मतचाचण्या किंवा जनमताचा कौल ही आता आपल्या देशात नित्याची बाब झाली आहे. मात्र त्याची भाकिते चुकणे वा फ़सणे, यामुळे त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. कालपरवाच बिहारच्या मतदानाचे अनेक अंदाज असेच व्यक्त झाले होते. पण त्यात लालूंना इतके मोठे यश मिळायची अपेक्षा कुठल्याच चाचणीने केली नव्हती. दिड वर्षापुर्वी मोदींना आपल्या पक्षाला एकट्याने बहुमत मिळण्याचे भाकितही कोणी करू शकला नव्हता. असे झाले, मग चाचण्यांवरचा विश्वास संपत असतो. निदान लोक त्याकडे साशंक नजरेने बघू लागतात. याची दुसरी बाजू अशी झाली आहे, की ज्यांना अशा भाकितामध्ये झुकते माप मिळालेले असते, त्यांना ती चाचणी वास्तववादी वाटते आणि ज्यांना त्यात अपयश दाखवलेले असते, त्यांना त्यात गफ़लत दिसू लागते. याला अर्थातच चाचणीकर्ते किंवा त्यावरून भाकित करणारे जबाबदार असतात. अनेकदा चाचणीकर्ते माहिती जमवताना पक्षपाती असतात, तर काही प्रसंगी त्यापासून निष्कर्ष काढणारे आपली मते त्यात घुसवण्याचा मोह आवरू शकत नाहीत. पर्यायाने एक चांगले शास्त्र वादाच्या भोवर्यात गटांगळ्या खावू लागते. वास्तवात हे एक शास्त्र आहे आणि त्यातून काही संकेत मिळत असतात. ते समजून घेण्याची गरज असते आणि त्यात प्रामाणिकपणा असला, तर अशा भाकितापासून खुप काही शिकता येत असते. मोदी सरकारला दिड वर्ष उलटून गेल्यावर एबीपी वाहिनीने नीलसन संस्थेच्या मदतीने एक देशव्यापी चाचणी नुकतीच घेतली आणि अजून मोदीलाट ओसरली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता तो भाजपाला झुकते माप देणारा असल्याने मोदी समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटणार हे स्वाभाविक आहे. त्याच बरोबर मोदी विरोधकांना त्यात तथ्य नसल्याचे वाटल्यास नवल नाही. पण वास्तवात दोघांनाही भाकितापेक्षा आपापल्या समजूती महत्वाच्या वाटत असतात.
चाचण्या काही संकेत देत असतात. त्यापेक्षा अधिक काही शोधणे गैरलागू असते. दिल्ली व बिहारमध्ये भाजपाने सपाटून मार खाल्ला, म्हणून लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने मिळवलेल्या यशावर पाणी ओतले गेले, अशा समजूतीत ज्यांना रहायचे असेल, त्यांना कोणी रोखू शकत नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की लोकसभेचे यश हे मोदी या व्यक्तीभोवती देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून होते, ही वस्तुस्थिती भाजपाचे नेते समजू शकले नाहीत. लोक कॉग्रेसला कंटाळले म्हणजे भाजपाच्या कुठल्याही मनमानीला शरण जाणार, हे भाजपाचे वा मोदी समर्थकांचे गृहीत त्यांच्यावर उलटले आहे. मतदान कशासाठी होते, याचे भान मतदाराला असते. म्हणूनच त्यानुसारच नेता, पक्ष व स्थिती यांचे समिकरण मांडून सामान्य मतदार आपला कौल देत असतो. उदाहरणार्थ मोदी पंतप्रधान म्हणून योग्य व अपरिहार्य असले, तरी बिहार वा दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करायला ते पंतप्रधानपद सोडणार नाहीत, हे मतदाराला नेमके कळते. म्हणूनच त्याने भाजपाला नकार देत अन्य पर्याय निवडले. ही जाणिव भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाला असती तर त्यांनी ‘पंचायत टू पार्लमेन्ट’ अशी बाष्कळ बडबड केली नसती. लोकसभेत भाजपाला झुकते माप देणार्या मतदाराने भाजपापेक्षा त्यांच्यासमोर असलेल्या प्रभावी व खमक्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी कौल दिला होता. तसाच कौल बिहारमध्ये नितीश व दिल्लीत केजरीवाल यांना दिला. तसा पर्याय भाजपाने त्या दोन्ही राज्यात समोर आणला नाही, ही चाचण्यांची चुक नाही. राहुल हे मोदींसमोर नगण्य होते ही कॉग्रेसची भयंकर मोठी चुक होती. त्याची किंमत त्यांनी मतांसह जागा गमावून मोजली. पण नितीशचा चेहरा असल्याने बिहारमध्ये कॉग्रेसने मोठी कमाई सुद्धा केली. ताज्या चाचणीचा वा इतर मतचाचण्यांचा संकेत तसा समजून घेतला पाहिजे.
