Saturday, June 15, 2019

मुख्यमंत्री कसा नसावा



कुठल्याही लढाईत उतरताना आपले सर्वस्व पणाला लावायचे किंवा नाही, यावर रणनिती ठरवली जात असते. काही लढाया ह्या निव्वळ हुलकावणी म्हणून लढवल्या जात असतात. त्यातून शत्रूला दुबळे वा विकलांग करून आपल्या पातळीवर आणण्यापुरतीच लढाई योजलेली असते. अशा लढाईत आपले अस्तित्व धोक्यात येत असेल, तर शरणागती पत्करून तह स्विकारला जातो. किंबहूना आक्रमकच तहाचा प्रस्ताव देत असतो. त्यातून त्याला आपले अस्तित्व टिकवायचे असते. पुर्वजांनी त्यालाच सिर सलामत तो पगडी पचास, असे म्हणून ठेवलेले आहे. उलट जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि जिंकण्याची शक्यता अजिबात नसते, तेव्हा लढाईचा विचार करण्यापेक्षाही त्याच्याशी समझोता करून आपले राज्य टिकवण्याची तडजोड करावी लागते. पण जिथे निर्णायक विजय संपादन करायचा असतो, तिथे सर्वस्व गमावण्याच्या तयारीने उतरावे लागत असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वा भाजपा अशा निर्णायक लढाईत उतरणार, याची प्रत्येकाने खात्री बाळगली असती, तर त्यांच्या विरोधी असलेल्या गटांना आपण किती तयारीने उतरावे, त्याचे काही समिकरण मांडता आले असते. आताही लढाई सर्वस्वी हरल्यानंतर विरोधकांना, काय गमावले आणि भविष्य काय आहे, त्याचा अंदाज आलेला नाही. म्हणूनच एका बाजूला ममता आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत आणि मोदी-शहा त्यांच्या कामात अजिबात व्यत्यय आणताना दिसत नाहीत. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू गायब झाले आहेत आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉग्रेसला राहुल गांधी गर्तेत सोडून युरोपला विश्रांती घ्यायला निघून गेले आहेत. काही दिवसात संसदेचे अधिवेशन सुरू व्हायचे आहे. तेव्हा विरोधकांची भूमिका व रणनिती काय असेल, त्याचा थांगपत्ता कोणालाही नाही. मग त्यांच्याकडून कुठला भारतीय नागरिक, कसली अपेक्षा बाळगू शकतो? या अनिश्चीततेमध्येच विरोधकांचा पराभव किंवा मोदींचा विजय सामावलेला आहे.

एक साधे उदाहरण घ्या. निकाल लागल्यापासून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी इतक्या विचलीत झाल्या आहेत, की त्यांना तो पराभव समजूनही घेता आलेला नाही. सहाजिकच त्यावर मात करण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवलेला नाही. लोकशाही लोकांच्या मतांवर चालते आणि त्याच लोकांना चुचकारून मतेही मिळावता येत असतात. अधिकाधिक लोकांना खुश करून किमान लोकांचा रोष पत्कराणारा नेता लोकप्रिय होत असतो. ममता नेमक्या दुसर्‍या टोकाला धावत सुटलेल्या आहेत आणि कालपर्यंत त्यांचे समर्थन करणारेही त्यांना रोखायला पुढे आलेले दिसत नाहीत. भाजपाचा विरोध करताना ममता इतक्या भरकटल्या आहेत, की आता त्यांनी जो आपल्याला प्रश्न विचारील, त्या प्रत्येकाला भाजपावाला किंवा बंगालविरोधी ठरवण्यापर्यंत मजल मारलेली आहे. त्यातूनच मग त्यांनी संपकरी डॉक्टर्सशी पंगा घेतला आहे. एका वयोवॄद्ध रुग्णाचा इस्पितळात उपचार चालू असताना मृत्यू झाला आणि त्याच्या नातेवाईकांनी नंतर जमावाने येऊन त्या डॉक्टर्सवर प्राणघातक हल्ला चढवला. त्या हल्ल्याने बिथरलेल्या डोक्टर्सनी सुरक्षेची मागणी करीत लाक्षणिक संप पुकारला. आरोग्य जी सार्वजनिक सेवा असल्याने आधी त्या डॉक्टरांची समजूत घालणे, हे ममतांचे मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य होते. पण त्यांनी तीन दिवस उलटेपर्यंत त्याकडे ढुंकून बघितले नाही. रुग्णांची संख्या वाढत गेली आणि लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागल्यावर थेट इस्पितळात येऊन त्या डॉक्टरांचा धमकावण्यापर्यंत ताळतंत्र सोडले. त्यातून एका इस्पितळातला संप बंगालभर पसरला आणि ममतांनी नंतर घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेने तो देशव्यापी विषय होऊन गेला. असे विषय डोके ताळ्यावर ठेवून हाताळणार्‍याला शासनकर्ता म्हणतात. पण ममतांना त्याचा गंधही नसावा. अन्यथा त्यांनी रस्त्यावरल्या गुंडाप्रमाणे भाषा वा कृती करून स्थिती अधिक चिघळवली नसती.

