Sunday, November 2, 2014

अर्जुनाला फ़क्त डोळाच दिसतो

अर्जुनाला फ़क्त पक्षाचा डोळा दिसतो, अशी एक महाभारतातली पुराणकथा नेहमी ऐकायला मिळते. द्रोणाचार्य आपल्या शिष्यांची परिक्षा घेण्यासाठी त्यांना समोरच्या झाडावर बसलेल्या पक्षाचा डोळ्यावर नेम धरायला सांगतात. सगळे आपापल्या धनुष्याला सावरून बाण रोखतात व नेम धरतात. मग तिथेच सर्वांना थांबायला सांगून गुरू विचारतात, काय दिसते आहे? प्रत्येकजण वेगवेगळी उत्तरे देतो आणि एकटा अर्जुन हवे तेच उत्तर देतो. त्याला फ़क्त पक्षाचा डोळा दिसतोय, या उत्तराने गुरूजी खुश होतात. त्यातून मग आपले लक्ष्य कसे असावे, त्याची शिकवण दिली जाते. पण दुसर्‍या बाजूने त्याच गोष्टीचा विचार सहसा होत नाही. समजा उद्या गुरू द्रोणाचार्य शिष्यांना घेऊन सहलीला गेले असते आणि त्यांनी असाच प्रश्न विचारला असता, की मुलांनो समोर काय दिसते आहे? तेव्हा अर्जुनाने पुन्हा तेच उत्तर देत ‘पक्षाचा डोळा’ म्हटले असते तर? गुरूने त्याला कानफ़टले असते. कारण नेम धरताना लक्ष्यावर नजर हवी. पण सहलीला आल्यावर सृष्टीसौंदर्य बघयचीही दृष्टी हवी. ती नसेल तर माणूस आपल्या बुद्धीचा वापर करीत नाही, असाच होतो. नेहमीच्या आयुष्यातही त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. दिसत सगळे असते, त्यातले बघायचे काय व किती नेमके बघायचे, ही बुद्धी तुमच्यापाशी असायला हवी. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो गुंता होऊन बसला आहे, त्यात सर्वांची बुद्धी केवळ विधानसभेतील बहूमताच्या आकड्यावर केंद्रीत झाले आहे आणि त्यासाठी कुठले पक्ष जवळ येतात वा दूर जातात, तेवढ्यापुरता विचार होतो आहे. पण त्यांच्याखेरीज कोण कोण नेते व पक्ष आपले कोणकोणते हेतू साध्य करायचे डाव कसे खेळत असतील, त्याचा विचारही मनाला शिवायला तयार नसतो. सहाजिकच राष्ट्रवादीचे शरद पवार भाजपाल बिनशर्त पाठींबा देतात, त्याचा इतर संदर्भाने विचारही कोणी करायला तयार दिसत नाही.

निकालाच्या दिवशी मी एबीपी वाहिनीच्या कार्यक्रमात दुपारी सहभागी झालो. तो कार्यक्रम भल्या सकाळी सुरू झाला होता. पण मी त्यात तब्बल सहा तास उशीरा सहभागी झालो. मात्र घरी त्यातले काही प्रक्षेपण बघितले होते आणि सहभागी होण्याच्या आधी अर्धातास बघत होतो. हाती आलेल्या निकालावर जेव्हा पहिली प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा मी खरेच थक्क होतो. कारण त्या एकूण साडेसहा तास चाललेल्या कार्यक्रमात जवळपास कोणीच शरद पवारांचा उल्लेख केला नव्हता किंवा दखलही घेतलेली नव्हती. मग हे महाराष्ट्रातल्या निवडणूका व राजकारणाचे विश्लेषण आहे, की हरयाणाच्या, असा प्रश्न मला पडला होता. कारण आजही पवारांना बाजूला ठेवून इथले राजकारण होऊ शकत नाही, असे माझे मत आहे आणि मी तेच तिथे मांडले. राष्ट्रवादी पराभूत होत असताना पवारांची दखल कोण कशाला घेईल? पण पवार हे निवडून आलेल्या वा येणार्‍या आमदारांच्या संख्येवर राजकारण करत नसतात. तर कुठल्याही पक्षातले आमदार वा नेते व त्यांच्यातले संबंध, यांच्या बळावर राजकारण खेळतात, असे माझे मत आहे. म्हणूनच निकाल कसेही लागोत, त्यात पवारांच्या राजकारणाला स्थान असतेच, हे माझे मत मी ठामपणे मांडले. त्याची प्रचिती अवघ्या काही तासातच मग आली. कारण निकाल पुर्ण होण्याआधीच शरद पवार यांनी भाजपाला एकतर्फ़ी पाठींबा जाहिर करून टाकला. कॉग्रेस सोबतच राष्ट्रवादीचा बोर्‍या वाजतोय असे निकाल समोर आले, तसेच भाजपाचे बहूमत हुकणार हे स्पष्ट झाल्यावर पवारांनी थेट भाजपाला पाठींबा जाहिर करून टाकला होता. जो कोणी मागितलेला नाही, असा पाठींबा पवारांनी द्यावाच कशाला? आपल्या पक्षाचा स्वबळावर लढून बोर्‍या वाजला, त्याबद्दल अवाक्षर नव्हते. मग पवारांनी साधले काय? पक्षापेक्षा पवारांना राज्यातल्या स्थीर सरकाराची इतकी चिंता असावी?