आज दिड वर्ष होत असताना मोदी विरोधात देशभर काहूर माजवण्यात आलेले आहे. कोणी माध्यमातल्या बातम्या किंवा विरोधकांचा गाजावाजा एवढ्यावरच विश्वास ठेवायचा असेल, तर मोदी यांनी आपली सर्व लोकप्रियता गमावली, असेच म्हणावे लागेल. सहाजिकच त्याचे प्रतिबिंब कुठल्याही मतचाचणीत पडले पाहिजे. आपापल्या घरात बसून निव्वळ वाहिन्या वा माध्यमांनी दाखवले, तितकेच जग बघणार्यांचे तसेच मत असल्यास नवल नाही. पण म्हणून ती वस्तुस्थिती नसते. माध्यमांच्या प्रभावापासून मुक्त असलेला प्रचंड जनसमुदाय असतो आणि आपल्या व्यक्तीगत अनुभवातून आपले मत तो सतत बनवत किंवा बदलत असतो. म्हणूनच माध्यमांनी बातम्या किंवा चर्चेतून रंगवलेल्या चित्रापेक्षा वस्तुस्थिती कमालीची भिन्न असू शकते आणि असते. अन्यथा बारा वर्ष मोदींना मुस्लिमांचा कर्दनकाळ रंगवणार्या याच माध्यमांनी मोदींना देशाच्या नेतृत्वासाठी सर्वात अयोग्य उमेदवार घोषित करून टाकले नव्हते का? पण ते दाखवलेले चित्र किती विपरीत होते, त्याची साक्ष मतदाराने आपल्या लोकसभा मतदानातूनच दिली. त्याचेही संकेत २०१३-१४ या वर्षभरात झालेल्या अनेक चाचण्या देतच होत्या. पण त्याचा अर्थ लावणारे मात्र त्यावर विश्वास ठेवायला राजी नव्हते. हाती येणारी माहिती नेमकी विश्लेषण करून माध्यमे सांगू शकत नव्हती. तो दोष चाचणीचा नव्हता तर चाचणीचा अर्थ उलगडणार्याच्या बुद्धीचा होता. आताही एबीपी नीलसन यांचा निष्कर्ष बाजूला ठेवून जे आकडे समोर आलेले आहेत, त्याकडे मोदी समर्थक वा विरोधकांनी गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशी चाचणी कुठे व कुठल्या संदर्भात घेतली त्याकडे पाठ फ़िरवून निष्कर्ष उमजणार नाहीत. ही मतचाचणी देशव्यापी झाली असून मोदी या व्यक्तीभोवती केंद्रीत झालेली आहे. त्याचा भाजपा वा कॉग्रेस यांच्याशी संबंध नाही.
