Monday, November 3, 2014

हे तर अडवाणींचे अनुयायीच



शुक्रवारी वानखेडे स्टेडीयमवर राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. त्याचा अकारण गाजावाजा झाला, तो उद्धव ठाकरे यांच्या मानापमान नाट्यामुळे. त्या पहिल्या शपथविधीमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेतले नाही, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख नाराज होते. त्यांनी आपली नाराजी लपवली सुद्धा नाही. थेट शपथविधी सोहळ्यावर पक्षाचा बहिष्कार घालून ते मोकळे झाले. वास्तविक असा सोहळा हा कुठल्या व्यक्ती वा पक्षासाठी मानापमानाचा विषय होऊ शकत नाही. कारण तो पक्षनिरपेक्ष कार्यक्रम असतो. तिथे हजर रहाणारा कोणी नव्या सरकारचा समर्थक नसतो, किंवा विरोधकही नसतो. तिथली हजेरी ही निव्वळ औपचारिकता असते. त्यातले आमंत्रण मिळणे, हाच सन्मान मानला जातो. पण उद्धव ठाकरे यांनी त्याला राजकीय रंग देण्याची अपरिपक्वता दाखवत, अकारण राजकारणाचा पोरखेळ करून टाकला. आधी युती तोडल्यावर त्यांनी लढावू बाणा दाखवण्याचे अवसान आणले होते. पण अपेक्षित यश मिळाले नाही, तर निकाल मान्य करून आपली राजकीय भूमिका निश्चीत करून टाकायची. पण यांना इतके चांगले यश कार्यकर्त्यांनी मिळवून दिले असताना, व्यक्तीगत अहंकारापायी उद्धवनी ते यश मातीमोल करून टाकले. त्याचबरोबर पक्षाला अधिकाधिक हास्यास्पद करण्याची जणू मोहिमच चालविली आहे. आपल्याला सन्मानाने वागवले पाहिजे, असा त्यांचा एकमेव सूर आहे. तोच त्यांच्या निकटवर्तियांचाही सूर आहे. पण सन्मान म्हणजे काय? त्याचे आकार व स्वरूप कोणते, याबद्दल संपुर्ण अस्पष्टता आहे. सन्मान हा मंत्रीपदांची संख्या किंवा सरकारमधील खाती यावर ठरत असतो काय? तसे असेल तर शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा कधीच सन्मान झाला नाही, असेच म्हणावे लागेल. एकूणच उद्धव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्यासह पक्षाला हास्यास्पद करून घेण्य़ाची परमावधी गाठली आहे.

त्यामुळेच खरे तर शपथविधीला हजेरी लावल्यानंतरही उद्धव यांचा अवमानच झाला म्हणावे लागेल. त्यांना वास्तविक लालकृष्ण अडवाणी यांच्या बाजूला बसवायला हवे होते. कारण दिड वर्षापुर्वी अडवाणी जसे वागत होते, त्याच्याही पुढली पायरी उद्धव ठाकरे यांनी आता गाठली आहे. जुन २०१३ मध्ये भाजपात पुढल्या लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू झाली आणि अडवाणी यांचे नाट्य सुरू झाले. ते तब्बल वर्षभर अखंड चालूच होते. गोव्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक भरली होती. तिथे गुजरातचे यशस्वी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नेमण्याचा घाट घातला गेला होता. त्याला अडवाणी यांनी विरोध करण्याचे काही कारण नव्हते आणि असेल तर पुढे येऊन त्याचा खुलासा करायला हवा होता. पण त्यापैकी काहीच न करता अडवाणी दिल्लीतच रुसून बसले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी रुसून बसण्याचा नवा पायंडा पाडला. आपला विरोध जुमानला गेला नाही, तेव्हा अडवाणींनी थेट पक्षाच्या सर्वच पदाचे राजिनामे पक्षाध्याक्षांकडे पाठवून दिले होते. अखेरीस सरसंघचालक मोहन भागवत यांनी हस्तक्षेप करून अडवाणींना माघार घ्यायला लावली. मग त्याच नाट्याचा नवा प्रयोग अडवाणींनी मोदींच्या उमेदवारीच्या प्रसंगी केला. जेव्हा मोदींनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करायचे ठरत होते, तेव्हा अडवाणींनी पक्ष भरकटत चालल्याची भिती घालून रुसवा धरला. होळी वा तत्सम सणांच्या काळातही ते रुसूनच बसले होते आणि पुढे लोकसभेचे वेध लागल्यावर मतदारसंघाच्याही बाबतीत रुसवेफ़ुगवे चालूच होते. आपल्याच वयाला शोभणार नाहीत, असे मानापमानाचे नाट्य खेळून अडवाणींनी गेल्या दिड वर्षात स्वत:ला इतके हास्यास्पद करून घेतले आहे, की आता त्यांच्या शब्दाला अथवा रुसव्याला कोणी विचारीनासा झाला आहे. अति तिथे माती म्हणतात, त्याचा हा उत्तम नमूना.

