Sunday, September 3, 2017

हे रामरहीम कुठून निपजतात?

MSG ramrahim के लिए चित्र परिणाम

इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झालेले एक अर्थशास्त्री मेघनाद देसाई अनेकदा भारतातील वृत्तवाहिन्यांवर अभ्यासक म्हणून आमंत्रित असतात. त्यांच्याच एका पुस्तकावर एका वाहिनीने चर्चा योजलेली होती आणि त्यात कॉग्रेसचे दोन माजी केंद्रीय मंत्री प्रवक्ते सहभागी झाले होते, तसेच दोन ज्येष्ठ पत्रकारही सहभागी होते. यापैकी एक संजय बारू हे युपीएच्या पहिल्या कारकिर्दीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागारही होते. तर स्वपन दासगुप्ता हे नेहमी भाजपाच्या विरोधात आवेशात न बोलणारे पत्रकार म्हणून पक्षपाती मानले गेलेले आहेत. पण बारू वा दासगुप्ता यांनी त्या चर्चेत मांडलेले मुद्देही अन्य नेते वक्ते समजू शकले नाहीत, ही राजकारणाची खरी शोकांतिकाच आहे. मागल्या वीसतीस वर्षात देशातील वातावरण, लोक व राजकारण खुप बदलले आहे. त्यातले बदल अशा लोकांना समजू शकलेले नाहीत, असा दासगुप्ता व बारू यांचा दावा होता. पण तोही समजून घेऊन त्याचा प्रतिवाद करण्याची ज्यांना गरज वाटत नाही, त्यांच्याकडून देशातील परिस्थितीचे योग्य मूल्यमापन कसे होऊ शकणार? त्यांना मोदी बहूमत मिळवून सत्तेत आल्यावर तीन वर्षानंतरही कशाला लोकप्रिय आहेत, त्याचा थांगपत्ता करी कसा लागणार? ज्यांना राजकारणात मोदींचे यश ओळखता येत नाही, त्यांना लालू, आसाराम किंवा डेरावाला बाबा गुरमित रामरहीमच्या भक्तीचे रहस्य तरी कसे उलगडता येईल? पण दुर्दैव असे आहे, की आजही त्याच लोकांकडून प्रत्येक गोष्टी व घडामोडीची उकल चालू असते. त्यातून सामान्य माणसाला कशाचाही बोध होत नसतो की विषयाची जाण येऊ शकत नाही. एका बलात्कारी बाबा वा ढोंगी साधूच्या मागे लोक इतके भक्तीने कशाला गोळा होतात, हे त्यांच्या मानसिक पातळीवर गेल्याशिवाय कळू शकणार नाही. तर त्याचेच विश्लेषण कसे होऊ शकेल? मग त्या असंख्य लोकांना अंधश्रद्ध वा निर्बुद्ध ठरवण्याची बौद्धीक कसरत चालू रहाते.

