Friday, June 14, 2019

फ़िदायीन विश्लेषक आवरा

Image result for indian TV debates

कॉग्रेस पक्षाने म्हणजे त्यांच्या माध्यम प्रसिद्धी शाखेचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी तमाम पक्ष प्रवक्त्यांना कुठल्याही चॅनेलवर जायला किंवा पक्षाची बाजू मांडायला लोकसभा निकालानंतर प्रतिबंध घातला आहे. अर्थात तसे असले तरी विविध वृत्तवाहिन्यांच्या चर्चा कायम चालू आहेत आणि तितक्याच आवेशात कॉग्रेसमधल्या खुळेपणाचे जोरदार समर्थन चालूच आहे. त्यातून कॉग्रेस पक्ष जनमानसात अधिकच हास्यास्पद करण्याचे काम अविरत चालू आहे. तुम्ही कुठल्याही इंग्रजी वा हिंदी वाहिन्यांवरच्या राजकीय चर्चा ऐकल्यात, तर त्यात गेली कित्येक वर्षे कोणी अधिकृत कॉग्रेस प्रवक्ता नसतो. पण काही पत्रकार किंवा राजकीय अभ्यासक विश्लेषक म्हणून पेश केलेले लोकच, कॉग्रेसचे समर्थक म्हणून बाजू लढवित असतात. तो नुसता खुळेपणा नसतो तर अनेकदा तर्कहीन व पक्षासाठी हानिकारक व कास्यास्पद असतो. त्याची किंमत अशा विश्लेषक अभ्यासकांना मोजावी लागत नसते. उदाहरणार्थ ‘चौकीदार चोर है’ असे आवेशात बोलणारे विश्लेषक आपण मागल्या तीनचार महिन्यार खुप बघितले. त्यामुळे मोदी वा भाजपाचे कुठलेही नुकसान झाले नाही. पण निवडणूकीत कॉग्रेसला मात्र ५२ जागांच्या पलिकडे झेप घेता आली नाही. ह्या अनधिकृत प्रवक्ते वा समर्थकांचा बंदोबस्त कॉग्रेसने केला नाही, तर तो पक्षा अधिकच गाळात जाणार आहे. आजच्या कॉग्रेस पक्षाचे नेमके वर्णन करायचे तर पाकिस्तानशी तुलना करता येईल. किर्गिजीस्थान या मध्य आशियाई देशात चालू असलेल्या संमेलनात पाकचे पंतप्रधान इम्रानखान ज्या दयनीय चेहर्‍याने वावरत आहेत, त्यापेक्षा इथे भारतात कॉग्रेसच्या नेत्यांची किंवा सोनिया प्रियंकांची स्थिती वेगळी आहे का? त्याला जबाबदार कोण आहे? थेट कॉग्रेस पक्ष त्याला जबाबदार नाही आणि काश्मिरात चाललेल्या अतिरेकालाही पाकिस्तान थेट जबाबदार नाही. पण तिथे ज्या उचापती होतात, त्याचे खापर पाकवर फ़ुटतेच ना? इथले तथाकथित विश्लेषक आणि तोयबाचे फ़िदायीन यात काय फ़रक आहे?

