Tuesday, September 26, 2017

थप्पड खाण्याची हौस

durga immersion के लिए चित्र परिणाम

बंगालच्या तथाकथित लोकप्रिय सेक्युलर मुख्यमंत्री ममता बानर्जी यांना नेहमी कोर्टाकडून थप्पड खाण्याची आता सवय झालेली आहे. जणू कोर्टाने कान उपटले नाहीत, तर ममता दिदींना राज्याचा कारभार केल्यासारखे वाटत नसावे. अन्यथा त्यांनी तसे प्रसंग वारंवार कशाला निर्माण केले असते? काही काळापुर्वी त्यांनी रा. स्व. संघाच्या एका जाहिर कार्यक्रमाला प्रतिबंध घालण्याचा आगावूपणा केलेला होता. संघाच्या कार्यक्रमाने धार्मिक बेबनाव निर्माण होईल असे कारण दाखवून स्वयंसेवकांच्या संचालनाला सरकारी परवानगी नाकारली होती. संघाच्या आयोजकांनी कोर्टात धाव घेतली आणि दाद मागितली. तेव्हा त्यांना तशी परवानगी देण्य़ाचा आदेश कोर्टाने जारी केलेला होता. नामूष्की आल्याने ममतांना माघार घ्यावी लागली आणि तो कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला. पण तेव्हाही ममतांचा मुखवटा कोर्टाने टरटरा फ़ाडून टाकला होता. वास्तविक कुठलेही कोर्ट राजकीय पक्षांच्या वा त्यातल्या सत्ताधार्‍यांच्या राजकीय हेतूविषयी मौन पाळत असते. पण ममतांच्या बाबतीत तसे सहसा होत नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाले, मग कोर्टाला दिदींवर ताशेरे झाडायची वेळ येत असते. तेव्हाही संघाला परवानगी देताना कोर्टाने ममतांवर मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा अतिरेक होत असल्याचे ताशेरे झाडलेले होते. असे थेट नाव घेऊन लांगुलचालनाचे ताशेरे आजवर कुठल्या अन्य पुरोगामी पक्षावर होऊ शकलेले नाहीत. पण ममतांच्या वाट्याला असे फ़टकारे नित्यनेमाने येत असतात. आता तर ममतांनी ताळतंत्र सोडले असून, आपल्याच बंगाली व प्रामुख्याने हिंदू मतदारालाच लाथाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अन्यथा त्यांनी दुर्गापुजा व त्यातल्या मुर्ती विसर्जनाचा विषय अंगावर ओढवून घेतला नसता. किंवा हायकोर्टाची टिप्पणी आमंत्रित केली नसती. असे आपलेच नाक कापून घेतले नसते.

यावर्षी प्रथमच दुर्गाविसर्जन व मोहरम एकाच दिवशी आलेले आहेत. ३० तारखेला दुर्गा विसर्जनाचा मुहूर्त आहे आणि दुसर्‍या दिवशी मोहरम आहे. दोन्ही सोहळ्यांच्या मिरवणूका निघत असतात. त्यात धार्मिक वितंडवाद होऊन दंगल होऊ शकते, असे एक गृहीत आहे. त्यामुळे़च मग तशी शक्यता टाळण्याचा सरकारी खाक्या झालेला आहे. अशावेळी मग निर्बंध नेहमी हिंदू सणांवर लादले जात असतात. ते घालणारे पुरोगामी राज्यकर्ते हिंदूच असतात. यालाच कंटाळून हळुहळू हिंदूत्ववादी पक्षांक्डे लोकांचा ओढा वळलेला आहे. पण त्यातून काही धडा शिकण्याची बुद्धी पुरोगामी पक्ष व नेत्यांना झालेली नाही. जिथे मग अशा पुरोगाम्यांच्या हाती सत्ता आहे, तिथे हिंदूंची कोंडी करण्याचा अतिरेक होत असतो. ममता हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. वास्तविक त्या पक्क्या बंगाली आहेत आणि म्हणूनच त्यांना बंगालची मानसिकता नेमकी ठाऊक असायला हवी. बंगालचा हिंदू कडवा धर्मनिष्ठ नाही. पण त्याच्या प्रादेशिक अस्मिता भक्कम आहेत, कडव्या आहेत. त्यात दुर्गापूजा हा भावनात्मक प्रश्न आहे. बंगाली लोक दिवाळीपेक्षाही दुर्गापूजेला प्राधान्य देत असतात. तितका कुठलाही अन्य हिंदू सण उत्साहात व गाजावाजा करून साजरा होत नाही. अगदी कम्युनिस्ट म्हणवणारे नेतेही अत्यंत मनोभावे सहभागी होतात आणि दुर्गापूजाही साजरी करतात. म्हणूनच असा भेदभाव यापुर्वी बंगालमध्ये कधी होऊ शकला नाही. परंतु ममतांनी त्याचेही ताळतंत्र सोडले आहे. त्यांना हिंदू जनता आणि हिदूत्ववादी भाजपा व संघ यातला फ़रकच कळेनासा झाला आहे. म्हणूनच की काय, आपले मुस्लिमप्रेम सिद्ध करण्यासाठी आता दिदी बंगाली भावनाही पायदळी तुडवायला निघाल्या आहेत. आधी त्यांनी सरसंघचालक व भाजपा अध्यक्षांच्या कार्यक्रमांना जागा नाकारल्या होत्या. आता त्यांची गदा बंगाली हिंदू सण दुर्गापुजेकडे वळली होती.

