Saturday, September 23, 2017

दिशा बदला, सत्य गवसेल

gauri lankesh के लिए चित्र परिणाम

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचे रहस्य अजून उलगडलेले नसताना, त्याच मालिकेतला ठरवला गेलेला चौथा खुन अलिकडेच झालेला आहे. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या रहात्या घरानजिक गोळ्या झाडून हत्या झाली आणि विनाविलंब त्याचे खापर हिंदूत्ववादी संघटनांच्या माथी मारण्य़ाची स्पर्धाच सुरू झाली. याला गुन्हे तपासकामाच्या भाषेत मोडस ऑपरेन्डी असेही म्हणता येईल. त्याचा अर्थ असा, की गुन्हे करणार्‍याची एक शैली असते आणि सातत्याने तसाच प्रकार घडू लागल्यावर पोलिस त्याला ‘एमओ’ म्हणू लागतात. दाभोळकरांच्या हत्येनंतर अवघ्या तासाभरात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुर येथे एक विधान केले होते. या हत्येमागे नथूराम प्रवृत्ती असल्याचे ते विधान होते. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा विनपुरावा असे काही विधान करतो, तेव्हा पोलिसांना एक संकेत दिला जात असतो. की त्यांनी नथूराम हा संदर्भ ज्यांच्याशी जोडता येईल, असेच गुन्हेगार शोधायचे आहेत आणि तसा कोणी मिळत नसेल तर खरे गुन्हेगारही शोधायचे नाहीत. किंबहूना खरेच कोणी अन्य गुन्हेगार हाती लागले, तरी त्यांच्याकडे ढुंकून बघायचे नाही, असाच मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ पोलिसांनी घ्यायचा असतो. सहाजिकच अजूनपर्यंत दाभोलकर खुनाचा तपास लागू शकलेला नाही. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी व आता गौरी लंकेश यांच्या हत्या एकाच पद्धतीने झाल्या आहेत. पण त्यांचाही कुठला रहस्यभेद होऊ शकलेला नाही. किंबहूना तो रहस्यभेद होऊच नये अशीच तयारी केलेली असावी, इतकाच निष्कर्ष त्यातून काढता येऊ शकेल. मग त्याचा थोडा वेगळ्या दिशेने तपास करणे भाग पडते. किंबहूना गुन्हेतपास ही एक कला असून, त्यात ठराविक निकषावर शोधकाम चालत असते. त्यात लाभ कुणाचा व हेतू कोणता, याला प्राधान्य असते. या चारही गुन्ह्यात त्याकडेच पाठ फ़िरवली गेलेली आहे.

गेल्या काही वर्षापासून सोनी नामक टिव्ही वाहिनीवर भारतातील खर्‍या गुन्ह्यांचा तपास चतुराईने करणार्‍या पोलिसांच्या कथा दाखवल्या जातात. क्राईम पेट्रोल नावाची ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली असून, आता तर जवळपास अर्धा दिवस त्याच मालिकेचे जुने-नवे भाग त्या वाहिनीवर प्रक्षेपित होत असतात. जे कोणी अगत्याने ही मालिका बघत व अभ्यासत असतील, त्यापैकी कोणालाही उपरोक्त चार खुन प्रकरणाचा तपास लागू शकत नाही, हे मान्य होणार नाही. कारण भारतातील अनेक जटील व गुंतागुंतीच्या हत्याकांडांचा अतिशय शिताफ़ीने पोलिस शोध घेऊ शकतात, हे त्या मालिकेच्या विविध भागातून स्पष्ट होते. ज्या काळात गौरी लंकेशची हत्या झाली, त्याच्याच आसपास या क्राईम पेट्रोल मालिकेत एक सत्यकथा दाखवण्यात आली. ती कशामुळे खुनाचे रहस्य झाले आणि त्याचा उलगडा कसा होऊ शकला, ते समजून घेतल्यास गौरी वा दाभोळकर हत्यांचा तपास कुठे भरकटला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. गुन्हे करणारी कितीही सामान्य बुद्धीची माणसे, कशी पोलिस तपासाला गुंगारा देण्याची खेळी करीत असतात, त्याचा या कथांमधून अंदाज येतो. अनेकदा त्यातले खुनी गुन्हेगारच पोलिसात पहिली तक्रार देतात. काहीजण मुद्दाम चुकीची माहिती देऊन तपासाची दिशाच भरकटून टाकतात. काही गुन्हेगार तर पोलिसांना सहकार्य करीत असल्याचा आव आणून, खर्‍या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खेळ करत असतात. असे सर्व दोष चारही खुनांच्या बाबतीत झालेले दिसतील. जितक्या तावातावाने या चार हत्याकांडांचा तमाशा करण्यात आला, किंवा आरोप प्रत्यारोपांची आतषबाजी करण्यात आली, त्याकडे बघता यातले खरे खुनी कधीही उघडकीस येऊ नयेत, याची काळजीच घेतली गेली. निदान तसा संशय घेण्य़ास भरपूर वाव आहे. म्हणूनच या एकूण चारही हत्याकांडांची नव्याने तपासणी अगत्याची ठरते.