डेरा सच्चा सौदाच्या बाबा रामरहिमवर कालपरवा बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे आणि त्याला दहा वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. हा खटला मागली १५ वर्षे चालू होता आणि त्याच काळात या इसमाने पाच चित्रपट निर्माण करून, त्यात स्वत:च नायकाच्या भूमिका केलेल्या होत्या. तो वाटेल ते मर्कटचाळे राजरोस करीत होता आणि तरीही त्याचे भक्त अजिबात विचलीत झाले नाहीत. त्याच्या विकृत चाळ्यांची जाहिर चर्चा होत राहिली, तरीही भक्तगणांच्या भावनांवर कुठलाही परिणाम होऊ शकला नाही. उलट अशा गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा होणार म्हटल्यावर हजारोच्या संख्येने हा भक्तगण कोर्टावर चाल करून गेल्यासारखा हिंसेला प्रवृत्त झाला. तर त्याची नेमकी मिमांसा होण्याची गरज आहे. पुस्तकी थाटातली व मुठभर उच्चभ्रू वर्गाच्या समाधानासाठी ती चर्चा आवश्यक नसून सामान्य करोडो लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली पाहिजे. काही वेळासाठी गुरमित बाबाची गोष्ट बाजूला ठेवा आणि बिहारच्या लालूंकडे आपण बघूयात. जेव्हा ह्या बाबाचा तमाशा चालू होता, त्याच दिवसात लालूंनी बिहारमध्ये ‘भाजपा ह्टाव देश बचाव’ अशी घोषणा करीत प्रचंड मेळावा योजला होता. त्यालाही लाखोच्या संख्येने लोकांनी हजेरी लावलेली होती. त्यात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी व शरद यादव यांच्यासह उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही हजर होते. त्यात उपस्थित होण्याचे मान्य करूनही सोनिया व राहुल पोहोचले नाहीत, तर मायावतींनी तिकडे पाठ फ़िरवली. अन्य डावे पक्षही त्यापासून दूर राहिले. यात लालू किती पावित्र्याचे पुतळे आहेत, की इतक्या मोठ्या संख्येने लोक त्यांच उदो उदो करायला हजेरी लावतात? त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला असून आता कुटुंबियांवरही आरोप चौकशा सुरू आहेत. तरीही लालूंचे इतके भक्तगण कशाला असावेत? अशी कोणती जादू लालूंनी त्या अनुयायांवर केलेली आहे?

अशी कुठलीही जादू वगैरे नसते. भारतीय समाजात पुर्वापार दोन विभाग पडलेले आहेत. त्यात एक उच्चभ्रू व जाणता छोटा वर्ग आहे, तर दुसरा अज्ञानी किंवा अप्रतिष्ठीत म्हणून कचर्‍यासारखा नाकारला गेलेला मोठा वर्ग आहे. तोही माणूस आहे आणि त्यालाही काही आकांक्षा अपेक्षा आहेत. माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी, काही किमान सन्मानाने समाजजीवनात त्याला स्थान असावे, ही त्याची अपेक्षा असल्यास गैर मानता येणार नाही. पण कधी धर्माच्या नावाने, कधी सामाजिक भेदभावाच्या रुपाने, तर कधी आर्थिक सुबत्ता हा निकष लावून अशा मोठ्या लोकसंख्येला वंचित ठेवले गेलेले आहे. अशा पायदळी तुडवण्याने त्याच्या आकांक्षा संपत नसतात. यांना नवे धुमारे फ़ुटत असतात आणि त्यांना खतपाणी घालणारा कोणी समोर आला, तर त्यांचे भरघोस पीक घेता येत असते. त्यांना चुचकारणारा कोणी पुढे येण्याच्या प्रतिक्षेत अशी लोकसंख्या बसलेली असते. सर्व दु:खदैन्य वा यातना सोसून त्या मुक्तीच्या क्षणाची हे लोक प्राणपणाने वाट बघत असतात. अर्थात इथे मुक्ती वा मोक्ष म्हणजे तुमच्याआमच्या भाषेतील सुटका किंवा प्रगती, अशा भ्रमात असण्याचे कारण नाही. त्यांची मुक्ती वा मोक्ष म्हणजे त्यांना किमान सन्मानाने वागवणारा कोणी असावा, इतकीच अपेक्षा असते. ती अपेक्षा गुरू, बाबा, प्रेषिताचे रूप घेऊन पुर्ण करायचे आश्वासन देतो किंवा तसे स्वप्न दाखवतो. तर कधी लालू वा तत्सम कोणी, जातीमहात्म्य सांगून त्यांच्यासमोर उच्चभ्रू जातीच्या वर्चस्वाला झुगारण्याचा मंत्र त्यांना देतो, तेव्हा त्यांच्या मोक्षाला आरंभ झाल्याचे समाधान त्यांना मिळून जात असते. त्यामध्ये त्यांच्या व्यक्तीगत जीवनात बदल येण्याची गरज नसते, तर नित्याच्या गरजा भागण्याबरोबर मिरवणार्‍या वर्गाला हिणवणारा कोणी हिंमतबाज, त्यांना कृत्रिम समाधान देत असतो. आपल्या यशापेक्षाही अन्य कुणाच्या अपमानात सन्मान शोधण्याला ते समाधान मानू लागतात.