उदाहरणार्थ लोकांना मोदी वा पंतप्रधानाच्या संदर्भात प्रश्न व मते विचारली गेली आहेत. त्यात भाजपापेक्षा लोकांनी मोदींना झुकते माप दिलेले आहे. याचा अर्थ इतकाच आहे, की अजून तरी पंतप्रधान व्हायला मोदींपेक्षा कोणी उजवा पर्याय मतदारापुढे नाही. म्हणूनच मग चाचणी म्हणते उद्या मतदान झाले, तरी पुन्हा प्रचंड मताधिक्याने मोदीच पंतप्रधान होतील. त्यांच्या तुलनेत अन्य कोणीही व कुठल्याही पक्षातला नेता जवळपास टिकत नाही. याचा अर्थ भाजपाला किंवा एनडीए आघाडीला लोक झुकते माप देत नाहीत. तर देश संभाळू शकणारा नेता म्हणून मोदींना कौल देत आहेत. पण भाजपाने मोदींना बाजूला करायचा निर्णय घेतला, तर ते भाजपाला मत देतील असे नाही. दुसरी बाजू अशी, की कितीही काहुर माजवून माध्यमांनी मोदींची काळी प्रतिमा रंगवली, तरी लोकांनी त्याला दाद दिलेली नाही. देशातील बुद्धीमंत विचाव्रवंत असंहिष्णूतेचा गदारोळ करीत असले, तरी त्यामुळे मोदींची पंतप्रधान म्हणून लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. किंबहूना मोदींच्या तुलनेत कोणी दुसरा राष्ट्रीय चेहराही जनतेसमोर येऊ शकलेला नाही. त्याचा अर्थ इतकाच होतो, की संसदेत धुमाकुळ घालून वा विविध प्रकारचे आरोप करूनही मोदींची प्रतिमा डागाळण्याचा केलेला प्रयास वाया गेलेला आहे. तशी मनमोहन सिंग यांची कुठलीही उजळ प्रतिमा २००९ सालात मतदारापुढे नव्हती. पण त्यांनी पाच वर्षे सरकार चालविले होते आणि त्यांना शह देवू शकेल, असा कुठलाही नेता वा चेहरा भाजपा वा अन्य विरोधकांनी समोर आणला नव्हता. म्हणुनच दुसर्यांदा कॉग्रेसला सत्ता मिळाली. तो सोनिया वा मनमोहन यांचा विजय नव्हता, तर विरोधकांचा नाकर्तेपणा होता. लोकसभेत यश मिळाले त्याचे कुठलेही प्रतिबिंब विधानसभांच्या मतदानात तेव्हाही पडताना म्हणूनच दिसले नाही. आताचा कौल त्याच निकषावर तपासून घ्यावा लागेल.
लोकसभेत २२ जागा जिंकणार्या कॉग्रेसला त्याच उत्तर प्रदेशात विधानसभेत २५ जागा मिळवताना दमछाक झाली होती. नेमके तेच चित्र २०१४ च्या लोकसभेनंतर काही विधानसभांच्या निवडणूकीत भाजपाच्या अनुभवाला आले. बिहार व दिल्लीत भाजपाची नाचक्की झाली. कारण दोन्ही जागी भाजपा पर्यायी नेतृत्वाचा चेहरा देवू शकलेले नव्हते. नीलसनच्या चाचणीत देशाच्या नेतृत्वाचा विषय आहे आणि तिथे अजून मोदींना मागे टाकणारा कोणी पुढे येऊ शकलेला नाही. म्हणूनच तो मोदींसाठी चांगला संकेत आहे, तितकाच त्यांच्या विरोधकांसाठी धोक्याच्या संदेश आहे. उठसुट मोदींच्या विरोधात काहूर माजवून मोदींना पराभूत करणे शक्य नाही. तर मोदींपेक्षा उजवा ठरू शकेल, असा राष्ट्रीय नेता वा त्याचा चेहरा विरोधकांना समोर आणावा लागेल. संसदेत धुमाकुळ घालून वा बारीकसारीक निमीत्त शोधून मोदी विरोधातील चिखलफ़ेक २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कामी येणार नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यापेक्षा बिहार दिल्लीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिस्पर्धी नेता समस्त विरोधकांनी एकत्र येऊन उभा करावा. जितकी मोदींनी आपल्या पक्ष व आघाडीवर हुकूमत आहे, तितकी त्याला पाठीराख्यांवर हुकूमत दाखवता आली पाहिजे. तिथे कॉग्रेसचा पर्याय आहे. पण त्या्चा पंतप्रधान करायचा चेहरा बाकीच्या सहकारी पक्ष व मित्रांना मान्य नाही. राहुल गांधीही अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन दोन पावले चालताना दिसत नाहीत. पण पार्याय म्हणून काही मोजकी लोकसंख्या त्यांच्याकडे बघते आहे. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी जो समंजसपणा दाखवायला हवा, तिथे राहुल तोकडे पडतात. बाकी कुठला पर्याय समोर येताना दिसत नाही. जे पर्याय एक दोन टक्के लोकप्रियता मिळवलेले दिसतात, ते मोदींच्या पासंगालाही पुरणारे नाहीत. किंबहूना त्यांची नावे मतदारांनी कशाला घेतली, तेही तपासून बघायला हरकत नाही.
