रविवारच्या मंत्रीमंडळ विस्ताराविषयी खुप लिहीले व बोलले गेले आहे. पण त्यातल्या नव्या किंवा पुर्णपणे वेगळ्या गोष्टी समोर आणायचा कोणी प्रयत्न केलेला नाही. या घटनेचा आरंभ विविध केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यातून झालेला होता. त्यांनीच आपल्या पद्धतीने प्रत्येक मंत्र्याच्या कामाची मोजदाद घेतली आणि अन्य कोणाला सत्तेत सहभागी करून घ्यायचे वा वगळायचे, त्याचा काही आडाखा तयार केला. त्यांनी आपला अहवाल पंतप्रधानांच्या समोर मांडला आणि नंतर नरेंद्र मोदी यांनी फ़ेरबदलाची प्रक्रीया सुरू केली. पण या घडामोडी चालू असताना कुठल्याही अभ्यासकाला त्याचे आकलन होऊ शकले नाही. आजवरच्या राजकीय घडामोडीचा अंदाज घेऊन सर्वच सहकारी पक्षांचाही समावेश म्हणून गृहीत धरला गेला. शत-प्रतिशत भाजपाची भूमिका घेऊन नेतॄत्व करणार्या अमित शहांना भाजपाचा विस्तार करायचा आहे. म्हणूनच त्यांच्या राजकारणात भाजपालाच प्राधान्य आहे. गरजेनुसार अन्य प्रादेशिक वा इतर पक्षांची मदत घेण्याच्या मर्यादा त्यांनी स्वत:वर घालून घेतल्या आहेत. सहाजिकच हक्काचे बहूमत असताना त्यांनी काय करायचे ते ठरवले. अन्य पक्षांना विश्वासात घेण्याची गरज मानली नाही. शहा असाच विचार करतात, हे अभ्यासकांना उमजलेले नाही, की काही सहकारी पक्षांना समजलेले नाही. म्हणून कोणी सहकारी पक्ष एनडीए मेली असा गळा काढत बसला आहे. अजूनही त्यांना अमित शहांचे डावपेच जाणून घेण्याची इच्छाही होत नाही. हे त्यांचे दुर्दैव आहे. पण दिल्लीच्या राजकारणात येऊन पक्षाध्यक्ष झालेल्या अमित शहांनी, दिल्लीत व पक्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. याआधीच्या भाजपा अध्यक्षांनी संघटनेवर इतकी व्यक्तीगत छाप कधी पाडली नव्हती. या विस्तार फ़ेरबदलाने शहांचे पक्षावरील प्रभूत्व सिद्ध केले, ही बाब म्हणूनच महत्वाची आहे.
वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपाचे संपुर्ण बहूमत नव्हते आणि अन्य पक्षांची मर्जी राखून त्यांना काम चालवावे लागत होते. खेरीज लालकृष्ण अडवाणी सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे पक्ष संघटना पुर्णत: पोरकी झालेली होती. कोणालाही नाममात्र अध्यक्षपदी बसवून सत्तेतले नेतेच पक्ष चालवित होते. पण मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि अमित शहा पक्षाध्यक्ष झाल्यापासून ते चित्र पुर्णपणे बदललेले आहे. शहा पुर्णवेळ पक्ष संघटनेला वाहून घेतल्यासारखे काम करत असतात आणि जिथे गरज असेल, तितक्यापुरती मोदींची मदत घेतात. मित्रपक्ष वा आघाड्या जमवताना शहांनी विषय सहसा पंतप्रधानांपर्यंत जाऊ दिलेला नाही. वेळोवेळी पक्षाचे राज्यातील वा केंद्रातील मंत्री नेते, यांची झाडाझडती घेण्याची कामगिरी शहा स्वत: पार पाडत असतात. त्यातून सत्तेवर पक्षाचे प्रभूत्व त्यांनी सिद्ध केलेले आहे. