शुक्रवारी मुंबईच्या परेल एलफ़िन्स्टन स्थानकावर एक दुर्घटना घडली आणि त्याची प्रतिक्रीया आपापल्या परीने माध्यमात व सोशल माध्यमात उमटत होती. या घटनेत २२ लोक चेंगरून मृत्यूमुखी पडल्याचे तर पन्नासहून अधिक प्रवासी जबर जखमी असल्याचे वृत्त आलेले होते. पोलिसांनी त्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या विविध रक्तगटाचा तुटवडा लक्षात घेऊन, तशा रक्तदात्यांना थेट केईएम इस्पितळात पोहोचण्याचे आवाहन केलेले होते. सोशल माध्यमातील अनेकांनी ते आव्हान आपापल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेण्याचा खास प्रयत्न केला. पण बहुतांश सोशल माध्यमवीर व मुख्य वाहिन्या राजकीय वातावरण व कागाळ्या करण्यात गर्क झालेल्या होत्या. ज्या अरूंद पुलावर जागा चिंचोळी म्हणून ही दुर्घटना घडली, तिथेच वारीस पठाण नावाचे ओवायसी गटाचे आमदार कुणा वाहिनीला मुलाखत देऊन सरकारचे वाभाडे काढत होते आणि इतर वाहिन्यांचे पत्रकार कॅमेरे आपल्याला संधी मिळण्याची प्रतिक्षा करत होते. ज्या कारणास्तव प्रवाश्यांचे जीव गेले ती अपुरी जागा, अधिक अरूंद करणारेच मग सरकार आणि रेल्वे प्रशासनाला जाबही विचारत होते. जिथे दुर्घटना घडली आहे किमान तिथे तरी आपण मदतकार्य करू शकत नसू तर अडचण तरी होऊ नये, इतकीही सभ्यता वा संयम यापैकी कोणी दाखवू शकला नव्हता. प्रत्येक विचाराचे व गटातले सोशल माध्यमातले योद्धे मात्र आपापल्या बाजूने इतरांवर प्रहार करीत मृतांना न्याय देण्याचा आव आणत होते. त्यापैकी कोणालाही कोण मेला व कशामुळे मेला, किंवा त्याच्या कुटुंबाची अवस्था यापुढे काय होणार, याची अजिबात फ़िकीर नव्हती. प्रत्येकाला आपापला अजेंडा पुढे रेटण्यासाठी निमीत्त मिळाल्याचा अत्यानंद झालेला होता आणि त्याचे प्रत्यंतर सोशल माध्यमातून पुरेपुर झळकत होते. आपण आता किती निर्दय व भावनाशून्य झालो आहोत, त्याची ही प्रचिती आहे.
एका वाहिनीने तर विविध पक्षाचे नेते व प्रवक्ते यांची नावे घेऊन ‘तुम्ही कधी लोकलने प्रवास करणार’ असा सवालही पेश केलेला होता. अशा वाहिन्यांचे संपादक वा वार्ताहर तरी कितीदा रेल्वेने वा लोकलने प्रवास करीत असतात? त्यापैकी कितीजणांना यापुर्वी असे अरुंद रेल्वे पादचारी पुल चेंगराचेंगरीने माणसांचा बळी घेतील, असे बघता आलेले होते? त्यांनी कधी अशी बातमी तरी दिलेली होती काय? पण असे सगळेच पत्रकार आपापल्या वाहिनीवर कुणाला तरी दोषी ठरवून फ़ाशी देण्यासाठी उतावळे झालेले होते. अलिकडे ही फ़ॅशन झालेली आहे. कुठलाही भयंकर प्रसंग घडला, मग वाहिन्या व माध्यमेच जणू त्याला न्याय देण्यासाठी कंबर कसून उभे ठाकले आहेत, तर सरकार व प्रशासन त्या नागरिकांच्या जीवावर उठलेले आहे; असेच एक चित्र उभे केले जात असते. पण त्यापासून कटाक्षाने दूर असलेल्या सोशल माध्यमात आता तीच वृत्ती बोकाळू लागली आहे. आपापल्या राजकीय भूमिका व आग्रह घेऊन सोशल माध्यमातील सामान्य जाणतेही अमानुष होत चालले आहेत. म्हणूनच मुंबई बुडाली, तेव्हा शिवसेनेच्या नावाने शंख करण्याची स्पर्धा झाली आणि शुक्रवारी रेल्वेमंत्र्याच्या नावाने शंख करण्याला ऊत आलेला होता. महिनाभरापुर्वी त्या खात्याचा मंत्री झालेल्या पियुष गोयल यांचा राजिनामा मागण्यापर्यंत मजल गेलेली होती. हा सगळा प्रकारच दिवसेदिवस किळसवाणा होत चालला आहे. मृताविषयी आत्मियता हळवा भावही कुठे दिसेनासा झाला आहे. मागल्या महिन्यात अशीच बंगलोरमध्ये गौरी लंकेश नावाच्या पत्रकार महिलेची हत्या झाली आणि त्यात हिंदूत्ववादी संघटनांना गोवण्यासाठी एका दिवसात मोठा उत्सवच साजरा करण्यापर्यंत मजल गेली. आता त्या घटनेला महिना होत आला आहे आणि तीच गौरी कोणालाही आठवेनाशी झाली आहे. आपल्या भावना वा उमाळे किती मतलबी होत चालले आहेत, त्याचे हे प्रतिबिंब आहे.
