Thursday, November 6, 2014

‘राज’गड उभारण्याची सुवर्णसंधी?

 

 लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणूकीत खुर्दा उडाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तिचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर काही काळातच सेनेला रामराम ठोकणार्‍या राज ठाकरे यांनी, पुढल्या दोनच वर्षात धमाल उडवून दिली होती. कारण आजपर्यंत शिवसेना सोडणार्‍यांनी स्वत:चा वेगळा सवतासुभा कधी उभा केला नव्हता. ते धाडस राज ठाकरे यांनी केले आणि स्वतंत्र पक्षच स्थापन केला. तेव्हा कुणाला त्याची फ़ारशी महत्ता ओळखता आलेली नव्हती. कारण प्रविण दरेकर यांच्यासारखे विद्यार्थी सेनेतर सहकारी आणि शिशीर शिंदे व बाळा नांदगावकर यांच्यासारखे सेनेतले दुय्यम फ़ळीतले दोनतीन उपनेते सोडल्यास, राजसोबत फ़ारसा कोणी सेनेतून बाहेर पडला नाही. पण शिवसेना ही कधीच नेत्यांची संघटना किंवा पक्ष नव्हता. म्हणूनच भुजबळ, राणे वा तत्सम नेत्यांनी सेनेला रामराम ठोकल्यावरही सेनेचा गड अभेद्य राहिला होता. राजसोबत कोणी नेते गेले नाहीत, याचा अर्थ त्याने सेनेला भगदाड पाडले नाही असा म्हणूनच लावला गेला. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. मोठ्या प्रमाणात उद्धवविषयी सेनेत जी नाराजी होती, तो सामान्य कार्यकर्ता व शिवसैनिक मात्र राजचा सहानुभूतीदार झालेला होता. त्याचेच प्रतिबिंब नंतर आलेल्या निवडणूकांवर पडले. २००९ च्या लोकसभेत राजच्या मनसे उमेदवारांना कुठेही एक जागा जिंकता आली नाही, पण त्यांनी शिवसेना व भाजपाला मुंबई-ठाणे परिसरात भूईसपाट करण्यात मात्र आपला प्रभाव दाखवला. खरे तर त्यानंतर उद्धव मंडळीने वास्तवाचे भान राखून ना‘राज’ शिवसैनिकांना सोबत घेण्याची पावले उचलायला हवी होती. पण पक्ष व लोकभावनेपेक्षा आपापले अहंकार जपताना दोघांनी सेनेला पुर्णपणे दुबळी करून टाकली. आज दोघेही त्याचेच परिणाम भोगत आहेत.

पहिल्या यशाची राजला धुंदी चढली होती, तर उद्धव गोटात सूडाची ज्वाला अधिकच भडकली होती. पण राजकारण हा लोकभावनेचा विषय असतो, त्यात सूडाला स्थान नसते. याचे दोघांनीही भान ठेवले नाही. आज एक चांगले यश मिळवून अगतिक आहे आणि दुसरा आपले वादळाने उध्वस्त झालेले घर सावरण्याच्या चिंतेत मग्न आहे. पण जगासमोर दुर्बळ ठरल्यानंतरही त्यांना आपापले अहंकार गुंडाळून एकमेकांशी हात मिळवण्याची सुबुद्धी होऊ शकलेली नाही. मग एकजण आपल्या बगलबच्च्यांना सत्तेच्या खुर्च्या मिळवून देण्यासाठी वणवण करतो आहे; तर दुसरा सतत ढासळणार्‍या आपल्या किल्ल्याची डागडूजी कशी करावी यासाठी गडबडून गेला आहे. राजकारणात किंवा लढाईत तुमच्या हाताशी किती मोठे सैन्यबळ आहे त्यापेक्षा असलेले बळ तुम्ही किती चतुराईने वापरता, याला महत्व असते. शिवसेनाप्रमुखांचे वारस म्हणून राजकारणात आलेल्या या दोघांनी साहेबांची बेफ़िकीरी उचलली असली, तरी त्यांच्या गनिमी कावा तंत्राचा कधीच आधार घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच फ़ाजील आत्मविश्वासाने त्यांची अशी दुर्दशा करून टाकली आहे. एकमेकांना धडे शिकवण्याच्या आहारी गेल्याने, त्यांना आपल्याच बळाचा कधीच खरा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचा नेमका वापर करायची इच्छाही त्यांच्या मनाला शिवली नाही. अन्यथा गेल्या पाच वर्षात त्यांनीच अवघे मराठी राजकारण आपसात वाटून घेण्याइतकी मजल मारली असती. तामिळनाडूत जशी दोन द्रमुक गटात अवघी राजकीय जागा व्यापली गेली आहे, तसे महाराष्ट्रात होऊ शकले असते. आपसातले व्यक्तीगत हेवेदावे लढताना इतर पक्षांना हाताशी धरून त्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी होणेही अवघड नव्हते. पर्यायाने उर्वरीत पक्ष याच दोघांच्या मागे भरकटू लागणे, अपरिहार्य होऊन जाते. मात्र त्यासाठी संयम आवश्यक असतो. सत्तेच्य मागे अगतिक होऊन भागत नाही.