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन पक्षाची संघटनात्मक शक्ती विस्तारीत करण्यासाठी शहा अखंड राबत असतात. त्यात सहाय्यभूत होऊ शकतील असे सहकारी त्यांनी निवडलेले आहेत. त्या प्रत्येकाला तितके अधिकार दिलेले आहेत. म्हणूनच राज्य असो वा केंद्रातील सत्ता असो, त्यातले फ़ेरबदल करताना पक्षाच्या भूमिकेला महत्व आलेले आहे. अन्यथा वाजपेयींच्या कारकिर्दीत पक्षाला फ़ारशी किंमत नव्हती. बंगारू लक्ष्मण वा जना कृष्णमुर्ती असे अध्यक्ष कुठलाही ठसा राजकारणात उठवू शकले नव्हते. व्यंकय्या नायडूही पक्षाध्यक्ष होते. पण त्यांनी संघटनेवर मांड ठोकून कधी काहीही सिद्ध केलेले दिसले नाही. अमित शहांनी पक्षाध्यक्ष झाल्यापासून सत्ता पक्षाची आहे, म्हणूनच सत्तेवरही पक्षाचा वरचष्मा प्रस्थापित करून दाखवला आहे. त्याचे उदाहरण म्हणून रविवारच्या मंत्रीमंडळ फ़ेरफ़ाराकडे बघता येईल. शहांच्या इतका देशाचा कानाकोपरा फ़िरणारा अन्य कुठल्या पक्षाचा प्रमुख आज अन्य दिसतो काय?
म्हणूनच अमित शहा हे राजकारणातील पात्र अन्य पक्ष व नेत्यांनी जरा बारकाईने अभ्यासण्याची गरज आहे. कालचा ‘तडीपार’ वा तत्सम शेलकी विशेषणे शहांना लावून त्यांच्या डावपेचांवर मात करता येणार नाही. मोदींनी आपला विश्वासू सहकारी म्हणून तीन वर्षापुर्वी शहांना कायमचे दिल्लीत आणले. त्यांच्यावर पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी भाजपाला मिळवून दिलेले यश लक्षणिय आहे. महाराष्ट्र व हरयाणात लोकसभेतली युती मोडुन सत्ता संपादन करणे असो, अथवा उत्तरप्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात तीन वर्षांनी पुन्हा दैदिप्यमान यश मिळवून दाखवणे असो, त्याचे श्रेय मोदींच्या लोकप्रियतेला दिले जाते. पण व्यवहारात त्या लोकप्रियतेचे फ़लस्वरूप उभे करण्याचे श्रेय कोणी कधी शहांना दिलेले नाही. माध्यमातील अभ्यासक वा जाणकारांनीही त्यातली शहांची किमया शोधण्याचा प्रयत्नही केलेला नाही. किंबहूना त्यामुळेच राजकारणातले आडाखे चुकत गेलेले आहेत. सत्ता व राजकारण संभाळणार्या मोदींना अतिशय मोलाची अशी संघटनात्मक मदत देणारा अत्यंत विश्वासू सहकारी, अशी ही भूमिका आहे. ती पार पाडताना शहांनी इतका पल्ला गाठला आहे, की पक्ष पातळीवर जे काही व्हायला हवे त्याकडे मोदींना ढुंकूनही बघावे लागलेले नाही. त्यातून भाजपा आज निवडणूका जिंकणारी एक यंत्रणा बनून गेला आहे. सहा महिने वर्षभर आधी कामाला लागायचे आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत युद्धसज्ज फ़ौज मैदानात आणायची; अशी स्थिती अमित शहांनी निर्माण करून ठेवलेली आहे. त्यांच्यासमोर लढायला उभे रहायचे तरी अफ़ाट संघटनात्मक शक्ती आवश्यक आहे. मिरवणारे चेहरे आणि झुंजणारे नेते अशी विभागणी करून, शहांनी ही यंत्रणा उभी केलेली आहे. म्हणूनच निवडणूका जिंकण्याची चिंताच मोदींना करावी लागत नाही. हा मागल्या साडेतीन वर्षातला सर्वात मोठा मूलभूत बदल भारतीय राजकारणात झाला आहे.
