Thursday, June 6, 2019

बंगालच्या वाघिणीला घाम फ़ुटला?

mamta ji shree ram के लिए इमेज परिणाम

लोकसभा निकालापासून बंगालमध्ये एक वेगळीच जुगलबंदी चाललेली आहे. भाजपा व मोदी बाजूला पडलेले असून, तिथल्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी मतदारांशी वा जनतेशीच दोन हात करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण बहुधा अशी प्रतिक्रीया भयातून उदभवलेली असते. आपल्या हातातून बंगाल निसटत चालल्याची भितीच ममतांना सतावत असल्याची चिन्हे त्यातून समोर येत आहेत. भारतात आजवर अनेक नेत्यांचे तमाशे जनतेने बघितलेले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने रस्त्यावर उतरून धरणे करणे, किंवा राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन उपोषणाचे नाटक रंगवणे; लोकांनी बघितले आहे. कधीकधी केजरीवालांना थोबाडण्याच्याही घटना झालेल्या आहेत. पण सामान्य नागरिक वा गावकर्‍यांशी रस्त्यावर येऊन भांडणारा मुख्यमंत्री ममतांनीच देशाला दाखवला. अर्थात प्रतिदिन अशा नाटकांची संख्या व प्रकारही वाढत चालले आहेत. निवडणूकीपुर्वी ममतांनी सीबीआयच्या पथकाला अटक केली आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ पोलिस आयुक्तांना सोबत घेऊन धरण्याचाही कार्यक्रम पार पाडला होता. मात्र त्याचा एकत्रित परिणाम मतदानावर होऊन त्यांच्या दहा जागा लोकसभेत कमी झाल्यावर त्यांना जाग आली आहे. पण गमावलेली लोकप्रियता पुन्हा कशी संपादन करावी, त्याचे काही सुटसुटीत उत्तर त्यांना मिळू शकलेले नाही. म्हणूनच मग दिदी सोप्या जादुकडे वळलेल्या आहेत. बंगाली जादू आपण ऐकलेली होती. पण दिदींनी बिहारी जादुगाराकडे पदर पसरला आहे. प्रशांत किशोर नावाच्या निवडणूक जादुगाराला त्यांनी साकडे घातल्याची बातमी ताजी आहे. २०१४ च्या लोकसभा निवड्णूकीत मोदींना मोठे यश मिळवून देणारा जादुगार; अशी या माणसाची ख्याती होती. त्याने इतरही जादू केल्या आहेत. पण अलिकडल्या काळात त्याची जादू राहुल गांधींनी संपवून दाखवली होती. ममता त्यालाच शरण गेलेल्या दिसतात.

लोकसभेनंतर मोदी व प्रशांत किशोर यांचे जमले नाही आणि ते भाजपापासून दुरावले होते. तेव्हा त्यांनी दिल्ली विधानसभेत केजरीवाल आणि बिहार विधानसभेमध्ये नितीशकुमार यांना मदत केली होती. त्या दोन्ही जागी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या भाजपाला धुळ चारून किशोर यांनी पराभूतांना यशस्वी करून दाखवले होते. म्हणून मग पंजाब विधानसभेसाठी अमरींदर सिंग यांनी प्रशांतला आमंत्रित केले. त्याची खबर लागल्यावर राहुलनीही त्यांच्यावरच उत्तरप्रदेश एकहाती जिंकून देण्य़ाची जबाबदारी टाकली होती. त्यापैकी अमरिंदर सिंगांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात किशोर यशस्वी झाला. पण उत्तरप्रदेशात राहुलने त्याला मातीमोल करून दाखवले. कारण जितक्या म्हणून नव्या कल्पना घेऊन प्रशांत किशोर डावपेच आखत होता, ते उधळण्याचे काम राहुलने छानपैकी पार पाडले. अखेरीस उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाला प्रचंड बहूमत मिळूनच विषय संपला. त्याचे कारण कल्पना चुकलेल्या नव्हत्या. राहुलने प्रशांतचॊ प्रत्येक कल्पना मोडूनतोडून वापरली आणि त्यातून प्रशांतची प्रतिष्ठा धुळीस मिळवून दाखवली. मात्र अमरिंदर सिंग यांनी प्रशांतचा प्रत्येक शब्द मानला आणि त्यांना यश मिळाले. त्यांनाच कशाला अगदी ताज्या निवडणूकीत प्रशांतने आंध्राचा तरूण नेता जगनमोहन रेड्डी याच्या पक्षाचे निवडणूक कंत्राट घेतलेले होते आणि त्याला प्रचंड बहूमताने यशस्वी करून दाखवले आहे. आता म्हणूनच ममतांनी त्याला आमंत्रित केले होते. आपल्या पुतण्यासह त्यांनी दोन तास प्रशांतशी खलबते केल्याची बातमी आहे. याचा अर्थ आगामी दिड वर्षात होणार्‍या विधानसभा निवडणूका आपल्या बळावर व आपल्याच अकलेने जिंकण्याची खात्री दिदीला उरलेली नसावी. असे काम अन्य कुणावर सोपवण्यात गैर काहीच नाही. आजकाल सगळेच पक्ष अशी व्यावसायिकांची प्रचारामध्ये मदत घेत असतात. मग दिदीचे तरी काय चुकले? फ़क्त त्यात एक मोक्याची अडचण ममता कशी दुर करणार, हा प्रश्न आहे.

