसामुळे प्रत्येक गावागावात रिकामटेकड्या पोळांच्या झुंडीच्या झुंडी माजलेल्या रेड्याप्रमाणे मस्तवालपणे दहशत निर्माण करत आहेत. MIM चा धोका ओळखा. प्रादेशिक अस्मिता निश्चय पुर्वक बाजुला ठेवा. वै-याची रात्र आहे अजुन जागे व्हा. अनिल थत्ते

    ReplyDelete
  6. शरद पवार आहेत तोपयत शकय नाही ते हे होऊ देणार नाही आतापयत पवार तोडाफोडाचे राजकारण करत आले आहेत

    ReplyDelete
  7. Prakash rakshe has a point, plus the brothers have ego to face each other. Secondly there is no enough desperation.

    ReplyDelete