दोनतीन वर्षापुर्वी अशीच चेंगराचेंगरीची दुर्घटना मुस्लिम पंढरी मानल्या जाणार्या मक्केत घडलेली होती. तिथे सैतानाला दगड मारण्यासाठी धवत सुटलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो भाविकांचा त्यात बळी गेला होता. एकदा तर कुठले बांधकाम चालू असताना कोसळून असेच शेकडो बळी गेले होते. तर त्यातल्या परदेशी मृतांचे देह बुलडोझरने उचलून डंपरमध्ये भरल्याविषयी तक्रारी झाल्या होत्या. पण कुठल्याही कारणाने गर्दीच्या जागी व्यवस्थापन होत नसल्याची तक्रार सहसा होत नाही. आज सगळेच तावातावाने बोलणार आहेत. पंधरा वर्षापुर्वी उत्तरप्रदेशच्या चारबाग रेल्वेस्थानकात अशीच घटना घडलेली होती. कुठल्याशा मेळाव्याला आलेले मायावतींचे अनुयायी पुन्हा माघारी जाण्यासाठी स्थानकावर आले आणि तिथेही जिन्यातच चेंगराचेंगरी होऊन सोळा लोकांचा बळी गेलेला होता. अशा शेकडो घटना सांगता येतील. कारण त्या घडलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या टाळण्याची कुठलीही हालचाल झालेली नाही. सामान्य माणसे मरण्यासाठीच जन्माला येतात अशीच एक राजकीय धारणा त्यामागे आहे. मुंबईवर कसाब टोळीचा हल्ला झाला, तेव्हा त्यात सुरक्षाकर्मी उन्नीकृष्णन मारला गेला होता. तर त्याच्या मृतदेहाचे दर्शन घ्यायला जायचे टाळले म्हणून तात्कालीन मार्क्सवादी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांच्यावर टिका झालेली होती. त्यांनी या बेपर्वा अमानुष राजकीय धारणेची साक्षच दिली होती. हे सैनिक किंवा जवान मरायलाच सेनेत भरती होतात ना? त्यांना श्रद्धांजली देण्यावरून इतके काहूर कशाला; असा प्रतिसवाल अच्युतानंदन यांनी केलेला होता. त्यामुळे ज्या सामान्य घरातून सैनिक जवान भरती होतात, त्यापैकीच लोक लोकल वा रेल्वे अपघातात मारले जातात. तर त्याची उच्चभ्रू राजकीय वर्गाने गंभीर दखल कशाला घेतली पाहिजे? याच धारणेचे प्रतिबिंब मग त्यांच्या अनुयायांच्या प्रतिक्रीयांमध्ये पडत असते.
म्हणून तर परेल एलफ़िन्स्टन रेल्वे स्थानकातील घटना घडल्यावर विनाविलंब त्यावर राजकीय प्रतिक्रीयांचा सडा पडला. त्यातून आपल्या विचारांचा राजकारणासाठी किती लाभ उठवता येईल, त्यावरच प्रत्येकाचे लक्ष होते. अशा दुर्घटना वारंवार का घडतात आणि त्या टाळण्यासाठी काय करायला हवे? त्याची शहानिशा करावी असे कोणाला वाटू नये, यासारखी खेदाची बाब नाही. जे कोणी मेले त्यांच्या मरणाचा आपल्याला कोणता राजकीय लाभ उठवता येईल, त्याची स्पर्धा तात्काळ सुरू झाली. माध्यमात हे आधीपासून चालू होते. आता त्याची पुनरावृत्ती सोशल माध्यमातही होऊ लागल्याची प्रचिती येऊ लागली आहे. सोशल माध्यमात सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडावे, अशी अपेक्षा होती. पण हळुहळू ती माध्यमेही आता मोठ्या प्रमाणात राजकीय विचारधारा व गटबाजीने व्यापून टाकलेली आहेत. सहाजिकच त्यात समाजनमाचे कुठले प्रतिबिंब पडण्याचे दिवस मागे पडले आहेत. काही किरकोळ अपवाद तिथेही कायम आहेत. पण तो समाजमनाचा आरसा म्हणावा, इतकी त्याची शाश्वती राहिलेली नाही. आपापल्या राजकीय वैचारिक भूमिका पुढे रेटण्याचा प्रभाव याही माध्यमात दिसू लागला आहे. तेही आता प्रसार माध्यम होत चालले आहे. त्याला सोशल वा सामाजिक माध्यम कशाला म्हणायचे, अशी शंका घेण्याची पाळी आली आहे. मुंबई पावसाने बुडणे वा तत्सम अन्य कुठल्या दुर्घटनेच्या वेळीही आपले राजकीय पवित्रे व अंगरखे बाजूला ठेवून, आपण एकमेकांशी सौहार्दाने संपर्क करणार नसू, तर आपणच आपल्यातली माणुसकी मारून टाकत आहोत, असे निश्चीत समजावे. किंबहूना आकाशात उंच घिरट्या घालणारी गिधाडे जशी कुठे मृतदेह पडलेला आहे त्याचा शोध घेत असतात, तशीच काहीशी अवस्था इथेही होत चालली आहे. जिथे असे माणसाचेच मृतदेह आढळले, तिथे तात्काळ मग लचके तोडणारी जमात झेपावू लागत असते. त्याबद्दल मनात खेद आहे, पण म्हणून वस्तुस्थिती किती नाकारायची काय?