प्रत्येकवेळी काश्मिर वा भारतात कुठे अशा तोयबा किंवा मुजाहिदीनाने घातपात हिंसाचार केला, मग त्याची जबाबदारी पाकिस्तान झटकून टाकत असतो. नॉन स्टेट एक्टर अशी त्यांनी त्या आरोपींची विल्हेवाट लावलेली आहे. त्यातून भारतीय नागरिक व जवानांची हत्या होते. तो हिंसाचार पाकिस्तानच्या मदती्शिवाय होऊ शकत नाही, हे अवघ्या जगाला कळते. पाकने कितीही इन्कार केला, म्हणून सईद हाफ़ीज वा अझहर मसूद यांच्यावर जागतिक निर्बंध येण्याचे थांबलेले नाही आणि पाकची अर्थव्यवस्था डबघाईला जाण्यापासून रोखणे शक्य झालेले नाही. व्हायचे ते नुकसान पाकला होऊन गेलेले आहे. पण त्या सापळ्यातून बाहेर पडणे मात्र पाकनेत्यांना अजून साध्य झालेले नाही. नुसता इन्कार करून ते वेळ मारून नेत राहिले आहेत आणि पाकिस्तान अधिकच गाळात गेला आहे. त्यापेक्षा शतायुषी कॉग्रेस पक्षाची परिस्थिती कितीशी भिन्न आहे? आपले प्रवक्ते विविध वाहिन्यांवर न पाठवता विश्लेषक म्हणून पत्रकारांना पुढे करून कॉग्रेसने आपली अशी दुर्दशा करून घेतलेली आहे. त्यातून पळवाट म्हणून अधिकृत प्रवक्त्यांना बाजूला काढण्याने मोजक्या वाहिन्यांवरचे असे हास्यास्पद प्रकार थांबले असतील. पण व्यवहारात त्याही वाहिन्यांवर पोरकटपणाला मोकाट रान मिळालेले आहे. भाट पत्रकार किंवा कॉग्रेसचे खुळे समर्थन करण्यातून, अशा लोकांनी त्या पक्षाला सतत गाळात ढकलले आहे. त्यातून पक्षाची प्रतिमा खराब होत असते. जे कॉग्रेसचे आहे, तेच ममता, केजरीवाल किंवा इतर पक्षांच्याही बाबतीत झालेले आहे. काही उपटसुंभ पत्रकार कट्टर मोदीविरोधी आहेत आणि कसल्याही विषयात ते भाजपाच्या विरोधात भूमिका मांडताना, विरोधकांच्या चुकांचे समर्थन करतात. त्यातून त्या पक्षाची वाईट प्रतिमा जनतेसमोर जात असते आणि मग त्याची किंमत अशा पत्रकारांपेक्षा त्या पक्षाला मोजावी लागत असते. ममताही आता त्याच गाळात फ़सत चालल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीपासून किंवा त्याच्याही आधॊपासून ममतांनी हुकूमशाही प्रवृत्तीने कारभार हाकलेला आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालताना सीबीआयलाही विरोध करताना, त्यांची प्रतिमा अधिकाधिक मलीन होत गेली आणि त्याचे समर्थन त्यांच्या पक्षाच्या कोणा नेत्यापेक्षाही अशाच विश्लेषकांनी चालविले होते. आपल्या विरोधात कोणीही बोलला किंवा काहीही झाले; तरी त्याचे खापर भाजपाच्या माथी फ़ोडण्याचा अतिरेक ममतांनी केला. पण असे विश्लेषक त्याला उचलून धरत राहिले. हल्लीच कोलकात्याच्या कुठल्या मोठ्या इस्पितळात मृत रुग्णाच्या आप्तस्वकीयांनी डॉक्टरांना मारहाण केली. तर तिथे डॉक्टर मंडळींनी संप पुकारला. पण त्यांच्याकडे वळून नघायला ममतांना सवड मिळाली नाही आणि प्रकरण चिघळत गेले. तेव्हाही डॉक्टरांना चुचकारून शांत करता आले असते आणि त्यातली हवा निघून गेली असती. पण त्या डॉक्टरांच्या संपातही ममतांना भाजपाचे कारस्थान दिसले आणि तमाम विश्लेषक नावाच्या फ़िदायीन पत्रकारांनी ममतांच्या आक्रस्ताळेपणाचे समर्थन केले. त्यातून मग देशव्यापी डॉक्टरांनी संप पुकारला. यातली गंमत लक्षात घेतली पाहिजे. विश्लेषक म्हणूज सादर होणारे पत्रकार तसे कुठल्या पक्षाला बांधील नाहीत. पण भाजपा विरोधाच्या आहारी जाऊन अशा खुळेपणाचेही समर्थन होत राहिले. त्यातून वाहिन्यांच्या चर्चेत भाजपाच्या प्रवक्त्याला घेरण्याचे डावपेच खुप यशस्वी झाले. पण आजवर कधी माध्यमातील लुटुपुटूच्या संघर्षातून निवडणूका जिंकल्या वा हरल्या गेलेल्या नाहीत. काहीकाळ दिशाभूल जरूर होऊ शकते. पण जो हास्यास्पद देखावा तयार होतो, त्यातून विरोधकांचीच प्रतिमा हास्यास्पद होऊन गेली. म्हणूनच विरोधकांसाठी असे अनधिकृत वा फ़िदायीन प्रवक्ते घातक ठरलेले आहेत. कारण त्यांच्यामुळे त्या पक्षाला चार मते अधिकची मिळत नाहीत. पण असलेले सहानुभूतीदारही पांगतात. हेच तर पाकिस्तानचेही झालेले आहे.