ज्यांचे आजवरचे राजकारण व डावपेच सरकारे व पक्षांना अस्थीर करण्याचेच राहिले आहे, अशा शरद पवारांना निकाल संपण्याआधी राज्यात सरकार स्थीर असावे, याची चिंता वाटेल काय? मुळात कुठलाही हेतू मनाशी न बाळगता पवार कुणाला पाठींबा देतील काय? पवार यांनी मग अशा खेळीतून काय साधले किंवा त्यांना काय साधायचे आहे? ह्याचे उत्तर शोधण्याआधी पक्षातच त्यांच्यासमोर कुठल्या समस्या होत्या, त्याकडे बघावे लागेल. गेल्या दोनतीन वर्षापासून पवार यांच्यापेक्षा राष्ट्रवादीत त्यांचे पुतणे अजितदादा यांचीच हुकूमत चालू होती. पवारांच्या जुन्या निष्ठावंतांची गठडी वळून त्यांना खड्यासारखे बाजूला केले जात होते आणि अजितदादांचे निष्ठावान यांनी पक्ष ताब्यात घेतला होता. त्यांना बाजूला करणेही शक्य नव्हते. त्यावरचा एकच उपाय होता अजितदादांना सत्तेपासून वंचित करणे. खुद्द आपलाच पक्ष राज्यात विकलांग करून अजितदादांना निकामी करणे. दादांची शक्ती सत्तेत होती. सत्तेविना अजितदादा पांगळे होऊ शकतात. तोच डाव आज साधला गेला आहे आणि दादा पुर्णपणे दुर्बळ होण्यापर्यंत त्यांचा वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादीला राज्यात सत्तेपासून दूर राखणे; हे पवारांचे उद्दीष्ट असू शकते. भाजपाला न मागितलेला पाठींबा देऊन एका दगडात त्यातले अनेक पक्षी मारले गेले आहेत. आपल्या सवंगड्यांसह दादा सत्तेपासून दूर फ़ेकले गेले आहेत. मात्र सगळी राजकीय खेळी व सुत्रे खुद्द पवारांच्या हाती आलेली आहेत. अधिक त्यांचे अनेक निष्ठावान भाजपा व शिवसेनेतून निवडून आलेले आहेत. म्हणूनच कामे व्हायची, तर पवारांना हवी ती कुठल्याही सत्तेपासून होऊ शकतील. अजितदादांची होणार नाहीत. परिणामी दिडदोन वर्षात अजितदादा नावाचा राजकारणातील दबदबा संपुष्टात येतो. पण दुसरीकडे काकांचे तमाम पत्ते सुरक्षित रहातात. विरोधाची लाट ओसरली, मग त्याच पत्त्यांवर पुन्हा मोठे राजकारण खेळणे शक्य होते.

