Wednesday, September 27, 2017

एक जागतिक सत्य

 refugees के लिए चित्र परिणाम

कुठलाही अतिरेक वाईटच असतो. कारण अतिरेक असह्य होत जातो, तेव्हा त्यावर प्रतिक्रीया उमटणे अपरिहार्य होऊन जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर जी उदारमतवादाची चलती जगभर झाली, त्याने उजव्या मानल्या गेलेल्या विचारसरणीला मागे टाकत मोठी मुसंडी जगभर मारली. काळ बदलतो आणि विकासाच्या गतीमुळे समाजाच्या सवयी व विचारही बदलत असतात. नव्या अनुभवातून उदयास येणारी नवी पिढी, जुन्या गोष्टी झिडकारत असते. सहाजिकच कालपर्यंत नवी मानली गेलेली विचारधारा वा क्रांतीकारी विचारसरणी आज कालबाह्य होत असते. त्याचे भान राखून समाजातील म्होरक्यांनी वा विचारवंतांनी त्यात आवश्यक ते बदल करणे भाग असते. अन्यथा ती विचारसरणीच निरूपयोगी बनत जाते. पण विरोधाभास असा असतो, की त्या कालबाह्य झालेल्या क्रांतीकारी विचारसरणीचे समाजाच्या सत्तास्थानावर किंवा वैचारीक नेतृत्वावर अजून वर्चस्व असते. त्याच्या मदतीने अशी कालबाह्य विचारसरणी इतरांवर आपली मते लादण्याचा अतिरेक करू लागते. त्यातून काही कलह व संघर्ष उभे रहातात आणि पर्यायाने त्यात कालबाह्य विचारसरणीला नेस्तनाबूत व्हावे लागत असते. ही प्रक्रीया काहीशी संथगतीने होत असते. कारण जुनी विचारधारा कालबाह्य होत असली, तरी पर्यायी विचारसरणी आकाराला येत असते, तिच्यात परिपुर्णता आलेली नसते. सहाजिकच जुन्यानव्याचा हा संघर्ष अधिकच तीव्र होत जातो आणि टोकाच्या भूमिका पुढे येत जातात. जगभरच्या उदारमतवाद व डाव्यांची आज तीच तारांबळ उडालेली आहे. त्यांना नव्या युगाशी जुळवून घेता आलेले नाही वा जुन्या विचारांना नवा आकार देऊन त्याची उपयुक्तता टिकवता आलेली नाही. सहाजिकच त्यांना झुगारणार्‍यांशी शक्ती क्रमाक्रमाने वाढत चाललेली आहे. भारतात ते अलिकडेच घडले आणि आता युरोपात त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. मर्केल मॅडमचा जर्मनीतील निसटता विजय त्याची चाहुल आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभाला राष्ट्रवाद वा वंशवाद खुप उफ़ाळला होता. त्याची कालबाह्यता त्या शतकाच्या मध्यास समोर येत गेली आणि ते सत्य नाकारण्यातून उजव्या किंवा कट्टर राष्ट्रवादी भूमिकेने संघर्षाचा पवित्रा घेतला. त्यात त्या भूमिकेचा पराभव अपरिहार्य होता. पण नंतरच्या काळात जी उदारमतवादी भूमिका फ़ोफ़ावत गेली, तिनेही आपल्या संकल्पनांचा अतिरेक सुरू केला. समाजवाद व उदारमतवाद या चांगल्या कल्पना आहेत. पण त्याखेरीज अन्य काही विचार असू शकत नाहीत वा आपल्यात किंचीतही बदल होऊ शकत नाही, हा आग्रह चुकीचा आहे. काळाबरोबर समाज बदलतो, तर विचारांनाही नवनवे धुमारे फ़ुटणे भाग असते. त्यांना संधी देऊनच तो विचार टिकवणे शक्य असते. पण तेच झुगारणार्‍या समाजवादी डाव्या विचारांचा प्रथम निकाल लागला आणि आता दोन दशकांनंतर उदारमतवादावर तीच वेळ येताना दिसते आहे. ज्या युरोपने उदारमतवादाला खतपाणी घातले व नव्या युगाचा पाया घातला, तिथेच आता त्या उदारवादाची कबर खोदली जात आहे. मानवी हक्क किंवा सहिष्णूता ह्या चांगल्या कल्पना आहेत. पण एकदोन नेते वा त्यांच्या पक्षालाच त्याची किंमत मोजावी लागत नसते. ज्या देश वा समाजाने तशा कल्पना स्विकारलेल्या असतात, त्यालाही त्यासंबंधी निर्णयाचे परिणाम भोगावे लागत असतात. जगाला हे शहाणपण शिकवणे वेगळे होते आणि तोपर्यंत युरोपिय शहाण्यांचा उदारवाद व संहिष्णूता चालून गेली. पण मध्यंतरी जिहाद नावाचे नवे भूत उभे राहिले आणि त्याचा विचारही ज्या संकल्पनेत झालेला नव्हता, ती सकल्पना वा त्यावर चालणार्‍या शासन व्यवस्था गडबडू लागल्या. आज युरोपला त्याच समस्येने भेडसावलेले आहे. मग त्यामुळे विचलीत झालेला तिथला समाज सगळा दोष उदारवादाच्या माथी फ़ोडू लागला तर नवल नाही. त्याला उजव्या अतिरेक्यांपेक्षाही अतिरेकी डावे व उदारवादी कारणीभूत आहेत.