पहिली गोष्ट म्हणजे या चारही लोकांना कोणी कशाला मारावे, त्याचे कारणच उलगडत नाही. कारण त्यांना मारल्याने तथाकथित संशयित उजव्या संघटनांचा कसलाही लाभ संभवत नाही. सनातन संस्थेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नको होता. पण दाभोळकर हत्येनंतर तोच रखडलेला कायदा चटकन संमत झाला. हा हिंदूत्ववादी संघटनांपेक्षा तथाकथित डाव्या संघटनांचा लाभ आहे. तोच कायदा झालेला असताना पानसरे यांची हत्या झाली. लागोपाठ कलबुर्गी यांची हत्या झाली. आता गौरी लंकेश यांची हत्या झाली. हा सर्व हिंदूत्ववादी गटाचा कट असेल, तर त्यांना कुठला लाभ या चौघांच्या हत्येमुळे होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. पण उलट्या बाजूने शोध घेतला, तर या चारही हत्याकांडाचा सर्वात मोठा राजकीय लाभ नामोहरम होऊन गेलेल्या पुरोगामी सेक्युलर चळवळीला उठवत आलेला आहे. त्यांच्यापाशी आज कुठलाही कार्यक्रम व संघटना उरलेली नाही. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याची संधी राहिलेली नाही, की लोकही अशा पुरोगाम्यांना विचारेनासे झालेले आहेत, सहाजिकच अशी प्रसिद्धी व गर्दी जमवण्याची संधी मात्र या पुरोगाम्यांना या हत्याकांडानंतर मिळालेली आहे. न्यायाच्या मागणीसाठी ज्या पद्धतीचे सोहळे झटपट साजरे केले जातात आणि जितका उत्साह दाखवला जातो, त्याकडे बघितल्यास हा संशय अधिकच बळावतो. प्रामुख्याने असे निमीत्त करून न्यायासाठी कोणी पाठपुरावा करीत नाहीत. तर हे हत्येचे निमीत्त करून उजव्या संघटना वा हिंदूत्ववादी संघटनांच्या नावाने शिमगा साजरा करण्याची अपुर्व संधी साधली जात असते. पण ती साजरी झाल्यानंतर कोणी खर्‍या खुन्यांना पकडण्यासाठी पाठपुरावा केला, असे चार वर्षात दिसलेले नाही. आपल्या परीने त्या गुन्ह्यांच्या तपासासाठी हातभार लावल्याचे एकाही प्रकरणात दिसून आलेले नाही. त्यासाठी कुठली आस्था दाखवलेली नाही.

थोडक्यात चारही हत्याकांडानंतरची पुरोगामी प्रतिक्रीया वा प्रतिसाद बघता, कुणाही पुरोगाम्याला या हत्यांचे दु:ख होण्यापेक्षा उत्साह आलेला मात्र दिसला आहे. त्याअर्थी हे पुरोगामीच त्यातले सर्वात मोठे लाभार्थी नाहीत काय? यातल्या कोणी किंवा अनेकांनी मिळून संगनमताने अशा घातपाती हत्याकांडाची कारस्थाने शिजवली व अंमलात आणलेली नसतील कशावरून? योगायोगाची गोष्ट म्हणजे गौरी लंकेशच्या हत्येच्या दरम्यान सोनी टिव्हीवर क्राईम पेट्रोल मालिकेत एक अशीच गुंतागुंतीची सत्यकथा दाखवण्यात आली. जबलपूर नजिकच्या भेडाघाट भागात घडलेले एक दुहेरी हत्याकांड, याच चार घटनांप्रमाणे पोलिसांना चक्रावून सोडणारे होते. कित्येक महिने पोलिस अहोरात्र खपून त्या हत्याकांडाच शोध घेत होते आणि त्यांना खुन्याच्या जवळपासही पोहोचता येत नव्हते. कारण प्रथमपासूनच पोलिसांची पद्धतशीर दिशाभूल करण्यात आलेली होती. इथे जशी चारही हत्याकांडात हिंदूत्ववादी खुनी मारेकरी असल्याची समजूत करून देण्यात आली आहे, तसाच काहीसा प्रकार त्याही कथानकात घडलेला होता. पण एका वळणावर एक गुन्हेगारच पोलिसांच्या डोळ्यात अंजन घालतो आणि पुर्वीची तपासाची दिशा सोडून पोलिस उलट्या दिशेने निघतात. चार दिवसात खर्‍या खुन्यांपर्यंत जाऊन पोहोचतात. तिथे एका गाडीतून प्रवास करणार्‍या एक बालक व त्याच्या भावजीवर प्राणघातक हल्ला झालेला असतो. त्यांना पोलिस जिवंत असताना इस्पितळात भरती करतात आणि उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला असतो. पण या दोघांना किंवा प्रामुख्याने त्यातल्या बालकाचे अपहरण गुन्हेगारांनी कशाला करावे, त्याचा अंदाजही पोलिसांना बांधता येत नाही. पण तक्रारदार सांगतील तितक्याच दिशेने पोलिस तपास भरकटलेला असतो. खुनाचा हेतूच चुकीचा गृहीत धरल्याने त्याचा उलगडा होत नसतो.