चार तासात कामावर हजर व्हा, नाहीतर कामावरून हाकलून लावीन; ही मुख्यमंत्र्याला शोभणारी भाषा नाही. यातही ममतांची जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. त्याच मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. म्हणजेच डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची होतीच. पण आरोग्यखातेही त्यांच्याकडेच असल्याने त्यांच्या आक्रस्ताळेपणाला वेगळाच रंग चढला. याला निव्वळ राजकीय आत्महत्या म्हणता येईल. कारण महिनाभर आधीच झालेल्या मतदानात ममतांच्या अजिंक्य पक्षाने लोकप्रियता कमालीची गमावली आहे. त्यांच्या पक्षाला अधिक जागा मिळालेल्या असल्या तरी नवखा असून भाजपाने जवळपास तितक्याच तुल्यबळ जागा व मते मिळवलेली आहेत. आकड्यातच सांगायचे तर भाजपाने १२८ तर ममतांनी १५८ विधानसभा क्षेत्रात यश मिळवले आहे. म्हणजेच लोकमत ममतांच्या विरोधात जायला वेग आलेला आहे. त्यांची गुंडगिरी व दहशत असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात गुपचुप राहून लोक विरोधात मतदान करत असतील; तर अशा निकालानंतर दबलेला वर्ग अधिक वेगाने त्यांच्या विरोधी मतदानाला बाहेर पडणार आहे? अशा हातून निसटणार्‍या वर्गाला धमकावून वा दहशत घालून आपल्या बाजूला वळवता येणार नाही. तो वर्ग का दुरावला व कशामुळे आपण अप्रिय होत चाललो, त्याचा शोध घेऊन आपल्या वागण्यात सुधारणा आणाव्या लागतील. पण त्याच्या उलट ममता दिवसेदिवस अधिकच बेताल होत चालल्या आहेत. आपल्याला नावडते बोलणारा कोणीही त्यांना भाजपावाला वाटतो. किंवा नावडती घटना म्हण्जे कारस्थान वाटते. याला आत्महत्येची मानसिकता म्हणतात. हेच वर्षभरापुर्वी आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे झाले होते आणि ते मोदीविरोधी भूमिका घेताना कमालीचे भरकटत गेले. आज त्यांची दुर्दशा समोर असताना ममता त्याच वाटेने निघाल्या आहेत. समाजातील एक एक घटक त्या शत्रूच्या गोटात ढकलत चालल्या आहेत.