आज पंजाबमधील अशा बुवा बाबांच्या भानगडी समोर येत आहेत. त्यांच्या श्रद्धा व भक्तीची चर्चा चालू आहे. पण याच देशातील अशा डझनावारी राजकीय प्रेषितांनी त्याच तळागाळातील कोट्यवधी गरीबांच्या पिडीत वंचितांच्या जीवनात कुठला बदल आजवर घडवून आणला आहे? अशा विविध समाज घटकांच्या न्यायासाठी आजवर कित्येक समाजसेवक व महापुरूष झटल्याच्या कथा लोकांना परिचित आहेत. पण असे घटक किती प्रमाणात सुखवस्तु वा प्रतिष्ठीत जीवनाचा पल्ला गाठू शकलेले आहेत? नसतील तर त्यांनी अशा महापुरूषांना देवत्व कशाला बहाल केलेले आहे? धर्माच्या नावाने चाललेली थोतांडे व राजकीय सामाजिक न्यायाच्या नावाखाली चालू असलेली पाखंडे; यात कितीसा फ़रक असतो? राहुल गांधी वा लालूंसह डावे ममता, नेहमी अशा पिडीत वंचितांच्या नावाची जपमाळ ओढत असतात. पण सत्तर वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत त्यापैकी कुठलाही समाज घटक त्या दुरावस्थेतून बाहेर काढला जाऊ शकलेला नाही. म्हणूनच तो नवनव्या प्रेषिताच्या प्रतिक्षेत बसलेला दिसतो. कधी तो लालूंच्या आहारी जाईल, कधी मोदी वा अन्य कुणा नेत्याकडून उद्धार होण्याची स्वप्ने बघतो. कधी इहवादाला तुच्छ ठरवणारा कोणी साधू महात्मा स्वर्गाचे स्वप्न दाखवून भुलवू शकत असतो. बाबा रामरहिम या दुसर्‍या वर्गातला महापुरूष असतो. एकदा त्याला महापुरूष मानले, मग त्याच्या कुठल्याही कृतीमध्ये पुण्यच दिसू लागते. शहाण्यांनी त्याला कितीही पाप ठरवणार्‍या व्याख्या पुढे केल्या, म्हणून भक्तांची नजर बदलत नाही, की भावना बदलू शकत नाही. म्हणूनच रामरहिमविषयी त्याच्या भक्तांची आंधळी भक्ती हा अंधश्रद्धेचा भाग नसून, ती आजच्या भारतातील वस्तुस्थिती आहे. एकदा त्याला देव महात्मा ठरवले, मग त्याला या जगातले वा देशातले कायदेच लागू होत नाहीत, की त्यानुसार त्याचा गुन्हाही सिद्ध होऊ शकत नसतो ना?