एक दरिद्री कुंटुंब! त्यातला नवरा मरतो आणि तीन मुलांना वार्‍यावर सोडून पत्नी अन्य पुरूषाबरोबर निघून जाते. उरलेल्या तीन मुलात वयात आलेली मोठी बहिण आपल्या धकट्या दोन भावंडांना काबाडकष्ट करून वाढवत असते. एका व्यापार्‍याकडे गडीकाम करणारा मित्र तिला भेटतो आणि ते लग्न करतात. दोघे मिळून उरलेल्या दोन भावंडांचे पालक होऊन त्यांचे पालनपोषण करीत असतात. अशावेळी व्यापार्‍याकडून त्यांना एक लॉटरी लागते. त्याचा पुत्र पॅरीसमध्ये स्थायिक झालेला असतो व त्याच्या परिचयातली एक श्रीमंत भारतीय महिला विनापत्य अविवाहित असते. तिला कोणा भारतीय मुलाला दत्तक घ्यायचे असते. व्यापारी ती ऑफ़र आपल्या गड्याला देतो. त्याच्यावरचा एका मुलाचा भार कमी होईल आणि त्या दत्तक जाणार्‍या मुलाचे कल्याण होईल. पुढली सर्व दत्तक कारवाई कायदेशीर पुर्तता करून उरकली जाते. त्या दत्तक मुलाचा पासपोर्टही बनवला जातो. त्याची नवी दत्तक आई गावी येऊन कुटुंबाची भेट घेते. त्यांनाही भावंडे म्हणून पाच लाख रुपये मदत देते. पुढे त्या मुलाला पॅरीसला पाठवण्यासाठी व्हीसा मिळवण्याची कसरत सुरू होते आणि त्यासाठीच गावाहून शहरात जाता येताना त्याच्यावर एका निर्जन जागी हल्ला होतो. अपहरण केले जाते आणि त्यात आडवा आला म्हणून थोरल्या बहिणीच्या नवर्‍यावरही प्राणघातक हल्ला होतो. त्यात सोबत असलेला गाडीचा ड्रायव्हर व आणखी एक तरूणही जखमी होतात. त्यांनीच धाव घेऊन तक्रार केल्याने प्रकरण पोलिसांकडे येते आणि दोन्ही जबर जखमींना पोलिस इस्पितळात उपचारासाठी दाखल करतात. त्यात त्यांचा मृत्यू होऊन जातो. यात या दरिद्री मुलाचे अपहरण वा हत्या कोणी का करावी? हे रहस्य असते आणि तेच पोलिसांना उलगडत नाही. एका दरिद्री मुलाला पळवून कोण खंडणी देणार होता? त्याच्यामुळे कोणाचा कुठला लाभ शक्य होता?

