Tuesday, November 4, 2014

सत्तेबाहेरची शिवसेना फ़ोफ़ावते

विधानसभेचे निकाल लागल्यापासून आणि भाजपाचे बहूमत हुकल्यापासून एक नवा युक्तीवाद अनेक ठिकाणाहून ऐकू येत आहे. तो म्हणजे शिवसेना सत्तेत गेली नाही, तर तिच्यात फ़ुट पडेल. सत्तेत जाऊन संघटनेचा सत्तेमुळे जो विस्तार होऊ शकेल, तो विरोधात बसून होणार नाही. असा तो युक्तीवाद आहे. मग त्यासाठी अनेक मुद्दे पुढे केले जात आहेत. गेली पंधरा वर्षे सत्तेपासून वंचित राहिल्याने शिवसेनेत खुप अस्वस्थता आहे आणि त्यामुळेच सेनेचा एक गट फ़ुटून बाहेर पडू शकतो. अर्थात त्याला दुजोरा देणार्‍या सूचक बातम्या भाजपाच्या गोटातूनही सोडल्या जात आहेत. अन्य पक्षातले काही आमदार भविष्याची हमी दिल्यास भाजपात यायला राजी आहेत, अशा त्या बातम्या आहेत. त्यात अर्थातच सेनेच्या आमदारांचाही समावेश आपोआपच केला जातो. अशा बातम्या देणार्‍या वा युक्तीवाद करणार्‍या कितीजणांना शिवसेनेचा गेल्या ४८ वर्षाचा इतिहास ठाऊक आहे, याचीच शंका येते. कारण सत्तेत शिवसेना गेली, ती १९९५ सालात आणि मोठ्या संख्येने सेनेचे आमदार निवडून आले तेही १९९० नंतर. म्हणजे १९६६ पासून १९९० पर्यंत २४ वर्षात ५२ आमदारांना निवडून आणण्यापर्यंत सेनेने मजल मारली, ती सत्तेत असताना असे कोणाला म्हणायचे आहे काय? १९६६ साली सेनेची स्थापना झाली आणि १९८६ सालात सेना राज्यव्यापी पक्ष बनण्यापर्यंत विस्तारली, तेव्हा तिच्यापाशी कुठली सत्ता होती? आणि सत्ता नसेल, तर सत्तेशिवाय शिवसेना मरगळते हा सिद्धांत आलाच कुठून? उलट शिवसेना सत्तेला वंचित होती, तेव्हा तेव्हा तिचा विस्तार अधिक झाला व ती जास्त फ़ोफ़वली. किंबहूना सगळ्याच सत्तेपासून व जवळपास एकामागून एक पराभव पचवले, त्यातूनच आजच्या राज्यव्यापी शिवसेनेचा इतका विस्तार झालेला आहे. पराभवाने सेनेला जितके विस्तारले, तितके तिला कुठल्याही विजयाने मोठे केले नाही.

१९६६ सालात सेनेची स्थापना झाल्यावर तिने पहिली नगरपालिका निवडणूक ठाण्यात लढवून नगराध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि पुढल्याच वर्षी मुंबई पालिकेची निवडणुक लढवून दुसर्‍या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. व्यवहारी भाषेत सांगायचे, तर तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वारसा सांगणार्‍या संपुर्ण महाराष्ट्र समितीची मुंबईच्या राजकारणातली जागा सेनेने व्यापली होती. पण तिथून पुढे विधानसभा व लोकसभा लढवताना सतत सेनेच्या नशीबी अपयशच आले. राज्यातही सेनेला आपले हातपाय पसरता आले नव्हते. त्यामुळेच आणिबाणी व जनता पक्षाच्या लाटेत सेनेची धुळधाण उडाली. तेव्हा पहिले काही महत्वाचे नेते सेनेला सोडून जनता पक्षात गेले. पण अस्तित्वाची लढाई लढणार्‍या सेनेला यश सतत हुलकावणी देत राहिले. जनता पक्ष संपला आणि पुन्हा इंदिरा लाट आली, तेव्हा तशीच सेनेची दुर्दशा मुंबईतही होत राहिली. पालिकेतील सेनेचे संख्याबळ २३ पर्यंत खाली घसरले होते. मग लोकसभेत पुन्हा पराभव झाल्यावर बाळासाहेबांनी थेट त्या मोठ्या निवडणूकांकडे पाठ फ़िरवली. १९८० च्या विधानसभेत सेनेचा बिनशर्त पाठींबा कॉग्रेसला देऊन बाळासाहेब मोकळे झाले. तेव्हा त्यांची खुप टिंगल झाली होती. बदल्यात त्यांना विधान परिषदेतले दोन आमदार अंतुले यांनी दिले होते. तेव्हा सेनेने शरणागती पत्करली नव्हती, तर सतत लढणार्‍या आपल्या कार्यकर्त्याला वैफ़ल्यग्रस्त होण्यापासून वाचवले होते. पुढे १९८४च्या लोकसभेच्या दोन जागा भाजपाच्याच चिन्हावर लढवून पराभव घेतला आणि विधानसभा एकाकी लढवताना भुजबळ हा एकांडा शिलेदार वगळता सेना हतबल झाली होती. कारण त्यांच्या गिरणगावाच्या बालेकिल्ल्यालाही डॉ. दत्ता सामंतांनी खिंडार पाडले होते. इतका दिर्घकाळ शिवसेना कुठल्या सत्तेत होती? कुठल्या यशाने सेनेला त्या काळात टिकवले आणि विस्तारले? कारण त्यानंतर अवघ्या चार महिन्यात शिवसेना उभारी घेऊन उंच झेपावली.