जे सत्तेचे लालची असतात, ते खुर्चीसाठी पक्ष सोडत असतात आणि ज्यांना अभिमान असतो ते पराभूत पक्षातही टिकून रहातात. मनसेला सोडून पळणार्‍यांची संख्या आज अधिक आहे. पण त्याचवेळी अभिमानाच्या गर्जना करत निवडणूका लढवणार्‍या शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. आपले तथाकथित नेते सत्तेसाठी नतमस्तक होताना बघून निराश झालेल्या तळागाळातल्या शिवसैनिकाला सत्ता लाथाडणार्‍या नेत्याची प्रतिक्षा आहे. इथे म्हणूनच राजला मोठी संधी आहे. एक तर त्याने पुढाकार घेऊन भावाशी हातमिळवणी करावी आणि राज्यात भाजपासमोर नवे राजकीय आव्हान उभे करायला आपली शक्ती अर्पण करावी. सत्तेत सेना जाणार नसेल, तर आपण पक्ष बरखास्त करून पुन्हा सेनेत दाखल होतो, इथपर्यंत माघारीचा प्रस्ताव जाहिरपणे देऊन टाकावा. वाटाघाटी करून वा पडद्याआडून नव्हे; तर जाहिरपणे तसे आवाहनच करावे. त्यामुळे सत्तेसाठी अगतिक झालेल्या सेनेतील नेत्यांना लगाम बसेल आणि विनाविलंब असा अभिमानी शिवसैनिक राजकडे झुकायला सुरूवात होईल त्याचा दबाव मग सेनेच्या नेतृत्वावर येऊन, दिल्लीशी चाललेल्या तहा़च्या बोलण्यांना लगाम घातला जाईल. त्यातून काही साधले नाही, तर त्या नाराज निराश शिवसैनिकाला आपल्या भावनांची जाण असलेला नेता म्हणून राजविषयी आत्मियता वाटू लागेल आणि तो आपोआप मनसेकडे झुकू लागेल. कारण शिवसेनेला मिळालेले विधानसभेतील यश, हे मनसेच्या बलिदानातून लाभलेले आहे. स्वबळावर अभिमानाची भाषा करीत लढलेल्या शिवसेनेचे नाक वर रहावे, म्हणून आजवर मनसेच्या पारड्यात मते टाकणार्‍या लाखो लोकांनी यावेळी सेनेला झुकते माप देऊन इतके आमदार बहाल केले. त्याच अभिमानाला सेना सोडचिठ्ठी देत असेल, तर असा मराठी मतदार सेनेला सोडचिठ्ठी देत मनसेच्या पाठीशी यायला वेळ लावणार नाही.