यातला राजकीय समाजिक विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे. एक बुवा महिलांवर बलात्कार करतो आणि अनेक पालक आपल्या वयात आलेल्या मुली त्याला उपभोग घेण्यासाठी दासी म्हणून अर्पण करतात. हे ऐकून अनेक सुशिक्षित व जाणत्या लोकांच्या अंगावर शहारे आलेले आहेत. जगातल्या तमाम उपभोग्य वस्तुंची चैन अनुभवणारा हा भौतिक सुखांचा लालची माणूस, इतक्या कोट्यवधी लोकांना भुरळ घालू शकतो कसा? आपल्याला त्याचे नवल वाटते. पण काहीसा तसाच प्रकार आसपास सातत्याने चालू असतो, त्याचे आपल्याला नवल वाटत नाही. उदाहरणार्थ काश्मिरातील हुर्रीयतच्या नेत्यांची कहाणी आहे. हे बहुतांश नेते मस्तपैकी चैन करत असतात आणि पैसे कमावून आपल्या कुटुंब आप्तस्वकीयांना चैनीचे जीवन जगण्याच्या सुविधा निर्माण करून देत असतात. त्याचवेळी समाजातील तळागाळातल्या लोकांना जिहादसाठी प्रवृत्त करून आत्मघाताला सिद्ध करत असतात. या नेत्यांची चैन व उच्चभ्रू जगणे, त्या भक्त अनुयायांपासून लपवलेले नसते. अशा पाखंडी नेते व त्यांच्या अनुयायांची मनस्थिती समजून घेण्याचा आग्रह कोण धरत असतो? आज ज्यांनी रामरहिम बाबावर चौफ़ेर हल्ला चढवलेला आहे. त्यापैकीच अनेकजण त्याच काश्मिरी घातपाती व दगडफ़ेक्यांच्या हुर्रीयत नेत्यांच्या भावनाही समजून घेण्याची भाषा बोलत असतात ना? दोन्हीकडला अनुयायी वर्ग तितकाच भारावलेला फ़सलेला आहे. पण त्याची कारणमिमांसा करताना मात्र शहाण्याचीच गफ़लत होताना दिसेल. म्हणूनच नुसता धर्म वा बुवाबाजी यापुरता हा विषय नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यात कुठल्याही स्वार्थाशिवाय सहभागी होऊन बळी जाणार्‍यांच्या मनस्थितीची मिमांसा आवश्यक आहे. कारण हा वर्ग अशा मतलबी लोकांनी पेटवलेल्या होळीतला बळी होत असतो आणि इकडल्या तिकडल्या बदमाश जाणत्यांची मात्र चंगळ होत असते.

हे अनुयायी कुठल्याही पाखंडाला बळी पडणारे असोत, तेच समाजातील बहुसंख्य असतात आणि कुठल्या तरी बाबाबुवा किंवा नेत्यांच्या आग्रहाचे बळी होत असतात. ते आपली विवेकबुद्धी वापरू शकत नाहीत, किंवा सूडबुद्धीने भारावलेले असतात. त्यांच्या जगण्याला कुठलाही हेतू नसल्याच्या विवशतेतून हे एकांगीपण त्यांच्यात मुरलेले असते. त्यांच्या जगण्याला शाश्वती व अर्थ प्राप्त करून देण्यावरच त्यांना अशा भुलभुलैयातून मुक्त करण्याचे रहस्य सामावलेले आहे. भक्ती ही देखील एकप्रकारची नशाच असते. ती घेतली मग यातना वेदना यापासून मुक्ती मिळाल्याचा आभास निर्माण होत असतो. त्याच गुंगीत पडून राहिले, मग वास्तव जगाचे भान सुटायला मदत होते. मग असे अनुयायी लालूंचे, हुर्रीयत नेत्यांचे वा रामरहिमचे असोत. त्यांना कुठल्याही चिंता सतावत नाहीत. त्यांना ती नशा किंवा भक्ती, जगण्याचा अर्थ मिळवून देत असते. ते जगणे नव्हे किंवा त्यात कुठलाही मतितार्थ नाही, हे आपल्या बुद्धीवादी भाषेत बोलणे सोपे आहे. पण त्याचे आकलन त्यांना होणे दुरापास्त आहे. म्हणूनच ज्यांना अशा पाखंडाचा राग आहे, त्यांनीही आपला पक्षपात सोडून सत्याचा पाठपुरावा करण्याची वृत्ती या बहुसंख्य लोकांमध्ये जोपासण्यासाठी पुढे आले पाहिजे. ते काम सोपे नाही. त्यासाठी आपला बुद्धीवाद सोडून त्यांच्या समिप जावे लागेल. त्यांना समजाणार्‍या भाषेत बोलावे लागेल. त्यांची बाजू समजून घेऊनच त्या बाजूविषयी प्रश्न विचारून, त्यांना उत्तरे शोधण्यास भाग पाडावे लागेल. त्यातून त्यांची विवेकबुद्धी जागृत करता येईल. पर्यायाने त्यांना सत्याला व वास्तवाला सामोरे जाण्यास भाग पाडले, तर त्यांनाही बुवाबाबा वा लफ़ंगे नेते यांच्याविषयी भ्रमनिरास होऊन, तेही विचार करू लागतील. मग आपल्यालाही अशा लोकांच्या भक्तीविषयी पडणारे अनाकलनीय प्रश्न निकालात निघू शकतील.

