Thursday, August 1, 2019

यशवंतरावांची मेगाभरती

भाजपातील मेगाभरतीच्या निमीत्ताने  (२)

Image result for chagan bhujbal

अन्य राज्यात जसे सोशल इंजिनियरींगचे राजकीय पक्ष १९५० नंतरच्या काळात उभे रहात गेले, तसाच शेकाप महाराष्ट्रातला बहुजनांचा होऊ शकणारा पक्ष होता. थोडा मार्क्सवादी व बहुतांश मराठा कुणबीवादी; असे त्याचे स्वरूप होते. त्यातल्या बहुतांश नेत्यांना किंवा त्यांच्या मुलांना कॉग्रेसमध्ये सामावून घेताना यशवंतरावांनी शेकापची वाढ कधी होऊ दिली नाही. तीच कथा रिपब्लिकन पक्षाची सांगता येईल. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्या दलित चळवळीला कोणी एकमुखी नेता राहिला नाही्. ज्यांची कुवत होती, त्यांना अन्य कुणाला समान अधिकाराने वागवण्याची सुबुद्धी कधीच झाली नाही. त्यामुळे १९५७ नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे नेते तितके पक्ष, अशी स्थिती होत गेली. प्रत्येकाच्या पाठीशी काही अनुयायी होते. पण एकजुट मात्र अजिबात नव्हती. एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा त्यांच्यापाशी कुठला कार्यक्रम नव्हता. त्याचाच लाभ उठवित कॉग्रेसने त्या पक्षातल्या हुशार गुणी नेत्यांना कॉग्रेसमध्ये सत्तापदाची आमिषे दाखवून आणले. तो पक्ष व चळवळ दोन्ही खच्ची होतील, याची पुरेपुर काळजी घेतली. संयुक्त महाराष्ट्र समितीचा घटकपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाने १९५७ सालात चांगले दणदणित यश मिळवलेले होते. किंबहूना महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या बिगर कॉग्रेस खासदारांमध्ये लक्षणिय आकडा रिपब्लिकन पक्षाचा होता. महाराष्ट्र किंवा तात्कालीन मुंबई विधानसभेत विरोधी नेता म्हणून रिपब्लिकन नेते प्रा. रा. धों. भंडारे यांनी आपली कारकिर्द गाजवलेली होती. पण लौकरच भंडारे कॉग्रेसमध्ये गेले आणि अनेक रिपब्लिकन नेतेही त्यांच्याच वाटेने जात राहिले. हेच शेकापच्याही बाबतीत झालेले होते. त्यामुळे कॉग्रेसला चांगले गुणी नेते मिळत गेले आणि विरोधाची धार बोथट होत गेली. आज दुसर्‍या पक्षातले कोणी भाजपात गेल्यास फ़ोडाफ़ोडीचा आरोप प्रच्छन्नपणे होतो. तो करणार्‍यांना इतिहास अजिबात ठाऊक नसावा.

जी कहाणी रिपब्लिकन व शेकापची होती, तीच कम्युनिस्ट व समाजवादी पक्षांची होती. आधीचे दोन पक्ष तुलनेने ग्रामिण भागातले होते आणि नंतरचे शहरी जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे मानता येतील. त्यांचा प्रभाव प्रामुख्याने कष्टकरी व कामगार भागात होता. समाजवाद मुळातच औद्योगिक क्रांतीच्या उदयातून जन्माला आलेला विषय किंवा विचार असल्याने, जिथे म्हणून औद्योगिकीकरण झाले होते किंवा चाललेले होते, तिथे त्याच कामगारधार्जिण्या पक्षांचा प्रभाव स्वाभाविक होता. समाजवादी व कम्युनिस्ट हे समान पुर्वजाचे वंशज असले, तरी त्यांच्यात एक किंचीत फ़रक त्या काळात तरी होता. समाजवादी लोकशाही मानणारे तर कम्युनिस्ट मजूर वर्गाची हुकूमशाही आणणारी एकपक्षीय लोकशाही मानणारे होते. म्हणूनच दोघेही भांडवलशाहीचे कट्टर विरोधक असले तरी त्यांच्यातून लोकशाही बाबतीत विस्तव जात नव्हता. म्हणून तर अनेकदा आघाडीचे राजकारण झाले किंवा निवडणूका लढवल्या गेल्या, त्याच्या नरडीला नख लावण्याचे काम याच दोन्ही पक्षांकडून झालेले आहे. आजपर्यंत या दोन्ही राजकीय गटांनी आघाड्यांचे शेकड्यांनी प्रयोग केलेत. पण त्यांनीच त्यात मोडताही घातलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती असो किंवा काही वर्षापुर्वी युपीए सरकार मोडण्यासाठी घेतलेला पुढाकार असो, कम्युनिस्ट किंवा समाजवादी नेत्यांचा त्यातला पुढाकार इतिहासाने नोंदवून ठेवलेला आहे. मुंबई किंवा नंतरच्या काळातला महाराष्ट्र हे वेगाने औद्योगिकीकरण होणारे देशातले एकमेव राज्य होते. म्हणूनच इथे कम्युनिस्ट व समाजवादी यांचा राजकीय प्रभाव औद्योगिक व शहरी भागामध्ये चांगला होता. सहाजिकच कॉग्रेस समोरचे महाराष्ट्रातले तेही मोठे आव्हान होते. परिणामी यशवंतरावांच्या कालखंडात किंवा नंतरही बराच काळ, याही दोन शहरी पक्षांची पाळेमुळे रुजू देण्यात व्यत्यय आणण्याने कॉग्रेसला निश्चींतपणे निवडणूका जिंकणे शक्य झालेले होते. 