२००९ सालात मोजक्या जागा लढवताना सहा टक्केहून अधिक मते मिळवत, मनसेने प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त केली होती. यावेळी संपुर्ण राज्यात दोनशेहून अधिक जागा लढवताना त्याच मनसेला साडेतीन टक्केच मते मिळाली. कारण तिच्या मराठी बाण्याला प्रतिसाद देणारा मतदार सेनेकडे बळला होता. भाजपा विरोधात मराठी बाणा सिद्ध करण्यासाठीच तो मतदार मनसेला सोडून गेला असेल, तर सेनेने मराठी बाणा सोडल्यास त्या मतदाराला पुन्हा मनसेकडेच यावे लागेल. तेवढाच नाही तर सेनेतला आजवर टिकून राहिलेला मराठी मतदारही मग मनसेच्या गोटात दाखल व्हायला वेळ लागणार नाही. प्रचारात ताठ बाणा आणि निकालानंतर सत्तेसाठी अगतिक झालेल्या सेना नेतृत्वाने, मराठी अस्मिता जपणार्‍या मतदाराचा पुरता भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे विचलीत झालेला असा मतदार आपल्या पाठीशी आणणे राज ठाकरे यांना अवघड नाही. विधानसभेच्या अटितटीच्या लढतीमध्ये मराठी अस्मिता पणाला लागली होती. त्यात या दोन पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज तेविस टक्केहून अधिक आहे. ते एकत्र आले, तरी ती बेरीज आव्हानात्मक आहे आणि सेना नतमस्तक होऊन सत्तेत सहभागी झाली, तर त्यातला मोठा हिस्सा मनसेच्या मागे जाऊ शकतो. दिडदोन वर्षात मोदी सरकार व राज्यातल्या भाजपा सरकारची नवलाई संपल्यावर हे तेवीस टक्के मतदार मोठा चमत्कार घडवू शकतात. कारण दोन आठवड्यात निकालानंतर भाजपाने सेनेशी केलेली टोलवाटोलवी आणि सेना नेतृत्वाने दाखवलेली अगतिकता, यांनी हा मतांचा मोठा गठ्ठा अस्वस्थ होऊन गेला आहे. त्याची लौकरच येणार्‍या मतदानापर्यंत मशागत करील, त्या नेत्याला व पक्षाला उज्वल भविष्य असेल. त्यात उद्धव वा राज पुढाकार घेणार नसतील, तर नवे नेतृत्व वा नवा चेहरा उदयास येऊ शकेल. काळ, परिस्थिती व अस्मिता कधी कोणाची लाचार नसते, हे उमजले तर धाडस त्या दोघांसाठी सोपे आहे.

4 comments:

  1. निवडणुका संपल्या आता युति करा नाही तर काही करा दोन्ही पक्षांची माती झालेली आहे. शिवसेनेच्या पराभवाचे कारण शिवसेना डावपेचात कमी पडली. नेतृत्व उथळपणाची भाषा करत राहिले. विकासाच्या मुद्द्यावर शिवसेने निवडणूक लढवायला हवी होती. शिवसेनेने विकास केलेले एक तरी उदाहरण देता येईल का? मुंबई व इतर पालिकांचा कारभार तसा भोंगळच आहे. त्यामानाने भाजपकडे विकासाचा दृष्टीकोन व भक्कम उदाहरण आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दाही शिवसेनेला लावून धरता आला नाही.
    विकासाची दृष्टी नसणे, बाष्कळ व बेजबाबदार पोरकट प्रचारतंत्र, अकार्यक्षमता एवढ्या गोष्टी पराभवासाठी पुरेशा आहेत

    ReplyDelete
  2. कळू दे न उभ्या महाराष्ट्राला आणि प्रत्येक मराठी माणसाला की ज्याचा अभिमान कायम राहावा त्याला भावनिक होऊन मूल्यवान मते दिली त्याने कशी मराठी माणसांची आणि त्यांच्या स्वाभिमानाची खिल्ली उडवले..कसे केंद्रासमोर गुढगे टेकले..मी ही एक कट्टर शिवसैनिक आहे (होतो) ..अहो ह्यापेक्षा तर १०० पटींनी राज बरा आहे..कोणासमोर लाचारांसारखा भिक मागत नाही ..

    ReplyDelete