बाबा रामरहीम वा त्याची पाखंडे, आजच्या पुरता विषय आहे. एकदोन आठवड्यात तो मागे पडेल आणि त्याविषयी कुठेही चर्चा होणार नाही. चार वर्षे दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्याकांडावरून खुप काहूर माजले. त्याच काळात हा रामरहीम धुमाकुळ घालत सिनेमे काढत होता आणि महिलांचे लैंगिक शोषण करीत होता. पण त्याविषयी कुठे चर्चा नव्हती, की इतक्या मोठ्या प्रमाणात संतापही व्यक्त झाल्याचे कुठल्या माध्यमाने आपल्याला कधी सांगितले नाही. हा माणूस सत्तेलाही आव्हान देण्याइतकी शस्त्रसज्जता करू शकला. हिंसा माजवणारे शेकडो अनुयायी निर्माण करू शकला. आपली थोडी शक्ती व वेळ दाभोळकरांच्या गुन्हेगारांना शोधण्याचा आग्रह धरण्यामागे खर्ची घालण्यापेक्षा, असे बाबा भक्त शोधून काढण्यात खर्ची घातली असती तर? आसाराम यांच्यावर काहूर माजले असताना या रामरहिमवर कोणी आवाज उठवला असता तर? अशा घटना घडतात, तेव्हा सरसकट साधू वा धर्ममार्तंडांना गुन्हेगार ठरवण्याची शर्यत चालते. त्यापेक्षा त्यातल्या सत्प्रवृत्त बाबांनाच दुष्टवृत्तीच्या अन्य बाबांच्या विरोधात उभे करण्याची चतुराई दाखवली गेली तर? पण आपण तितके संयमी कुठे असतो? आपला शहाणपणा सिद्ध करण्यासाठी आपली सगळी बुद्धी व शक्ती सनसनाटी माजवण्यात खर्ची पडत असते. जनजागृती केल्याचे थोतांड माजवणारे बुद्धीमंत ज्या देशात सोकावलेले असतात, त्याच समाजात बुवाबाजी फ़ोफ़ावत असते. कारण हेतूशून्य पुरोगामीत्व किंवा नाकर्ता बुद्धीप्रामाण्यवाद, बुवाबाबांसाठी पोषक स्थिती निर्माण करत असतो. त्याच पाखंडाचे अनुयायी म्हणून पत्रकार व माध्यमे त्या स्थितीला खतपाणी घालून बुवाबाजीला प्रतिसाद देणारे घोळके निर्माण करीत असतात. दोघेही परस्परांना पुरक असल्याने दोघांचाही व्यापार उदीम तेजीत चालत असतो. एक बुवा संपला मग दुसरा निपजतच असतो.

11 comments:

  1. खरच विचार करण्यासारखा लेख

    अप्रतिम

    ReplyDelete
  2. Chhan lekh zanzaneet anjan ghalanaara ekun samajmanaawar

    ReplyDelete
  3. Waa mastach ekun samaajmanachya dolyat anjan ghalanaara lekh

    ReplyDelete
  4. पाखंडि लोक सोयिस्कर रित्या मुूग गिळुून बसतात.

    ReplyDelete
  5. प्रश्नांची समतोल मीमांसा!