सांगायचा मुद्दा इतकाच, की स्वातंत्र्योत्तर कालखंडात पहिली ४५ वर्षे कॉग्रेसला खरेखुरे राजकीय आव्हान कधी उभे राहिले नाही. १९७७ सालात आणिबाणीनंतर झाल्या त्या निवडणूकांत, महाराष्ट्रात कॉग्रेसला लोकसभेच्या मतदानात मोठा फ़टका बसला होता. ४८ पैकी २८ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या. त्याला सर्वपक्षांनी एकत्र येऊन दिलेली लढत कारणीभूत होती. त्यामध्ये विविध विरोधी पक्षांचे योगदान बघितले तरी तेव्हाचा जनसंघ किंवा आजचा भाजपा किती नगण्य राजकीय शक्ती होती, याचा अंदाज येऊ शकतो. २८ बिगर कॉग्रेसी खासदार लोकसभेत १९७७ सालात पोहोचले, त्यातले सात शेकापचे होते आणि तीन मार्क्सवादी पक्षाचे होते. एक रिपब्लिकन कांबळे गटाचा होता. म्हणजे २८ पैकी १० खासदार कट्टर मार्क्सवादी विचारांचे होते. त्यात पुन्हा मुळच्या समाजवादी खासदारांची संख्या घातली तर महाराष्ट्रामध्ये डावे राजकारण किती जुने व प्रभावी होते, त्याचा अंदाज येऊ शकतो. तुलनेने जनता पक्षात सहभागी असूनही जनसंघ वा भाजपा किती नगण्य पक्ष होता, तेही समजू शकेल. पण त्याच जनसंघाला बाहेर ठेवून डाव्या पुरोगामी पक्षांना कॉग्रेसला आव्हान उभे करता आलेले नव्हते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, एसेम जोशी असे एकाहून एक दिग्गज विरोधी नेते तेव्हा बिगर कॉग्रेसी राजकारण हाताळत होते. पण कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याचा विचारही त्यापैकी कोणाला मनाला शिवला नाही. किंबहूना कॉग्रेसला कधी तशी भितीही वाटली नाही. अगदी १९६७ साली नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली, तेव्हाही महाराष्ट्रातले कॉग्रेस नेतृत्व निर्धास्त होते. त्याला कधी विरोधी पक्ष आपली सत्ता हिरावून घेईल, असे स्वप्नातही वाटले नाही. अडीचशे ते २८८ इतक्या विधानसभेच्या जागांपैकी दोनशे जागा कॉग्रेस पक्ष आरामात जिंकत होती आणि विरोधकांना आपापल्या बेटवजा बालेकिल्ल्यात यश मिळाले तरी खुप मोठे वाटायचे. इतका इथे कॉग्रेसचा भक्कम बुरूज होता. 