काही महिने पोलिस अनेक दिशांनी जाऊन तपासाची शर्थ करतात. त्यातला गाडीचा ड्रायव्हर व दुसरा जखमी तरूण यांनाही फ़ैलावर घेतले जाते. जबलपूर व मध्यप्रदेश इथल्या सर्व सुपारीबाज गुन्हेगार व अपहरण खंडणी गुन्ह्यात गुंतलेल्यांची वरात काढली जाते. पण कुठूनही कसला सुगावा लागत नाही. खंडणी वा मालमत्तेसाठीच हत्या वा हल्ला झाल्याची समजूत पोलिसांना कोड्यात पाडून राहिलेली असते. पण अशाच एका अट्टल गुन्हेगाराला उचलून जबानी घेतली जात असताना तो पोलिसांना थेट जागेवर आणून सोडतो. अपहरणकर्ते कधी खुन पाडत नाहीत आणि खुन करणारे कधी अपहरणाचे नाटक रंगवत नाहीत. ज्याअर्थी प्राणघातक हल्ला झाला, त्याअर्थी यात खुनाचाच हेतू असणार, असे तो मुरब्बी गुन्हेगार पोलिसांना सांगतो, तेव्हा तपास अधिकार्‍याच्या डोक्यात प्रकाश पडतो. प्रथमच या दरिद्री मुलाच्या खुनातून कोणाचा काय लाभ होऊ शकतो, या दिशेने तपास सुरू होतो. मग फ़टाफ़ट रहस्याचे धागेदोरे उलगडू लागतात. या नव्या दिशेने तपास सरकू लागल्यावर प्रथम तो व्यापारी, त्याचा पॅरीसमधला मुलगा, दयावान होऊन गरीब मुलाचा उद्धार करायला निघालेली ती अविवाहित महिला, यांचे हेतू व पार्श्वभूमी तपासली जाते. तेव्हा दत्तक प्रकरणच भोंदूगिरी असल्याचे रहस्य चव्हाट्यावर येते. ज्याच्या हत्येने फ़ारसा गाजावाजा होणार नाही, असे मुल दत्तक घ्यायचे. त्याची भारतातच हत्या करायची आणि तत्पुर्वी त्याच्या नावाने मोठा विमा उतरवून घबाड मिळवायचे; ही त्यातली कारस्थानी योजना असते. म्हणजे या दत्तकपुत्राला पॅरीसला नेण्यासाठी सर्व कारभार झालेला नसतो. तर त्याच्या नावाने तिकडे मोठा विमा काढण्यापुरती कायदेशीर कागदपत्रे बनवायला हे नाटक रंगवलेले असते. कुटुंब गरीब अडाणी असल्याने त्याचे कोणी आप्तस्वकीय दाद मागणार नाहीत, म्हणून त्याची दत्तकपुत्र म्हणून निवड झालेली असते.

मुद्दा इतकाच, की एका गरीब मुलावर दयाबुद्धीने उपकार करण्याचे नाटक रंगवणारे व त्यातले फ़िर्यादीच खुनी असतात. पॅरीसची ती महिला, तिचा परिचित इथल्या व्यापार्‍याचा मुलगा, यांनी हे कारस्थान रचलेले असते. त्यातली कागदपत्रे बनवण्याचे व बळीचा बकरा शोधण्याचे काम व्यापार्‍याने उरकलेले असते. तर व्हीसासाठी त्या मुलाला शहरात घेऊन जाणारा तरूण, हत्येच्या बदल्यात पॅरीसचा व्हीसा स्वत:ला मिळण्याच्या मोहाने त्या हत्याकांडात सहभागी झालेला असतो. बाकी गाडीचा ड्रायव्हर फ़क्त लाखभर रुपये मिळणार म्हणून साथीदार झालेला असतो. सर्वात प्रथम तो ड्रायव्हर पोलिसांच्या माराला बळी पडतो आणि मुद्दाम ठरलेल्या निर्जन जागी गाडी थांबवल्याची कबुली देतो. नंतर एकामागून एकाचे मुखवटे फ़ाटत जातात. कित्येक महिने दिशाहीन झालेला वा दिशाभूल केलेला तपास, योग्य दिशेने वळताच चुटकीसरशी त्या खुनाचा उलगडा होऊन जातो. अशा अनेक गुंतागुंतीच्या खुन प्रकरणांचा उलगडा करणारे चतूर पोलिस भारतात असल्याची साक्ष क्राईल पेट्रोल या मालिकेतून रोज दिली जात असते. त्यातल्या अनेक सत्यकथांमध्ये मुळात खुनानंतर टाहो फ़ोडून रडणारे, आक्रोश करणारेच अनेकदा मारेकरी असल्याचे दिसते. अशा भारत देशात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी वा गौरी लंकेश यांच्या हत्या रहस्य होऊन रहातात, अनुत्तरीत रहातात, हे पटणारे नाही. त्यात पोलिस व तपासकामाची मोठी दिशाभूल करण्यात आलेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे त्या बहुतांश सत्यकथांमध्ये आपुलकीने रडणारेच तपासाला भरकटून टाकत असतात, तसा संशय मग गौरीच्या हत्येनंतर चोविस तासात रंगलेल्या निषेध नाट्यातून येतो. कारण मृत्य़ूमुखी पडलेल्यांच्या प्रेमापेक्षाही, या आक्रोश करणार्‍यांचा उत्साह त्यांचा राजकीय लाभाची अधिक साक्ष देत असतो. पोलिसांनी जरा गंभीरपणे चारही खुनाच्या न्यायासाठी आक्रोश करणार्‍यांचे धागेदोरे शोधले; तर कदाचित सत्याचा पाठपुरावा लौकर होऊ शकेल.