केजरीवाल, ममता बानर्जी, लालू वा अन्य कोणीही नेते घेतल्यास त्यांच्यापाशी अशा विश्वासू सहकार्याचा अभाव दिसेल. त्यांना नेतृत्व करावे लागते, सभा गाजवाव्या लागतात. त्यांनीच पदाधिकारी नेमायचे आहेत आणि सहकारीही निवडायचे आहेत. त्यांच्याविषयी खातरजमाही करून घ्यायची आहे. मोदींना त्यापासून पुर्णपणे मोकळीक मिळालेली आहे. हे केवळ अमित शहांमुळे शक्य झालेले आहे. आपल्या कामात पंतप्रधान नरेंद्र मोदी जितके व्यग्र असतात, तितकेच पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहाही अखंड धावपळ करताना दिसतील. अन्य किती व कुठल्या पक्षाचे प्रमुख इतकी धावपळ करताना आपल्याला दिसतात काय? सत्ताधारी वा देशातील प्रमुख पक्षाचा व्याप किती मोठ्या कामाचा असतो वा असू शकतो, त्याची प्रचिती शहांनी आपल्या कामातून घडवून आणलेली आहे. यापुर्वीचे भाजपाचे अध्यक्ष इतके कष्ट उपसताना आपण कधी बघितले आहेत काय? अन्य कुठल्याही पक्षाचे नेते पदाधिकारी असे राबताना आपल्याला दिसलेले नाहीत. किंबहूना सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष म्हणजे निव्वळ शोभेचे पद मानले गेलेले होते. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्षही दुर्लक्षणिय वस्तुच राहिलेला आहे. पण शहांनी भाजपाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या पदाचे महात्म्य किती मोठे असू शकते, याचा साक्षात्कार घडवला आहे. राहुल गांधी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि सोनिया आजारी असल्याने पक्षाचे निर्णय राहुलच करीत असतात. शहांच्या तुलनेत राहुल किती राबताना दिसले आहेत? गुलाम नबी आझाद वा अन्य कोणी कॉग्रेस नेता, डाव्या पक्षाचा नेता पक्ष संघटनेवर इतके प्रभूत्व मिळवून त्या यंत्रणेला राबवताना आपण बघितला आहे काय? मंत्रीमंडळ फ़ेरबदलात शहांची म्हणूनच महत्वपुर्ण भूमिका ठरली. ते पदमहात्म्य त्यांनीच आपल्या कामातून निर्माण केलेले आहे. म्हणूनच या माणसाच्या कार्यशैलीचा अन्य पक्ष व नेत्यांनी बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे.
Great bhau. Kharach kahi milvayache asel tar dur drustikon na havach asato. Aani drudh nischay hava asato
ReplyDeleteखर आहे भाऊ.. अमित शहा त्यांच्या प्रत्येक कृतीतून संघात प्राप्त केलेली शिस्त संयम चिकाटी धोरणीपणा व स्व राष्ट्रनिष्ठा दाखवितात
ReplyDeleteक्रिकेटमध्ये वकार युनूस आणि वसीम अक्रम ही दुक्कल जोडीनं पारध करण्यात माहीर होती. आज मोदी आणि शहा हे तीच भूमिका पार पाडत आहेत.
ReplyDeleteबरोबर आहे भाऊ,
ReplyDeleteअमीत शहा मोदिंसाठि कष्ट घेतायेत कारण,
त्या दोघांना "नवीन भारत" बनवायचा आहे,
बाकि पक्षाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना फक्त "सत्तेत" यायचं आहे
परवाच आजतक वर योगेंद्र यादव वैगेरे लोक सांगत होते की मोदी सरकार जायला केवळ एक घोटाळा पुरेसा आहे इतकी वाइट स्तिथी आहे.2004 चे उदा देत होते पन शहांचे नाव कोनीच घेत नव्हता आश्चर्य वाटले.जो मानुस इतर पक्षांची मत टक्के कायम असताना केवळ आपले टक्के वाढवुन जिंकतो.त्याला कोन हरवील
ReplyDelete
ReplyDeleteछान भाऊ…!!!
By http://www.webkatta.com