प्रशांत किशोर याला राहुल गांधींनी उत्तरप्रदेशसाठी मदतीला घेतले, तेव्हाच अशी शंका मी जाहिरपणे व्यक्त केलेली होती. प्रशांत किशोर हा कोणी पक्ष कार्यकर्ता किंवा हुकूमाच ताबेदार गुलाम नाही. तो कुणाची हांजी हांजी करीत सलाम ठोकणारा नाही. तो रणनिती व डावपेच आखणारा बुद्धीमान माणूस आहे आणि त्याला सल्लागार केले, तर निदान त्याचे काही ऐकून तसे वागावे लागेल. तिथे आपले अहंकार व प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्याच्या कुशलतेला शरण जाणे भाग असते. त्याचे दोष काढून वा त्याला मुर्ख ठरवून त्याचा उपयोग करून घेता येणार नाही. तो गुलाम नबी आझाद नाही किंवा सुरजेवालाही नाही. झालेही तसेच. प्रशांतने नवनव्या कल्पना काढल्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याची प्रत्येक कल्पना उधळून लावण्यापेक्षा राहुलने दुसरे काही केले नाही. राहुलच्या मनमानीने प्रशांत किशोरची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाली. मग तोच नियम ममता दिदीला लागू होत नाही काय? ममतांची एक मोठी समस्या अशी आहे, की त्यांना सगळी जगभरची अक्कल आपल्यापाशीच साठली असल्याच्या भ्रमाने भारावून टाकलेले आहे. सहाजिकच त्यांना कोणी सल्ला देऊ शकत नाही आणि होयबांचीच गर्दी त्यांना सभोवती आवडत असते. प्रशांत किशोर त्या पठडीत बसणारा नाही, किंवा कामही करू शकणारा गृहस्थ नाही. मग दिदी व प्रशांत यांचे जुळायचे कसे? म्हणजे अमूक बाबतीत बोलू नका, संयम राखा किंवा अमूकच बोला; असे बंधन प्रशांतने घातले तर दिदी ऐकून घेणार आहेत काय? की प्रशांतवरच खेकसून त्याला गप्प करणार आहेत? तसे केल्यास प्रशांतच्या कुठल्याही कल्पनांचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होऊ शकणार नाही. ममता निवडणूक हरतील आणि दरम्यान प्रशांतची प्रतिष्ठा आणखी एकदा जमिनदोस्त होऊन जाईल. पण त्याची गरज ममतांना कशाला भासली आहे? दिदी इतकी भरकटलेली कशाला आहे?

लोकसभा निवडणूक निकालांनी ममतांना भयभीत करून टाकलेले आहे. सिंगुर आंदोलनानंतर एकदम प्रकाशझोतात आलेल्या ममतांकडे सामान्य लोक गरीबांचा आवाज म्हणून बघु लागले. तोपर्यंत डाव्या आघाडीची सत्ता आणि दादागिरीही डाव्यांचीच. त्यातून लोकांना मुक्ती हवी होती. पण लढायची हिंमत कुठल्या अन्य पक्षात किंवा नेत्यात नव्हती. सिंगुरच्या धरण्यातून ममता दिदीने ती हिंमत दाखवली. त्यांनी गावातच धरणे धरले आणि डाव्या गुंडगिरीला घाबरत नसल्याचे सिद्ध केले. त्याखेरीज बंगालमधील सत्तेची हुकूमत त्यांनी झुगारून दाखवली होती. म्हणून लोक त्यांच्याकडे वळले आणि पुढल्या निवडणूका जिंकत दिदी मुख्यमंत्री झाल्या. पण हळुहळू त्यांचा पक्षच त्या गुंडगिरीला शरण गेला आणि आज डाव्यांची गुंडगिरी बरी म्हणायची पाळी ममतांनी आणली. त्यांच्याशी दोन हात करायला कॉग्रेस किंवा डावे पक्षही पुढे आले नाहीत. तेव्हा भाजपाने ती जागा घेतली आणि त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात पडलेले आहे. प्रशांत किशोरशिवाय ममतांनी दोन लोकसभा विधानसभा जिंकल्या होत्या. त्यांना आजच अशा कुणा चाणक्याची गरज कशाला भासलेली आहे? तर बंगालमधील भाजपाच्या आकस्मिक विजयाने त्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यातच गल्लोगल्ली व गावागावात त्यांना भाजपाच्या ‘श्रीराम’ घोषणा ऐकायला मिळत असल्याने विधानसभेतील पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यातून सावरण्यासाठी त्यांना कुणी प्रेषित हवा, म्हणून त्यांनी प्रशांत किशोरची भेट घेतलेली आहे. त्यांना तो उपयुक्तही ठरू शकेल. पण सवाल काही पथ्ये पाळण्याचा आहे. संयम बाळगणे व उतावळेपणाने डोक्यात राख घालून न घेणे, ह्या अटी आहेत. त्या दिदीला समजावणार कोण आणि त्यांना नियंत्रणात ठेवणार कोण? मध्यंतरी आठदहा दिवसात त्यांनी आपण बेफ़ाम किती होऊ शकतो, हे चित्रणातून दाखवून दिले आहे. त्यातून त्यांना प्रशांत किशोर कसा बाहेर काढणार आहे? त्या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार नसली तरी प्रशांत किशोरच्या भेटीतून एक गोष्ट साफ़ झाली. बंगालच्या या वाघिणीला घाम फ़ुटला आहे.