11 comments:

  1. You are perfectly right sir, the day BJP started rising these hypes are created

    ReplyDelete
  2. उत्तम विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  3. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ . आता पुरोगामीच पुरोगाम्याला मारणार.

    ReplyDelete
  4. आताच डावे पत्रकार निखिल वागळे ने bjp वर तुटुन पडन्याच्या नादात बनारस विद्यापीठ मधील खोट ट्विट केल नंतर माफी पन मागितली नाही.नुसत तस झाल्याच कबूल केल.मग हे डावे लोक असल्या मोोठ्या बाबतीत किती खोटा प्रचार करत असतील.

    ReplyDelete
  5. भाउ हया दाभोलकर हयांचा बुरखा फाडनरा लेख तुम्ही पूर्वी लिहला होता तो परत मिळेल का वाचायला

    ReplyDelete
  6. पोलिसांनी मनात आणलं किंवा त्यांची इच्छा असली तर कितीही अवघड गुन्ह्याचा छडा लावू शकतात.त्यापैकी राजीव गांधी हत्या.आणखी एका प्रकरणाचा तपास भारतीय पोलीसांनी फार चांगल्या पद्धतीने केला होता.हँन्से क्रोनियेला असा पकडला होता की त्याल सुटायला अजिबात वाव माहिती.भारतीय पोलिसांनी त्याच्या आवाजाचा नमुना मागितला होता.पण तो काही दिला गेला नाही.नंतर तिकीट बुक केलेले विमान चुकल्यामुळे,दुसर्या कार्गोविमानातून प्रवास करताना विमान कोसळून झालेल्या अपघतात मृत्यू झाला अस सांगण्यात येत.मृत्यूमुळे त्याच्यामागचा पोलिसांचा ससेमिरा संपला.पोलिसांचे हे काम कौतुकास्पद होते.[हे प्रकरण मिटविण्यासाठी फार वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न झाले असावेत असे वाटते.आवाजाचा नुमना द्यायला द.आफ्रिकासरकारच बहूदा टाळत होत.अपघाती मृत्यूसुद्धा बनावच वाटतो.क्रोनियेने मँचफिक्सींगमुळे कलंकित झालेली प्रतिमा धुण्यसाठी भाडोत्री कंपनीला काम दिल्याची बातमी वाचल्याचे आठवते.पण त्यामुळेही प्रकरणातून सुटका होत नाही म्हटल्यावर मृत्यूचा बनाव रचण्याचा उद्योग त्या कंपनीने सुचविला असावा असे वाटते.क्रोनिये जीवंत असावा,ओळख लपवून,नाव बदलून कोठेतरी-शक्यतो इंग्लंडमध्ये- रहात असावा.त्याच्या मृत्यूनंतर त्याची प्रचंड संपत्ती त्याच्या बायकोला मिळाली असेही वाचनात आले.(क्रोनिये प्रकरण शोधपत्रकारांसाठी एक संधीच आहे.कोणीतरी प्रयत्न करावा.)]तात्पर्य- पोलिसांची(आणि राजकिय)इच्छा असेल तर गुन्ह्यांचा छडा लावता येतो.

    ReplyDelete
  7. या सर्व हत्याकांडांचा राजकीय तोटा भाजपाला होतोय आणी आता भाजपा सत्तेत ही आहे मग आपन म्हणताय त्या दिशेन तपास करण्याची सूचना हे सरकार तपास यंत्राणांना का देत नसावे ?

    ReplyDelete
  8. TV serail ani hya vyaktincha khun hya donhi goshtincha kadimatrahi sambandh lavta yenyasarkha nahi jo tumhi lavlay. tv serial mhnje fkt kalpna astat tyapalikde kahi nahi. tumhi jar saral sangitl ki tapas kra pn ajun jara kholat jaun kra tari thik hot he asa kuthlya kuthe swatala bharktvt nen kahi garjech nvt. purogamyanich purogamyana marych ast tr ti chalval kdich smpli asti kimbhuna suruvatch zali nasti. ani he lok jyanche khun zale te hindu nvte ka? ani ewdhach tv serial vr visjvas thewyla laglay tr apn swata ka nahi shodhun det tyanchya khunyana. tumhi hi madat keli khuni shodhayla tr ulat khup changl hoil na. tumchahi nav hoil.

    ReplyDelete