मुस्लिमांविषयी आस्था असणे वेगळे आणि ते दर्शवण्यासाठी हिंदूंचा द्वेष करणे वेगळे असते. ममतांनी मागल्या दोनतीन वर्षात मुस्लिमांच्या प्रेमाचे अतिरेकी प्रदर्शन करताना बंगाली हिंदूंना दुखावण्याचा जणू सपाटा लावला आहे. त्यांचा राग संघ-भाजपावर असणे समजू शकते. पण तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी हिंदू बहुसंख्य लोकांना दुखावणे, म्हणजे आपल्याच बंगाली जनतेला लाथाडणे आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार किती ठामपणे ममतांच्या पक्षाला मत देईल हे नक्की नाही. पण बंगाली हिंदू मात्र त्यांच्यापासून दुरावत चालला आहे. विविध लहानमोठ्या निवडणूका व अन्य कार्यक्रमातून भाजपाला मिळणार्‍या प्रतिसादातून, त्याची प्रचिती येत असते. ममतांच्या असल्या थिल्लर पुरोगामीपणाने बंगालमध्ये भाजपा व संघाला आपले बस्तान बसवणे खुप सोपे होऊन गेले आहे. तर दुसरीकडे धर्मांध मुस्लिम नेते खुप बेताल होऊन धुमाकुळ घालू लागले आहेत. अनेक जिल्हे व तालुक्यात मुस्लिमांनी दंगली माजवल्या असून, ममतांची पाठराखण मिळत असल्यानेच अशा धर्मांधांना चेव चढला आहे. त्याची दखल कॉग्रेस वा डावे पक्ष घेत नसल्याने, मग पिडल्या जाणार्‍या हिंदू लोकसंख्येला भाजपा आपला आश्रयदाता वाटल्यास नवल नाही. आता तर त्याची प्रतिक्रीया न्यायालयातही उमटू लागली आहे. बंगालमध्ये भाजपा व संघामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल, असा ममतांचा दावा आहे. पण हायकोर्टानेच त्यांचे कान उपटताना दोन धर्मियात तेढ लावून देऊ नका, असे खडेबोल ऐकवले आहेत. पण अशा रितीने ममता जणू आपलाच मतदार हाकलून लावत आहेत, इतकाच याचा अर्थ होऊ शकतो. हे त्यांच्या लक्षात येत नसेल असे नाही. पण द्वेषाने माणसे प्रवृत्त झाली, मग त्यांना आत्मघात वा त्यातला मुर्खपणा लक्षात येत नसतो. ममतांसह अनेक मोदी विरोधकांची तीच दुर्दशा होऊन गेलेली आहे.

एक गोष्ट सत्य आहे. सात वर्षापुर्वी ममतांनी बंगालची सत्ता मिळवली, तेव्हा त्यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळालेली होती. याचा अर्थ स्वच्छ आहे. ममतांना त्याच मतांनी सत्तेपर्यंत पोहोचवलेले आहे. हिंदूमतांची विभागणी होते. त्यात ज्या गटापाशी पुरेशी हिंदू मते असतात. त्यात मुस्लिम मतांचा गठ्ठा पडला मग तोच गट सत्तेपर्यंत पोहोचतो. ममतांना त्याच आकड्यांनी पछाडलेले असावे. अन्यथा त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन इतक्या टोकाला जाऊन केले नसते. पण त्या एक गोष्ट साफ़ विसरून गेलेल्या आहेत, की हिंदूमतांचा जो हिस्सा त्यांच्याकडे येतो, तोच घटला तर सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन जाईल. किंबहूना त्याच कारणामुळे डावी आघाडी सत्ता गमावून बसलेली आहे. जोवर मुस्लिमांची एकगठ्ठा मते डाव्यांच्या पाठीशी ठामपणे होती, तोपर्यंत डाव्यांची सत्ता अबाधित होती. ममतांनी प्रथम डाव्यांची हिंदूमते फ़ोडली. त्याच्याही आधी कॉग्रेसच्या मतांचा काही हिस्सा ममतांनी मिळवलेला होता. मात्र अलिकडल्या काळात डावी आघाडी व कॉग्रेसची हिंदूमते भाजपा बळकावत चालला आहे. लोकसभा मतदानानंतरच्या काळात भाजपाची बंगलमधील मते सातत्याने वाढत आहेत आणि त्याच्या परिणामी डावे व कॉग्रेस त्यांची मते मात्र गमावत चालले आहेत. अशा स्थितीत मुस्लिमांचे अति लांगुलचालन करताना ममतांनी हिंदू मतांचा आपल्याकडला हिस्सा गमावणारे राजकारण करणे, हा आत्महत्येचा प्रयास म्हणावा लागेल. ज्याप्रकारे ममता हे उद्योग करीत आहेत, त्यातून भाजपाला विरोध करताना हिंदूमते त्यांच्यापासून दुरावत आहेत. तसेच होत राहिले तर मग नुसत्या मुस्लिम मतांवर ममतांना सत्ता मिळवणे शक्य नाहीच. पण असलेली सत्ताही टिकवणेही शक्य होणार नाही. ते समजण्यासाठी संघ व भाजपा म्हणजे हिंदूमते नाहीत, हे ममतांनी लक्षात घेतले पाहिजे.