१९८५ च्या पालिका निवडणूकीत सेना इतकी एकाकी पडली होती, की तिच्या सोबत कोणी मैत्री वा आघाडी करायलाही तयार नव्हता. मग सगळे शाखाप्रमुख उमेदवार म्हणून आखाड्यात उतरवण्याचे धाडस सेनाप्रमुखांनी केले होते. अनेक शाखाप्रमुख घाबरून गावी पळाले होते. अनेक सेना नेत्यांना या वेड्या धाडसाचे आश्चर्य वाटले होते. पण त्याच धाडसाने सेनेला एकहाती पालिकेची सत्ता दिली. तिथून सेनेची अशी घोडदौड सुरू झाली, की लोकसभेनंतर सेनेला सोडून गेलेल्य भाजपा व प्रमोद महाजनांनी त्याच सेनेसमोर राज्यव्यापी युतीचा प्रस्ताव मांडला होता. हा सगळा चमत्कार शिवसेना सत्तेत असतानाचा नव्हता, तर दिर्घकाळ सेना सत्तेपासून वंचित असतानाचा होता. मार्च १९८५ मध्ये सेनेला वार्‍यावर सोडून पवारांच्या पुलोदच्या गोटात दाखल झालेल्या भाजपाने १६ आमदार निवडून आणलेले होते. सेनेला एकटा छगन भुजबळ कसाबसा विधानसभेत पाठवता आलेला होता. अशा किरकोळ पक्षाशी राज्यव्यापि युतीचा प्रस्ताव १६ आमदारांच्या बलदंड भाजपाने कशाला मांडला होता? शिवसेना तेव्हा सत्तेत नव्हती. तिच्या खात्यात डझनभरही आमदार नव्हते. हाताशी होती एक मुंबई महापालिका आणि ठाणे ही नवी महापालिका. मुद्दा इतकाच, की शिवसेना सत्तेत नसेल तर विस्तारत नाही, जोमाने उभी रहात नाही, हा युक्तीवादच फ़सवा व दिशाभूल करणारा आहे. उलट जितकी सेना सत्तेला वंचित रहाते व सेनेची चौफ़ेर कोंडी होते, तितकी ती सुसाट वेगाने उभारी घेते. अर्थात हा सर्व इतिहास आहे आणि त्तो बाळासाहेब नावाच्या शिवसेनाप्रमुखाने घडवलेला आहे. स्वत:ला कुठल्या सत्ता पदाची अपेक्षा नसलेला व निवडणूकीच्या फ़ंदात न पडलेल्या नेत्याने घडवलेला इतिहास आहे. त्याच्या इतकाच तो कुठलीच निवडणूक न लढवलेल्या शिवसैनिकांचाही इतिहास आहे. ती खरी शिवसेना आहे आणि ती फ़ुटत नसते किंवा संपत नसते.

