Tuesday, November 11, 2014

शरद पवारांचे मोहरे आणि प्यादे



ज्या दिवशी विधानसभेच्या मतांची मोजणी व्हायची होती, त्यादिवशी एबीपी माझा वाहिनीने प्रदिर्घ विश्लेषणाचा कार्यक्रम योजला होता. प्रत्यक्ष मोजणीला आरंभ होण्यापुर्वी दोन तास ह्या वाहिनीचा थेट प्रक्षेपण असलेला विश्लेषणाचा कार्यक्रम सुरू झाला. चांगले २०-३० आमंत्रित त्यात होते. पत्रकारांपासून विविध क्षेत्रातील जाणकारांना त्यात सहभागी करून घेण्याचा अभिनव प्रयोग त्या वाहिनीचे संपादक राजू खांडेकर यांनी केला. मलाही आमंत्रण होते आणि मी उशीरा म्हणजे सहा तासानंतर त्यात सहभागी झालो. सकाळचे प्रक्षेपण मी घरातून बघितले होते आणि पुढले काही तिथे स्टुडीओत पोहोचल्यावर ऐकले. साडे बारानंतर मला प्रथम मतप्रदर्शनाची संधी मिळाली. तेव्हा मी उत्तर देण्यापेक्षा प्रश्नच निवेदकाला विचारला होता. आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचे व निवडणुकांचे विश्लेषण करतोय की भलत्याच कुठल्या राज्याचे? कार्यक्रम सुरू होऊन साडेसहा तास उलटले आणि कोणी शरद पवारांचे नावही घेऊ नये? महाराष्ट्राच्या राजकारणाला पवार यांच्याशिवाय पुर्तता असूच शकत नाही. हेच माझे महिले मत होते. त्याचे अनेक उपस्थितांना नवल वाटले. एकदोघांनी मला त्याबद्दल छेडलेही. कारण स्वाभाविक होते. पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुठल्या कुठे पिछाडीवर फ़ेकला गेला होता आणि सगळे यश भाजपाच्या व पाठोपाठ शिवसेनेच्या पारड्यात पडताना दिसत होते. मग शरद पवार कितीही जाणता नेता असले, तरी कोण कशाला त्यांच्या राजकारणाचा उहापोह करणार? साधारण इतरांचे असे मत होते. ते वरकरणी रास्तही होते. पण मला ते मंजूर नव्हते. कारण पवार एकाच कुठल्या पक्षातर्फ़े राजकारण करतात, हेच मला मान्य नाही. पवारांचे अनुयायी वा हस्तक सर्वच पक्षात असतात आणि गरजेनुसार पवार त्या पक्षात आपली प्यादी खेळवतात, असा माझा आजवरचा समज आहे. इतरांचा नसावा कदाचित.

मी असे का आग्रहपुर्वक मांडत होतो, त्याचा खुलासाही मी तिथेच केला होता. मतमोजणीच्या आदल्याच दिवशी पवार यांचे विश्वासू सहकारी प्रफ़ुल्ल पटेल यांनी एक असा ट्वीट केला, की त्याचा कोणालाही अर्थ लागत नव्हता. राजकीय जाणकारही थक्क होऊन जावेत असे विधान पटेल यांनी केलेले होते. पटेल यांनी म्हटले होते, ‘उद्या लागणार्‍या निकालानंतर राज्यात होणार्‍या नव्या सत्तास्थापनेमध्ये राष्ट्रवादीची महत्वपुर्ण भूमिका असेल.’ ज्या पक्षाला सपाटून मार बसणार अशी सर्वांना खात्री होती, त्याच पक्षाचा मोठा नेता थेट सत्ता स्थापनेच्या गमजा करतो, याचे कोणालाही हसूच येणार किंवा गुढच वाटणार ना? पण पवार यांचे कुठलेही विधान त्यातल्या शब्दांच्या प्रचलित अर्थाने घेता येत नसते. त्याचे अनेक संभाव्य अर्थ शोधावे लागत असतात आणि कुठला अर्थ समयोचित आहे, तोच स्विकारावा लागत असतो. म्हणूनच मी त्या वाहिनीच्या चर्चेत पहिली प्रतिक्रीया देताना म्हणालो होतो. पवारांचे निकटवर्ती पटेल आदल्या दिवशी असे वक्तव्य करतात, त्याकडे काणाडोळा करता येत नाही. सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची महत्वपुर्ण भूमिका असल्याचे पटेल म्हणतात, म्हणजेच तसे पवार म्हणत आहेत. कारण पवार अशी मोक्याची गोष्ट पटेल यांच्या तोंडाने बोलत असतात. त्यामुळेच राष्ट्रवादीला किती जागा मिळत आहेत, त्यानुसार पवारांचे राजकीय मूल्यमापन महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकत नाही. त्यांची गंभीर दखल घ्यायलाच हवी. त्यानंतर मग पुढल्या चर्चेत थोडाफ़ार पवारांचा उल्लेख येऊ लागला आणि पवार आजच्या परिस्थितीत काय भूमिका घेतील, असे चर्चिले जाऊ लागले. सगळे विश्लेषण पुन्हा सेना व भाजपा यांच्या भोवतीच गुरफ़टत होते. मग चारच्या सुमारास चित्र बरेच स्पष्ट झाले आणि भाजपा बहूमताच्या अलिकडेच अडकणार आणि शिवसेनेची मदत घेतल्याखेरीज भाजपा सरकार बनू शकत नाही, असा चर्चेचा रोख फ़िरला.