गेल्या एका दशकात मध्यपूर्वेत वा प्रामुख्याने इस्लामी देशात धार्मिक घुसळण सुरू झालेली आहे. तिथे कट्टर धर्मवादी विचारांनी डोके वर काढलेले आहे. त्याचा युरोप वा अन्य जगावर परिणाम होण्याचे काही कारण नव्हते. पण तिथल्या सत्तांना सतावणार्‍या लोकांना मानवाधिकाराच्या बुरख्याखाली आश्रय देणार्‍या युरोपिय देशात मुस्लिम निर्वासित वा तिथले अतिरेकी आश्रय घेत गेले. त्यां अतिरेक्यांना आश्रय देणारा युरोपियन कायदा वा व्यवस्था मान्य असली, तरी त्यातला उदारमतवाद अजिबात मान्य नव्हता. सहाजिकच अशा आश्रीत मुस्लिम अतिरेक्यांनी आपले चावायचे दात युरोपियन समाजाला दाखवायला आरंभ केला. तेव्हा त्यांना कायद्यातील पळवाटा वापरून धर्मांधता करण्यापासून रोखण्याची पहिली जबाबदारी युरोपातील उदारमतवादी पक्ष व नेत्यांची होती. मुळच्या ख्रिश्चन लोकसंख्येला आपल्या धर्मापासून बाजूला करण्यात यशस्वी झालेल्या या देशात, मग निरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिम धर्मांधतेचे चोचले सुरू झाले आणि सुप्तावस्थेतील वंशवाद व ख्रिश्चन धर्माचा कडवेपणा डोके वर काढू लागला. आज अवघ्या युरोपला त्याच समस्येने भेडसावलेले आहे. त्यातून मग जुन्या कडव्या विचारसरणीचे नेते व पक्ष उदयास येऊ लागले आहेत. त्यांना जनतेचा प्रतिसादही मिळू लागला आहे. जर्मनीत ताज्या निकालांनी तेच दाखवून दिलेले आहे. प्रथमच तिथे कट्टर वंशवादी प्रवृत्ती मोठे यश मिळवून गेल्या आहेत. अंजेलो मर्केल यांची सत्ता टिकलेली असली तरी त्यांचा पाठींबा कमी झाला असून, कडव्या राष्ट्रवादी पक्षाशी त्यांना तडजोड करावी लागणार आहे. त्याचे श्रेय इतकी वर्षे नगण्य असलेल्या उजव्या पक्षांना देता येणार नाही. आज त्यांना यश मिळाले त्याचे श्रेय डाव्या उदारमतवादी अतिरेकाची प्रतिक्रीया आहे. आपल्याच देशात परागंदा निर्वासित व्हायचे काय, ह्या प्रश्नाला मिळालेले ते उत्तर आहे.

काश्मिरातील आपले वडिलार्जित घरदार सोडून तीन दशके काश्मिरी पंडित हिंदू स्वदेशातच परागंदा झालेले आहेत. पण त्याच काश्मिरात म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांना वसवण्याचा अट्टाहास भारतात कोण करीत आहेत? इथले सगळे डावे उदारमतवादी त्यात पुढे दिसतील. तेच मागल्या काही वर्षात युरोपभर झालेले आहे आणि तिथे अनेक देशात आता कडव्या वंशवादाने उचल खाल्ली आहे. त्यातही नव्या पिढीतले मतदार मोठ्या संख्येने अशा कडव्या वंशवादाकडे आकर्षित होत आहेत. याचा अर्थ त्यांना जुनेपुराणे विचार आवडले असा नसून, आपले अस्तित्व व ओळख टिकवण्याची उपजत मानवीवृत्ती त्यांना तिकडे ओढते आहे. अन्य देशातून तिथे वास्तव्य करायला गेलेले मुस्लिम निर्वासित आपल्या धर्म व ओळखीला जपत असताना, मूळच्या रहिवाश्यांना मात्र अंग चोरून जगण्याची पाळी आल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. मात्र त्याला जगातले जिहादी वा निर्वासितातले मुस्लिम जबाबदार नसून, आपलीच ओळख पुसण्याला उदारमतवाद ठरवण्याचा मुर्खपणा करणारे डावेच अशा स्थितीला कारणीभूत झालेले आहेत. त्यांनी निर्वासित वा आश्रित म्हणून आलेल्या मुस्लिमांना अतिरेक करू दिला नसता आणि मुळच्या लोकसंख्येन समानतेने सामावून जाण्यास भाग पाडले असते, तर मुळनिवासी निरपेक्ष समाजाला आपल्या ओळखीची जपणूक करण्याची गरज वाटली नसती. म्यानमारचे बुद्ध, भारतात हिंदू वा युरोपातले ख्रिश्चन गौरवर्णिय यांना उजवे म्हणून हिणवणे सोपे आहे. पण ते समस्येवरचे उत्तर नसून तीच समस्या आहे. एकीकडे आपल्या नागरिकांना धर्मनिरपेक्ष वागण्याची सक्ती करायची आणि आश्रित उपर्‍यांना मात्र धर्मांधतेसाठी मोकाट रान द्यायचे, यातून ही प्रतिक्रीया जगभर उफ़ाळून येत आहे. त्यात मागास म्यानमार वा प्रगत जर्मनी असा फ़रक पडताना दिसत नाही.

5 comments:

  1. योगेश काळेSeptember 29, 2017 at 10:09 AM

    अश्या जगभरात होणारया खिलाफत चळवळी वेळीच ठेचून कढल्या पाहिजेत.म्हणजे रोहिंग्यांसारखी विषवल्ली मुळ धरणार नाही. जय हिद!

    ReplyDelete