    ReplyDelete
  6. खरोखर विचार करायला भाग पाडणारा लेख।
    धन्य वाद,

    ReplyDelete
  7. Wonderful article making brain storming vibrant thought for educated so called learned Middle class people of India

    ReplyDelete
  8. पुरोगामी भारतातील संस्कृतीला छेद देणारे हे भोंदू बुवा, ज्यांच्यावर सर्वसामान्य अंधविश्वास ठेवतात.पण सर हा ब्लॉग खरच जागृत करणारा आहे.

    ReplyDelete
  9. योगेश काळेSeptember 17, 2017 at 1:47 AM

    अतिशय सुंदर विवेचन... विचारांना चालना देणारा लेख... भाऊ, ह्या लेखाच्या माध्यमातून विचारांचा वेगळी दिशा दिलीत... धन्यवाद!

    ReplyDelete
  10. काही दिवसांपूर्वी तरुण भारत मध्ये एक लेख वाचायला मिळाला.या लेखाचे लेखक आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, या लेखातील मुद्द्यांवर चर्चा करावीशी वाटली म्हणून ही प्रतिक्रिया.

    भारतात 2 वर्ग असल्याचे या लेखात सांगितले आहे , एक जाणता छोटा ज्ञानी वर्ग तर दुसरा मोठा अज्ञानी वर्ग. ज्ञान आणि जाण कुठल्या बाबतीत हे मात्र या महाशयांनी सांगितलेले नाही. शिक्षणाचा धर्मश्रद्धेवर फारसा परिणाम होत नाही हे आत्तापर्यंत आपल्याला कळायला हवे होते. त्यामुळे हा मोठा वर्ग जो ह्यांनी म्हंटलाय तो कुठल्या बाबतीत अडाणी आहे हे समजण्यास मार्ग नाही.

    भारतात असे 2 वर्ग वैगेरे नाहीच आहेत मुळी , भारतात अनेक वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गाची स्वतःची अशी वेगळीच समजूत आहे.
    भारतात असे अनेक गरीबही आहेत ज्यांना जाण आहे , अक्कल आहे पण राजकीय वा सामाजिक शोषणामुळे त्यांचा कधी विकास झालेला नाही .
    त्यामुळे वंचितांचे जे विश्लेषण महाशयांनी केलेल आहे ते फारच प्राथमिक व बाळबोध वाटते.
    रामरहीमच्या बाबतीत फक्त वंचित किंवा फक्त राजकारणीच त्याची साथ देत नव्हते, तर भरपूर पैसे कमावलेले किंवा आर्थिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या लोकांनीही त्याची साथ दिली. त्यामुळे जेव्हा कोणा एका व्यक्तीविशेषच्या श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा फक्त वंचित वर्गाचा विचार करून चालत नाही तर एकूणच माणसाच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो.
    या लेखात महाशयांनी लालू , मोदी , काश्मीर मधले हुरीयतचे समर्थक व रामरहीम याचा अनुयायांना एकाच श्रेणीत बसवले.
    केवढं हास्यास्पद आहे हे ? वास्तविक पाहता धर्मकारण आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी असायला हव्यात लोकशाहीत, पण 2014 सालापासून भारतात दोहोंत फरक करणे कठीण होऊन बसले आहे.पण, तरीही राजकीय नेत्याचे समर्थक आणि बाबांचे सर्मथक ह्यांच्यात खुप फरक आहे. बाबांचे समर्थक बाबा सोडून कुठल्याही गोष्टीला मानायलाच तयार नाहीत आणि त्यांचासाठी देश व जग ह्या गोष्टी दुय्यम ठरतात, राजकीय नेत्यांच्या समर्थकांचे तसे नाही , ते पक्षाचे समर्थक आहेत, देशाचे समर्थक आहेत. हो, काही राजकीय समर्थकही व्यक्तिकेंद्रीत असतात पण त्यांची संख्या फार कमी. सरकारी व्यवस्थेलाच आव्हान देणारी श्रद्धा त्यांची नसते. जगण्यासाठी धर्म आवश्यक आहे असं मानणारी माणसं संयमी असतात व जे धर्मालाच जगणं मानतात त्यांची गत रामरहीम च्या समर्थकांसारखी होते.