त्याचे खरे रहस्य पक्ष संघटना किंवा कॉग्रेसचे प्रभावशाली नेतृत्व असे अजिबात नव्हते. कॉग्रेसची सर्व शक्ती दुबळ्या विरोधी पक्षात सामावलेली होती. किंबहूना विरोधी पक्ष दुबळे ठेवून त्यांना खेळवणे, हे महाराष्ट्रातील कॉग्रेससाठीचे खरे राजकारण होते. ज्या जुन्या दिग्गज नेत्यांची नावे वरती घेतलेली आहेत, त्यांच्या भाषणांनी किंवा वक्तव्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघेल, अशीच त्या कालखंडातली स्थिती होती. पण योगायोग असा, की त्यापैकी कोणाही विरोधी नेत्याने कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करून राज्यातली सत्ता हाती घेण्याची भाषा कधीच केली नाही की वापरली नाही. कॉग्रेस भ्रष्ट व नालायक पक्ष असल्याची सडेतोड टिका यापैकी अनेक नेत्यांनी सातत्याने केलेली असली, तरी आम्हाला सत्ता द्या आणि बघा, उत्तम सरकार कसे चालवतो, असे कोणी कधी म्हटले नाही. परिणाम असा होता, की नेते दिग्गज होते, पण त्यात कोणी पर्यायी सत्ताधीश व्हायचा विचारही करणारा नव्हता. जणू प्रत्येक विरोधी पक्ष किंवा नेता आपापल्या छोट्या बालेकिल्ल्यातील पक्ष किंवा जागा जिंकण्याचाच विचार करून समाधानी होते. जनतेला पर्याय लागतो, असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला का नाही? हा खरा प्रश्न आहे. कदाचित यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक किंवा वसंतराव दादा अशा दिग्गज कॉग्रेस नेत्यांनी विरोधकांना आपल्या जागी खुश ठेवण्याची काळजी घेतली असावी. दुसरीकडे पर्यायी राजकीय पक्ष वा संघटना उभीच राहू नये, अशी पक्की व्यवस्था करून ठेवलेली होती. म्हणूनच खराखुरा बिगर कॉग्रेसी पक्ष किंवा सरकार सत्तेत यायला १९९५ साल उजाडले. किंबहूना १९९० पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉग्रेसच्या सत्तेला आव्हान देऊ शकेल, असा पक्षच नव्हता आणि असला तरी त्याने कधी तशी भाषा वापरली नाही किंवा प्रयत्नही केलेला नव्हता. अगदी १९७८ सालात जनता लाट असतानाही कॉग्रेसला पर्याय उभा राहिला, तोही कॉग्रेसीच होता.  (अपुर्ण)
(आगामी पुस्तकातून)

9 comments:

 1. बर झाल हा इतिहास सांगितलात.काॅंगरेसने काय केलय ते कळाल तरी.

  ReplyDelete
 2. फार छान विश्लेषण. महाराष्ट्रातील कांग्रेस विरोधी पक्षांची परिस्थिती योग्य सांगितली आहे।धन्यवाद

  ReplyDelete
 3. माझा अगदी साधा भाबडा प्रश्न. भाजप मध्ये असा कुठला खड्डा पडलाय की बाहेरचा कचरा भरताहेत?

  ReplyDelete
 4. महाराष्ट्राचा राजकिय इतिहास वाचायला भाऊ खूप आनंद वाटतो.

  ReplyDelete
 5. स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेसनंतरचा पक्ष एकत्रीत कम्युनिस्ट फक्ष होता. महाराष्ट्रात कित्येक वर्षे काँग्रेसनंतरचा म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असा शेतकरी कामकरी पक्ष होथा. महाराष्ट्रात शेतकरी कामकरी पक्ष इणि रिपब्लिकन पक्ष यांच्या नेत्यांना आलोभने देऊन काँग्रेसने विकत घेतले आणि संपवले. समाजवादी पक्ष आणि प्रजा समाजवादी पक्ष यांच्या बहुतांशी नेत्यांच्या बाबतीत तेच झाले. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक हा काँग्रेसहून मोठा प्रश्न होता. त्यातल्या नेत्यांना विकत घेतले आणि संपवले. काँग्रेसला दुसऱ्यांवर विकत घेण्याचा आरोप करण्याचा अधिकार नाही.

  ReplyDelete
 6. उत्तम माहिती, भाऊ

  ReplyDelete
 7. Bhau...tumhi RTI var je chal le aahe tya baddal kahi liha....

  ReplyDelete
 8. भाऊ, पुस्तकाची वाट आतुरतेने पहात आहे.

  ReplyDelete
 9. गांधीहत्त्येमुळे जनसंघ / भाजपाला जनाधार मिळवायला खूप वेळ लागला.

  ReplyDelete