पण त्यात पवारांची महत्ता कोणी विचारातही घ्यायला राजी नव्हता. मग निकाल खुप स्पष्ट होत आल्यावर पहिली ब्रेकिंग न्युज आली आणि साडेबारा वाजता मी दिलेल्या इशार्‍याला खुद्द शरद पवारांनी पुढाकार घेऊन दुजोरा दिला. अकस्मात राष्ट्रवादीच्या मोजक्या निकटवर्तियांशी चर्चा केल्यावर पवारांनी स्थीर सरकारसाठी भाजपाला पाठींबा देत असल्याची थेट घोषणा करून टाकली. अर्थात पुन्हा एकदा पत्रकार वा कॅमेराच्या समोर स्वत: पवार आलेले नव्हते. त्यांचे उजवे हात मानले जाणारे प्रफ़ुल्ल पटेल यांनी ती घोषणा केलेली होती. ह्यात निकाल बघून राजकीय अस्थीरता टाळण्यासाठी व फ़ेरनिवडणूकाचा धोका टाळावा म्हणून राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतल्याची मखलाशी होतीच. पण त्यात काही तथ्य नव्हते. तथ्य होते ते आदल्या दिवशीच्या पटेलांच्या ट्वीटमध्ये. कशाच्या आधारावर पटेल यांनी सरकार स्थापनेत पवारांची वा राष्ट्रवादीच्या महत्वपुर्ण भूमिकेचे भाकित केले होते? १८ आक्टोबरच्या संध्याकाळी प्रफ़ुल्ल पटेल यांनी केलेले ते भाकित आज ११ नोव्हेंबर रोजीपर्यंत नेमके खरे ठरताना दिसते आहे. पण मध्यंतरीची सेना वा भाजपा यांच्या एकत्र येण्य़ाची वा वेगळे होण्याची सर्व भाकिते उलटीपालटी होऊन कोसळत आहेत. ही चमत्कारीक बाब नाही काय? पहिले मत मोजण्यापुर्वी पवारांनी ठरवले होते की निकाल कसेही लागोत, नवे सरकार बनवण्यात आपण महत्वाची भूमिका करायची. मोठे पक्ष होऊनही सेना भाजपाला पवारांची मनिषा रोखता आलेली नाही. शेवटी चौथ्या क्रमांकावर पवारांचा पक्ष फ़ेकला गेला, तरी संपुर्ण राजकारणाची सुत्रे पवारच हलवत आहेत. याचा अर्थच निवडणुका घोषित झाल्यापासून वा त्याच्याही खुप आधीपासून सेना-भाजपा युती वा कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्या टिकण्यामोडण्याचेही डावपेच खुद्द पवारच खेळत होते आणि बहुतेक पक्ष त्यांनी आपल्या पटावरची प्यादी करून ठेवलेले असावेत.

राजकारणात लढाई जिंकणे खुप सोपे असते. पण त्यातले यशापयश टिकवणे, पचवणे मात्र खुप अवघड असते, हाच यातला धडा आहे. आपला पक्ष निवडणूका जिंकू शकणार नाही याची खात्री होती, तर पवार यांनी आपले विश्वासू सहकारी अन्य पक्षात पाठवून निवडून आणायची सज्जता आधीच केलेली होती. आपल्य पक्षातल्या डोईजड झालेल्यांना निकालात काढण्यासाठी त्यांनीच स्वपक्षाला अपयशाच्या कडेलोटावर आणायचाही धोका पत्करला. त्यासाठी आघाडी मोडून पक्ष आणखी विकलांग केला. सेनेला सोडून स्वबळावर भाजपाला बहूमत गाठण्याचे आमिष दाखवत आपलेच सहकारी तिकडे धाडले आणि युती मोडण्यासाठी आघाडीही मोडून दिली. परंतु त्यात भाजपाला स्वबळावर बहूमताचा पल्ला पार करता येणार नाही, याचीही पुरेशी काळजी घेतली. परिणामी भाजपा मोठा पक्ष झाला, तरी स्वयंभू होऊ शकला नाही आणि त्याला सत्तेसाठी कुबडी घेण्याइतके लंगडे राखले गेले. पुन्हा सेनेच्या पाया पडायची नामुष्की टाळण्यासाठी परस्पर पाठींबा जाहिर करून सेनेकडे परत जाण्याचे दोर कापून टाकले. पर्यायाने १८ आक्टोबरला म्हणाल्याप्रमाणे सत्ता स्थापनेत पवार किंवा राष्ट्रवादी यांना महत्वपुर्ण भूमिका आपोआप मिळाली. राष्ट्रवादीपेक्षा एक जागा अधिक मिळूनही कॉग्रेस राज्याच्या राजकारणात आज कुठेच दखलपात्र राहिलेली नाही. पण राष्ट्रवादी कॉग्रेस चौथ्या क्रमांकावर फ़ेकली जाऊनही सत्ताकारणात अत्यंत महत्वपुर्ण भूमिकेत आहे. तसे असल्याचे पत्रकार परिषदा घेऊन पवार पुन्हा पुन्हा आठवण करून देत आहेत. अर्थात पवार यांना आपण पचवू शकतो, अशी नरेंद्र मोदी व अमित शहांना खात्री असणारच. जुन्याजाणत्या राजकारण्यांना ‘राजनिती शिकवायला आलोय’ असे वर्षभरापुर्वी आपण छाती फ़ुगलेल्या केजरीवाल यांच्याकडून आपण ऐकतच होतो ना? त्यांचा उत्साह आज भाजपामध्ये ओसंडून वहाताना दिसतोय ना?