    भाऊ तोरस्कर यांचे पुरोगाम्यांबद्दलचे विचार पूर्वग्रहदूषित वाटण्यासारखे आहेत. रहीमच्या कार्याबद्दल जाब का नाही विचारला म्हणून टीका करणारे भाऊ हे विसरतात की त्या ढोंगी बाबाला थांबवणं सरकारच काम होत. त्याला करमाफी का दिली, त्याला साम्राज्य वाढवू का दिल ह्याबद्दल भाऊ काहीच बोललेले नाहीत.
    एवढच नाही तर त्यांनी लेखात अ.नि.स. वरही टीका केली आहे, एकतर अनिस आणि पंजाब आणि हरियाणाचा काडीमात्र सबंध नाही आणि स्वतः ह्या बाबतीत पूर्वी एकही शब्द न काढलेले पत्रकार भाऊ तोरस्कर काय म्हणून अ.नि.स. वर टीका करतात?
    पत्रकार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली का?
    'दाभोळकर्यांच्या मारेकराची मागणी करणारे काय करत होते?' असा सवालही भाऊ करतात ! अहो भाऊ तुम्ही म्हणजे टनातनी प्रवक्त्यासारखे बोललात अगदी! अ.नि.स. महाराष्ट्रात चांगलं काम करत आहे , आधीही करत होत. पण सरकारनं काय केलं ते सांगा ! महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा खून होतो आणि त्याचा मारेकरी 5 वर्ष झाली तरी सापडत नाही आणि तुम्ही असले प्रश्न विचारता? सरकारला जाब विचारायचा सोडून तुम्ही पुरोगाम्यांना लक्ष करता ? तेही ह्या मुद्द्यावरून? अहो पुरोगाम्यांनी कुणाकुणाविरुद्ध लढायचं? धर्माच्या आधारे सत्ताकारण करणाऱ्यांविरुद्ध लढा चालूच आहे सतत, टनातनी आहेतच कित्येक वर्षांपासून. असल्या भोंदू बाबांचे पितळही अनेकदा उघडे पाडले आहे लोकांनी, पण जर त्यांना सत्तेवर असलेल्यांचेच पाठबळ असेल तर कोण काय करणार? इथे जबाबदारी सुरू होते पत्रकारांची , पाच वर्षे जेव्हा रामरहीम जेव्हा खुलेआम टुकार चित्रपट काढत होता तेव्हा तुम्ही काहीच का बरं बोलला नाहीत ? आता सगळ्या गोष्टी प्रकाशझोतात आल्यानंतर तुम्ही ह्या विषयावर भाष्य केलंत. तुम्ही तुमची जबाबदारी ओळखली का ?
    नाही कस आहे , सगळं चित्र समोर आल्यावर बसून टीका करणं फार सोपं आहे. ते सर्वच जण करतात पण गेल्या 15 वर्षांपासून ही केस चालु आहे, तेव्हा आपण त्याची 'मीमांसा' करून काही बोलला नाहीत. आपण सगळं झाल्यावर टीका करण्यात, तेही चुकीच्या व्यक्तीवर, धन्यता मानलीत.
    लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडे पाषाण! हे येथे संयुक्तिक ठरेल.

    तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एवढच म्हणेन. तुमचा अभ्यास ह्या क्षेत्रात माझ्याहून कित्येक पटीने जास्त पण तरीही ह्या मुद्यावर तुम्ही विचार करावा असे वाटते.

    ऋषिकेश पाटील.
    वय:20
    मीडिया विद्यार्थी, मुंबई.

    ReplyDelete