मोदी आणि राहुल वगळता पुढला नंबर थेट केजरीवाल यांचा आहे. त्याखेरीज जी नावे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत चाचणीमध्ये दिसतात, ती बहुतेक माध्यमातून सतत गाजणारी नावे आहेत. म्हणजेच माध्यमात त्यांची नाव झळकली नसती, तर त्यांची दखलही पंतप्रधान पदासाठी कोणी घेतली नसती. ओडीशाचे नविन पटनाईक तिनदा बहूमत मिळवून मुख्यमंत्री झालेत. पण कोणी त्यांची दखल घेत नाही. मात्र केजरीवाल स्पर्धेत दिसतात, कारण ते सदोदीत माध्यमात झळकण्याचे काम करतात. पण तुलनेने अधिक जागा जिंकू शकणार्या विविध नेत्यांचा उल्लेखही अशा चाचणीत येत नाही. हा माध्यमांचा प्रताप असतो. मोदींविरोधात इतके काहूर माजवूनही लोक त्यांना कौल देताना दिसतात, तेव्हा दोन कारणे संभवतात. एक म्हणजे सतत पंतप्रधान म्हणून मोदींचा चेहरा त्यांच्यासमोर येत असतो. अधिक कुठल्या ना कुठल्या कारणाने विरोधकांकडून मोदींना टिकेचे लक्ष्य केले जात असल्यानेही मोदीच समोर येतात. त्याचा एक प्रभाव अशा चाचणीवर पडत असतो. भले समाधानकारक काम मोदी करू शकलेले नसतील. पण कामे करतात, ही वस्तुस्थिती असते ना? दुसरी गोष्ट सरकार म्हणून जे काही निर्णय घेतले जात असतात, त्याचे कमीअधिक लाभ सामान्य माणसाला कुठेतरी अनुभवास येत असतील, त्याचाही परिणाम दिसतो. एकूण निष्कर्ष काढायचा तर सत्ताधारी व विरोधी पक्षांसाठी त्यात नेमका संकेत आलेला आहे. भाजपाला लोक पुन्हा मते देतील, अशा भ्रमात रहाण्याची गरज नाही. लोकांच्या अपेक्षा मोदी या व्यक्तीकडून आहेत. म्हणूनच त्यांना यशस्वी होऊ देण्यावर भाजपा विसंबून आहे. पण त्यांच्या नावावर विधानसभा वा महापालिका जिंकता येणार नाही. विरोधकांसाठीचा संदेश असा, की बदनामीतून काहीही साध्य होणार नाही. लोकांना भारून टाकेल व भुरळ घालील, असा पर्यायी नेतृत्वाचा चेहरा समोर आणायला आणखी साडेतीन वर्षेच शिल्लक उरली आहेत.
(पूर्वप्रसिद्धी तरूण भारत नागपूर)
रविवार ३१/१/२०१६