5 comments:

  1. >>आपल्य पक्षातल्या डोईजड झालेल्यांना निकालात काढण्यासाठी त्यांनीच स्वपक्षाला अपयशाच्या कडेलोटावर आणायचाही धोका पत्करला.

    उत्तम लेख पण या वाक्याशी असहमत. डोईजडांना बाजुला करण्यासाठी पक्षाला हरवले हे काही खरे नाही. पक्ष कॉंग्रेसविरोधी लाटेने खालच्या क्रमांकावर फेकला जाणार आहे हे बहुदा त्यांनी ओळखले असावे इतकेच. बाकी ही पवारनीती फसावी व महाराष्ट्राच्या राजकारणातून मुजोर राष्ट्रवादीवाले हद्दपार व्हावेत अशी फार इच्छा आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ, तुमच्या राजकीय ज्ञानाचा आणि अंदाजांचा पूर्ण आदर राखूनही असे म्हणावेसे वाटते की या लेखाच्या शेवटच्या पॅरा मध्ये तुम्ही शरद पवारांच्या मॅनेजमेंटच्या गुणांना फारच वर नेऊन ठेवले आहे. पवार अत्यंत चतुर आणि धूर्त आहेत हे संपूर्णपणे मान्य आहे परंतू तुम्ही लिहिल्या एवढ्या गोष्टी त्यांनी ठरवून मॅनेज केल्या असतील असे मला अजिबात वाटत नाही.
    महाराष्ट्रातल्या राजकारणात कुठेही काहीही घडले की त्या मागे पवार साहेब असलेच पाहिजेत हा एक विचित्र समज महाराष्ट्रात पसरलेला आहे आणि त्यामुळे देवानंतर फक्त पवार साहेबच अशी काहीशी त्यांची प्रतिमा तयार करण्यात त्यांना यश आलेले आहे (यात वेगवेगळ्या रूपाने अंकित केलेल्या पत्रकारांचा मोठा वाटा आहे). ही प्रतिमा वास्तविक पाहता अजिबात खरी नाही. अजून त्यांचा पक्ष फक्त स्वत:च्या बळावर महाराष्ट्रात काहीही भरीव करू शकलेला नाही हे वास्तव आहे. संधी मिळेल तिथे राजकीय अस्थीरता पैदा करून तिचा अचूक फायदा उठवणे यात मात्र ते माहिर आहेत.

    ReplyDelete
  3. If pawar wants to take care of some leaders of his own party, no need for him to bring His party to the brink in election s. He could simply remove them. For him it was not difficult.

    ReplyDelete
  4. शरद पवार यांचे राजकारण नकारात्मक असते ते स्वत: कधीच जिंकत नाहीत.
    पण मोठ्या खूबीने एखादी खास त्यांच्या स्टाईलची चाल खेळून ते दुसरा कसा हरलाय
    ते भासवतात. भाजप सारख्या अपरिपक्व नेते मंडळींनी भरलेले नेते तर त्यांचे गिर्हाईक
    त्याना तर ते अगदी आपल्या मनासारखे नाचवू शकतात. पण याचा अर्थ ते राजकारणातले
    फार मोठे खिलाडी वगैरे आहेत असा होत नाही. जर ते खरोखर ते इतके पोहोचलेले असते तर राष्ट्रीय
    राजकारणात तर सोडाच पण कमीत कमी महाराष्ट्राच्या राजकारणात तरी त्यांचा दबदबा असता
    आणि त्यांचा पक्ष बहुमतात असता. सर्व सामान्य माणसांची मने जिंकण्यात आणि जनमताचा
    कौल आपल्याकडे वळवण्यात ते अपयशी ठरले आहेत.

    ReplyDelete