गेल्या पाच वर्षात विविध वाहिन्या व माध्यमात अशा अनधिकृत प्रवक्त्यांची खुप गर्दी झाली. त्यांना कॉग्रेस किंवा विरोधकांनी नेमलेले नसेल किंवा त्यांनीच परस्पर आगावूपणा केलेला असेल. तर त्यांना रोखण्याचे कामही त्या त्या पक्षांनी करायला हवे होते. कारण असे लोकच त्या पक्षांचे अधिक नुकसान करीत होते. पण त्यातले फ़ायदे बघून हे पक्ष गप्प राहिले आणि आता त्यांची अवस्था पाकिस्तानसारखी होऊन गेलेली आहे. किंबहूना त्यांच्या अशा आगावूपणाने विरोधी पक्षातल्या अनेक गटांचा खरा अजेंडा व भूमिकाही लोकांसमोर येऊ शकल्या नाहीत. त्यातले फ़ायदे बघितले जातात, तेव्हाच त्यातला संभाव्य तोटाही लक्षात घ्यायला हवा असतो. परंतु त्याचे भान कोणाला होते? त्यातच पाच वर्षे कशी निघून गेली, त्याचे कोणाला भान राहिले नाही आणि निकालानंतर बहुतांश पक्षांना कोमात जाण्याची पाळी आलेली आहे. चुका झाकून ठेवल्या म्हणून त्याचे परिणाम संपत नसतात. संसद हे सर्वात मोठे व्यासपीठ असते आणि लोकशाहीची खरी लढाई तिथेच लढावी लागते. तिथेच कामकाज बंद पाडण्यातून विरोधक मोदी सरकारला मुक्त रान देत राहिले. पाकिस्तानने आपला विकास प्रगत्ती साधण्यासाठी कुठले प्रयत्न केले नाही आणि भारताला पाण्यात बघण्यामध्ये धन्यता मानली. भारताला डिवचण्यासाठी जिहादींना प्रोत्साहन दिले. त्यांचा उद्देश पाकिस्तानचा विकास असा कधीच नव्हता. त्यांचा धर्मांधतेचा अजेंडा ते पुढे रेटत राहिले आणि भारताची तारांबळ बघण्यात पाकिस्तानची पाच दशके खर्ची पडली. कॉग्रेस आणि विरोधकांना माध्यमातील अशा फ़िदायीन विश्लेषक प्रवक्त्यांनी खुश केले. पण किंमत किती मोठी मोजावी लागली आहे? आताही पाकिस्तान त्यांना आवरायला राजी नाही आणि कॉग्रेसही अशा अनधिकृत विश्लेषक प्रवक्ते मंडळींना रोखणार नसेल, तर काय होणार ते वेगळे सांगण्याची गरज नाही.

10 comments:

  1. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रकारांकडे पाठ फिरवली. हे किती योग्य आहे ते यावरून कळते.

    ReplyDelete
  2. उगी राहावे
    चाललंय ते चालू द्यावे
    येतील जेव्हा २ वरती
    अक्कल येईल हो पुरती

    ReplyDelete
  3. खरय भाउ योगेंद्र यादव नावचे असेच छुपे मोदीत्रस्त व काॅंगरेसी प्रवक्ते

    ReplyDelete
  4. घी देखा लेकीन बडगा नही देखा

    ReplyDelete
  5. All these fraud reporters may be planners by the channels or by BJP. For example Republic India where plan show always run by Arnab. The fraud reporters gets paid for such things. And Congress can't stop that.

    ReplyDelete
  6. आंतरराष्ट्रीय घडामोडी व राष्ट्रीय स्थिती याचा उत्तम मेळ साधला भाऊ,उत्तम विश्लेषण..जयहिंद!!

    ReplyDelete
  7. काँग्रेसने तयार केलेली ही तैनाती फौज सर्व मिडिया मद्धे आहे. पण भाजपने पूर्ण दुर्लक्ष करू नये

    ReplyDelete
  8. अभ्यासपूर्ण विश्लेषण.

    ReplyDelete
  9. भाऊ अतिशय समर्पक. मोडीजवर झालेल्या आजच्या मीडियाला आपण कुठल्या जगात राहतोय याचे भान नाहीये. त्यांच्याकडे आता निव्वळ करमणूक म्हणून पाहिले जातंय. राजदीप, बरखा, सागरिका, योगइन्द्र यादव, राविष या पासून गिरीश कुबेर, कुमार केतकर, राजीव खांडेकर, प्रसन्न जोशींपर्यंत सगळ्यांचे कॉमेडी शोज चालू आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मोदींनी फार चांगले काम केलंय. या देशविरोधी प्रवृत्तीना ठेवलेच पाहिजे

    ReplyDelete