शिवसेनेतून अनेक नेते फ़ुटले, इतर पक्षात गेले आणि त्यांना सत्तापदेही मिळाली. पण म्हणुन त्यांनी नव्या पक्षाचा कितीसा विस्तार केला? त्यांच्या जाण्यामुळे सेनेला किती हानी सोसावी लागली? अशा प्रत्येक प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. याचे कारण शिवसेना हा पक्ष म्हणून वावरत असला, तरी ती एक मानसिकता आहे. त्यासाठी झटणारा कार्यकर्ता कुठे त्या पक्षाच्या मुशीत तयार होत नाही किंवा संघटनेत येऊन सदस्य होत नाही. वयात येणार्‍या जवळपास प्रत्येक मराठी मुलाला किशोरावस्थेत जी मस्ती अंगात येते, तिचे नाव शिवसेना असते. अंगातल्या मस्तीला जिरवण्याची संधी शिवसेनेत मिळते, म्हणुन तो तरूण शिवसैनिक होतो. राजकारण बाकीचे नेते करतात. त्याच कारणास्तव गेल्या पाच दशकात मराठी तरूणांना बाळासाहेब भुरळ घालू शकले. त्यांनी या तरुणाच्या मनस्थितीला जपले जोजवले आणि वेळ आली, तेव्हा सत्तेसह निवडणूकीतल्या यशापयशाला लाथ मारून, त्या तरूणाच्या इर्षेला इजा होऊ दिली नाही. इतिहासातले दत्ताजी शिंदे नावाचे एक अविस्मरणिय पत्र आहे. त्याचे प्रसिद्ध शब्द समजून घेतले, तर खरी शिवसेना उमगते. रक्तबंबाळ होऊन धारातिर्थी पडलेल्या दत्ताजीला दुष्मन खिजवायला विचारतो, अब क्या करोगे? दत्ताजी उत्तरतो, ‘बचेंगे तो और भी लडेंगे.’ अशी इर्षा व उत्स्फ़ुर्तता ज्याच्या रक्तात उसळ्या मारत असते, त्या मराठी तरूणात शिवसेना उपजतच येत असते. त्याचे लाभ शिवसेना नावाच्या पक्षाला राजकारणात मिळतात. पण राजकारणातल्या जय पराजयाने तो ‘दत्ताजी शिंदे’ खच्ची होत नाही. कारण तो सत्ता व पदासाठी लढलेलाच नसतो. त्याच्या अंगी लढण्यातली जी खुमखुमी असते, तिला आधुनिक काळात खतपा्णी घालून बाळासाहेबांनी जोपासले, त्याला लोक शिवसेना नावाचा पक्ष म्हणून ओळखतात. म्हणूनच त्यांनी सेनाप्रमुख असताना सत्ता भोगणार्‍या किंवा त्यासाठी सेना सोडणार्‍यांची कधी पर्वा केली नाही.

8 comments:

  1. Sundar blog saheb..
    Pan mala watate aata kaal badalala ahe. Tumhi saangat asaleli raangdyaa marathi baanyachi gosht aajkalchya 80% sushikshit tarunaana samjat nahi..

    Dattaji shinde khup kami urale ahet ata.

    ReplyDelete
  2. sattebaher rahaycha hota Sene la tar 20-Oct lach jahir kele aste...Purvichi hi rohkhtok sena rahili nai..

    ReplyDelete
  3. वयात येणार्‍या जवळपास प्रत्येक मराठी मुलाला किशोरावस्थेत जी मस्ती अंगात येते, तिचे नाव शिवसेना असते. ...अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
    Replies
    1. Chuk! Pratyek nahi ..... those who don't have vision.

      Delete
  4. या विश्लेषणाबरोबरच मागील पंधरावर्षापासून सत्ते असणाèया कॉंग्रेसमध्ये सद्य स्थितीत काय सुरू आहे. सत्तेपासून दूर राहिल्यानंतर कॉंग्रेसला चांगले दिवस येतील का? या विषयावरही काही विवेचन आले पाहीजे.

    ReplyDelete
  5. माझं किशोर वयातलं पहिलं आणि शेवटचं राजकीय प्रेम, शिवसेनाच. वयाच्या 11व्या वर्षापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत...

    ReplyDelete
  6. शिवसेनेचे याग्य विश्लेषण! मराठी माणसाच्या 'मोडेल पण वाकणार नाही' या मराठी माणसाच्या वृत्तीला जिथे खतपाणी मिळते ती शिवसेना!

    ReplyDelete
  7. भाऊसाहेब तुम्ही तर शिवसेनेचा इतिहास सांगितलंत पण भविष्यात शिवसैनिक मराठी खांभिर नेता हवा जो महाराष्ट्र उज्वल करू शकतो व मराठी अस्मिता जगवू शकतो

    ReplyDelete