दरम्यान नुसत्या बिनशर्त पाठींब्याने निकालानंतर एकत्र येऊ शकणार्‍या सेना भाजपाच्या मैत्रीत बिब्बा घातला गेला आणि त्यांच्या भांडणामुळे भाजपाचे अल्पमताचे सरकार येण्य़ाआधीच अस्थीर होऊन गेले. म्हणजे स्थीर सरकारसाठी बिनशर्त पाठींबा घोषित करून, पवारांनी स्थीर होऊ शकणारे युतीचे सरकार होण्यापुर्वीच अस्थीर करून टाकले. ते जितके अस्थीर तितके तितकी मग बिनशर्त पाठींब्याची किंमत वाढत जाते आणि कायम पाठींब्याचे कुठलेली बंधन पवारांवर रहात नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, यापेक्षा बिनशर्त पाठींब्याला किंमत नाही. पण तो धोका भाजपाने पत्करलेला आहे. इथे एक शंका अनेकांना येणे शक्य आहे, की फ़क्त पवारच चाणाक्ष आणि भाजपावाले दुधखुळे आहेत काय? त्याचे उत्तर असे, की यशाची नशा चढलेली असताना चाणाक्षपणा ढिला पडतो. निकालाच्या आदल्या दिवशी भाजपाचे नेते कमी जागा आल्यास सेनेच्या पाठींब्याची भाषा बोलत होते आणि पवारांच्या बिनशर्त पाठींब्याच्या घोषणेनंतर त्यांचा नूर एकदम बदलून गेला. सेनेची गरज नाही, त्यांनी अटी घालू नयेत, अशी भाषा आली. त्याला पवार नावाची जादू म्हणतात. एकदा त्यात वितुष्ट आणखी टोकाला गेल्यावर आता सेना भाजपाला एकत्र येणे अधिकच अवघड होऊन बसले आहे आणि तितके भाजपा सरकार ‘पवारावलंबी’ होत गेले आहे. त्यातून मग अन्य पक्षातले २७ आमदार संपर्कात असल्याची बातमी आलेली आहे. ती सुखावणारी असली, तरी पक्षांतर विरोधी कायद्यामुळे आमदार फ़ोडणे सोपे राहिलेले नाही. सोपे असते, तर एव्हाना दिल्लीत भाजपा मुख्यमंत्री सत्तेवर आरुढ होऊ शकला असता. केजरीवालचा पक्ष फ़ोडणे अशक्य असलेल्यांना सेना, राष्ट्रवादी वा कॉग्रेस आमदार फ़ोडणे सहजशक्य असेल, तर गोष्ट वेगळी. अर्जुनाला फ़क्त डोळाच बघत बसायचे असेल, तर बाकीचे सृष्टीसौंदर्य कोणी दाखवायचे?

6 comments:

  1. सरकार जितके अस्थीर तितके तितकी मग बिनशर्त पाठींब्याची किंमत वाढत जाते वा क्या खूब मांनगये भाऊ पण हे जरी सर्वे खरे असले तरी भाऊ तुम्ही जे सांगितले आहे कि अजितदादा ना कंट्रोल म्हध्ये आणण्यासाठी पवारांनी या बर्याच बाबी केल्या असतील असे वाटत नाही पचायला कठीण आहे या उलट अजितदादा ना राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर मागणी आहे त्यांची क्रेज आहे असे माझे निरीक्षण आहे .

    ReplyDelete
  2. "म्हणजे स्थीर सरकारसाठी बिनशर्त पाठींबा घोषित करून, पवारांनी स्थीर होऊ शकणारे युतीचे सरकार होण्यापुर्वीच अस्थीर करून टाकले."
    भाऊ, आपण हा एक बॉम्बगोळाच टाकलाय! आणि आपण आम्हाला शरद पवारांचे 'दूरदृष्टीसौंदर्य' सुद्धा दाखवलेत! धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  3. अर्जुनाला फ़क्त पक्षाचा डोळा दिसतो पण राज्यातील राजकारणात पवारांना सर्वच पक्षाचे सर्वे डोळे दिसतात त्यातील कोणता डोळा कधी उघडायचा आणि बंद करायचा याचेही त्यांचे timeing बेमालून आहे.

    ReplyDelete
  4. पवार .... न पवार ..... हे विश्लेषण २०१४ आणि २०१९ मध्ये पण अचूक लागू होतंय

    ReplyDelete
  5. Bhau,
    You have not said anything about the Lonyaachaa Golaa which the Baramatichaa Maha Bokaa has swalloed in the process of foisting UddhatRao

    ReplyDelete