9 comments:

  1. केवळ प्रशांत किशोर याच्याचमूळे नरेंद्र मोदी निवडून आले असे नाही. एका टीममधील तो सभासद होता. त्यावेळी इतर सभासदांनी वापरलेल्या युक्त्या त्याने बघितल्या. त्यावरून तो इतर ठिकाणी उपदेश करत आहे. त्या कुठे वापरायच्या कुठे नाही याचे ज्ञानही त्याला नसावे. त्यामूळे नरेंद्र मोदी, लालू प्रसाद, नितीश सिंग, अमरिंदर सिंग वगैरे कोणीही त्याला श्रेय देत नाही आणि परत नेमत नाही.

    यात प्रशांत किशोरची काळजी वाटते. कारण यावेळी त्याचे गिर्‍हाहिक ममता बॅनर्जीसारखी क्रूर पाताळयंत्री आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. या निवडणुकीत किशोर जर ममताबरोबर गेला तर त्याचा बोऱ्या वाजणार आहे

      Delete
  2. मंडळी.....

    भाऊ भवीष्यवाणी करतात तेव्हा बर्याच जनांना याचा अंदाज येत नाही..
    ममतांचे पुढे काय होईल? त्या सत्तेत राहतील का? प्रशांत किशोरांचा प्रभाव पडेल का? बंगाल मधे मोदी शाहा भाजपा जिंकेल का? बंगाली मतदारांचा नंमका कल काय आहे? जनमानस जानते नेते का समजु शकत नाहीत? या आणी अश्या अनेक प्रश्नांची बरीच स्पष्ट ऊत्तरे भाऊंनी दीली आहेत व या पुढच्या लेखात ती जास्त खोलवर व सुस्पष्ट पणे येतीलच...

    लेखाल पायाचा लेख समजुन पुढे ममतां वर येनारे लेख जपुन ठेवलेत तर बंगाल विघान सभेच्या निकालाच्या दिवशी तुम्हांला अनेक गोष्टींची प्रचेती येईल.... गरज आहे ती चीकाटीने भाऊंचा पाठलाग करायची ....

    ReplyDelete
  3. भाऊ या अति शहण्यामध्ये एक रघूराम राजन होते. त्यांचे देशाचे अर्थमंत्री चे स्वप्ने होते. त्या बद्दल थोडी माहिती द्या. निवडणूक पुर्वी हे सर्वत्र ज्ञान पाजत होते. निकाल लागल्यावर गायब झाले आहे