आपल्या समोर हे नाट्य घडलेले उद्धव ठाकरे यांनी बघितले होते. त्यातून राजकारण्यांनी धडे घ्यायचे असतात. पण काही शिकणे दूर, उद्धवराव अडवाणींचीच नक्कल करण्यात गेला महिनाभर रंगून गेले आहेत. पदोपदी जशी आपली मानहानी अडवाणींनी ओढवून घेतली होती, त्यापेक्षा उद्धव यांचे वागणे वेगळे आहे काय? नेत्याने कुठलाही निर्णय घ्यावा आणि चुकला तरी त्याच्याशी ठाम असावे लागते. तरच त्याचे अनुयायी त्याच्यावर विसंबून राहू शकतात. पण नेताच धरसोड करू लागला, मग अनुयायांना त्याच्याविषयी शंका येऊ लागतात. अडवाणींचे तेच झाले. त्यामुळे अर्धशतकाहून अधिक काळ राष्ट्रीय राजकारणात वावरलेला हा भीष्माचार्य, कुठल्या कुठे आज फ़ेकला गेला आहे. गर्दीत त्यांना मानाचे स्थान दिले जाते, पण सभोवतालच्या गर्दीत अडवाणी नगण्य वाटतात. त्याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत. कारण त्यांची धरसोडवृत्ती. १९ आक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यावर एक गोष्ट स्पष्ट झालेली होती, की भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता. त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेमध्ये सहभागी करून घ्यायचे किंवा नाही, हा विषय उद्धव ठाकरे यांच्या हाती राहिलेला नव्हता. कारण निकाल स्पष्ट होण्यापुर्वीच भाजपाला बाहेरुन पाठींबा देऊन शरद पवार यांनी सेनेच्या सौदेबाजीची किंमत संपवली होती. त्यामुळे आपल्याला ‘मतदाराने विरोधात बसायचा जनादेश दिला आहे’ असे बोलून उद्धव यांनी मौन धारण केले असते, तरी त्यांची बाजू भक्कम झाली असती. मग भाजपाला राष्ट्रवादी की सेना, अशा पेचात अडकावे लागले असते. पण उद्धवसह त्यांच्या निकटवर्तिय बोलघेवड्यांनी मानापमान व सन्मानाची इतकी मुक्ताफ़ळे उधळली, की पदोपदी हास्यास्पद होण्याइतकी धरसोड अकारण होत राहिली. आपल्याला खेळवायची संधीच त्यांनी इतरांना देऊन टाकली. त्याचा शेवट अजून होऊ शकलेला नाही.

निकालानंतर दोन आठवड्यांनी नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. पण त्यात सेना सहभागी होणार किंवा नाही? सेना विरोधात बसणार काय? पक्षासमोर कुठलीच भूमिका अजून स्पष्ट नाही. आधी मोठ्या अभिमान सन्मानाच्या गमजा केल्या आणि आता भाजपाच्या मागे काहीतरी पदरात पडावे म्हणून सेनेची फ़रफ़ट चालू आहे. धड सन्मान स्वाभिमानाचे प्रदर्शन सेना करू शकली नाही, की समजूतदारपणे आपला मान राखून घेण्यातही यशस्वी होऊ शकली नाही. ज्यांच्यामुळे सेनेला आज इतके लज्जास्पद अनुभव घ्यावे लागत आहेत, त्या बोलघेवड्यांना गप्प करण्याचेही पाऊल पक्षप्रमुख उचलू शकलेले नाहीत. ‘सामना’ची भाषा असो किंवा मातोश्रीची महत्ता असो, ती बाळासाहेबांमुळे होती. त्यांच्या निर्वाणानंतर त्याच भाषेचा अवलंब किंवा बडेजाव उरलेला नाही. कारण शिवसेना किंवा नवे पक्षप्रमुख आपला तेवढा दबदबा अजून सिद्ध करू शकलेले नाहीत. सहाजिकच ती ‘सामना’ची भाषा शत्रू निर्माण करते आहे आणि मित्रांना दुखावते आहे. त्याला आवरण्याची कुवत पक्षप्रमुख राखवू शकलेले नाहीत. त्याचेच दुष्परिणाम सेनेला भोगावे लागत असताना, निदान त्याला आवर घालण्याचे तरी भान हवे. तेही दिसत नाही. त्यामुळेच हल्ली उद्धव हे बाळासाहेबाचे चिरंजीव असण्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी यांचे शिष्य अधिक वाटतात. कारण ज्याप्रकारे मागल्या दिड वर्षात अडवाणी यांनी स्वत:ला जगापुढे हास्यास्पद करून घेतले, त्याचीच सेनेसह उद्धव ठाकरे यांच्याकडून पुनरावृत्ती होते आहे. त्यामुळेच मग परवाच्या शपथविधी समारंभातली पक्षप्रमुखांची उपस्थिती केविलवाणी भासत होती. यानंतर सत्तेत किती मंत्रीपदे मिळाली, तरी शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा विश्वास कितपत टिकून राहिल, याचीच शंका आहे. गेल्या सहा महिन्यात मनसेच्या सावटातून बाहेर पडलेली शिवसेना व शिवसैनिक, पुन्हा त्याच छायेत आला असे आता म्हणावे लागेल.


2 comments:

  1. नेत्याने कुठलाही निर्णय घ्यावा आणि चुकला तरी त्याच्याशी ठाम असावे लागते. तरच त्याचे अनुयायी त्याच्यावर विसंबून राहू शकतात. पण नेताच धरसोड करू लागला, मग अनुयायांना त्याच्याविषयी शंका येऊ लागतात bhau मला तुमचे हे म्हणणे पटते पण मग हे shivsenelach का लागू होते .

    ReplyDelete
  2. Bhavu, jar shivsena sarakar made samil zali tar to shisenecha shevatakade pravas suru zalyachi nandi asel as mala vatat.

    ReplyDelete