उत्तरप्रदेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भाजपा वगळता त्या मोठ्या राज्यात अन्य कोणीही हिंदू मतांना किंमत देत नव्हता. सहाजिकच अशा समाज घटकात भाजपा पुढे जात राहिला. परिणामी मुस्लिम मते भाजपाला मिळत नसली, तरी तो पक्ष उत्तरप्रदेशात उर्वरीत सर्व पक्षांना धुळ चारू शकला. बंगालमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के इतकीच आहे. म्हणजेच तिथे ६०-६५ टक्के हिंदू मते आहेत. त्याचा जितका हिस्सा भाजपाच्या वाट्याला येईल तितका तो पक्ष शिरजोर होत जाणार आहे. किंबहूना मागल्या तीनचार वर्षात भाजपाचे बंगालमधील बळ वाढते आहेत. भाजपाच्या या वाढीचे खरे श्रेय ममतांच्या आक्रस्ताळ्या राजकारणाला देणे भाग आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी केलेले संघटनात्मक प्रयास उपयुक्त ठरले असतील. पण त्यामागची खरी चालना ममतांची आहे. ममता अतिरेकी मुस्लिम लांगुलचालन करताना हिंदूंना सातत्याने दुखावत चालल्या आहेत. आताही दुर्गापुजा विसर्जनावर गदा आणुन त्यांनी तेच पाप केले होते. कोलकात्यामध्ये मोहरम करणार्‍या दोनच मिरवणूका निघणार असल्याची सरकारने कोर्टात माहिती दिली. म्हणजेच इतक्या मोठ्या महानगरात फ़क्त दोन मुस्लिम मिरवणूकांसाठी हिंदूंवर बंदी घालणे, हा निव्वळ अत्याचार झालेला आहे. किंबहूना तीच मिरवणूकांची संख्या सरकारला विचारूनच कोर्टाने ममता सरकारवर ताशेरे झाडले आहेत. पण त्यातून ममता कुठलाही धडा शिकण्याची शक्यता नाही. त्यामुळे बंगालला तृणमूलमुक्त करण्याची त्यांची कामगिरी पुढला काही काळ चालूच राहिल. २०१९ साली त्याचे परिणाम लोकसभा मतदानावर होतील, तेव्हाच त्यांना जाग येईल. मात्र त्यानंतर राजकारण सावरून बंगालची आपली सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्यापाशी पुरेशी सवड उरलेली नसेल. कारण अवघ्या वर्षभरात त्यांना बंगालची विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.

5 comments:

  1. Uttam Vivechan of the present situation in the West Bengal.

    ReplyDelete
  2. Bjp increased vote shares


    But is it possible to get chance to form government in Bengal

    ReplyDelete
  3. mamata is muslim by religion. only name is hindu to fool the foolish hindus.there are plenty of such leaders in india but our media is sold out to them so majority of hindus are unaware of this.

    ReplyDelete
  4. योगेश काळेSeptember 27, 2017 at 6:04 AM

    मुस्लिम धर्मांधता आणि त्या नावाखाली होणारा दहशतवाद हा या देशातच नाही तर जगाला लागलेला महारोग आहे. यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.
    सुशिक्षित मुस्लिम समाज पण ह्या धर्मांधतेला त्रस्त आहे. त्यामुळे यांनी पण आता रस्त्यावर उतरने गरजेचे आहे... दहशदवादाची व्याख्या करा हा मोदींचा आग्रह पुढे घेऊन जाणे आत्यावश्यक आहे...

    बाकी ममताज चा बंदोबस्त लवकरच होईल...

    ReplyDelete