    ReplyDelete
  4. प्रशांत किशोर हा प्रचंड ओव्हरहाईप्ड माणूस आहे असे वाटते. एखाद्याचे नशीब फळफळले की त्याला वारेमाप प्रसिध्दी मिळत जाते त्यातला तो एक प्रकार आहे. त्याने आतापर्यंत जे काही यश मिळविले ते जिंकणाऱ्या घोड्यांवर पैसे लावले म्हणूनच मिळविले. २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या प्रचारात प्रशांत किशोरचे नाव सगळ्यात पहिल्यांदा पुढे आले. पण ती निवडणुक मोदी प्रशांत किशोरच्या मदतीशिवायही जिंकले असतेच. २०१४ मध्ये मोदी बहुमत मिळविणार हे भाकित भाऊ सारख्या थोड्या अभ्यासकांनी केले होतेच. त्यात प्रशांत किशोर फॅक्टरचा किती हातभार होता? प्रशांत किशोरला भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी हवी होती पण ती मिळाली नाही म्हणून तो मोदींना सोडून गेला. तो जर इतका प्रभावशाली आणि उपयुक्त असता तर त्याला असेच सोडून द्यायला मोदी-शहा इतके अपरिपक्व आहेत का? त्याचा फार उपयोग झाला नाही तेव्हा त्याला उगीच का राज्यसभेत पाठवा म्हणून मोदी-शहांनी त्याला दाद लागू दिली नाही. पण २०१४ मध्ये निकाल आल्यावर ती मोदी लाट नसून प्रशांत किशोर लाट होती अशाप्रकारे अनेक पत्रकार लिहायला लागले. जर प्रशांत किशोर इतका प्रभाव राखून होता तर तो मोदींना पंतप्रधान व्हायला मदत का करायला जाईल? स्वत:च तीनशे सीट काढून पंतप्रधान नाही का व्हायचा हा प्रश्न कोणालाही पडला नाही. पुढे २०१५ मध्ये बिहारमध्ये जदयु-राजद युती झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे नितीश कुमार हा लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्याने त्या युतीने विजय मिळविला. परत एकदा प्रशांत किशोरने जिंकणाऱ्या घोड्यावर पैज लावली. तीच गोष्ट २०१७ मध्ये पंजाबची. त्यापूर्वीची दहा वर्षे बादल पितापुत्रांनी घातलेल्या धुमाकूळामुळे त्यांचा पराभव होणे क्रमप्राप्त होते. सुरवातीला केजरीवालांचा आआप हा एक पर्याय म्ह्णून पुढे येत आहे हे चित्र होते. पण केजरीवालांनी दिल्लीत केलेल्या मर्कटचाळ्यांमुळे तो पण पर्याय गेला. मग अमरिंदरसिंग यांनी मोठा विजय मिळविला यात आश्चर्य कोणते होते? तसा विजय त्यांनी प्रशांत किशोरच्या मदतीशिवायही मिळविला असताच. प्रशांत किशोर जर जादूगार असते तर उत्तर प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवून द्यायला हवा होता. पण त्याला तसे करता आले नाही. २०२१ मध्ये ममतांचा बंगालमध्ये पराभव होईल निदान मागच्या वेळेइतकी निवडणूक सोपी नक्कीच जाणार नाही असे आताचे चित्र आहे. मधल्या दोन वर्षात परिस्थिती कशी बदलते, ममता किती आणि कसा आक्रस्ताळेपणा करतात, मोदींच्या कारभारावर नाराजी वाढते का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. प्रशांत किशोर नक्की काय जादू करणार आहे?

    ReplyDelete
  5. महेश लोणेJune 7, 2019 at 3:38 AM

    ममता बॅॅॅॅनर्जी यांचा स्वभाव लक्षात घेता, प्रशांत किशोरांचा प्रभाव पडेल का? याचे उत्तर नियतीच देवू शकेल...
    खूप सुंदर लेख..��

    ReplyDelete
  6. जय श्री राम म्हटले तरी ही बया भूं भूं.... करत लोकांनवर धाऊन जाते.. प्रशांत चा पण काई खर नाही....������

    ReplyDelete
  7. Bhau
    Such hypothetic explanation not expected from you. In punjab BJP list as public opinion was totally against Shiromani Akali Dal and Bjp has to pay prize for that. In recent loksabha election also there was same scenario.

    In Bihar Prashant kishore Has joined JD secular as Amit shah asked nitish twice to gave him a position in his party. Afterwards you see Nitish got separated from Lalu n joined hand with Bjp.

    In recent elections also there is say in inner circle that Amit shah sent Prashant to help Jagan to win against chandra Babu. Now chandra babu is zero in aandhra n Bjp will occupy that space there.

    So in short He is working with Amit shah. So dont mislead your readers. Again any such man dont have capacity to turn the game completely. He is facilitator. Apart from this there r n no. of factors to play a role.

    So expext you to give the inside stories than such hypothetic analysis.

    ReplyDelete
  8. I think Modi and Shaha have their own strategies and own plans and they constantly keep assessing the ground reality and take out new new weapons from their stock.. they do it right from the day they get into the government.. they work to win the elections for 5 years.. they don't need Prashant Kishore to plan their campaign. The only architects of BJPs victory are Modi and Shaha.. If the opposition understands what they do, they will change their strategies.
    They are like Raj Kapoor films. He used to have something for each section of the society, good music, good lyrics, good singers, sexy heroins, romantic scenes, sexy dresses, dialogues But there used to be a very strong and good message for the society. Similarly they have given toilets, cooking gas, electricity, income tax exemption, Padma awards to the gems from the common people, roads, ports, loans, better services, surgical strikes, air strikes, medicines, insurance, subsidies and a very strong message that Indians are safe and secured under his leadership.
    He will repeat it now.
    Prashant Kishor can manage the campaign but he can not build a strong network of party workers and supporters by getting involved for just a few months before the elections. For that each party needs people like Modi and Shaha

    ReplyDelete