भाजपाला बंगालमध्ये ४० टक्के माते मिळालेली आहेत आणि ममतांना ४३ टक्के मतदाराने पसंती दिलेली आहे. अशावेळी प्रत्येक भाजपावाला किंवा समर्थक मतदाराला बंगालमधला उपरा ठरवून ममता कोणाला दुखवत आहेत? या ताज्या डॉक्टरांच्या संपात त्यांचा स्वत:चाच भाचाही उतरला आहे. तोही उपरा आहे असे ममतांना वाटते काय? कोलकात्याचे महापौर व ममतांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्याची मुलगीही डॉक्टर म्हणून संपत उतरली आहे. तिचे काय? दिदीला तीही उपरीच वाटते काय? हजारो डॉक्टर्स संपात उतरले असतील, तर त्यांना उपरे ठरवून ममतांनी कोणाच्या पायावर धोंडा पाडलेला आहे? आपल्याविषयी जनमानसात असलेली आपुलकी आस्था संपवण्याचा हा खेळ, राजकारणात चकीत करणारा म्हटला पाहिजे. कारण या एका खेळीतून ममतांनी भाजपाला निदान सहासात टक्के मतदानाचे अनुदानच देऊन टाकले म्हणावे लागेल. कारण आपल्या अशा वागण्यातून मागल्या दोन वर्षात ममतांनी मुख्यमंत्री वा सत्ताधीश कसा नसावा, याचीच साक्ष सातत्याने दिलेली आहे. कुठलेही तत्वज्ञान वा विचारसरणीशी सामान्य जनतेला कर्तव्य नसते. आपल्या नित्यजीवनात स्थैर्य सुरक्षा असावी, इतकीच किमान अपेक्षा मतदार बाळगत असतो. त्याची पदोपदी निराशा करण्यातून कोणी निवडणूका जिंकत नाही. लोकसभा मतदानाने तोच धडा ममतांना दिलेला आहे. पण त्यातून सावरण्यापेक्षा त्या आत्महत्येच्या दिशेने धावत सुटलेल्या वाटतात. आणखी दिड वर्षाने बंगालच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत आणि त्यात प्रचंड मोठ्या संख्येने व मतांनी पराभूत होण्याचीच त्यांची अपेक्षा असेल, तर त्या योग्य मार्गाने निघालेल्या आहेत. पण आपली सत्ता टिकवण्याची अपेक्षा असेल, तर मात्र त्यांनी चुकीच्या डावात आपले सर्वस्व पणाला लावले असेच म्हणावे लागेल. एक मात्र निश्चीत, मुख्यमंत्री कसा नसावा त्याचा वस्तुपाठ ममतांनी गेल्या वर्षभरात भारतीयांना सादर केला आहे.

7 comments:

  1. "लढाईत आपले अस्तित्व धोक्यात येत असेल, तर शरणागती पत्करून तह स्विकारला जातो. किंबहूना आक्रमकच तहाचा प्रस्ताव देत असतो. त्यातून त्याला आपले अस्तित्व टिकवायचे असते. पुर्वजांनी त्यालाच सिर सलामत तो पगडी पचास, असे म्हणून ठेवलेले आहे. उलट जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि जिंकण्याची शक्यता अजिबात नसते, तेव्हा लढाईचा विचार करण्यापेक्षाही त्याच्याशी समझोता करून आपले राज्य टिकवण्याची तडजोड करावी लागते. पण जिथे निर्णायक विजय संपादन करायचा असतो, तिथे सर्वस्व गमावण्याच्या तयारीने उतरावे लागत असते"
    यासाठी सलाम आपल्याला...
    अतिशय सोपं आणि महत्वाचे ज्ञान..

    ReplyDelete
    Replies
    1. हेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी केल्यासारखे वाटते

      Delete
    2. ठाकरे साहेबांनी अगदी शेवटच्या क्षणी धावत जाऊन मोदी एक्स्प्रेस पकडली।
      नाहीतर लोकसभेच्या रिकाम्या फलाटावर माश्या मारत बसायची वेळ आली असती!

      Delete
  2. कधी ना कधी व्यक्तीच खर रूप सर्वान समोर येतच.
    विनाश काले विपरत बुध्दी
    व्यक्तीला स्वताचा अंत दिसायला लागतो.तेव्हा रागावर नियंत्रण गमावून बसतो.त्यावेळी त्याला आपल्या विश्वासू व जवळच्या लोकांवर चा विश्वास उडतो.
    ममतादीदीचा हा उदामपणाचे रुपांतर उन्मादात झाले आहे. वन्यप्राणी जसा ह्याना मारू वकत नाही. त्यांचा अंत खर म्हणजे टाटाचा सिंगूर प्रकल्प राज्याच्या बाहेर काढला, त्याच वेळी होयला हवा होता.

    आताच्या निवडणुकीत बांगलादेश मधील खोटे मतदार घुसू शकले नाहीत.हेच त्रिपुरा च्या विधानसभा निवडणुकीत माणिक सरकारांच्या बाबतीत घडल होत.ह्याच सर्व श्रेय श्री. सुनिल देवधर ह्यां भाजप च्या कार्यकर्त्याला जात. ह्यांच व्यक्तीने आंध्रप्रदेशात पण प्रचार केला होता.

    ReplyDelete
  3. ममतांचा नंदीग्राम-सिंगुर क्षण?

    ReplyDelete
  4. बुडत्याचा पाय खोलात.

    ReplyDelete